नातेसंबंधातले ताणतणाव विशेषत: पती-पत्नीच्या नात्यांत काही काळासाठी का होईना पडणारे अंतर हा विषय सध्या हिंदी-मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने बोलका होतो आहे. कोणी कितीही नकारघंटा वाजवली तरी देवाब्राह्मणांच्या साक्षीने वगैरे गाठी बांधलेल्या असूनही, दोन दिल एक जान है हम.. अशा सगळ्या घट्ट प्रेमभावनेतून एका बंधनात अडकलेले असोत.. सगळ्यात जवळच्या या नात्यांमधली अंतरे वाढत चालली आहेत, या वास्तवाकडे काणाडोळा करता येणे शक्यच नाही, इतक्या वेगाने हा प्रॉब्लेम घराघरांत वाढत चालला आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित ‘मला काहीच प्रॉब्लेम’ नाही हा चित्रपट किमान हा ‘प्रॉब्लेम’ आहे रे.. इथपर्यंत तरी पोहोचवतो.
स्वातंत्र्यात, मोकळेपणाने वावरणाऱ्या या पिढीतील प्रत्येकाला आपले एक मत आहे, अस्तित्व आहे, विचार आहे, आर्थिक क्षमताही आहे. आणि तरीही नात्यां-नात्यांमधील गुंतागुंत अधिकच वाढते आहे. आत्तापर्यंत प्रेमातले गोंधळलेपण हा चित्रपटांसाठी महत्त्वाचा विषय होता. मात्र लग्नांपेक्षाही घटस्फोटांच्या वाढत्या संख्येमुळे त्यामागच्या कारणांपर्यंत पोहोचताना वैवाहिक नात्यांतील हे ताणेबाणे अधिक ठळकपणे समोर येऊ लागले आहेत. शहरांमधून तर या गुंतागुंतीचेही वेगवेगळे पैलू आहेत. अजय (गश्मीर महाजनी) आणि केतकी (स्पृहा जोशी)अगदी दोन ते तीन महिन्यांच्या ओळखीत हे दोघेही लग्नाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. अजयचे कुटुंब वैदर्भीय तर केतकीचे कुटुंब कोकणस्थ ब्राह्मण. मुलांच्या इच्छेखातर त्यांच्या लग्नाला मान्यता देऊनही ‘पुढची बोलणी’ करण्यासाठी एकत्र आलेली दोन्ही घरची मंडळी आपापसातील वैचारिक अंतरामुळे लग्नाचा निर्णय घेण्याऐवजी आपापसातच मोठे भांडण करतात. परिणामी, पुढे काय करायचे याचा विचार करताना दोघांनाही थोडे धीराने घेण्याचा, कमीत कमी दोन वर्ष तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या किंवा थेट ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय निवडा, असा सल्ला त्यांचा जिवलग मित्र सागर त्यांना देतो. पण हे सगळे पर्याय डोळ्यांसमोर असूनही एकत्र राहण्याची घाई असलेली केतकी आणि या विषयावर कधीच ठाम मत देऊ न शकणारा अजय लगेचच लग्न आणि वर्षभराच्या आत पालकत्वापर्यंत पोहोचतात. आलिशान फ्लॅट, गलेलठ्ठ पगार, एकमेकांना समजून घेण्याची तयारी या सगळ्या जमेच्या बाजू असतानाही एक क्षण असा येतो जेव्हा दोघेही या नात्यात राहून एकमेकांपासून अलिप्तपणे वागू लागतात.. आणि इथूनच खऱ्या प्रॉब्लेमची जाणीव होऊ लागते.
