आताच्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या आणि त्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन यावर बऱ्याच चित्रपटांमध्ये भाष्य केले गेले. दोन पिढ्यांची विचारसरणी आणि जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न ‘बस स्टॉप’मधून केलेला आहे. कॉलेज तरुणाईवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा हलकी फुलकी आहे किंबहुना मध्यांतरापर्यंत कथा कोणत्या दिशेने जाते हेच समजत नाही.
मराठीतले अनेक नावाजलेले कलाकार चित्रपटात भूमिका साकारत असले तरी पटकथा मात्र तेवढी तगडी नसल्याचे समजते. तरुणाईवर आधारित चित्रपट असल्याने संवादही वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात रटाळपणा जाणवतो. पूजा सावंत आणि अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर आणि अमृता खानविलकर, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणे, एकमेकांमधील मैत्री आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पालकांची मानसिकता चित्रपटात मांडण्यात आली आहे. तरुण मुला-मुलींचे पालक आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला किती पटतात, याचा उहापोह यामध्ये दिसून येतो.
चित्रपटातील व्यक्तिरेखांना, संवादाला, गायनाला आधुनिकतेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरत नाही. पालकांची भूमिका साकारणारे अविनाथ नारकर, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांचे अभिनय मात्र चित्रपटाशी आपल्याला जोडून ठेवते. मध्यांतरानंतर चित्रपटाच्या कथेला योग्य वळण येते. अनेकदा पालकांनी मुलांवर लादलेली अवाजवी बंधने ही नंतर त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरतात, याचे योग्य चित्रण यात करण्यात आले आहे.
वाचा : अशोक सराफ आणि सुनील गावस्करांच्या ‘या’ नाटकाबद्दल तुम्हाला माहित आहे का?
स्वत: पालक होईपर्यंत पालकांची मनस्थिती मुलांना समजू शकत नाही असे अनेकदा म्हटले जाते आणि याचेच चित्रण चित्रपटाच्या अखेर करण्यात आले. त्यामुळे कथेच्या मांडणीत नाविन्य आढळत नाही. ‘बस स्टॉपवर आपल्याला अनेक पर्याय असतात, मात्र चांगल्या अनुभवांकडे, चांगल्या नात्यांकडे नेणारा पर्याय निवडावा,’ असा संदेश अविनाश नारकर चित्रपटाअखेर आपल्या आवाजातून देतात. एकूणच कथेची चुकलेली मांडणी, रटाळपणा, उगीचच खेचलेले काही शॉट्स आणि अपूर्ण शेवट यांमुळे हा ‘बस स्टॉप’ भरकटलेला वाटतो.