साहित्य :
१/२ वाटी वांग्याचा गर (वांगे भाजून आणि सोलून घ्यावे. आतील गर मॅश करावा.)
१ चमचा गूळ
२ चमचे चिंचेचा घट्ट कोळ
२ ते ३ चमचे कांदा बारीक चिरून
१ चमचा तिळाचा कूट (तीळ भाजून मिक्सरमध्ये भरडसर वाटणे.)
१ चमचा तेल
२ चिमटी मोहरी ल्ल १/४ चमचा जिरे
चिमूटभर हिंग
२ सुक्या लाल मिरच्या, तुकडे करावेत
१/४ चमचा लाल तिखट
१ चमचा गोडा मसाला
चवीपुरते मीठ
२ चमचे कोथिंबीर, बारीक चिरून
कृती :
१) एका वाडग्यात १/४ वाटी गरम पाणी घ्यावे. त्यात गूळ किंवा मध्यमसर गुळाचा खडा घालून कुस्करावे किंवा १० मिनिटे तसेच ठेवावे.
२) गूळ पाण्यात मिक्स झाला की त्यात तिळकूट, गोडा मसाला, थोडे मीठ, कांदा, कोथिंबीर आणि वांग्याचा गर घालून छान मिक्स करावे. हे भरीत किंचित पातळसर असते त्यामुळे गरजेनुसार पाणी घालावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून सुक्या मिरच्यांचे तुकडे घालावे. ही फोडणी भरितावर घालावी. चिंचेचा कोळ घालून ढवळावे.
हे भरीत गारच खातात. मूग-तांदूळ खिचडी, मसालेभात किंवा भाकरीबरोबर हे भरीत छान लागते.
टीप : यामध्ये २ चमचे ताजा खोवलेला नारळ घातल्यास चव छान लागते.
वांगी-भात मसाला
साहित्य :
२ चमचे चणाडाळ
२ चमचे उडीदडाळ
२ चमचे धने
२ चमचे भाजलेला खोबऱ्याचा किस
५-६ काळी मिरी
१ इंच दालचिनी
२-३ सुक्या मिरच्या
१ ते २ चक्रीफुलाच्या पाकळ्या (अख्खं चक्रीफूल वापरू नये, त्याच्या एक किंवा दोन पाकळ्या वापराव्यात. कारण याचा फ्लेवर खूप उग्र असतो.)
१ चमचा तेल
कृती :
१) तेल गरम करून त्यात चणाडाळ मंद आचेवर खमंग भाजावी. बाजूला काढून ठेवावी.
२) नंतर राहिलेल्या तेलात उडीदडाळ भाजावी. बाजूला काढून ठेवावी.
३) त्याच कढईत धणे आणि काळी मिरी हलकेच परतून घ्यावे. साधारण मिनिटभर बाजूला काढून ठेवावे.
४) आच बंद करावी. मिरच्या घालून नुसत्या कढईच्या उष्णतेवर परताव्यात. सर्व साहित्य थंड होऊ द्यावे.
५) गार झाल्यावर आधी चणाडाळ. उडीदडाळ, धणे, मिरी, दालचिनी आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर खोबरे घालून परत बारीक करावे.
हा मसाला वांगी-भाताला घालू शकतो.
वांगी-भात
साहित्य :
२ वाटय़ा तांदूळ (बासमती किंवा तुकडा बासमती चालेल)
७-८ लहान वांगी (साधारण १/४ किलो), मोठय़ा फोडी कराव्यात
फोडणीसाठी :- ३ चमचे तेल, १/४ चमचा मोहोरी, १/४ चमचा हिंग, १/४ चमचा हळद, ७-८ पानं कढीपत्ता
१ चमचा भरून वांगी-भात मसाला
चवीपुरते मीठ
वांगी तळण्यासाठी तेल
१ तमालपत्र आणि १-२ वेलची
कृती :
१) तांदूळ पाण्यात १५-२० मिनिटे भिजत घालावा. पाणी काढून टाकावे. भात मोकळा आणि जरा फडफडीत शिजवावा. शिजवताना त्यात मीठ, तमालपत्र आणि वेलची घालावी. भात शिजल्यावर तमालपत्र आणि वेलची काढून टाकावी.
२) कढईत तेल गरम करून त्यात वांगी तळून घ्यावी. (खाली टीप पाहा)
३) मोठय़ा जाड बुडाच्या कढईत २-३ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात तळलेली वांगी, थोडे मीठ आणि वांगी-भात मसाला घालावा. लगेच भात घालून मिक्स करावे. जर कोरडे कोरडे वाटले तर थोडेसे तूप घालावे. चव पाहून लागल्यास मसाला किंवा मीठ घालावे. मंद आचेवर मिक्स करावे. कढईवर जड झाकण ठेवून वाफ काढावी. तळाला भात चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
भात गरमच सव्र्ह करावा.
टीप :
तळण्यासाठी तेल कमीच घ्यावे आणि वांगी ३-४ बॅचमध्ये तळावी. जे उरलेले तेल असेल तेच भाताच्या फोडणीसाठी वापरावे. म्हणजे तळून उरलेल्या तेलाचे पुढे काय करावे हा प्रश्न उरत नाही.
आंबटपणा जास्त हवा असल्यास अजून थोडा चिंचेचा कोळ घालावा.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com