सव्वा वर्षांचा पंपू थोडा अडखळत, थोडा चालत, थोडा रांगत घरभर फिरायचा. एकदा तो काळोख असलेल्या खोलीत रांगत रांगत गेला आणि काळोखात भिंतीवर पडणारी हलणाऱ्या पडद्याची सावली बघत बसला. कोणीतरी ओरडलं, ‘‘जाऊ नकोस तिथे- अंधार आहे.. बुवा येईल!’’ पंपूला शब्द आवडला.. ‘बुवा’! तो तिथेच बसून सावल्या बघत हसत होता. तेवढय़ात धावत धावत कोणीतरी आलं आणि त्याला कडेवर घेऊन उराशी धरलं आणि दिवा लावला. पंपूनं भोकाड पसरलं. बोबडय़ा आवाजात ‘बुवा.. बुवा’ ओरडला. सगळ्यांना वाटलं, पंपू अंधाराला घाबरला. पंपूला फार गार.. शांत वाटला होता अंधार. त्यात ‘बुवा’ म्हणून काहीतरी गंमत आहे असंही कानावर पडलं होतं. पण आता कोणी त्याला अंधारात जाऊ देत नव्हतं.
अडीच वर्षांच्या पंपूला त्याच्या डॅडींनी खूप खेळणी आणली. रिमोटची गाडी, किल्ली दिली की कोलांटय़ा उडय़ा मारणारा कुत्रा, मऊ मऊ अस्वल.. पण पंपूला सारखं चिखलात खेळायचं होतं. मातीत पाणी ओतायचं आणि अख्खं अंग बरबटेपर्यंत चिखलात खेळायचं. अधूनमधून चिखलात उभं राहून उडय़ा मारायच्या. त्यातच फतकल मारून बसायचं. अगदी कोणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच बोट तोंडात घालायचं. एकदा त्याच्या डॅडींनी हे बघितलं आणि त्याला उचलून घरात आणून स्वच्छ आंघोळ घातली. आणि पंपूच्या आईला बजावलं की, ‘दारात फळी लाव. हा मातीत खेळताना दिसायला नको. इतकी महागाची खेळणी आणली आहेत मी! माझा मुलगा मातीत खेळताना दिसला लोकांना तर..’ वगैरे. मग दारात फळी बसवली गेली आणि पंपू खिडकीतून मातीकडे, झाडांकडे बघत घरातच खेळू लागला. रिमोटची मोटर, किल्लीवरचा कुत्रा..
महिन्याला आठ हजार रुपये फी असलेल्या शाळेत पंपूला घालताना डॅडी आणि मम्मी सॉलिड खूश होते. शाळेतच जेवण वगैरे. त्यात गृहपाठ नाही. आणि सगळ्या वर्तुळांमध्ये बोलताना महिना आठ हजार हा आकडा पण किती भारदस्त वाटतो! मग इतकं कमवायला किती कष्ट.. किती वेळ.. बाहेरगावी मीटिंग्स.. आणि मग ‘यू नो, मुलांना उत्तमात उत्तम सोय देतोय आम्ही.’
शहरामधल्या मोठमोठय़ा उद्योजकांची, डॉक्टर्स, अभिनेते, नेते मंडळींची मुलं पंपूच्या वर्गात होती याचा पंपूच्या डॅडी-मम्मीला आणि ड्रायव्हरला फार अभिमान होता. पंपू सगळ्यांशी छान गप्पा मारायचा; पण खेळताना मात्र त्याला सगळ्यात मजा यायची ती जग्गूबरोबर. त्यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या मावशींचा मुलगा जग्गू वेगवेगळे खेळ खेळण्यात निपुण होता. झाडावर सपासप चढायचा. खांबावर सर्रकन् वर जायचा. लंगडी, क्रिकेट, गोटय़ा, चोर-पोलीस काहीही खेळा- जग्गू धम्माल करायचा. पंपूला सहा वर्षांचा असताना मम्मी-डॅडींनी पिझ्झा खाता खाता समजावलं, की ‘हे बघ, जग्गू चांगला मुलगा नाहीये. त्याचे बाबा दारू पितात. आणि ते गरीब आहेत..’
