थंडी सुरु झाली आहे. हलक्या थंडीसह हवामानाने बदल करण्यास सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होऊ लागते. त्यामुळे लोक सहजपणे आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य खाणे खूप महत्त्वाचे आहे. गुळ टोमॅटोची चटणी हिवाळ्यासाठी अतिशय आरोग्यदायी मानली जाते. ही चटणी चवीला अतिशय उत्तम लागते. हिरव्या मिरच्या, गूळ आणि खमंग फोडणी यामुळे चटणीची चव आणखीनच बहारदार होते, यात शंकाच नाही. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. ही चटणी जेवणात तोंडी लावायला तर घ्याच.सोबतच ही तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
चार मध्यम बारीक चिरलेले टोमॅटो
तीन ते चार चमचे गुळ
एक टीस्पून मोहरीचे तेल एक टीस्पून मोहरी
चिमुटभर हिंग
आठ ते दहा कडीपत्त्याची पाने
दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
अर्धा टीस्पून लाल तिखट
चिमूटभर हळद पावडर चवीनुसार मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर
चटणी बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. नंतर त्यात मोहरी टाका ती चांगली तडतडू द्या. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि कडीपत्ता घाला.
आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि अधून मधून ढवळत राहा. यानंतर ते मऊ होईपर्यंत शिजवा.
यानंतर त्यामध्ये हळद, मसाला, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर त्यात गूळ घाला आणि ते वितळत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिसळा.
आता ही चटणी मंद आचेवर पाच ते सात मिनिटे शिजू द्या. या चटणीचे तेल जोपर्यंत वेगळे निघत नाही आणि चटणी घट्ट होत नाही तोपर्यंत ती मंद आचेवर शिजवत ठेवा.
हेही वाचा >> रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
त्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार गूळ आणि मीठ घालायला अजिबात विसरू नका. आता वरुन ताजी हिरवी कोथिंबीर सजावटीसाठी चटणीवर घाला.