Lachha Paratha Recipe For Tifin : मुलांना टिफीनवर एकच एक भाजी देऊन कंटाळला असाल तर तुम्ही काही हटके पदार्थ देऊ शकता. सकाळी खूप धावपळ असते अशात अगदी कमी वेळेत कोणता पदार्थ तुम्ही मुलांवर टिफीनवर देऊ शकता? या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये महिला सांगते, “दररोज उठून मुलांना टिफीनला काय द्यायचं, जे की हेल्दी असेल, टेस्टी असेल, झटपट होणारं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलं सुद्धा आवडीने खातील, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे.
आज आपण बघणार आहोत, सकाळच्या घाईगडबडीत अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे खमंग, खुसखूशीत मसालेदार लच्छे पराठे.
एका मोठ्या बाउलमध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्या. चार पराठे करायचे आहे. त्यासाठी दोन वाट्या पीठ घेतले आहे. त्यात चवीनुसार मीठ घाला आणि नेहमीप्रमाणे जशी आपण कणीक भिजवतो तशी आपण कणीक भिजवून घ्यावी. कणीक भिजवल्यानंतर त्यावर दहा मिनिटे झाकण ठेवा.
तोपर्यंत मसाले मिक्स करून घ्या.अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा ओवा आणि जिऱ्याची पूड. त्यात मीठ घाला आणि हे सर्व मसाले एकत्र करा.
मळलेली कणिकेचे एकसारखे गोळे करा. एक गोळा घ्या आणि पीठ लावून त्याची पातळ पोळी लाटून घ्या. त्या पोळीवर अर्धा चमचा तूप लावा. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता आणि त्यावर मसाला टाका. हा मसाला एकसारखा पोळीवर पसरवून घ्या. त्यावर थोडं गव्हाचं पीठ सुद्धा फिरवून घ्या. म्हणजे याच्या लेअर्स आहेत त्या छान मोकळ्या होतात.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, ही पोळी छान फोल्ड करून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण साडीच्या प्लेट्स करतो, त्यापद्धतीने हे मी फोल्ड करून घेते. संपूर्ण पोळी ही फोल्ड करून घ्यायची आहे. जी मसाल्याची बाजू आहे ती वर ठेवली आहे आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे याचा रोल तयार करायचा आहे आणि शेवटचं जे टोक आहे, ते व्यवस्थित प्रेस करून सिक्युअर करून घ्यायचं. बाकीचे गोळे असेच तयार करून घ्यायचे.
त्यानंतर थोडं पीठ घेऊन हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. थोडा जाडसर असा हा पराठा लाटून घ्या.
तवा गरम करा. त्या गरम तव्यावर हा पराठा भाजून घ्या. नीट भाजल्यानंतर त्यावर तूप लावा. तुम्ही तेलाचा वापर करू शकता. तूप लावून तुम्ही हा पराठा मस्त भाजून घ्या.
सर्व पराठे झाले की रुमालावर ठेवून सर्व पराठे दाबून घ्यायचे आहे. त्यामुळे याच्या ज्या लेअर्स आहेत, त्या मोकळ्या होतात. अशाप्रकारे गव्हाच्या पिठाचा मसाला लच्छा पराठे तयार होतील.
तुम्ही हे पराठे दही, लोणचं किंवा मग एखादी चटणी किंवा असं काही नसेल तर एखाद्या भाजीबरोबर मुलांना टिफीनवर देऊ शकता.
पाहा व्हिडीओ
Vrushali’s Kitchen & Creations या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलांच्या टिफीनसाठी झटपट बनणारा गव्हाच्या पिठाचा मसाला लच्छा पराठा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे लच्चा पराठे बनवले. खूप छान झाले.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान रेसिपी, परफेक्ट लंच बॉक्स रेसिपी” अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली आहे.