‘मुरांबा’… बेचव जेवणातही चव आणणारा, खरंतर गोडवा आणणारा एक पदार्थ. तो आवडत नाही अशी फार कमीच माणसं असावीत. मुरांबा आवडणाऱ्या कैक गोड व्यक्ती आहेत. अर्थात इथे गोष्ट सुरु आहे ती पानात वाढल्या जाणाऱ्या मुरांब्याची. पानातल्या याच मुरांब्याची संकल्पना हाताशी घेत या नावाभोवती दिग्दर्शक वरुण नार्वेकरने एक हलकीफुलकी कथा गुंफली आहे. सध्याचा माहोल आणि सूर्यदेवाची कृपा पाहता मुरांबा आणि लोणची मुरवण्याचे हे अगदी योग्य दिवस आहेत. चांगल्या कैऱ्या, आंबे घेऊन मसाले, तेल आणि काही ‘सो कॉल्ड’ सिक्रेट सामग्री वापरुन जवळपास आठ महिने किंवा मग वर्षभरासाठी बरणीत भरुन हा मुरांबा मुरण्यासाठी ठेवला जातो. प्रदीर्घ काळासाठी मुरेल्या मुरांब्याची ही बरणी जेव्हा उघडते तेव्हा कोणालाही त्या बरणीतील मुरांब्याची चव चाखण्याचा मोह आवरत नाही. असंच काहीसं आपल्या रोजच्या जीवनाचंही आहे. आपली नाती म्हणजे कैरी किंवा अर्धाच पिकलेला आंबा, त्यात येणारे चढउतार म्हणजे मसाला, मीठ, आयुष्यात येणारं प्रेमाचं वळण म्हणजे सिक्रेट सामग्री आणि या साऱ्याचे सुरेख अनुभव म्हणजे बरीच वर्षे बरणीत मुरलेला तुमचा आमचा ‘मुरांबा’.
रिलेशनशिप, करिअर, कामाच्या संधी, संधी मिळवण्यासाठी सुरु असणारी धडपड, संधी मिळाल्यावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची धडपड आणि त्यातूनच कुटुंबियांचं ‘बुमरॅंग’प्रमाणे सर्रकन येणं… त्याच वेगाने निघून जाणं हे जणू आजच्या तरुणाईसाठी सरावाचच झालं आहे. अर्थात हे असंच होणं अपेक्षित नसतानाही ‘कूल डुड’ म्हणवला जाणारा पठ्ठ्या केव्हा त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करणं थांबवतो हे कळतच नाही. तरुणाईच्या मनाची चलबिचल, प्रत्येक गोष्टीवरुन त्यांच्यात होणारा गोंधळ ‘मुरांबा’मध्ये अचूकपणे टिपण्यात आला आहे. बाहेरगावची दृश्य आणि धाडधाड करणारी गाणी नसतानाही पुण्याभोवती फिरणारा हा ‘मुरांबा’ Muramba क्षणाक्षणाला आपल्यामध्ये मुरत जातो.
या चित्रपटामध्ये अमेय वाघ amey wagh साकारत असलेला ‘आलोक’ आणि मिथिला पालकर mithila palkar साकारत असलेली ‘इंदु’ म्हणजेच ‘इंद्रायणी’ या दोघांचं राहणीमान. पुण्याच्या एका उच्चभ्रू कुटुंबाप्रमाणे. त्यांचं वागणं बोलणं, रिलेशनशिपमध्ये येणं या सर्व गोष्टींच्या गाडीने वेग धरला खरा. पण, अतिकाळजी करण्याची सवय, संशयी वृत्ती, एकमेकांचे फोन तपासणं, खासगी गोष्टींवर उगाचच चर्चा करणं या गोष्टींमुळे आलोक-इंदूच्या नात्यात अचानकच ब्रेकअपचं वादळी वारं येतं आणि मग काय… ‘सगळं सगळं चुकतंय’ असंच होऊन बसतं. ब्रेकअपनंतर नेमकी आजच्या तरुणाईची काय मनःस्थिती असते, त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या विचारांचा-आठवणींचा काहूर माजलेला असतो हे दाखवताना आणि ब्रेकअपच्या भावनेतून व्यक्त होताना अमेयचा अभिनय पाहण्याजोगा आहे. तर, अॅड एजन्सीमध्ये काम करत असल्यामुळे राहणीमानात झालेला बदल, मित्रमंडळींसोबत वावरताना आलेली सहजता, जगाकडे, भविष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असलेली ‘इंदू’ साकारण्यासाठी मिथिलानेही बरीच मेहनत घेतली आहे. अर्थात अभिनय आणखी चांगला होऊ शकला असता. पण, पहिल्याच चित्रपटात वेब विश्वातल्या या क्वीनने खरंच चौकार मारला आहे.
