बाळ केशव ठाकरे यांनी आयुष्यभर राजकारण केले, परंतु तरीही ते प्रचलित अर्थाने राजकारणी नव्हते. उमदा स्वभाव, दोन घ्यावे, दोन द्यावे ही वृत्ती आणि त्या जोडीला कलासक्त मन हे बाळासाहेबांचे वैशिष्टय़ होते. त्यामुळेच राजकारणात असूनही शिवसेना त्या अर्थाने राजकीय पक्ष नव्हता. ती एक संघटना होती. काळाच्या ओघात तयार झालेली. हा काळाचा ओघ बाळ ठाकरे यांनी अत्यंत तरुणपणी ओळखला हे त्यांचे वैशिष्टय़. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार हे प्रखर समाजसुधारणावादी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ते एक प्रमुख अध्वर्यू. देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली वैधानिक चाल पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने केली ती म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. १९५६ सालच्या या विधेयकाने राज्यांच्या सीमा भाषिक तत्त्वावर नव्याने आखल्या जाणार होत्या, परंतु महाराष्ट्राच्या दुर्दैवाने मोरारजी देसाई आणि खुद्द पं. नेहरू हे मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्यास अनुकूल नव्हते. काँग्रेसच्या राजकारणावर तेव्हा असलेल्या शेठजीच्या प्रभावामुळे असेल, परंतु मुंबई ही महाराष्ट्राला न देता गुजरातला देण्याचा घाट घालण्यात आला. त्या वेळचे काँग्रेसचे राज्यातले नेतृत्व इतके नतद्रष्ट होते की, स. का. पाटील यांच्यासारख्याने महाराष्ट्राच्या बाजूने उभे न राहता हे शहर केंद्रशासित करावे अशी भूमिका घेतली. त्यास पहिल्यांदा विरोध केला तो सी. डी. देशमुख यांनी. आपल्या बुद्धितेजाने तळपणारे सीडी हे रिझव्‍‌र्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि नंतर पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीही. परंतु काँग्रेसच्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा राजकारणाचा निषेध करीत देशमुख हे पंतप्रधान नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकत सरकारातून बाहेर पडले आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेस अचानक उंची आली. त्याच सुमारास मोरारजी देसाई यांच्या सरकारने संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करून १०५ जणांचे जीव घेतले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावर अकारण रक्तशिंपण झाले. आंदोलनात रक्त सांडले की अस्मितेला खतपाणी मिळते. येथेही तसेच झाले. एरवी महाराष्ट्राची मागणी मान्य झाल्यावर आणि १९६० साली महाराष्ट्र मुंबईसह जन्माला आल्यावर हे आंदोलनाचे निखारे विझायला हवे होते. तसे झाले नाही. महाराष्ट्र निर्मितीनंतर अर्थातच संयुक्त महाराष्ट्र समितीचे जीवितकार्य संपुष्टात आले तरी महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या मुद्दय़ावर कायमस्वरूपी लढणारी एखादी संघटना असावी असा विचार बाळ ठाकरे या तरुणाने केला आणि ‘फ्री प्रेस जर्नल’मधील आपली व्यंगचित्रकाराची चाकरी सोडून शिवसेना जन्माला घातली. संधी ओळखण्याचे कौशल्य हे ठाकरे यांचे वैशिष्टय़ होते.
