कलावंताच्या मनात वसतीला असलेल्या जगाचा आणि वास्तवातल्या जगाचा कायम झगडा चाललेला असतो. लिहिताना, व्यक्त होताना हा झगडाच सुरू असतो. दोन जगांची सरमिसळ होते, संघर्ष होतो आणि यातले सत्त्व जितके असेल ते बाहेर यावे असे लेखकाला वाटत असते.. हे सत्त्व राखायचे, तर चाळणारी चाळणी हवी.. पाखडणारे सूप हवे.. आहे का ते आपल्यापाशी?
एखाद्या आदिवासी भाषेतले गीत कोणी म्हटले म्हणजे लगेच त्या आदिवासींच्या जगात प्रकाश येईल असे नाही. एखाद्या बालमजुरावर कोणी कविता केली म्हणजे लगेच त्याच्या डोक्यावरचे ओझे कमी होईल असे नाही किंवा एखाद्या मजुराच्या आयुष्यावर कोणी पथनाटय़ सादर केले म्हणजे लगेच त्याला मजुरी मिळेल असे नाही. बलांच्या गळ्यात घुंगरमाळा असतात. बल जेव्हा शेतातील मशागतीची कामे करतो तेव्हा या घुंगरमाळांचा आवाज एका लयीत येत राहतो. या घुंगरमाळांची किणकिण बलांचे ढोरकष्ट कमी करील असे नाही. रात्री गुरांच्या गोठय़ातल्या जनावरांच्या हालचालीनुसार घुंगरमाळांचे आवाज येत राहतात. राबणूक आणि घुंगरमाळांचा नाद यात मोठे अंतर आहे. कलेचे जग जीवनाशी संबंधित असले तरीही ते पूर्णपणे वेगळे आहे. एखाद्या खेडय़ातल्या मुलीचा निरागस चेहरा असलेले चित्र विकले गेले, त्याला चांगली किंमत आली म्हणजे लगेच गावातल्या कुठल्या तरी कष्टणाऱ्या मुलीच्या आयुष्यातल्या वाटेवरचे काटे दूर होतील असे नाही. कला कोणतीही असेल किंवा शब्द असतील, ते जीवनाशी संवादी असले म्हणजे लगेच जगणे सुकर होईल असे नाही; पण ते तसे व्हावे अशी कलावंताची आस असते.
कलावंत, त्यातही जो शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होतो त्याच्या अवतीभोवतीचे जग अगदी सुरळीत आणि त्याच्या मनासारखेच असेल असे नाही. अनेकदा अस्वस्थ करणारे असते, हताश करणारे असते. याच्याउलट कलावंताच्या मनातही एक जग असते त्याचे स्वत:चे. कोणताही कलावंत हे युग बाळगतच वावरत असतो. कलावंताच्या मनात एका चांगल्या जगाचे चित्र असते. जिथे कोणीच कोणाचे शोषण करणार नाही, माणूस न्यायाने वागेल, दुबळ्यालाही आपल्या पाठीवरचे वळ दाखविण्याची भीती वाटणार नाही, किंबहुना असे कोणी कोणाच्या पाठीवर आसूडही बडवणार नाही. या जगात माणसाचे माणूसपण शाबूत राहील अशी आकांक्षा असते. या जगात खुले, मोकळे आकाश असेल आणि सर्वानाच मोकळा श्वास घेता येईल याची सोय असते. जात, धर्म, िलग, भाषा याआधारे एक दुसऱ्याला नाकारण्याचा प्रकार नसेल. अर्थात हे सगळे असते कलावंताच्या मनातल्या जगात; पण वास्तवातले जग मात्र याच्या नेमके उलटे. दोन वेगवेगळ्या जगांचे हे असे स्वरूप आहे. कलावंताच्या मनात वसतीला असलेल्या जगाचा आणि वास्तवातल्या जगाचा कायम झगडा चाललेला असतो. लिहिताना, व्यक्त होताना हा झगडाच सुरू असतो. दोन जगांची सरमिसळ होते, संघर्ष होतो आणि यातले सत्त्व जितके असेल ते बाहेर यावे असे लेखकाला वाटत असते.
