Potato Papad Marathi Recipe: उन्हाळा सुरु झाला की महाराष्ट्रातील घरोघरी पापड- लोणची, मसाले शेवया बनवण्याचीही सुरुवात होते. वर्षभरासाठी पुरतील असे साठवणीचे पदार्थ बनवले जातात आणि मग पावसाळयात, थंडीत अगदी साध्या जेवणाची चव वाढवण्यासाठी यांचा चांगलाच फायदा होतो. अलीकडे अनेक घरांमध्ये वेळेअभावी किलोभर पापड करणे, मिरच्या आणून, तापवून मसाले कांडून आणणे यासाठी आपल्याला वेळ मिळतोच असे नाही. अशावेळी दुकानातून वेगवेगळे पदार्थ आणले जातात. तुमचीही अशीच अवस्था असेल पण तरीही मोजकं का होईना आपल्या हाताने बनवलेला एखादा साठवणीचा पदार्थ बनवायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आलो आहोत. आजवर आपण बटाट्याचे पापड या नावाखाली फेल झालेले चिप्स खाल्ले असतील पण आज अवघ्या दोन बटाट्यात तिप्पट फुलणारे व पुरणारे पापड कसे करायचे हे पाहुयात.
साहित्य: दोन कच्चे बटाटे, साबुदाणा, जिरे, चिली फ्लेक्स, मीठ, पाणी
कृती: बटाटे बारीक किसून थंड पाण्यात घालून ठेवा. मग एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात चिमूटभर मीठ व बटाट्याचा किस घालून उकळू द्या. मग यामध्ये साबुदाणे घालून ते मऊ होईपर्यंत उकळून घ्या. यामध्ये जिरे, चिली फ्लेक्स व तुम्हाला हवे तसे हर्ब्स घालून घ्या. यानंतर ही चिकट पेस्ट होईपर्यंत मंद आचेवर गॅस राहूद्या.
दुसरीकडे पापड वाळत घालण्याची तयारी करूयात. एक साधारण जिथे उत्तम ऊन येईल अशा ठिकाणी पातळ प्लास्टिक टाका त्यावर अगदी किंचित तेल पसरवून घ्या जेणेकरून पापड चिकटणार नाहीत. मग पळीने पापड हव्या त्या आकारात पसरून घ्या. सुकल्यावर हे पापड अगदी पातळ, पारदसर्शक चिप्स प्रमाणे दिसतील, डीप फ्राय करताच पापड तिप्पट फुलून खाण्यासाठी तयार असतील.
२ बटाट्यांचे २०० पापड
हे ही वाचा<< चायनीज शेजवान चटणी घरीच बनवा; साध्या भात- चपातीला येईल भन्नाट चव, पाहा रेसिपी
तुम्हीही ही रेसिपी करून पाहा व कशी होते नक्की कळवा.