    त्या अर्थाने शिवसेना राजकीय पक्ष नव्हती. तिचे स्वरूप एकचालकानुवर्ती संघटनेचेच राहिले. सुरुवातीच्या काळात उनाडपणा करीत हिंडणाऱ्या बेरोजगार तरुणांना शिवसेना या संघटनेच्या झेंडय़ाखाली एकत्र यायची संधी मिळाली. बेरोजगारी, प्रगतीचा अभाव यामुळे समाजात साचलेले वैफल्य बाळ ठाकरे यांनी हेरले आणि अशा वैफल्यग्रस्तांना संघटनेखाली आसरा दिला. राज्यनिर्मितीनंतर शासकीय सेवेत रोजगाराच्या ज्या काही संधी होत्या त्या इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वामुळे दाक्षिणात्यांनी मिळवल्या. अकुशल वा अर्धकुशल अशा मराठी तरुणास कोणी वाली नव्हता. राज्याच्या राजधानीतच आपण उपरे असल्याची भावना मराठी भाषकांत साचली होती. तिचा हिंसक निचरा करण्याची संधी शिवसेनेने दिली. ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ यांसारख्या टपोरी वर्गाला आकर्षित करणाऱ्या घोषणा देत शिवसेनेने मुंबईतील मराठी घरांतील असहाय्यता एकत्र केली आणि शिवसेनेच्या झेंडय़ाखाली अशांना संघटित केले. सुरुवातीच्या काळात सेनेस हेमचंद्र गुप्ते, सुधीरभाऊ जोशी, प्रमोद नवलकर असे नेमस्त नेते मिळाले. यातील नवलकर, जोशी आदी नंतरही सेनेत राहिले, परंतु सत्ताकारणाच्या रेटय़ात फेकले गेले. वास्तविक सेनेस मध्यमवर्गीय मराठी घरांत पोहोचवण्याचे काम केले ते सुधीरभाऊ जोशी वगैरेंनी. त्यांच्या नेतृत्वाखालील स्थानीय लोकाधिकार समितीने मराठी तरुणांना प्रशिक्षणाची सोय केली आणि सरकारी आणि खासगी आस्थापनांत नोकऱ्या मिळवून दिल्या. रिझव्‍‌र्ह बँक, एअर इंडिया, महिंद्र अँड महिंद्र, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स आदी बडय़ा कंपन्यांत मराठी टक्का वाढला तो केवळ सेनेमुळे हे मान्य करावयास हवे. परंतु प्रसाराच्या नादात सेनेने पुढे आपले मूळ उद्दिष्ट हरवले आणि केवळ धुडगूस घालणाऱ्यांची संघटना असाच लौकिक प्राप्त केला. हे असे झाले याचे कारण कोणत्याही राजकीय पक्षास लागते ते आर्थिक प्रारूप शिवसेना कधीही देऊ शकली नाही. या संघटनेचा आर्थिक विचार वडापावच्या गाडीपलीकडे कधी गेला नाही. याची जाणीव एव्हाना बाळासाहेब झालेल्या ठाकरे यांना नव्हती असे नाही, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि सुरुवातीला मराठी मध्यमवर्गीयांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेनेची दहशत या वर्गात तयार झाली होती. हे असे झाले याचे कारण सेनेने दरम्यानच्या काळात स्वत:ला मुंबईतील कामगारांचे संप, आंदोलने तोडण्यासाठी वापरू दिले, त्यामुळे. वसंतराव नाईक असोत की वसंतदादा पाटील, सेना ही नेहमीच काँग्रेसशी मागच्या दाराने सौहार्दाचे संबंध ठेवणारीच होती. काँग्रेसच्या दिल्लीस्थित नेत्यांनी मराठी नेत्यांकडे सतत संशयानेच पाहिले. त्याचा प्रतिवाद काँग्रेसजनांनी सेनेची ढाल करून केला. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांना हटविण्याचे प्रयत्न झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावरून आपल्या पक्षo्रेष्ठींवर निशाणा साधला. त्यामुळे मधल्या काळात काँग्रेसचा उपसंघ असा सेनेचा लौकिक झाला होता. ठाकरे यांचे वैशिष्टय़ हे की, त्यांनी ही अवस्था ओळखली आणि सेनेला पुन्हा एकदा स्वत:चा चेहरा दिला. काँग्रेसला पर्याय म्हणून आपण एकमेव आहोत, असे चित्र त्यांनी निर्माण केले आणि केवळ एकटय़ाच्या जोरावर शिवसेनेला राज्यभर नेले. पुलोदच्या प्रयोगानंतर शरद पवार यांनी काँग्रेस सोडली होती तरी ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील, हे भाकीत पहिल्यांदा ठाकरे यांनी केले होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी याही सक्रिय राजकारणात येतील आणि नंतर पवारांनी आपला स्वत:चा राष्ट्रवादी पक्ष काढला तरी ते काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन करू शकणार नाहीत हेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. दूरचे पाहण्याची सवय हे बाळासाहेब ठाकरे यांचे वैशिष्टय़ होते. १९९५ साली पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेसेतर सरकार येऊ शकले ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. त्यांचा त्या वेळचा प्रचाराचा झंझावात हा राजकारणाचा धडा होता. बाळासाहेबांनी त्या काळात शब्दश: महाराष्ट्र पिंजून काढला आणि आपल्याबरोबर भाजपला घेत एकहाती सत्ता आणली. परंतु पुढे सेनेच्या वाढत्या पसाऱ्याबरोबर केवळ मराठीची भूमिका तगणार नाही, हे त्यांनी जाणले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वभावास अनुसरून सेनेला सौम्य करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे पुढे काय झाले आणि होत आहे, हे आता दिसत आहे.
