‘वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते’ हे जॉन मॅकी यांचे प्रतिपादन  नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रात नवी रुजवात घालणारे ठरले..
‘मूल्य’ या तात्त्विक संकल्पनेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. तिचे विश्लेषण न करता, ती समजावून न घेता व्यवहारात सर्रास उपयोगात आणली जाते आणि मग एकच मूल्यसंघर्ष निर्माण होतो. व्यक्तिगत व सामूहिक जीवनकलह तीव्र बनतो. मूल्य संकल्पनेच्या रहस्याचे आकलन झाले तर अटळ जीवनकलहाची तीव्रता सहन करणे सोपे जाते.
मूल्य (value) हा शब्द ‘आर्थिक मूल्य’ अशा अर्थाने अ‍ॅडम स्मिथने उपयोगात आणला. नंतर रुडॉल्फ हरमन लोत्झ (१८१७-१८८१), आल्ब्रेख्त रिचेल (१८२२-१८८९), नीत्शे (१९४४-१९००), अलेक्स मायनाँग (१८५३-१९२०), एडवर्ड हॉर्टमन (१९४२-१९०६), विल्बुर अर्बन (१८७३-१९५२), आर. बी. पेरी (१८७६-१९५७) या तत्त्वचिंतकांनी त्याला व्यापक अर्थ दिला. या व्यापक अर्थाने तो शब्द अर्थशास्त्रासह नीती, धर्म, कला, विज्ञान, कायदा, रूढी व राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रांत रुळला. आजकाल वाङ्मयीनमूल्ये, जीवनमूल्ये, लोकशाहीमूल्ये अशा तऱ्हेचे शब्दप्रयोग आपल्या बोलण्या-लिहिण्यात येतात ते याच अर्थाने. या ठिकाणी ‘मूल्य’ शब्दाने नेमके काय कळते, मूल्य हा काही वस्तुगत धर्म आहे की मनुष्यकृत आरोपण आहे, मूल्यांची प्रतवारी किंवा वर्गीकरणात्मक व्यवस्था लावता येईल काय, याचा विचार आवश्यक असतो. मूल्यांचे स्वरूप, त्यांचे प्रकार, त्यांचे परस्परसंबंध, त्यांच्या प्रामाण्याचा आधार यांचा काटेकोर तार्किक विश्लेषणात्मक विचार करणारी अशी तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे मूल्यशास्त्र अथवा मूल्यमीमांसा (अ‍ॅक्सिऑलॉजी).
तत्त्वज्ञानात नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र यांना मूल्यशास्त्रे मानले आहे. जगताना मूल्यसंघर्ष होतो, याचा अर्थ मुख्यत: या दोन क्षेत्रांत संघर्ष होतो.
प्रथम हा टकराव नीतिशास्त्रात कसा उद्भवतो, ते पाहू. वर्णनात्मक नीतिशास्त्र आदर्शवादी नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र हे नीतिशास्त्राचे चार प्रकार लक्षात घेता मूल्यसंघर्ष पुढीलप्रमाणे निर्माण होतो.  
वर्णनात्मक नीतिशास्त्र लोकांच्या नतिकतेच्या रेडीमेड श्रद्धा, विश्वास व संकल्पना यांचे वर्णन करते. आदर्शवादी नीतिशास्त्र, कुणी तरी सांगितलेली नीती पाळणे कसे योग्य आहे, हे सांगते. अधिनीतिशास्त्र त्यांची काटेकोर तार्किक चिकित्सा करू पाहाते. उपयोजित नीतिशास्त्र व्यक्तीचे खासगी जीवन आणि तिचे सार्वजनिक जीवन यातील फरकानुसार नतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत मांडते.
 आता, संघर्ष निर्माण कुठे होतो? नीतिशास्त्रात तो दोन प्रकारे निर्माण होतो. वर्णनात्मक नीती व आदर्शवादी नीतीनुसार एखाद्या गोष्टीचे वर्णन करणे, हे एका अर्थाने आदेश देणेच असते. त्यामुळे या दोन्ही नीती सक्तीच्या पाळावयाच्या पारंपरिक नीती ठरतात, पण त्यांना प्रश्न विचारला म्हणजे परंपरेपलीकडे, अधिपातळीवर म्हणजे अधिनीतिशास्त्रीय पातळीवर आपण गेलो की परंपरा आणि नवता यात संघर्ष सुरू होतो. उदाहरणार्थ, काळा-गोरा हा वर्णभेद, जातिभेद, िलगभेद, ‘परधर्मो भयावह:’  या परंपरा असून त्या पाळणे चांगले असते, हे आदर्श आहेत. पण ‘गोरेपण-उच्च जात किंवा पुरुष असणे चांगले कसे,’ असा प्रश्न अधिपातळीवर जाऊन विचारला की संघर्ष, तणाव निर्माण होतो. एखादी गोष्ट आदर्शवादी मानली की तिला ‘का?’ म्हटले की ती परंपरेला आव्हान देते. मी कोणती नीती निवडणार? हा या संघर्षांचा पाया बनतो. हा पहिला प्रकार आहे.
