हिवाळ्यात हवा थंड असते त्यामुळे आपल्या शरीराला उब मिळावी यासाठी आपण गरम कपडे घालतो. झोपताना मऊ आणि जाड पांघरुणांचा वापर करतो. मात्र आपल्या शरीराला सर्वात जास्त उब ही आपण जे अन्नपदार्थ खात असतो त्यामधून मिळते. तुम्ही जर थंड वातावरणाला साजेसा, पौष्टिक आणि पोषक आहार घेत असाल तर तुम्हाला या थंडीचा फारसा त्रास होत नाही.
मेथी, पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्या, बाजरीची भाकरी, लोणी आणि तुपासारखे स्निग्ध पदार्थ, असे शरीराला संपूर्ण पोषण देऊ शकणारे घटक थंडीच्या दिवसांमध्ये आहारात घेण्याचा सल्ला, आपल्याला आपली वडीलधारी माणसे देत असतात. याच पदार्थांचा वापर करून, पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपी अशी बाजरीच्या थालीपीठाची रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @tasty_chav अकाउंटने शेअर केली आहे. पाहा.
हेही वाचा : Recipe : हिवाळ्यात हमखास खावी अशी ‘भाजी’; काय आहे ‘या’ पौष्टिक पदार्थाची रेसिपी पाहा…
बाजरीचे थालीपीठ
साहित्य
बाजरीचे पीठ – 2 वाटी
गव्हाचे पीठ – अर्धी वाटी
ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
बेसन – अर्धी वाटी
वाटण -हिरवी मिरची, आल, लसूण, जिरे
ओवा – अर्धा चमचा
तीळ – 2 चमचे
हळद – 1 चमचा
गरम मसाला – 1 चमचा
धने पावडर – 1 चमचा
दही – 2 चमचे
कांदा – 1 बारीक चिरुन
मीठ – चवीनुसार
मेथी – बारीक चिरुन
कोथिंबीर – आवडीनुसार
तेल
कृती
हेही वाचा : Recipe : सोयाबीनची झणझणीत चटणी कशी बनवायची पाहा; रेसिपी आणि प्रमाण लिहून घ्या…
सर्वप्रथम मिरच्या, आलं, लसूण आणि जिरे खलबत्यामध्ये कुटून किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची एक पेस्ट बनवून घ्या.
आता परातीमध्ये बाजरी, गहू, ज्वारी आणि बेसन अशी सर्व पिठं एकत्र करा.
यामध्ये, वाटून घेतलेली पेस्ट, ओवा, कोथिंबीर, कांदा, मेथी हे पदार्थ घालून घ्या.
त्याचबरोरबर ओवा, तीळ, गरम मसाला, धणे पावडर, मीठ आणि शेवटी दही घालून घ्या.
आता सर्व पदार्थ तेल आणि पाणी घालत, हाताने व्यवस्थित मळून घ्या.
आपली थालीपीठाची कणिक मळून तयार आहे.
मळलेली कणिक काहीवेळ कापडाने झाकून ठेवावी.
गॅसवर एक तवा तापत ठेवा.
पोळपाटावर कापड किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी पसरून त्यावर पाणी शिंपडून घ्या.
थालीपीठ तयार करण्यासाठी तयार कणकेचा एक गोळा घेऊन तो त्या कापडावर/ पिशवीवर थापून मधोमध बोटाने काही खड्डे करा.
तव्यावर थोडे तेल लावून त्यावर हे थालीपीठ त्यावर घालून, दोन्ही बाजूंनी खरपूस परतून घ्यावे.
बाजरीचे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ तयार आहे.
हे थालीपीठ तुम्ही चटणी किंवा लोण्यासोबत खाऊ शकता.
इन्स्टाग्रामवर @tasty_chav या अकाउंटने शेअर केलेल्या या भन्नाट रेसिपीला आत्तापर्यंत ९७९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.