जिथे जिवंत बैल आहेत त्या खेडय़ापाडय़ात तर बैलांची पूजा होतेच, पण जिथे असे बैल मिळणार नाहीत तिथे मातीच्या बैलांची पूजा केली जाते. कधी काळी जे बैलांसोबत राबले असतील आणि कधी पाठीवरून हातही फिरवला असेल बैलांच्या, अशांचा आता शेतीशीही संबंध नाही आणि बैलांशीही. खऱ्याखुऱ्या बैलांचे दर्शन दुर्मीळ होते त्यांना शहरात. बाजारातून मातीचे रंगवलेले बैल आणून त्यांची पूजा केली जाते..
ज्याच्या मानेवर वर्षभर शेतीधंद्यातल्या राबणुकीचा भार असतो त्यालाही एक दिवस विश्रांती मिळते. मानेवर जो निबर असा घट्टा पडलेला असतो तो हळद आणि तूप लावून चोळला जातो, खांदेमळण म्हणतात ती हीच. हे खांदे मळल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळी घातल्या जातात. नदीच्या, ओढय़ाच्या खळाळत्या पाण्यात धुतले जाते. िशगे रंगविली जातात, बािशगे बांधली जातात, चमकदार ऐने लावलेल्या झुली चढविल्या जातात आणि वाजतगाजत मिरवणूकही काढली जाते. एकदा हा दिवस संपला की पुन्हा मानेवर जू आणि अधूनमधून चाबकाचे फटके. हे फक्त बलांच्याच बाबतीत घडते असे नाही, हा संबंध थेट निवडणुकांच्या राजकारणाशीही जोडला जाऊ शकतो. मतदानाच्या आदल्या दिवशी काय पाहिजे ते मागा, मतदान केंद्रापर्यंत नेण्या-आणण्याचीही व्यवस्था होईल. तुमच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेतली जाईल, पण एकदा निवडणूक झाली की पुन्हा पुढची पाच वष्रे कुणी ढुंकूनही पाहणार नाही. पोळा प्रत्येकाच्याच नशिबी असतो फक्त त्याचे स्वरूप वेगळे.
बैल-पोळ्याच्या दिवशी मात्र बैलांबद्दल खरोखरच आदरभाव व्यक्त होतो. बैलाचे लग्नही लावले जाते आणि त्याला पुरणपोळीही खाऊ घातली जाते. इतकी काळजी घेतली जाते की त्याने जर ती खाल्ली नाही तर तो रुसला असा अर्थ काढला जातो. पोळ्याच्या दिवसात पाऊस नसेल तर संपूर्ण उत्साहावरच विरजण पडते, चेहरे काळवंडतात. अशा वेळी पोळा साजरा करताना कोणताच उत्साह नसतो. पोळा म्हणजे रस्त्यावर बैलांच्या खुरांनी झालेला चिखलाचा राडा. पण रस्ता ओला होईल इतकाही पाऊस नसेल तर मग सगळ्या सणावरच उदासीचे सावट असते. पोळ्याच्या दिवशी पाऊस आलाच नाही तर सगळा उत्साहच ओसरतो आणि दु:खाचे ढग सगळीकडेच दिसू लागतात. असे म्हणतात की, पोळ्याला पावसाची दिशा बदलते. म्हणूनच ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी म्हणही वापरली जाते. जेव्हा पाऊस खूप ताण द्यायला लागतो तेव्हा पोळ्याच्या दिवशी तरी तो येणारच अशी लोकांना आशा वाटते. पावसाची वाट पाहून प्राण कंठात येतात तेव्हा बैलांची िशगे भिजवायला तरी तो येईलच ही खात्री असते. पण कधी कधी पाऊस दगाफटका करतो. पोळ्याच्या दिवशी थेंबभरही बरसत नाही तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकतो. कधी कधी पावसाचा लहरीपणा इतका की तो इथे पडेल आणि तिथे नाही. या त्याच्या बेभरवशाच्या वागण्यालाही गावाकडची माणसे जाणून असतात. म्हणूनच पावसाचे काही खरे नाही, तो कधी बैलाच्या एका िशगावर पडला तर दुसऱ्या िशगावर पडेलच असे नाही असेही म्हटले जाते. म्हणजे पोळा आणि पाऊस हासुद्धा एक अनुबंध आहेच.
शेतीत यांत्रिकीकरण आल्यानंतर आता नांगरणी, वखरणी, पेरणी यांसारखी कामेही यंत्राद्वारे होतात. बलांची संख्याही गावोगाव घटू लागली आहे. जे लहान शेतकरी आहेत त्यांना दोन-चार एकर जमिनीच्या वहितीसाठी वर्षभर एखादी बैलजोडी पोसणे शक्य नाही आणि ते व्यवहार्यही नाही. वैरणपाणी, देखभालीचा खर्च झेपत नाही अशा वेळी. शेतात काम असो, नसो बैल सांभाळण्यासाठी स्वतंत्र माणूस गुंतून पडतो हेही परवडणारे नसते. मोठय़ा शेतकऱ्यांना जास्त जमीन वहितीखाली आणायची तर वेळ, श्रम या सर्वच गोष्टींच्या बचतीसाठी ट्रॅक्टर परवडते. त्यामुळे आता कृषी व्यवस्थेतूनच बैल बाजूला होत आहेत. अजूनही घरच्या गायीचे बैल असतील आणि त्यांनी एकाच शेतमालकाकडे जर आपली हयातभराची राबणूक केली असेल तर म्हातारपणाला आलेले असे बैल विकले जात नाहीत. तो आज काहीच काम करीत नसला आणि त्याला बसल्या जागीच वैरणपाणी द्यावे लागले तरीही त्याचे ओझे मानले जात नाही. मरेपर्यंत तो सांभाळला जातो. जी गोष्ट उपयोगाची नाही ती गोष्टही जतन करावी, ज्याचे आपल्याला काम नाही अशा म्हाताऱ्या बैलाला कुणी लगेच बाजार दाखवत नाही. अखेर ज्या शेतात बैल राबला त्याच शेतात त्याची माती होते.
काही बैल चपळ असतात. त्यांच्या राठ त्वचेवर माशी बसली तरीही त्यांची पाठ थरथरते, फार तर संवेदनशील म्हणता येईल अशांना. काही बैल खूपच मंद असतात. चालतच नाहीत. पाय रोवून उभे असतात. अशा बैलांना पळविण्यासाठी अघोरी उपाय केले जातात. काठीच्या एका टोकाला धारदार अणी असते बारीक खिळ्यासारखी. न चालणाऱ्या बैलाला ती सतत ठोसवली जाते. बऱ्याचदा अशा बैलांचे ढोपर रक्तबंबाळ होते. काही बैल कामाला लावल्याबरोबर बसतात. म्हणजे एरवी उभे राहतील पण मानेला जू लावल्याबरोबर ठिय्याच मांडतात, जागचे हलत नाहीत. अशांना ‘बैशा बैल’ म्हटले जाते. अशा बैलांना चाबकाचा मारा कायम झेलावा लागतो. हा मारा इतका की त्याचे पाठीवर वळ उठतात आणि या वळांच्या जखमांवर पुन्हा हळद लावावी लागते. याउलट काहींच्या मानेवर जू असले तरीही ते मानेवरचे ओझे टाळण्यासाठी एका दिशेला झुकतात. ‘शिवळावर पडणे’ असा वाक्प्रचार आहे त्यासाठी. काम केल्यासारखे दाखवायचे पण जबाबदारी टाळायची ही प्रवृत्ती त्यांच्यातही आढळते. काही पुष्ट बैल ओल्या मातीला धडका देऊन ती िशगाने उकरतात. अशा वेळी नागफण्यासारख्या त्यांच्या शेपटी सळसळतात. असा िशगांना चिखल लागलेला बैल दिसला तर समजायचे हा मस्ती करून आलाय.
बैलांच्या प्रवृत्ती आपल्या शब्दसृष्टीतही अवतरल्या आहेत. जो निव्वळ होयबा आहे, कोणाच्या तरी तालावर मुंडी हलवतो, ज्याला स्वत:चे मत नाही त्याला ‘नंदीबैल’ म्हटले जाते. एखाद्याने खोटी प्रतिष्ठा धारण केली असेल आणि असण्यापेक्षा दिसण्यासाठी केलेली मिरवामिरव असेल तर त्याने ‘झुल पांघरली’ असे म्हणतो आपण. गुलामी सहन करणाऱ्याच्या ‘मानेवर जू’ असल्याचे बोलले जाते. कधी दुखावलाच एखाद्याचा स्वाभिमान तर तो म्हणतो, ‘मी काही तुमच्या दावणीचा नाही’ आणि आलाच एखादा अंगावर कुणी तर त्याला ‘िशगावर’ घेण्याची भाषाही केली जाते.
बैलपोळ्याच्या निमित्ताने हे सारे संदर्भ पुन्हा जागे होतात. जिथे जिवंत बैल आहेत त्या खेडय़ापाडय़ात तर बैलांची पूजा होतेच, पण जिथे असे बैल मिळणार नाहीत तिथे मातीच्या बैलांची पूजा केली जाते. कधी काळी जे बैलांसोबत राबले असतील, बैलांच्या वैरणपाण्याकडे ज्यांनी लक्ष दिले असेल आणि कधी पाठीवरून हातही फिरवला असेल बैलांच्या, अशांचा आता शेतीशीही संबंध नाही आणि बैलांशीही. खऱ्याखुऱ्या बैलांचे दर्शन दुर्मीळ होते त्यांना शहरात. बाजारातून मातीचे रंगवलेले बैल आणून त्यांची पूजा केली जाते. अशा वेळी कधी उंडारणाऱ्या, मानेवर जू असणाऱ्या आणि कधी एखादी जखम झाल्यानंतर जायबंदी होऊन एकाच जागी पाणी गाळणाऱ्या बैलांच्याही आठवणी येतच असणार मातीच्या बैलांची पूजा करताना. काय विचित्र योगायोग.. राबराब राबून जे मातीतच मिसळतात तेच पुन्हा मातीच्याच रूपातून जिवंत होऊन आपल्यासमोर येतात या दिवशी.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे