तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ‘फोर डेझर्ट मॅरेथॉन’ ही जगातली एक महत्त्वाची मॅरेथॉन. त्यात सहभागी होऊन ती पूर्ण करणारे अतुल पत्की हे एकमेव भारतीय आहेत.
वाळवंट म्हटलं, की समोर येतं ते राजस्थानचंच. जिथे सगळीकडे वाळू आहे, प्यायलाही पाणी नाही असा सगळा प्रदेश म्हणजे वाळवंट अशी त्याची साधी-सोपी व्याख्या. पण, ‘डेझर्ट’ या शब्दाचा अर्थ ‘प्रचंड अंतर असणारा निर्मनुष्य प्रदेश’ असा होतो. मग यामध्ये वाळूचं वाळवंट येतंच. त्याचबरोबर संपूर्ण बर्फाने झाकलेले उत्तर आणि दक्षिण ध्रुव, चीनमधलं भरपूर दलदल असलेलं गोबीचं वाळवंट आणि नद्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे, पण तिथे मनुष्य नाही असाही सगळा भाग हा वाळवंट याच अर्थाने संबोधला जातो. या सगळ्या खडतर प्रदेशात जिथे सर्वोच्च नैसर्गिक वातावरणामुळे एकही मनुष्य आजपर्यंत राहिलेला नाही अशा भागात सलग सहा ते सात दिवस धावणं म्हणजे कौतुकास्पद आहे. एका वर्षांत अशी चार वाळवंटं धावण्याचा पराक्रम गाजवणाऱ्यांपैकी एकमेव भारतीय मराठी माणूस म्हणजे अतुल पत्की.
२०१३ मध्ये अतुल पत्की उत्तर ध्रुवावरची मॅरेथॉन धावले. याआधी ते अशा अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पण, उत्तर ध्रुवावरची ही मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी होती. साधारणपणे २८ मार्च ते दोन मेच्या दरम्यान होणारी ही मॅरेथॉन ९० अंश उत्तरेला होते. सूर्य उत्तर ध्रुवावर येतो त्याच्या दोन दिवस आधी रशियन लोक उणे ६० अंश फॅरेनहिट तापमानात विमानांसाठीची धावपट्टी टाकतात ज्यावर ‘एन ७४’सारखं विमानही उतरू शकतं. याच दरम्यान येथे ‘नॉर्थ पोल मॅरेथॉन’ होते. अतुल पत्की जेव्हा या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासमोरचं महत्त्वाचं आव्हान होतं, झियाद रहीम या पाकिस्तानच्या धावपटूला हरवणं. क्रिकेटप्रमाणेच इतर कुठल्याही स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे स्पर्धक होतात. त्यांच्यात एकमेकांना हरवण्याची जिद्द येते. अर्थात ही स्पर्धा निकोप असते. हेच त्यांचं ध्येयही होऊन जातं. अतुल आणि झियादच्या बाबतीतही तसंच झालं. बाकी रँक कितीही आला तरी ‘पाकिस्तानवर भारताचं नाव लावायचं’ एवढं एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अतुल यांनी मॅरेथॉनला सुरुवात केली. एकूण नऊ फेऱ्या मारायच्या होत्या. हा अनुभव अतुल सांगत होते, ‘पहिल्या फेरीपासूनच झियाद माझ्या पाच मिनिटं पुढे होते. एरव्हीची पाच मिनिटं कधी संपतात कळतही नाहीत. पण, मॅरेथॉनमधे ही ‘पाच मिनिटं’ म्हणजे खूप मोठा काळ असतो. पहिल्या दोन फेऱ्या माझ्या पुढे राहिल्यानंतर तिसऱ्या फेरीला झियाद जरा शिथिल झाला आणि त्याने मला पुढे जाऊ दिलं. काही वेळाने मुद्दाम चिथवण्यासाठी मला ओलांडून तो पुढे गेला. अशा जवळजवळ तीन फेऱ्या तो हेच करत होता. मी एकाच वेगाने सगळ्या फेऱ्या धावत होतो. त्यामुळे झियादला माझ्या त्याच एका वेगाची सवय झाली. पण, आठव्या फेरीला मी वेग थोडा वाढवला. आणि झियादला त्या वाढलेल्या वेगाचा अंदाज आला नाही. तो मला गाठण्याच्या विचारानेच धावत होता. त्यामुळे अर्थातच तो अचानक खूप थकला. नवव्या फेरीत आम्ही दोघंही तंबूतून एकत्र बाहेर पडलो. दोघांचंही ध्येय एकच होतं. ‘एकमेकांना हरवणं.’ प्रश्न देशाच्या प्रतिष्ठेचा होता. मी माझा वेग कमी ठेवला. झियादला ३०० मीटर पुढे जाऊ दिलं. एका क्षणी शेवटचा बिंदू म्हणजेच ‘एंडिंग पाँइंट’ दिसू लागला. पण, या क्षणी झियाद संपूर्णपणे संपला होता. त्याची ऊर्जा पूर्ण गेली होती. कारण तो खूप वेगाने धावला होता. याउलट माझी ऊर्जा मी वाचवली होती. कारण संयमाने सात फेऱ्या एकाच वेगात धावून मी ती कमवली होती. झियादने धावणं केव्हाच थांबवलं होतं आणि तो चालत होता.’ हा अनुभव एखाद्या सिनेमातल्या क्लायमॅक्ससारखा भासू लागला.