नीतिशास्त्रातील संघर्षांचा दुसरा प्रकार अगदी अलीकडे निर्माण झाला. उपयोजित नीतिशास्त्र व्यवसायाचे नीतिशास्त्र रचू पाहते. त्या क्षेत्रात हा संघर्ष ठळकपणे दिसून येतो. उपयोजित नीतिशास्त्र समाजसेवा (Social Service), पेशा (Vocation), व्यवसाय (Profession), धंदा (Business),  नफेखोरीचा धंदा (trade) आणि उद्योगसमूह (Corporation / Company)   यांत नेमका फरक करते. पण तो कागदावरच राहिला. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात यातील नेमके आपण काय निवडले आहे? हा अधिपातळीवरील प्रश्न विचारला की संघर्ष निर्माण झालाच! शिक्षण, शेती, परराष्ट्र धोरण किंवा वेश्याव्यवसाय यांत फरक कसा करणार? (वेश्याव्यवसाय, एस्कॉर्ट अव्हेलेबल हा व्यवसाय की सामाजिक दुरित? हा तर एक स्वतंत्र नतिक प्रश्न आहे.)   
भारतात तर कोणत्याही सामाजिक कृतीचे रूपांतर नफेखोरीच्या धंद्यात होऊ शकते. गप्पा मारणे या साध्या-सरळ गोष्टीचा व्यवसाय झाला की ‘गप्पाष्टक’ हा धंदा होतो. शिक्षण, सुशिक्षित नागरिक, शेती, बँकिंग, नागरी सेवा इत्यादी देशाची गरज आहे की चन आहे, याचा व्यापक विचार न झाल्याने त्याचे रूपांतर नफेखोरीच्या धंद्यात झाले आहे. विशेषत: राजकारण हा सेवा की धंदा? हा नतिक पेच आहे. तेच उद्योगसमूहाचे. उद्योगसमूहाची सामाजिक जबाबदारी (सी.एस.आर.) आणि प्रत्यक्ष त्या समूहाचे नतिक समजले जाणारे वर्तन यात फरक आहे.
 याचा अर्थ असा की, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र यांच्यात हा संघर्ष निर्माण झाला आहे. याचे अगदी अचूक वर्णन तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक शि. स. अंतरकर यांनी केले आहे. त्यांच्या मते, उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे ‘सोयीस्करतेचे नीतिशास्त्र’ बनले आहे. उपयोजित असणे, या मूलभूत नतिक विचारात व्यापक समाजहिताचा विचार गृहीत असतो, त्याचा बळी द्यावयाचा नसतो. व्यापक समाजहिताशी सुसंगत राहूनच प्रत्येक सामाजिक कृतीची- व्यवसाय, धंदा इत्यादीची नीती रचली पाहिजे. पण समाजहिताचा बळी देऊनच आपापल्या सोयीनुसार व्यवसाय केला गेला की यादवी छेडली जाते.  
 आता, सौंदर्यशास्त्रात हा मूल्यसंघर्ष कसा निर्माण होतो, ते पाहू. सौंदर्यवाचक विधान निसर्गविषयक किंवा मानवनिर्मित कलाकृतीबाबत असते, तेव्हा काही बिघडत नाही. पण  सौंदर्यवाचक विधान प्रत्यक्ष खुद्द माणसाला लागू केले की ते नतिक विधान बनते आणि संघर्ष सुरू होतो. जसे की ‘मुलगी सुंदर आहे’ आणि ‘मुलगी सुंदर नाही’ ही दोन विधाने वरपांगी सौंदर्यविधान दिसत असली, तरी ही व अशा प्रकारची इतर विधाने सौंदर्यवाचक विधान न राहता त्यांचे रूपांतर नतिक विधानात होते. ‘मुलगी काळी आहे’ हे विधान तर अनतिक विधान बनते. इथे सौंदर्यशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय संघर्ष सुरू होतो. ही मांडणी प्रो. सुरेंद्र बारिलगे यांनी ‘मूल्य, मूल्ये आणि मूल्यव्यवस्था’ या लेखात केली आहे. त्यांच्या मते, मूल्य ही निखळ मानवकेंद्रित संकल्पना आहे. तिचे आरोपण जग किंवा निसर्गनियम यांच्यावर करता येत नाही.   
खरे तर मूल्य संकल्पनेचे स्वरूप दुहेरी असते. व्यक्तीव समाजाच्या जगण्यात कोणती ना कोणती मूल्ये असतात. या अर्थाने मूल्ये चिरंतन असतात पण त्यांचा स्थलकाल परिस्थितीनुसार आशय बदलत राहतो. या अनिश्चिततेमुळे मूल्ये भ्रामक बनतात. ‘वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते’ असा ‘मूल्याचा भ्रम सिद्धान्त’ जॉन लेस्ली मॅकी (१९१७-१९८१) या ऑस्ट्रेलियन तत्त्ववेत्त्याने त्याच्या ‘एथिक्स : इन्व्हेिन्टग राइट अ‍ॅण्ड राँग (१९७७) या पुस्तकात मांडला. त्याच्या मते, ‘नीतिशास्त्र कुणी तरी (धर्म, प्रेषित, साधुसंत इ. ) आधीच आयते तयार ठेवले आहे आणि आपण ते केवळ शोधून (डिस्कव्हरी) अमलात आणावयाचे आहे, असे कधी नसते. नीतिशास्त्र प्रत्येक काळात नव्याने शोधावयाचे (इन्व्हेन्शन) असते.’
मॅकीचा नियम सौंदर्यशास्त्रालाही लागू होतो. त्यामुळे ‘दलित सौंदर्यशास्त्र’ किंवा ‘काळ्यांचे सौंदर्यशास्त्र’ या संकल्पना आणि साहित्य निर्माण करणे शक्य होते. स्त्रीवादी दृष्टिकोनानुसार पाहता ‘व्हॅल्यू’चा अर्थ पुरुषी उन्मत्तपणा किंवा ‘पुरुष जे ठरवितो तेच’ असा आहे. हे तर संघर्षांचे आणखी तीव्र क्षेत्र आहे.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Story img Loader