‘आलोक- इंदु’च्या ब्रेकअपनंतर त्यांचं नातं पूर्वपदावर आणण्यासाठी वेगवेगळ्या खुरापती करणाऱ्या वडिलांची भूमिका सचिन खेडेकर यांनी अप्रतिमरित्या साकारली आहे. तर, धारवाडहून लग्न होऊन पुण्यात आलेली एक गृहिणी, तिच्या चेहऱ्यावरील साधे-भोळे भाव आणि मुलासोबतच त्याच्या गर्लफ्रेंडवरही नि:स्वार्थ प्रेम करणारी आई चिन्मयी सुमितनेही सुरेखपणे साकारली आहे.
रिलेशनशिपमध्ये होणारी भंडणं, शारीरिक सुख अर्थात ‘सेक्स’च्या विषयावरुन ‘आलोक- इंदू’मध्ये अवघ्या काही क्षणांसाठी होणारा संवाद लक्षवेधी असला तरीही ‘सेक्स’ या शब्दावर चित्रपटाचा सायलेंट मोड ऑन होत आहे. एकीकडे रिलेशनशिप, आई-वडील, शिव्या, बिअर, व्हिस्की याविषयीच्या चर्चांची सुरेख मांडणी केल्यानंतर ‘सेक्स’ या शब्दावरच आवाज बंद का, असा प्रश्न राहू राहून पडत आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुरेख आहे. त्यासोबतच सिनेमॅटोग्राफीचीही दाद द्यावी लागेल. संवाद आणि वेशभूषेमध्ये अजिबात भडकपणा नसल्यामुळे या गोष्टी सहज पटून जातात. सहसा चित्रपट फार लांबतोय किंवा काय चाललंय काय…, असा प्रश्न बऱ्याचदा प्रेक्षकांना पडतो. पण, मुरांबाच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध जास्त रंजक आहे. चित्रपट अगदी शेवटच्या आभारांच्या नावांपर्यंत प्रेक्षकांना त्यांच्या जागेवरच खिळवून ठेवतो. तेव्हा आता असं नेमकं का होतंय ते चित्रपट पाहिल्यावर कळेलच, कारण हे एक सरप्राइज आहे.
वाचा: …यांच्यामुळे बॉलिवूडला मिळाली अनुष्का शर्मा
मिथिलाच्या तोंडी असणारे ‘फोन टाक’ वगैरेसारखे संवाद किंवा मग ‘बच्चन देऊ नका’ असं म्हणणारा ‘आलोक’ म्हणजेच अमेय आपलासा वाटतो. कारण, त्यांच्या भाषेत ओढूनताणून कोणतीही अलंकारिक झाक पाहायला मिळत नाही. मुलांचं रिलेशनशिप स्टेटस जेव्हा पालकांसमोर येतं आणि मुलांच्या जीवनातील या टप्प्याचा पालक त्यांच्यापरिने कसा स्वीकार करतात याचं चित्रण वरुणने प्रत्ययकारीपणे मांडलं आहे. त्यासोबतच पालकांचं जास्तंच गोडगोड वागणं कधी मुलांना खटकू लागतं ही गोष्टही वरुणने अचूक हेरली आहे. तेव्हा आता ‘आलोक- इंदू’चा प्रेमळ प्रवास जरा जास्तच मुरल्यामुळे त्यांच्या नात्याची चव कशी काय राखली जाणार हे जाणून घेण्यासाठी एकदातरी जरुर पाहा ‘मुरांबा’..
कारण, नात्यांच्या प्रवासात असतो रागरुसव्यांचा थांबा, शेवटचं स्टेशन आहेच की हा गोड ‘मुरांबा’…
सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com