हा अनुभव रोमांचकारी असला तरी अतुल यांनी खिलाडू वृत्ती जपली. ते झियादच्या बाजूला येऊन ‘झियाद रन’ असं सांगू लागले. झियाद यांच्यासाठी जिंकण्याची ती शेवटची संधी होती. हरतोय असं दिसूनही त्यांनाही धावावं लागणार होतं. कारण प्रश्न ‘भारत-पाकिस्तान’चा होता. त्यांनीही धावायला सुरुवात केली. पण, शरीर पूर्णत: थकलं होतं. त्यामुळे ते जेमतेम शंभर पावलं धावू शकले. अर्थातच अतुल जिंकले. अतुल यांनी मेडल घेतल्यावर दोन मिनिटांनी झियाद तिथे पोहोचले. झियाद हे जगातील उत्कृष्ट धावपटूंपैकी एक आहेत. अतुल आणि झियाद हे दोघं चांगले मित्रही आहेत. असं असलं तरी झियाद यांच्या ‘नॉर्थ पोल मॅरेथॉनचा रेकॉर्ड’ बघताना भारताचं नाव पाकिस्तानच्या वर असेल याचा सार्थ अभिमान असल्याचं अतुल सांगतात.
उत्तर ध्रुवावरची ही मॅरेथॉन संपवून परत येत असताना अतुल आणि त्यांचा एक लेबेनिज मित्रं गप्पा मारत होते. तो मित्र त्यांना म्हणाला, ‘अतुल, खरं तर तू फोर डेझर्ट मॅरेथॉनमध्ये भाग घेतला पाहिजेस.’ अतुल यांना त्यावेळी या मॅरेथॉनबद्दल माहितीही नव्हती. पण, त्या मित्राने त्यांना त्याबद्दल सगळं सांगितलं. थोडक्यात त्याला सलग सहा दिवस दररोज ‘नॉर्थ पोल मॅरेथॉन’ एवढं धावायचं होतं. अशा चार मोठय़ा मॅरेथॉन. अतुल हा किस्सा सांगतात, ‘माझ्या मित्राने मला हे सगळं सांगितल्यावर मी तिथेच ‘नाही’ ठरवून मोकळा झालो होतो. पण, घरी परतताना विमानतळावर असताना सहज कुतूहल म्हणून मी इंटरनेटवर या फोर डेझर्ट मॅरेथॉनबद्दल माहिती काढली. आत्तापर्यंत किती भारतीयांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यात मला पुण्याची एकमेव मराठी मुलगी सापडली. पण, तिने एकापेक्षा जास्त वर्षांमध्ये ही चार वाळवंट पूर्ण केली होती. एकाच वर्षांत चारही वाळवंट धावणारा एकही भारतीय नव्हता. हीच माझ्यासाठी प्रेरणा ठरली. वयाच्या ४८व्या वर्षांत मी चार वाळवंट धावण्याचं ठरवलं. जिथे प्रचंड नैसर्गिक प्रतिकूलता असल्याने जीव जगतच नाहीत अशा जगातील वाळवंटं पालथी घालायची असं मी ठरवलं.’
यातलं पहिलं वाळवंट होतं ‘सहारा वाळवंट’. या वाळवंटात प्रचंड तापमान असतं. या तापमानामुळे उकळलेल्या वाळूत धावताना पाय आत रुततो. कारण पळताना वाळूत घर्षण मिळत नाही. आणि नेहमी आपण धावतो त्यापेक्षा पाच ते सहा पटीने जास्त श्रम लावावे लागतात. असं असतानाही ही मॅरेथॉन अतुल यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढचं होतं चीनचं वाळवंट. याला ‘गोबीचं वाळवंट’ असं म्हणतात. या वाळवंटाचं अतुल वर्णन करतात, ‘इथे सोसाटय़ाचा वारा असतो. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ढगफुटी’ म्हणजे काय असतं याचा संपूर्ण अनुभव या वाळवंटात येतो. ‘फुग्यात पाणी भरून त्याला टाचणी लावल्यावर जसं पाणी एकदम बाहेर येईल तसा पाण्याने तुडुंब भरलेला मोठ्ठाच्या मोठ्ठा ढग फुटून प्रचंड प्रमाणात पाणी पडतं आणि आपल्यासकट सगळं वाहून नेतं. या वाळवंटात खूप नद्या आहेत. आणि त्या नद्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराचे गोल बुळबुळीत गोटे आहेत. ज्यावरून एखादा घसरला तर तो गेलाच असं समजायचं. या मॅरेथॉनमध्ये दिवसाला सात ते आठ नद्या पार केल्याचा अनुभव मी घेतला. सकाळी खूप उष्णता आणि रात्री प्रचंड प्रमाणात थंडी, कधी पाऊस. त्यामुळे अशा वातावरणाचा अनुभव विलक्षण होता.
