Vidarbha special Takatla Besan Recipe : पिठलं भाकर हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीमध्ये पिठलं भाकरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पिठलं जर चविष्ठ असेल तर पिठलं भाकर खाण्याची मजा द्विगुणित होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे पिठलं बनवले जाते. या पिठल्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आज आपण विदर्भातील ताकातले पिठलं म्हणजे ताकातले बेसन कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विदर्भ स्पेशल ताकाचे बेसन कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहे. हे बेसन चवीला अप्रतिम लागते. (video of Vidarbha special Takatla Besan Recipe)
व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- कांदा
- कढीपत्ता
- हिरवी मिरचे
- बेसन
- ताक
- मीठ
- हळद
- आलं
- लसूण
- जिरे
- मोहरी
- पाणी
- कोथिंबीर
पाहा व्हिडीओ
कृती
- सुरुवातीला कांदा उभा बारीक कापा. पिठलं बनवताना कांदा भरपूर वापरतो पण इथे ताकाचे बेसन बनवताना कांदा कमी वापरावा कारण ताकाला आणि कांद्याला गोडपणा असतो.
- हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक चिरून घ्या.
- त्यानंतर दोन वाट्या ताक घ्या. ताकाला आंबटपणा असल्यामुळे त्यात एक वाटी पाणी टाका. जर ताक आंबट नसेल तर फक्त ताकामध्ये बेसन घाला. ताकाच्या प्रमाणानुसार तीन चमचे बेसन त्यात टाका आणि नीट मिसळून घ्या. कोणत्याही बेसनाच्या गुठळ्या ताकात राहू नये, अशा प्रकारे ताकात बेसन एकजीव करावे.
- कढईत तेल गरम करा. गरम तेलात मोहरी टाका. त्यानंतर त्यात जिरे घाला. त्यानंतर त्यात कापलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाका. चांगले परतून घ्या.
- कांदा मिरची चांगले भाजून झाले की त्यात लसणाची बारीक पेस्ट टाकावी आणि अर्धा चमचा आलं टाका. आलं आणि लसूण पेस्ट पचनास चांगलं असतं आणि बेसनाला चवही चांगली येते. आलं लसूण पेस्ट नीट परतून घ्या.
- त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घाला. त्यानंतर त्यात ताक आणि बेसनाचे एकत्र मिश्रण घाला. अर्धा चमचा मीठ घाला. हे सर्व मिश्रण मिक्स करा.
- त्यानंतर कढईवर चार ते पाच मिनिटे झाकण ठेवा. त्यानंतर तुम्हाला दिसेल की थोडा बेसनाला घट्टपणा आलेला दिसून येईल. पुन्हा पाच मिनिटे बेसन कमी आचेवर होऊ द्या.
- शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाका. तुमचे गरमागरम ताकाचे बेसन तयार होईल.
हे बेसन तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.