पंपूला त्या दिवशी दोन नवीन शब्द कळले.. ‘दारू’ आणि ‘गरीब’! त्याने डॅडींना ‘‘परवा राजा-अंकलकडे तुम्ही सगळे पीत होतात ती पण दारू होती का?,’ असे विचारले. डॅडी लॅपटॉपमध्ये बघत बसले. मम्मी म्हणाली, ‘पंपू, झोप आता. मी उद्या सांगीन.. डॅडी बिझी आहेत ना!?’’
दुसऱ्या रात्री पंपूने ‘‘मम्मा, गरिबी कशी दिसते? गरिबी म्हणजे काय?’’ असं विचारलं.
‘‘ज्यांच्याकडे छान छान घर, कपडे, कार नसते ते गरीब.’’
‘‘पण जग्गू मस्त खेळतो. आणि त्याला गणित पण माझ्यापेक्षा भारी येतं. तो बूट न घालता पळतो, तरी शर्यत जिंकतो. तरी तो ‘गरीब’ आहे का?’’
‘‘पंपू झोप.. मी उद्या सांगते..’’ डॅडी लॅपटॉपमध्ये बघत होते..
‘उद्या सांगते’ची मम्मीची यादी आणि ‘मोठा झाल्यावर समजेल तुला..’ची डॅडींची यादी वाढत चालली होती.
डॅडी आणि त्यांचे मित्र काय पितात? जग्गू भारी का नाही? सगळ्यांची आई डब्यात पोळी-भाजी देते, मग मम्मी घरी असूनही पोळ्या का करत नाही?
आजी-आजोबा माझे इतके लाड करतात.. गोष्टी सांगतात.. गाणी शिकवतात; तरी ते आपल्याकडे सहा महिने आणि मुंबईला काकांकडे सहा महिने का राहतात?
काल आणलेला पिझ्झा खाऊ नकोस असं सांगणारी मम्मी तोच पिझ्झा जग्गूला का देते?
एरवी सगळ्यांशी हसतखेळत बोलणारी मम्मी आणि मायेनं डोक्यावरून हात फिरवणारी आजी एकमेकींशी का बोलत नाहीत?
डॅडींना रोज उशीर का होतो? आणि ते सारखं ‘हे सगळं तुझ्यासाठीच करतोय..’ का म्हणतात? मग ते माझ्यासाठी एकदाही शाळेच्या मीटिंगला का येत नाहीत?
..अनेक विचार, अनेक प्रसंग, अनेक शब्द.. जाच, सासर, कुरबुर, म्हातारपण, वृद्धाश्रम, पांग फेडणे, नशीब, लफडं, लाच, गुर्मी, माज.. सतत कानावर गोष्टी पडतायत, पण..
‘उद्या सांगीन’ आणि ‘मोठा झाल्यावर समजेल..’ची यादी भलीमोठ्ठी!
पंपूच्या मनातले प्रश्न, उत्कंठा, शंका त्याला कोणी बोलू दिल्याच नाहीत. सगळे फक्त सांगत राहिले यशाची त्रिसूत्री, हमखास यशासाठी बारा मंत्र, जात, धर्म, श्रद्धा, पद्धती, रिवाज.. पंपूला जे कळलं त्यापेक्षा वेगळं काहीतरी त्याच्या मनात आलंसुद्धा असतं; पण मुळात मुलांना चार गोष्टी सांगणं, मार्गदर्शन करणं, समुपदेशन, करिअर गाइडन्स यांतून ते निसटलंच. आणि मग त्या फुलपाखराच्या मागे धावणाऱ्या जग्गूवर प्रेम करणाऱ्या पंपूच्या डोक्यातले झरे, धबधबे, हिरवळ सगळं बाहेर गेलं आणि मग वेळापत्रक , कोष्टक, जमाखर्च, फायदे-तोटे, दूरदृष्टी त्यात शिरली.