परंतु या सगळ्याच्या वर दशांगुळे पुरून राहील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. स्वत: उत्तम व्यंगचित्रकार. बाळासाहेब केवळ व्यंगचित्रकार म्हणून राहिले असते तरीही ते मोठे झाले असते, इतकी ताकद आणि ऊर्जा त्यांच्या रेषेत होती. कलाकारांची गप्पांची मैफल जमवावी, हास्यविनोद करावेत आणि एकंदर वेळ मजेत घालवावा अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे राजकारणी बाळासाहेब आणि कलाकारांच्या गोतावळ्यातील बाळासाहेब या दोन भिन्न व्यक्ती होत्या. कोणत्याही सांस्कृतिक देवाणघेवाणीशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या सेना नेत्यास वा कार्यकर्त्यांस आणि उत्तम कवी कलाकारास बाळासाहेब एकाच वेळी आपले वाटत. हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. कलाकारांत त्यांच्या इतकी ऊठबस असलेला नेता आज महाराष्ट्रात दुसरा कोणता नसेल.
या सगळ्यातून उठून दिसते ते बाळासाहेबांचे व्यक्त होण्याचे आणि संपर्क साधण्याचे कौशल्य. मोबाइल, इंटरनेट किंवा साधा फोनदेखील नव्हता त्या काळात या माणसाने एक गोळीबंद संघटना उभारली. त्यांच्या एका शब्दानिशी, कसलाही मागचापुढचा विचार न करता स्वत:ला झोकून देणारे हजारो तरुण तयार झाले हा एका अर्थी राजकीय चमत्कार होता आणि अचंबित व्हावे असेच काम होते. तिकडे मराठी वृत्तीशी साधम्र्य सांगणाऱ्या प. बंगालने केवळ राज्यपातळीवर राहूनदेखील राष्ट्रीय नेता होता येते हे ज्योती बसू यांच्या रूपाने दाखवून दिले, तर
 बाळासाहेबांनी कधीही महाराष्ट्राची वेस ओलांडली नाही. तरीही अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय पक्षांचे लक्ष असे. मग तो पंजाबचा प्रश्न असो की अयोध्येतील राम मंदिराचा.
बाळ ठाकरे यांनी नेहमी तगडे आणि उमदे राजकारण केले. लाखालाखांची सभा मारून मित्रांच्या गराडय़ात गप्पांचा फड रंगवणारा हा राजकारणी होता. त्यांचे कर्तृत्व स्वनिर्मित होते. दादरच्या चौपाटीवर उगवलेला हा राजकीय पहाड साऱ्या राज्याच्या राजकारणास कवेत घेऊन होता. आज तो कोसळला. या पहाडाचे प्रस्थान राज्यास चटका लावणारे आहे.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
nitish kumar goverment vs governor
विद्यापीठांच्या मुद्द्यावरून नितीश सरकार आणि राज्यपाल आमने-सामने; ‘या’ वादाला कारणीभूत कोण?