Dryfruit Kulfi at Home Recipe: दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. दुपारी तर घरात फॅन कितीही फास्ट केला तरी घाम काही कमी होत नाही. अशावेळी मस्त काहीतरी गारेगार खायला मिळावं अशी अनेकांची इच्छा असते, तुमचीही असेल ना? नेमक्या याच वेळी बाहेर बर्फाचा गोळा, कुल्फीवाला येतो पण सध्या आजार पसरत असताना स्वच्छतेची खात्री नसलेले बाहेरचे पदार्थ कसे खायचे हा ही प्रश्न असतोच ना. आज तुमची ही चिंता आम्ही दूर करणार आहोत. सुक्यामेव्याची चविष्ट कुल्फी बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी आता आपण पाहणार आहोत. चला तर मग,,,
ड्रायफ्रुट कुल्फी रेसिपी
साहित्य
१/२ कप कंडेन्स्ड मिल्क
२ कप दूध (उकळलेले)
सुका मेवा (पर्यायी)
कृती
एका पॅनमध्ये कंडेन्स्ड मिल्क काढून घ्या, गॅसची आच मंद ठेवा. यात २ कप दूध घालून थोडी उकळ येऊ द्या. मग यात सुका मेवा व उपलब्ध असल्यास (आवडीनुसार) केशर टाका. तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसल्यास सध्या ग्लासमध्ये तुम्ही हे मिश्रण ओतून घ्या व फ्रीजरमध्ये ठेवा. रात्रभर कुल्फी फ्रीज होऊ द्या व दुसऱ्या दिवशी दुपारी उन्हाचा उकाडा वाढत असताना छान कुल्फीचा आनंद घ्या.
टीप: कुल्फी मिश्रण मोल्डमध्ये टाकण्याआधी थंड करा. जर कुल्फी साच्यातून बाहेर येत नसेल तर मोल्ड/ग्लास सामान्य पाण्यात थोडावेळ ठेवल्यास ती सहज बाहेर येते.