हा पूर्ण नव्हे अर्धविराम आहे. याचाच अर्थ हे सदर संपवतानाच उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या सदराची ही प्रस्तावना आहे. हे सदर असेल श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या बोधाचा मागोवा घेणारं. त्याला निमित्तही आहे. श्रीगोंदवलेकर महाराज यांनी देह ठेवल्याच्या घटनेला ७ जानेवारी २०१३ या दिवशी  (तिथीनुसार) ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा २०१३ हे वर्ष त्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षांचा प्रारंभ आहे. सागराचं अध्र्य सागरातच सोडलं जातं त्याप्रमाणे श्रीमहाराजांच्या बोधसागरातून भरलेली ओंजळ त्यांच्याच स्मरणात त्याच बोधसागरात अर्पित करायची ही संधी हा आत्मिक आनंदयोग आहे. श्रीमहाराजांचा विचार आणि त्याचा मागोवा, असं या सदराचं बहुतेकवेळा स्वरूप असेल. सदर आकारमानाने लहान असेल पण श्रीमहाराजांच्याच बोधामुळे विचारमानाने दुणावले असेल. खरंतर श्रीमहाराजांनी जे सांगितलं त्याला आपल्या विवरणाचं ठिगळ जोडण्याची काही गरज नाही. तरी त्यातही वेगळा आनंद आहे. कारण या ना त्या योगे त्यांचंच चिंतन साधणार आहे. श्रीमहाराजांच्या अनुषंगाने लिहिण्याआधी त्यांचं एक वाक्य मनात येतं. त्याचा आशय असा होता की, ‘जे माझी निंदा करतात त्यांना मी खरा कोण ते कळलं नाहीच पण जे माझी स्तुती करतात त्यांनीही मला खरं ओळखलेलं नाही.’ अर्थात त्यांची स्तुती ही सुद्धा एक मर्यादाच. क्षुद्र जीव क्षुद्र आकलनाच्या जोरावर अनंत कोटी ब्रह्माण्डाचा जो स्वामी त्याची काय स्तुती करणार? तेव्हा त्यांच्या बोधाच्या आत्मिक स्वरुपाकडे जाण्याचा हे सदर म्हणजे एक प्रयत्न असेल. तो साधेल किंवा फसेल पण त्यायोगे स्मरण तर त्यांचंच होईल! त्या स्मरणाची गोडी फार विलक्षण आहे हो. ते कसं आहे, आहे माहीत? शुद्ध तुपाचा मोदक कितीही वेडावाकडा झाला तरी त्याची गोडी अवीटच असते. त्याप्रमाणे सांगणारा वेडावाकडा असला तरी श्रीमहाराजांचा बोधच जर त्यातून येणार असेल तर त्याची गोडी असेलच. इ.स. १८४५ ते २२ डिसेंबर १९१३ असे अडुसष्ठ वर्ष श्रीमहाराज देहात होते. त्यानंतर १९२५ ते १९६७ असा ४२ वर्षांसाठीचा त्यांचा पुनर्सहवास तात्यासाहेब केतकर यांच्यायोगे लाभला. एकूण मिळून ११० वर्षे. जणू एका जपमाळेइतकी र्वष श्रीमहाराज आपल्या माणसांसाठी दिवसरात्र सेवेत होते. अखेपर्यंत त्यांनी प्रापंचिकांना आणि विरक्तांनाही केवळ सत्याचाच मार्ग दाखविला. कर्तेपण भगवंताकडे देऊन अकर्तेपणाने जीवन जगण्याची कला त्यांनी शिकवली. साध्यासोप्या शब्दांत आणि देहबुद्धीत जखडलेला लोकस्वभाव लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येकाला तो आहे त्यापेक्षा दोन पावलं पुढेच नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी परमार्थाचा हाट भरवला तेथून कस्तुरी घेण्याऐवजी आम्ही हिंगजिरंचं मागत राहिलो. आजही आमच्या सर्व प्रार्थनांना हिंगजिऱ्याचाच वास आहे. तो वास सुटावा आणि त्यांचा सहवास लाभावा यासाठी ब्रह्मचैतन्यांच्या विचारांचा मागोवा घेणारं चैतन्य चिंतन उद्यापासून..

Story img Loader