शाळेच्या शेवटच्या वर्षांत हातात सतत मोबाइल घेऊन बसणाऱ्या पंपूला मम्मी म्हणाली, ‘‘गेस्ट आले आहेत.. हॅलो म्हण.’’ पंपू रोबोसारखा उठून गेस्टशेजारी बसला. ‘हॅलो’ म्हणाला. मग कोण, कसं, किती श्रीमंत आहे, कोणाकडे काय आहे, जमिनी, इमारती, शेती, मालमत्ता.. या डॅडींच्या चर्चेकडे उत्सुकतेने पाहत राहिला. त्याला वाटायचं, गप्पा म्हणजे विचारांची देवाणघेवाण, अनुभवकथन. पण आता कळलं- गप्पा म्हणजे व्यवसायासाठी पाश्र्वभूमी!!
मे महिन्याच्या सुट्टीत मम्मीच्या मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून एका संस्कारवर्गात पंपू गेला. त्यात आत्मविश्वास, निसर्गावर प्रेम, माणुसकी अशा गोष्टींवर चर्चा झाली. अंधार, चिखल आणि जग्गू यांचे संदर्भ आता इतके पुसट झाले होते, की पंपू अंधाराला, गणवेशातल्या अधिकाऱ्याला, परीक्षेपूर्वी देवाला, खोटं बोलल्यावर डॅडींना, चोरून सिगरेट ओढल्यावर मम्मीला घाबरल्यासारखं दाखवू लागला. पाय धुळीत न ठेवता स्वच्छ राहून निसर्गाची पुस्तकं वाचू लागला. मित्र करताना घराणं, व्यवसाय, योग्य उपयोग हे सगळं स्वाभाविकपणे त्याच्या मनात येऊ लागलं. पंपू ‘सुजाण नागरिक’ झाला!! मम्मी-डॅडींचा ऊर अभिमानानं भरून आला. आपण पंपूवर केलेल्या संस्कारांविषयी ते सगळ्यांना सांगू लागले. त्यांना हवा तसा ‘योग्य पंपू’ त्यांनी घडवला.
पंपूशेटच्या लग्नात साडेतीन कोटीचे दागिने घातले मुलीकडच्यांनी. पंपूशेट अमेरिकेत जाऊन परत आल्याने त्याला चांगला भाव आला.. लग्नाच्या मार्केटमध्ये. आता पंपूशेट एकटक लॅपटॉपमध्ये बघू लागला..
गंपूच्या जन्माच्या वेळी पंपूशेट बायकोला म्हणाले, ‘‘त्याला आपण खूप मोठा माणूस करू. त्याला लहानपणापासून चांगलं-वाईट, भलं-बुरं शिकवू. आपल्यापेक्षाही परफेक्ट व्हायला पाहिजे गंपू.’
गंपू रांगत रांगत अंधारात गेला.. त्याला धावत जाऊन उचलून आणून पंपूशेट शिकवू लागले.. ‘अंधार म्हणजे वाईट.’
काळा म्हणजे कमी.. गरीब म्हणजे दूर ठेव
बुटका म्हणजे कमी.. पैसेवाला धरून ठेव
आपलं आडनाव, त्याचा कप्पा..
आपला गट, आपले मित्र.. आपली भाषा.. फायदे-तोटे, जमाखर्च.. गंपूला मस्तपैकी मातीशी नातं जोडायचं होतं; पण पुन्हा एकदा घाणा सुरू झाला.. एक करेक्ट ‘गंपूशेट’ बनवण्याचा.. त्याच फॅक्टरीमध्ये!!
अंधार.. चिखल.. माती.. सगळं तेच. आणि पुन्हा एकदा गंपूचे डॅडी पण तेच.. ‘मोठेपणी कळेल’ आणि ‘उद्या सांगीन’वाले!! माल नवीन, फॅक्टरी तीच!!
saleel_kulkarni@yahoo.co.in