संवादाची माध्यमे वाढली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप..दिवसभर असंख्य गोष्टी आदळत राहतात एखाद्या प्रपातासारख्या. त्यातल्या किती गोष्टींना धरून ठेवतो आपण किंवा किती जखडून टाकतात आपल्याला. की हे सगळे आदळत राहिले आपल्यावर तरीही साधा ओरखडाही उमटणार नाही अशी ठेवण करून घेतली आपण आपल्या मनाची? शेवाळलेल्या दगडी गोटय़ाला पाण्याच्या प्रवाहातले तरंग जाणवत नाहीत. असे तर झाले नाही ना आपले?
एक नवश्रीमंत शेतकरी. एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा सातबाऱ्यापुरताच त्याचा शेतीशी संबंध. नुकतीच महागडी कार घेतली. त्या कारचा फोटो. कार कुठे लावली तर जनावरे बांधतात त्या जागेत. शेतातून नेमकीच ती कार आली असावी. समोरच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर कारमधून बाहेर तोंड काढणारे एक कुत्र्याचे पिल्लू. मागच्या सीटवर आडवी टाकलेली एक कडब्याची पेंढी. त्या पेंढीचा वरचा भाग कारच्या मागच्या खिडकीतून बाहेर आलेला. ही कडब्याची पेंढी बसावी म्हणून एका बाजूची काच मुद्दाम उघडी ठेवलेली. फोटो लगेचच फेसबुकवर. ‘शेतकऱ्याचा नाद नाय करायचा’. यातल्या सगळ्याच तपशिलात एक खुन्नस. जिथं जनावरं बांधतात त्या जागेत आम्ही कार ठेवतो, भलेही कारमधून माणसे प्रवास करीत असतील, पण आम्ही तिचा वापर कडब्याची पेंढी आणण्यासाठीही करू. आमची बातच न्यारी. आमच्या नादी नाही लागायचं. अशी भावना फोटोत ठासून भरलेली.
हा फोटो जर एखाद्या राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराने पाहिला की ज्याला गावाकडच्या घराचे फुटके छप्पर वर्षांनुवष्रे दुरुस्त करता येत नाही याची सल आहे किंवा सारे घरदार राबूनही पदरात काहीच पडत नाही त्यामुळे घराचा एखादा कोपराही बांधता येत नाही हे त्याचे दुखणे आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या आपल्या पोराला ठरविले त्या वेळी पसे पाठविता येत नाहीत ही अगतिकता असणाऱ्या एखाद्या बापाच्या पोराने जर असा फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल? हा कसला नाद आणि कोणाशी नाद? याचा विचार करण्याची आवश्यकताच वाटत नाही. असे असंख्य फोटो दिसतात ‘िभती’वर. त्यावरच्या ‘कमेंट’सुद्धा तितक्याच अंगावर येणाऱ्या. ‘नेते.. गेट’, ‘बस्स.. एकच वाघ’, ‘तुमच्यासाठी काय पण’ यासारख्या असंख्य प्रतिक्रिया. परस्परांच्या अस्मिता गोंजारणाऱ्या, टोकदार करणाऱ्या. माध्यमांनी संवाद साधावा ही अपेक्षा, पण अस्मितेला ललकारणाऱ्या, सतत युद्धमान संघर्षांसारखी भाषा बोलणाऱ्या अशा किती तरी गोष्टी दिसतात िभतीवर. हे सगळे चहुबाजूंनी सुरू आहे. एक प्रचंड धुसफुस जाणवते कधी कधी. एकदा आपण ‘िभती’वर व्यक्त झालो की मग संवादाची गरजच उरत नाही. समोरच्या माणसांशी, आसपासच्या लोकांशीही बोलण्याची, त्यांना समजून घेण्याची आवश्यकता भासत नाही. शेजारी काय जळते आहे याच्याशी काही देणेघेणे नाही, पण जगातल्या कुठल्याही गोष्टीवर आपली प्रतिक्रिया आणि ‘लाइक’ देणे आवश्यक वाटू लागते. त्याशिवाय आपण आहोत ही कल्पनाच पटत नाही. जिवंत आहोत असे वाटत नाही. बरे संवादी असणे म्हणजे केवळ बाहेरच्या जगाशीच वरवरचा संबंध असणे असेही नाही. कधी कधी आपल्या स्वत:शीसुद्धा संवाद असावा लागतो. सतत स्वत:ला तपासावे लागत असते. स्वत:च्याही आत वाकून पाहण्याची, कंगोरे न्याहाळण्याची आंतरिक गरज असते. समाजात वावरताना आपण डोळे उघडे ठेवून वावरत असू तर मग आपल्या आजूबाजूच्या घटना-घटितांचा अन्वय लावताना कधी तरी अंतर्मुखही व्हावे लागते. सतत धारण करावी लागणारी बहिर्मुखता हीच जर एखाद्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असेल तर मग अशा पर्यावरणात जगण्यासाठी लागणाऱ्या संबंधांच्या तंतुमय धाग्यांचे काय?
जग जवळ आले आहे. संवादाची माध्यमे वाढली आहेत आणि ती गतिमानही किती आहेत. चहा पितानाचा फोटो, जेवण करतानाचा फोटो किंवा कोणाची भेट घेतली तर त्याचा फोटो. सतत व्यक्त होण्याची ही धडपड. आपण आणि आपले जग यात अंतरच नाही. फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सतत लोकांसमोर येण्याची चाह. आयुष्यातली प्रत्येक घटना, प्रसंग लगेचच इतरांना सांगण्याचा अनिवार उत्साह. त्यावरचे ‘लाइक’ किती यावरून आपले स्थान ठरविण्याचा प्रयत्न. आपल्यापुरत्या दुनियेत आपली उपस्थिती दर्शविण्यासाठी, कायम दखलपात्र राहावे यासाठी, सतत केंद्रस्थानी राहण्यासाठी चाललेली ही ‘नेटाधारी’ कसरत. खेडी आणि शहर यातला फरकही उरलेला नाही आता. एक अर्धनागरी जग जे नव्याने अस्तित्वात येत आहे त्या जगातही हा बदल झपाटय़ाने होत आहे. प्रत्यक्ष किंवा आपण जिथे राहतो, वावरतो तिथे काय आहे हे पाहायचेच नाही. आजूबाजूलाही लक्ष द्यायचे नाही. सगळे पाहायचे ते ‘िभती’वर. जगात जे काही घडत आहे, माध्यमाद्वारे जे काही दिसत आहे, त्याकडे निर्वकिारपणे पाहायचे आपला प्रत्यक्ष संबंध नसल्यासारखे. जणू आपण एकएकटे स्वतंत्रपणे एका एका बेटावर राहत आहोत. बधिरीकरण करून टाकले आहे अशा पद्धतीने आपण टीव्हीसमोर बसणार. जे पाहतोय त्यावर आपण व्यक्तही होऊ आपल्या हाताशी असणाऱ्या माध्यमाद्वारे, पण प्रत्यक्ष संवेदनेच्या पातळीवर काय? अशी एखादी घटना अस्वस्थ करते आपल्याला? हलवते का मुळापासून गदागदा आणि भाग पाडते का हस्तक्षेप करायला? फक्त ‘लाइक’ करून एखाद्या वेळी ‘कमेंट’ दिली की संपते का आपली जबाबदारी? दिवसभर असंख्य गोष्टी आदळत राहतात एखाद्या प्रपातासारख्या. त्यातल्या किती गोष्टींना धरून ठेवतो आपण किंवा किती जखडून टाकतात आपल्याला. की हे सगळे आदळत राहिले आपल्यावर तरीही साधा ओरखडाही उमटणार नाही अशी ठेवण करून घेतली आपण आपल्या मनाची? शेवाळलेल्या दगडी गोटय़ाला पाण्याच्या प्रवाहातले तरंग जाणवत नाहीत. असे तर झाले नाही ना आपले? अर्धनागरी जगातल्याही अनेक गोष्टी दिसतात माध्यमाद्वारे. आपल्या आजूबाजूच्या काही घटना दिसतात छोटय़ा पडद्यावर. मग हा पडदा टी.व्ही.चा असेल किंवा संगणकाचा. पाहिल्यावर चमकून जातात माणसे. ‘अरे! हे तर आपल्या गावातलं’, ‘हे तर आपल्या जवळचं’. आपल्या जगातले काही तुकडे माध्यमात दिसले की आपल्या प्रत्यक्ष जगण्यातल्याही जगाचा विसर पडतो माणसांना. गावातल्या शाळेची अवस्था वाईट, गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत, एखादी अडलेली बाई असेल तर गावातच तिची प्रसूती सुखरूप होईल अशी व्यवस्था नाही, कधी कधी पावसाळ्याच्या दिवसात वरच्या वर्गात शिकण्यासाठी दुसऱ्या गावाला जावे लागते तेव्हा ओढय़ावर साधा पूलही नसतो. वाहत्या धारेतून लहान मुले एकमेकांचा हात धरत रस्ता पार करतात. यातले काहीच दिसत नाही, काहीच पोहोचत नाही आमच्यापर्यंत. जेव्हा त्याच गावात राहूनही आमचे लक्ष कुठल्या तरी ‘िभती’वर असते आणि डोळे कायम खिळलेले असतात पडद्यावर.
तात्कालिक प्रतिक्रिया हीच आपण सजग आणि जिवंत असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य़ धरण्यात यावी अशी अपेक्षा असेल तर मग हा संवाद बुडबुडय़ासारखा सप्तरंगी दिसू लागतो पण तो फुटतोही लवकर. त्याला ना कशाची घनता ना कुठलीही ओल असलेले द्रवरूप रसायन.. ‘फेस’च सगळा!
नाद नाय करायचा
संवादाची माध्यमे वाढली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप..दिवसभर असंख्य गोष्टी आदळत राहतात एखाद्या प्रपातासारख्या. त्यातल्या किती गोष्टींना धरून ठेवतो आपण किंवा किती जखडून टाकतात आपल्याला.
आणखी वाचा
First published on: 15-09-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व धूळपेर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrogant use of social media in rural areas