Moong Dal Dhokala In Katori Video: भारताच्या वैविध्याचा सर्वात मोठा पैलू म्हणजे आपली खाद्यसंस्कृती. सोशल मीडियाच्या काळात अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातील रेसिपी सुद्धा सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवाय काही रेसिपी ज्या ऑनलाईन व्हायरल होण्याआधीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेने सोपवल्या जात होत्या त्यांच्या काही क्लुप्त्या व हॅक आता सोशल मीडियावरून शेअर केल्या जातात. अशीच एक जगप्रसिद्ध रेसिपी म्हणजे खमण ढोकळा. जाळीदार ढोकळा हा पोटभरीचा, पोषणाचा आणि सर्वात मुख्य म्हणजे जिभेचे चोचले पुरवणारा नाश्त्याचा पदार्थ आहे. गुजरातची रेसिपी अशी ओळख असली तरी जवळपास प्रत्येक राज्यात या ढोकळ्याचे चाहते आहेत.
तुम्हालाही ढोकळा आवडत असेल पण वजनावर नियंत्रण ठेवायचं किंवा अन्य कोणत्या कारणाने बेसनाचे सेवन टाळायचे असेल तर आज आपण अगदी सोपा पर्याय पाहणार आहोत. एक वाटी मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी साधी सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि बरं का यासाठी तुम्हाला कुकर किंवा स्टीमरची सुद्धा गरज नाही फक्त एक पॅन व चार वाट्यांमध्ये तुम्ही जाळीदार लुसलुशीत ढोकळा बनवू शकता. चला तर मग रेसिपी पाहूया..
साहित्य
ढोकळ्यासाठी
१ वाटी मुगाची डाळ
पाणी
हिरवी मिरची
हळद
मीठ
इनो किंवा साधा बेकिंग सोडा
लिंबाचा रस
फोडणीसाठी
कडीपत्ता, मोहरी, (पर्यायी) मिरची (लाल सुकी/ हिरवी), हिंग, मीठ (पर्यायी), हळद
कृती
सर्वात आधी १० मिनिटे मुगाची डाळ भिजवून ठेवा. मिक्सरच्या भांड्यात ही भिजवलेली डाळ, चिरलेल्या मिरच्या व मीठ घालून वाटून घ्या. जर फोडणीला सुद्धा मीठ वापरणार असाल तर आता मीठ थोडं कमी प्रमाणातच घाला.
वाटून झालेली डाळ एका भांड्यात घेऊन यात हळद, थोडं तेल, पाणी आणि लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसाला पर्यायी आपण इनोचं एक पाकीट किंवा बेकिंग सोडा आणि चमचाभर पाणी मिसळून टाकू शकता. हे सगळं एकाच दिशेने पळी फिरवून नीट ढवळून घ्या.
एका पॅनमध्ये पाणी घेऊन उकळत ठेवा तोवर वाटीला थोडं तेल लावून त्यात मुगाच्या डाळीचं मिश्रण ओतायचं. पॅन मध्ये या वाट्या ठेवून वर झाकण ठेवून १५ मिनिटे ढोकळा वाफवून घ्या.
फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी- कडीपत्ता तडतडून घ्या, त्यात मिरची हिंग व थोडं मीठ घालून घ्या.
१५ मिनिटांनी ढोकळ्याच्या वाटीत टूथपिक घालून ढोकळा तयार झालाय का तपासा. ढोकळ्याचं पीठ जर स्टिकला चिकटलं नाही तर तो ढोकळा तयार झाला समजा.
मग वाटीतला ढोकळा ताटात काढून घ्या व फोडणी या ढोकळ्यावर ओता.
हे ही वाचा<< Video: १० मिनिटात पोह्याच्या मेदूवड्यांचे पीठ तयार; तेलाचा थेंबही न वापरता करा खमंग खुसखुशीत वडा- सांबार
छान मऊ लुसलुशीत ढोकळा चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.