यानंतर तिसरं वाळवंट होतं चिलीच्या ‘अटाकामाचं’ वाळवंट. हे वाळवंट १४ हजार फुटांवर आहे. येथे सूर्य डोक्याच्या बरोबर वर म्हणजे ९० अंशावर असतो. १०५ अंश फॅरेनाइट एवढय़ा तापमानात धावायचं असतं. ‘या वाळवंटात मला नागपूरच्या उन्हाळ्यातल्या तापमानाची आठवण झाल्याचं ते सांगतात. येथे डोक्यावरच्या टोपीवर एक गॅलन पाणी ओतलं तर ती टोपी मोजून दोन मिनिटांच्या आत पूर्ण कोरडी होते. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीराचा अंदाज येत नाही. कधी खूप भूक लागते तर कधी अजिबात भूकच लागत नाही’, तिथला अनुभव ते सांगत होते. प्रत्येक मॅरेथॉननंतर विश्रांतीसाठी पाच ते सहा आठवडय़ांचा कालावधी असतो. पण तिसऱ्या आणि चौथ्या मॅरेथॉनमध्ये अतुल यांना फक्त तीन आठवडय़ांचा अवधी होता. आणि त्यात शरीराला संपूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला त्यांच्या एका डॉक्टर मित्राने दिला. पण, अतुल यांनी त्यांच्या धाकटय़ा मुलीला तिच्याबरोबर दहा किमी. मॅरेथॉन धावण्याचं कबूल केलं होतं. खरंतर त्यांच्या दृष्टीने त्या तीन आठवडय़ांत पुन्हा मॅरेथॉन धावणं योग्य नव्हतं. पण, तरीही मुलीसाठी अतुल यांनी ती मॅरेथॉनही पूर्ण केली. यामुळे ‘शब्द पाळण्याचा’चा संस्कार आपोआप तिच्यावर झाला असं अतुल सांगतात.
या सगळ्यानंतर शेवटची एक मॅरेथॉन राहिली होती. ‘द लास्ट डेझर्ट’..! ते म्हणजे अंटाक्र्टिका. अंटाक्र्टिकाला पोहोचणं हीच अतुल यांच्यासाठी सर्वप्रथम मोठी परीक्षा ठरली. ही परीक्षा ते कशी उत्तीर्ण झाले या विषयी ते सांगतात, ‘तिथे पोहोचण्यासाठी एका लहानशा बोटीतून जवळपास दोन दिवस प्रवास करावा लागतो. ती बोट इतकी हेलकावे घेते की मला खूपदा मळमळल्यासारखं होत होतं. बोटीतील सगळ्यांनाच किमान ३०-४० उलटय़ा झाल्या. मलाच त्यातल्या त्यात कमी त्रास झाला. ३० ते ४० फुटांच्या लाटा उसळत असल्याने दोन दिवस झोपही झाली नव्हती. पुन्हा सहा दिवस धावायचं होतं. त्यासाठी येणारा अशक्तपणा हा खूप मोठा अडथळा होता. तिथे थंड वातावरण असल्याने माझा फायदाच झाला. गरम वातावरणापेक्षा थंड वातावरण माझ्या शरीरासाठी पोषक ठरतं. पण, इतर वाळवंटांपेक्षा हे वेगळं होतं. या वाळवंटात विशिष्ट वेळेत विशिष्ट अंतर गाठायचं होतं.’ एकाच वेळी स्वत:जवळचा मर्यादित अन्नाचा साठा, बदलणाऱ्या तापमानाचा अंदाज, त्यानुसार बदलणारी शरीराची स्थिती, वेळेनुसार आणि तापमानानुसार धावण्याचा वेग या गोष्टी सांभाळत अतुल यांनी ‘द लास्ट डेझर्ट’ मॅरेथॉनही यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे मॅरेथॉन पूर्ण केलेल्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवशी ही मॅरेथॉन पूर्ण करणारा एकमेव भारतीय ठरण्याचा आनंद अतुल यांनी अनुभवला.
अतुल यांचा अमेरिकेत स्वत:चा व्यवसाय आहे. ‘फोर डेझर्ट’च्या वर्षी कुटुंबाची सर्व जबाबदारी अतुल यांच्या पत्नीने सांभाळली. तिच्या पाठिंब्याशिवाय हे सगळं शक्यच झालं नसतं, असं ते सांगतात. जगभरातून अतुल यांच्या कामगिरीला दाद मिळाली, पण, ही मॅरेथॉन पूर्ण करणारा ‘एकमेव भारतीय’ असून आपल्याच देशात त्याची दखलही घेतली नाही ही त्यांची खंत आहे. ते म्हणतात, ‘प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने मी हे केलंच नाही’ म्हणून नंतरही त्यांनी प्रसिद्धीसाठी कधी प्रयत्नही केले नाहीत. शेवटी ‘प्रत्येक यशस्वी माणूस प्रसिद्ध होतोच असे नाही आणि प्रत्येक प्रसिद्ध माणूस हा यशस्वी असतोच असेही नाही..!’
श्रुती आगाशे- response.lokprabha@expressindia.com