Pushpak Viman Movie Review :  गेले काही दिवस मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकाच नावाचा जयघोष सुरु आहे, तो म्हणजे ‘पुष्पक विमान’चा. खरंतर पुष्पक विमान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे संत तुकारामांचे अभंग, त्यात त्यांनी केलेल्या पुष्पक विमानाचा उल्लेख. त्यामुळे संत तुकारामांची अपार भक्ती करणाऱ्या आणि तुकोबा महाराजांच्या भेटीची ओढ लागलेल्या एका निर्मळ मनाच्या तात्यांवर आधारित चित्रपट करण्याचा निर्णय वैभव चिंचाळकर यांनी घेतला आणि त्यातून साकार झालं आजच्या काळातील ‘पुष्पक विमान’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाच्या माध्यमातून तात्या, विलास, स्मिता, फिरोज आणि तुकाराम महाराज ही पात्र भेटीला येतात. तात्यांना तुकोबांच्या भेटीची लागलेली आस पूर्ण करण्यासाठी साऱ्यांनी केलेले प्रयत्न, मुंबईमध्ये राहताना येणारी आर्थिक चणचण, नात्यात येणारे कडू-गोड वाद यांची बांधणी चित्रपटाच्या कथेमध्ये केली आहे. नात्यांचा पाश अलगदपणे कसा उलगडायचा हे या चित्रपटातून समोर येतं. त्यामुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना वैभव चिंचाळकर  यांना काही अंशी यश आलं आहे.

चित्रपटामध्ये सर्वसामान्य व्यक्तींची जीवनशैली रेखाटण्यात आल्यामुळे यात अलंकारिक भाषेचा भरणा न करता अगदी सहजरित्या सर्वसामान्यांना समजतील अशा स्वरुपात संवादशैलीचा वापर करण्यात आला आहे. त्यातच खानदेशी भाषेची जोड मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी लहानलहान विनोदही घडले आहेत.

तुकोबांच्या भक्तीत लीन झालेले तात्या (मोहन जोशी) यांना तुकोबांच्या भेटीची ओढ लागलेली असते. त्यामुळे तुकोबांपर्यंत पोहोचायचं असेल तर पुष्पक विमानात बसण्याशिवाय पर्याय नाही हे तात्यांनी ताडलं असतं. त्यामुळेच मुंबईमध्ये पहिल्यांदाच आलेल्या तात्यांना आज सर्रासपणे फिरणारं विमान म्हणजेच आपलं ‘पुष्पक विमान’ आहे असा समज होतो. आणि या विमान बसण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होतो. या साऱ्या खटाटोपामध्ये तात्यांना मुंबईमध्ये येणारे नवनवीन अनुभव अत्यंत सुंदररित्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या प्रयत्नांमध्ये काही ठिकाणी अतिशयोक्ती झाल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे कथानक थोडसं कंटाळवाणंही झाल्याचं पाहायला मिळतं.

तात्या खानदेशी तर स्मिता कोकणी त्यामुळे अनेक वेळा या दोघांमध्ये वाद होतांना दिसतात. हे वाद म्हणजे हलक्याफुलक्या स्वरुपाचे असून एकाच घरात दोन वेगवेगळ्या संस्कृती नांदतात त्यामुळे भांड्याला भांडण लागणारंच. मात्र, यावर या दोघांनीही दाखवलेला संयमावर जोर देण्यात आला आहे. त्यातूनच स्मिता आणि तात्या यांच्या नात्यातील बाप-लेकीच्या नात्यावरही प्रकाश टाकण्यात येतो. एका सूनेला मुलीसारखी वागणूक देणारे तात्या आणि वडीलांप्रमाणे काळजी घेणारी स्मिता यांच्याकडे पाहिल्यावर सर्वसामान्य कुटुंबातील आठवण आल्याशिवाय राहत नाही.

चित्रपटाचा प्रवास पुढे-पुढे सरकत असताना त्यात समावेश करण्यात आलेली गाणीही अत्यंत सुंदर आणि मर्मबंधाचा प्रत्यय देणारी आहेत. तुकोबांच्या अभंगांना वेगळी चाल लावत प्रत्येकाला मंत्रमुग्ध करत योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम या चित्रपटातील गाण्यांनी केलं आहे. त्याप्रमाणेच कॅमेरांचा वापरही सुबकरित्या करण्यात आल्यामुळे चित्रपटातील भाव जिवंत झाल्याचा भास होतो. तुकोबांच्या आणि विठ्ठलाच्या भक्तीत लीन होणारे तात्या आजच्या काळातले नवनवीन बदलदेखील स्वीकारत असल्याचं पाहायला मिळतं.

एकंदरीतच चित्रपटाची मांडणी चांगल्या पद्धतीने करण्यात आली असून त्याला चित्रपटातील कलाकरांनी पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे मोहन जोशी यांनी अत्यंत सुंदररित्या अभिनय केला आहे. त्यांनी केवळ हा अभिनय केला नाही तर ते खऱ्या अर्थाने तात्या जगले आहेत. तर नवोदित अभिनेत्री गौरी महाजन हिने तिच्या परीने भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेता सुबोध भावे यानेही त्याच्या अभिनयाचे गुण दाखवून दिले आहेत. दरम्यान, वैभव चिंचाळकर यांनी उत्तम कलाकरांची निवड करत तुकोबांच्या भक्तीत लीन झालेल्या भाविकांच्या मनातील भाव उत्तमरित्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व अगामी चित्रपट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav chinchalkar directed movie pushpak viman review in marathi
Show comments