या चित्रपटाची कथा रवि सिंग यांची आहे तर पटकथा आणि संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहे. मुळातच या चित्रपटाची मांडणी करताना केवळ या दोघांच्या दृष्टीने नात्यांचा विचार झालेला नाही. चित्रपटात एका निर्णायक क्षणी दोघांचीही कुटुंबे यात दाखल होतात. आणि मग त्यांच्यामुळे या नात्यात काही बदल होतोय का?, याचीही चाचपणी दिग्दर्शक आपल्याला करायला लावतो. मुळात, ही समस्या शहरांतून वाढत चाललेल्या वैवाहिक समस्यांची आहे. चित्रपटाच्याच भाषेत बोलायचे झाले तर भरल्या पोटीची ही समस्या आहे. पण म्हणून ती नाकारून किंवा त्याला कमी लेखून पुढे जाता येत नाही, याचा विचार दिग्दर्शकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडला आहे हे या चित्रपटाचे मोठे वैशिष्टय़ वाटते. कारण, पती-पत्नीच्या नात्यांत जर दुरावा वाढत चालला असेल तर त्याचा परिणाम त्या दोघांवर जितका होतो, तितकाच त्यांच्या मुलांवरही होतो. या पिढीची आणखी एक अडचण म्हणजे त्या अर्थाने कुठलीही नको असलेली गोष्ट मग ते नातेही का असेना आपल्या मनाविरुद्ध ओढत नेण्याची गरज त्यांना उरलेली नाही. घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे, काही समस्या असतील तर मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत सहजतेने घेतली जाऊ शकते. इतकेच नाही तर एकमेकांशी बोलून आपल्या समस्या सोडवण्याइतकेही ते प्रगल्भ आहेत. बोलून नाही तर निदान शरीराने तरी आपण एकत्र आहोत ना, सुखी आहोत ना.. हे पाहणारी आणि जेव्हा तेही फोल ठरतेय हे लक्षात येते तेव्हा स्वत:हून हा प्रॉब्लेम आहे हे स्वीकारणारी, त्याबद्दल ठाम भूमिका घेणारी नायिका या चित्रपटात दिसते. दैनंदिन जीवनात ज्या सहजपणे या गोष्टी घडत जातात त्याच ओघाने, स्वाभाविकपणे या दोघांच्या नात्यातील स्थित्यंतर समीर विद्वांस यांनी दाखवून दिले आहे.
खूप खोलवर विचार करून याच्याशी संबंधित प्रत्येक समस्या, त्याचे पैलू आणि त्याचे उत्तर अशा तिन्ही गोष्टी एकत्र मांडत दिग्दर्शक आपल्याला विचार करायला भाग पाडतो. या समस्यांवर ठरावीक असे उत्तर नाही. ज्याची त्याची समस्या आणि त्यावरचे उत्तर शोधण्याचे मार्गही त्या त्या नात्यापरत्वे बदलत जाणारे आहेत. पण मुळात आपल्या नात्यात प्रॉब्लेम आहे हे स्वीकारायला लावून मग त्याचा अलिप्ततेने विचार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत दिग्दर्शकाने आणून ठेवले आहे. अर्थात, या विषयाला दिग्दर्शकाप्रमाणेच प्रभावीपणे पडद्यावर जिवंत करणारी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी दोघांनीही या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. त्यातही केतकीची व्यक्तिरेखा आक्रमक असल्याने स्पृहाला मोठा वाव मिळाला आहे ज्याचा तिने पुरेपूर उपयोग केला आहे. अजयचे आई-वडील म्हणून निर्मिती सावंत आणि विजय निकम ही वेगळीच जोडी समोर येते. निर्मिती सावंत कित्येक वर्षांनी त्यांच्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या असलेल्या भूमिकेतून समोर आल्या आहेत. तर मंगला केंकरे आणि सतीश आळेकरांनीही पारंपरिक रीतिरिवाज आणि मुलीचे आधुनिक विचार याचा समतोल साधत जगणाऱ्या आई-वडिलांची भूमिका चोख वठवली आहे. विनोद लव्हेकरांनी रंगवलेली मित्राची सागरची छोटेखानी भूमिकाही भाव खाऊन जाते. आजच्या पिढीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय पूर्ण विचारानिशी मांडण्याचा प्रयत्न करणारा, लेखन-दिग्दर्शन-अभिनय या सगळ्यांच आघाडय़ांवर सरस असा हा चित्रपट आहे.
कलाकार – गश्मीर महाजनी, स्पृहा जोशी, निर्मिती सावंत, विजय निकम, सतीश आळेकर, मंगला केंकरे, कमलेश सावंत, विनोद लव्हेकर, सीमा देशमुख, साहिल कोपर्डे, स्नेहलता वसईकर.
– रेश्मा राईकवार