ग्रामीण भागात सत्त्व निके करण्याच्या काही पद्धती आहेत. धान्य पाखडण्यासाठी सूप असते. या सुपाच्या आधारे जेव्हा धान्य पाखडले जाते तेव्हा त्यातले नि:सत्त्व, फोलपट आपोआपच एका बाजूला गोळा होते. जे चांगले आहे ते त्यातून वेगळे काढले जाते. कधी कधी धान्य चाळावयाची चाळणी असते. या चाळणीतून जी घुसळण होते त्या वेळी जे बारीक आहे ते गळून पडते, जे आकाराने जरा मोठे आहे ते चाळणीतच राहते. त्यातही आपण चाळतो काय यावरही बरेच काही अवलंबून असते. म्हणजे कधी चाळणीच्या खाली पडलेले टाकाऊ असते आणि चाळणीत राहिलेले राखून ठेवायचे असते, तर कधी चाळणीत राहिलेले टाकाऊ आणि चाळताना खाली जमा झालेले महत्त्वाचे. ..आपण काय चाळतो यावर ते अवलंबून आहे. तर गोष्ट आहे सत्त्व राखण्याची. सगळ्याच संघर्षांत हीच गोष्ट महत्त्वाची.
..फोलपट सगळे बाजूला करून सत्त्व राखण्याचाच आटापिटा लेखकाला, कलावंताला करावा लागतो. जगातले काय टाकाऊ आणि काय राखून ठेवण्याजोगे याचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा लागतो. जगात वावरताना पाखडण्याजोगे खूप अनुभव असतात. ते सत्य-असत्याच्या कसोटीवर तपासावे लागतात. यात भले काय आहे ते पाहावे लागते. सत्त्व राखावे लागते. त्याआधारेच एका चांगल्या जगाचे स्वप्न आपण पाहू शकतो. वास्तवातले जग अपेक्षाभंग करणारे, संभ्रमित करणारे, कुरतडणारे असले तरीही जगण्यासाठीचे चांगले सत्त्व गोळा करून या जगाचे स्वप्न आपण पाहत असतो. असे जग अस्तित्वात येईल काय? प्रत्यक्षात दिसेल काय? हे प्रश्नही उपस्थित होतातच; पण असे प्रश्न उपस्थित करून थांबता येत नाही. ज्या जगात आपले अस्तित्व असते ते जग प्रसंगी भयाण वाटते म्हणून ते सोडून अन्यत्र जाता येत नाही. तिथे थांबूनच काही तरी बदलण्याचा प्रयत्न करावा लागतो. कुठून चांगले जग आयात करता येत नाही.
एखादा वाहणारा निर्झर असेल, फुलांनी डवरलेली एखादी फांदी असेल किंवा रंगीबेरंगी गवताच्या हिरवळीवर उडणारे एखादे फुलपाखरू असेल असे जग मोहविणारे असले तरीही असा एखादा तुकडा आपल्याला आणता येत नाही किंवा जो सूर्य आग ओकणारा नाही, पण ऊब देणारा आहे असा सूर्य आपल्या छताला, आढय़ालाही आणून टांगता येत नाही. अशी काही आकांक्षा असेलच तर ती फक्त एखाद्या चित्रात पुरी करता येईल. असे एखादे चित्र काढूनच तो कलावंत आपल्यापुरते तरी हे जग उभे करू शकतो. वास्तवातल्या भयाण जगात आपले म्हणून त्याला एक छोटे का होईना, पण स्वत:चे जग साकारता येऊ शकते.
शब्दातूनही जेव्हा जेव्हा असे काही साकारण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तीच आस असते. त्यामुळे एखादी कविता, एखादी कथा, एखादी कादंबरी किंवा नाटक या सगळ्या अभिव्यक्तींच्या माध्यमाद्वारे लेखक आपल्या मनातल्या जगाची एक खिडकी उघडून देतो. बाहेरच्या जगात अस्वस्थ व्हावे असे काही असले तरीही ‘हा रस्ता अटळ आहे’ याचेही त्याला भान असते. अशा वेळी काही शब्द त्याच्या मदतीला येतात. शब्दांच्या आधारेच तो आपल्या अनुभवाचे आकार शोधतो. कधी शब्द अडून बसले आहेत असेही होते आणि कधी मानगुटीवर बसले आहेत असेही होते. मनाजोगा शब्द सापडल्यानंतर एखादा सख्खा जिवलग भेटल्याचा आनंद होतो. शब्दांनाही त्यांचे स्वभाव असतात माणसाच्या प्रवृत्तीसारखे; पण या ‘दुसरे जग’ साकारण्याच्या प्रक्रियेत शब्दांइतके हुकमी आणि विश्वासाचे दुसरे काहीही नसते. त्यांच्याच आधारे आपण समाजातले सत्त्व राखण्याची, पाखडण्याची प्रक्रिया पार पाडतो. हे सत्त्व जेव्हा शाबूत राहते तेव्हाच आपल्याला काळीज सुपाएवढे वाटू लागते.