How To Make Orange Barfi : प्रत्येक शहराची एक खाद्य संस्कृती आहे. नागपूर शहरानेदेखील ही आगळी वेगळी ओळख जपली आहे. नागपूरची संत्र्याची बर्फी खूप प्रसिद्ध आहे. कुणीही नागपुरात गेलं की, ही बर्फी नक्की खातो आणि इतरांसाठीही घेऊन येतो. तर आता ही बर्फी तुम्हीसुद्धा घरच्या घरी सहज बनवू शकणार आहात. तर आज आम्ही तुम्हाला नागपूरची प्रसिद्ध संत्र्यांची बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहोत.
साहित्य :
- १/२ कप संत्र्याचा रस
- ३/४ कप साखर
- ५० ग्रॅम मिल्क पावडर
- एक चमचा केशरी रंग (फूड कलर)
- एक चमचा पिस्ता, बदामाचे काप
- तूप
कृती :
- सगळ्यात पहिल्यांदा संत्र्याच्या बिया आणि सालं काढून घ्या आणि त्याचा पल्प वेगळा करा.
- मिक्सरच्या भांड्यात पल्प घालून याचा रस काढून घ्या.
- गॅसवर पॅन ठेवा. त्यात संत्र्याचा रस व साखर घालून घेणे.
- साखर विरघळून झाल्यानंतर रस थोडा घट्ट होईपर्यंत हलवत राहावे, म्हणजे खाली पॅनला चिटकणार नाही.
- रस थोडा घट्ट झाल्यावर त्यात दूध पावडर ओतताना डाव्या हाताने हे मिश्रण हलवत राहणे, म्हणजे पावडरच्या गुठळ्या होणार नाहीत.
- त्यानंतर त्यात केशरी रंग (फूड कलर) घाला आणि गॅस मंद आचेवर ठेवा.
- मिश्रण थोडे घट्ट झाले की, थोडंसं बोटावर घेऊन चेक करावे.
- त्यानंतर एका छोट्या ट्रेला किंवा ताटाला तूप लावून घ्या व त्यात तयार मिश्रण एकसारखे घालून पसरवून घ्या. तसेच पिस्ता, बदाम यांचे काप किंवा चांदीचा वर्खदेखील तुम्ही यावर लावू शकता.
- मिश्रण थोडे थंड झाल्यावर सुरीने वड्या कापून घ्याव्यात. अशाप्रकारे तुमची ‘नागपुरी संत्रा बर्फी” तयार.