दोन मैत्रिणींनी एकत्र बाहेर जायचा प्लॅन केला आणि ट्रीपला जायची वेळ येते तेव्हा अचानक एक मैत्रीण प्लॅन रद्द करते, असे तुमच्यासोबत कधी झाले आहे का? तेव्हा तुम्ही प्लॅनच रद्द करता का? पण हंपी सिनेमा पाहिल्यानंतर तुमचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.
आपण आपल्या आयुष्यात एवढे गुंतलेले असतो की, त्याहून वेगळंही आपलं आयुष्य आहे याचा विचार आपल्या मनालाही शिवत नाही. पण तुम्हाला स्वतःला शोधायचे असेल तर एकदा तरी ‘हंपी’ सिनेमा पाहावाच लागेल.
तुमच्या आमच्यासारखीच इशा (सोनाली कुलकर्णी) तिच्या आयुष्यातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी हंपी गाठते. यावेळी तिला हंपीमध्ये कबीर (ललित प्रभाकर) भेटतो. कबीर हा स्वच्छंदी असतो, तर इशा प्रत्येक गोष्ट मनात ठेवणारी. हंपी फिरताना दोघांची नकळत भेट होते आणि मैत्रीही. या दोघांची मैत्री फुलवण्यात कळत- नकळतपणे गिरीजाची (प्राजक्ता माळी) मदत होते. सिनेमात तिघांचाही लूक वेगळा असला तरी प्राजक्ता आणि ललित यांच्या लूकमधील बदल अधिक जाणवतो. आतापर्यंत ललित आणि प्राजक्ताला आपण साध्या लूकमध्ये पाहिले आहे. हंपी सिनेमामुळे त्यांचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना भुरळ घालणारा आहे, यात काही शंका नाही. सिनेमात प्रियदर्शन जाधवची आर रणजित ही व्यक्तिरेखाही लक्षात राहते.
बॅकपॅक या विषयावर आतापर्यंत मराठीमध्ये फारसे सिनेमे आले नाहीत. बॅकपॅकचा विचार करणाऱ्यांसाठी, स्वच्छंद फिरणाऱ्यांसाठी आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा सिनेमा एक वेगळा दृष्टीकोन देऊ शकतो. प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनाची छाप प्रत्येक दृश्यात दिसून येते. आपल्याला प्रेक्षकांना नक्की काय दाखवायचे, हे दिग्दर्शकाच्या डोक्यात पक्के असल्यामुळे चित्रपटाच्या मांडणीत कुठेही गोंधळ दिसून येत नाही. याशिवाय, हंपी हे लोकेशन चित्रपटाचे आणखी एक बलस्थान ठरले आहे.
मुळात हंपी हे ठिकाण सिनेमॅटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे. तिथे चित्रीकरण करताना काय दाखवू आणि काय नको असाच प्रश्न अनेकांना पडत असेल. याला हंपीचे सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरीही अपवाद नसतील. परंतु अशाचवेळी तुमच्या कौशल्याचा कस लागतो. कथेला पूरक आणि योग्य अशी दृश्ये दाखवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. चौधरी यांनी ही जबाबदारी अगदी लीलया पेलली आहे. हंपीमध्ये चित्रीकरण झालेय म्हणून सिनेमा पाहताना फक्त निसर्गच दिसतो असे कधीच वाटत नाही.
हम्पी, आनेगुडी, विठ्ठल मंदिर, कोरॅकल राइड या ठिकाणांची सैर करता करता इशा, कबीर आणि गिरीजा तुम्हाला आयुष्यातील अशा गोष्टींची जाणीव करुन देतात जे तुमच्या मनात गेली अनेक वर्षे खदखदत असते. सिनेमातील गाणीही श्रवणीय आहेत. अनेकदा आपण आनंदासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो. त्यामुळे आपण जगणेच विसरून जातो. त्यामुळे आयुष्यात स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी आणि इतरांवर भरभरून प्रेम करण्यासाठी एकदा तरी हंपी सिनेमा पाहावाच.
मधुरा नेरूरकर
madhura.nerurkar@loksatta.com