आद्य शंकराचार्य यांनी अखेरच्या दिवसांत शिष्यांना एक संदेश दिला. ते म्हणाले, ‘एकच ब्रह्म आपल्या आत्मसामर्थ्यांने नानात्व धारण करते. याकरिता त्या शुद्ध, बुद्ध, मुक्त सच्चिदानंद स्वरुपाची उपासना सर्वानी करावी. परंतु हे जे नानात्व दिसते त्यातूनच या सृष्टीचे वैविध्य स्पष्ट होते. प्रत्येक प्राणिमात्राच्या रुचीतही वैविध्यता दिसून येते. या रुची वैचित्र्यामुळे प्रत्येकाच्या उपासना पद्धतीतही भिन्नता असते. या भिन्नतेचा आदर करावा. कोणत्याही कारणास्तव अशा विविधतेची हेटाळणी करू नये.’ शंकराचार्यानी विविध उपासनामते मोडीत काढून अद्वैत मत प्रस्थापित केले, असे आपण म्हणतो. प्रत्यक्षात उपासना पद्धतीच्या वैविध्याला त्यांनी नष्ट केले नाही तर त्या सर्वाचा जो एकसमान आंतरिक उद्देश आहे त्याला चिकटलेल्या भेदाभेदावर आणि विपरीत मान्यतांवर त्यांनी घाव घातला. साईबाबांनी अखेरच्या दिवसांत एकदा उग्र क्रोधावतार धारण करीत अंगावरची कफनी आणि डोईचं वस्त्र काढून शेकोटीत फेकलं अन् ओरडले, ‘‘कोणी मला खरं ओळखलं नाही. ज्या कारणासाठी मी आलो त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही.. मी खरा कोण आहे पाहायचं होतं ना? पाहाआता!’’ साई, शंकराचार्य, कबीर अशी अरुपाची अनंत रूपं अवतरली. त्यांचा अंतस्थ उद्देश आणि कळकळ एकच होती. आम्ही त्यांना जाती, धर्म, प्रांत, वेष या चौकटीत चिणून टाकण्याचाच प्रयत्न केला. आम्ही कितीही मोडतोड केली आणि आवरणं घालायचा प्रयत्न केला तरी सत्य त्याच्या मूळ लखलखीत स्वरूपात प्रकटल्यावाचून राहूच शकत नाही. त्या सत्याचा मार्ग दाखविणाऱ्या या अरुपांच्या रुपाचा बोध जाणून घ्यायचा हा अल्पसा प्रयत्न होता. समारोप करताना एक कळकळीची प्रार्थना आहे. दुर्बिणीतून आपण सृष्टीचं विराट रूप पाहातो. किती ग्रह, किती तारे, किती शब्दातीत आणि अद्भुत असं विराट रूप! पण ते पाहाणं सोडून जर आपण दुर्बिणीकडेच पाहू लागलो तर काय उपयोग? दुर्बिणीचं कौतुक वाटून तीच न्याहाळू लागलो तर विराटाचं दर्शन अंतरेल. अध्यात्माच्या क्षेत्रात आज दुर्बिणींचाच उदोउदो सुरू आहे. मूळ दर्शन बाजूलाच राहाते आहे. हे लिहिणाऱ्याची किंमतही त्या दुर्बिणीपेक्षा अधिक नाही. आणि जो ही विराट, अनंत कोटी ब्रह्माण्डांची सृष्टी उत्पन्न करतो आणि सांभाळतो त्याला काय अशा शेकडो कचकडी दुर्बिणी बनवता येणे कठीण आहे? तेव्हा ओढ विराटाच्या दर्शनाची असू द्या. दुर्बीण पाहण्याची नव्हे. दुर्बिणीतून विराट सृष्टी पाहाताना केवळ तुम्ही आणि ती सृष्टी यांच्यातच एकरूपता निर्माण होते. विराटाचा वेध घेताना माध्यममात्र असलेल्या दुर्बिणीच्या अस्तित्वाचीही जाणीव जेव्हा लोपते ते पाहाणे खरे. आपण जे वाचतो त्यातील विचारांशी जेव्हा आंतरिक एकरुपता होते त्यातच खरा आनंद असतो. ते विचार पोहोचविणाऱ्या माध्यमाला मधे कडमडू देणं हा त्या विराटाचा अवमान आहे.
२८८. प्रार्थना
आद्य शंकराचार्य यांनी अखेरच्या दिवसांत शिष्यांना एक संदेश दिला. ते म्हणाले, ‘एकच ब्रह्म आपल्या आत्मसामर्थ्यांने नानात्व धारण करते. याकरिता त्या शुद्ध, बुद्ध, मुक्त सच्चिदानंद स्वरुपाची उपासना सर्वानी करावी. परंतु हे जे नानात्व दिसते त्यातूनच या सृष्टीचे वैविध्य स्पष्ट होते.
First published on: 29-12-2012 at 12:01 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 288 prayer