बापलेकाच्या अमर्याद प्रेमाचे व संघर्षाचे चित्रण करणारा ‘रिंगण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शशांक शेंडे यांनी साकारलेली अर्जुन मगर आणि साहिल जोशी याने साकारलेली अभिमन्यू मगर या पात्रांभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. पाऊस नसल्याने निर्माण झालेली दुष्काळ परिस्थीत, सावकाराकडील कर्जाचा डोंगर आणि या नैराश्यातून आत्महत्येचा विचार येणे. अशा वातावरणात देहमुक्तीचा मार्ग जवळ करणाऱ्या शेतकऱ्याने थोडेसे धाडस दाखवल्यास त्यातूनही वाट काढता येते, असे विश्वासार्ह चित्र दिग्दर्शक मकरंद माने यांनी या चित्रपटात रंगवले आहे. सावकाराकडे गहाण असलेली शेतजमीन आणि घर परत मिळवण्यासाठी अर्जून मगर आत्महत्येचा विचार सोडून त्यातून मार्ग काढायचे ठरवतो तेव्हा या चित्रपटाला वेगळे वळण येते. त्यातच लहानग्या अभिमन्यूची भूमिकाही मन जिंकून जाते.

‘रिंगण’च्या कथेला पंढरपूरची पार्श्वभूमी आहे. पंढरपूरमधील वातावरण, वारी, विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे हजारो वारकरी, त्या निमित्ताने अगदी हळद-कुंकूवापासून उभी राहिलेली बाजारपेठ अशा अनेक गोष्टींसोबत अर्जून-अभिमन्यू या बापलेकाचा संघर्ष रंगवला आहे. चित्रपटात अर्जुन ही व्यक्तिरेखा साकारणारे आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळवणारे अभिनेता शशांक शेंडे यांचे अभिनय प्रशंसनीय आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात अभिमन्यूची भूमिका साकारणारा साहिल जोशीची भूमिकाही अधोरेखित करण्यासारखी आहे. साहिलचे बोलके डोळे या चित्रपटात किमया करून गेले आहेत. आजवर अव्यक्त आणि चित्रपटातून फार कमी वेळा रंगवले गेलेले बापलेकाचे नाते यात पाहायला मिळते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो याचे चित्रण ‘रिंगण’मध्ये मकरंद माने यांनी केले आहे. दिग्दर्शक म्हणून ‘रिंगण’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट. चित्रपटात शशांक शेंडे आणि साहिल जोशीसोबतच सुहास शिरसाट, उमेश जगताप, केतन पवार यांच्याही भूमिका उल्लेखनीय आहेत. चित्रपटातील अर्जून मगर जेव्हा आत्महत्येचा विचार सोडून मार्ग शोधायचे ठरवतो तेव्हा त्यात अडचणी येणार हे त्याने गृहित धरलेलंच असतं पण तो प्रयत्न सोडत नाही. एकीकडे जगण्यासाठी पित्याची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे आईचा शोध घेण्यासाठी चिमुकला अभिमन्यू कासावीस असतो. आई जगात नाही हे लहानग्या अभिमन्यूला समजवायचे तरी कसे ही पित्याची विवंचनाही अचूकपणे मांडली आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

हा चित्रपट पंढपुरात चित्रित झाला तेव्हा तिथे माघी यात्रा सुरु होती. लाखो लोक तिथे होते. त्यामुळे तिथल्या वातावरणाचा भंग न करता कधी छुपे कॅमेरे वापरून, वेगवगळ्या पद्धतीने हे चित्रण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात ६३ व्या राष्ट्रीय पुरस्कारावर ‘रिंगण’ने आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय ५३ वा महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायादिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकारया पुरस्कारांवर आपले नाव कोरले. कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही ‘रिंगण’ने आपले वेगळेपण दाखवून दिले.

रोजच्या जगण्यातील अशक्यता बाजूला सारून शक्य ते श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करण्याचा मंत्र देणारी ही कथा एक सकारात्मक दृष्टिकोन देऊन जाते. त्याचप्रमाणे आपल्याजवळ जे आहे त्याचे महत्त्व जपून जे नाही त्यासाठी दु:खी होऊ नका असा संदेशदेखील चिमुकल्या अभिमन्यूची भूमिका देऊन जाते. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवणारा आणि सकारात्मकतेकडे नेणारा ‘रिंगण’ एक वेगळा दृष्टिकोन देऊन जातो.

Story img Loader