Davangiri Poha Dosa Marathi Recipe: थंडीच्या दिवसात सकाळी कडकडून भूक लागते, पण ऑफिसला जायची घाई, घरची कामं, त्यात कधी उठायला उशीर झाला तर नीट नाष्टा करणे शक्यच होत नाही. अशावेळी बिस्कीट, चिवडा असा सुका खाऊ खाऊन पोट भरायचं काम केलं जातं. तुम्हाला माहित आहे का तुम्ही सकाळी उठून काय खाता यावर तुमच्या संपूर्ण दिवसाचा मूड कसा असणार हे ठरते त्यामुळे सकाळी केवळ पोट भरण्यासाठी नाही तर तुमचं मनही आनंदून जाईल यासाठी सुद्धा खायचे असते. नाष्ट्याला सकाळी मस्त लुसलुशीत डोसे किंवा जाळीदार घावण खाल्लं की पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं, नाही का? पण आता पुन्हा थंडी म्हंटली की डोश्याचं पीठ आंबवणं कठीण होऊन बसतं. अशावेळी झटपट होईल आणि भरपेट खाता येईल अशी एक डोश्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
इंस्टाग्रामवर @spoonsofodisha या अकाउंटवर छान लुसलुशीत पोह्यांच्या डोश्याची रेसिपी शेअर करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यासाठी आपल्याला रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवा किंवा आधी तांदूळ, डाळ वाटून घ्या अशी काहीच प्रक्रिया करावी लागणार नाही अवघ्या ५ सोप्या स्टेप्समध्ये आपण ही रेसिपी पूर्ण करू शकता. चला तर पाहुयात..
साहित्य
आवश्यकतेनुसार पोहे, दही, पाणी, मीठ, रवा, बेकिंग सोडा किंवा ENO
कृती
एका वाटीत पोहे घेऊन त्यात रवा व दही एकत्र करून घ्या यात गरजेनुसार मीठ घालून हे मिश्रण वाटून घ्या. याची मीडियम पेस्ट होईपर्यंत पाणी घाला व ढवळून घ्या. यामध्ये इनो किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून एकाच दिशेने हलक्या हाताने फिरवून घ्या. आणि मग गरम तापलेल्या तव्यावर पळीने हे मिश्रण घालून छान जाळीदार डोसे तयार करा.
हे ही वाचा<< दीड लिटर दुधाने बनवा अर्धा किलो तूप; पहा घरगुती सोपी रेसिपी
पोह्याचे डोसे मराठी रेसिपी
टीप: डोसे तव्याला चिकटू नयेत यासाठी तवा पूर्ण गरम झाला आहे याची खात्री करा. तव्यावर तेल टाकून नारळाच्या काथ्याने पसरवून घ्या व त्यावर मीठ घातलेल्या पाणी मारून पुसून घ्या आणि मग डोश्याचे पीठ टाका.
हे ही वाचा<< Video: भांडी घासताना डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? वास व तेल दोन्ही हटवणारा ‘हा’ सोपा उपाय करा
तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पाहा व कशी होते नक्की कळवा. तसेच तुमच्या काही किचन टिप्स असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा!