स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशात कायदा लागू आहे.. गावांनी, शहरांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे, असं हा कायदा सांगतो, तरीही महाराष्ट्रच काय, देशभरातली अगदी मोजकी गावं अशा नोंदी ठेवतात..
पर्यावरणाबद्दल आस्था म्हणजे भलभलत्या चिंता नसून भवतालाबद्दलचं कुतूहल, हे ठसवणाऱ्या सदराचा हा विरामलेख..
‘सांगली आणि इस्लामपूर या दोन शहरांमधील अंतर आहे इनमीन ४० किलोमीटर! पण या दोन ठिकाणच्या बाजारात वेगवेगळी वांगी दिसतात. सांगलीत मळीची वांगी- हिरव्या रंगाची, तर इस्लामपूरला जांभळट रंगाची. सांगलीत जांभळट वांगं दिसत नाही आणि इस्लामपूरच्या बाजारात हिरवं वांगं नसतं.’ सांगलीचे प्रा. सुरेश गायकवाड गप्पांमध्ये सांगत होते. बोलणं चाललं होतं, जेनेटिकली मॉडिफाइड वांग्याचं (बीटी वांगं) आलेलं वाण आणि आपल्याकडील जैवविविधता या विषयांवर. त्यांनी सांगितलेला मुद्दा अनोखा वाटला म्हणून मुद्दाम सांगलीच्या शिवाजी मंडई बाजारात चक्कर मारली, तर खरंच सगळीकडं हिरवी वांगी दिसत होती, जांभळट रंगाची वांगी अपवादानेच होती. इस्लामपूरचा बाजार पाहायला मिळाला नाही, पण सांगलीच्या बाजाराप्रमाणेच तिथंही विशिष्ट प्रकारची वांगीच मोठय़ा संख्येने असतील असं मानायला हरकत नाही.
पण सांगलीलाच हिरवी वांगी का? त्याचं कारण आहे तिथून वाहणारी कृष्णा नदी. या नदीच्या काठावर मळ (नदीचा गाळ) जमा होते. या मळीत हिरवी वांगी चांगली येतात. म्हणून ती सांगलीत असतात. इस्लामपूरला जवळ नदी नाही, त्यामुळे तिथं मळ नाही आणि तिथं ही वांगी चांगली येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे तिथं मळीची हिरवी वांगी नाहीत, तर जांभळट रंगाची आहेत. या दोन ठिकाणची वांगीच वेगळी नाहीत, तर दोन्ही वांग्यांची भाजी-कालवण करण्याची पद्धतही वेगळी आहे. त्यासाठी वापरला जाणारा मसालासुद्धा दोन्हीकडे वेगळा असतो. स्वाभाविकपणे त्यांची चवसुद्धा वेगवेगळी असते. हे झालं एकटय़ा सांगलीजवळचं उदाहरण, पण राज्यात आणि देशातसुद्धा वांग्याचे शेकडो प्रकार आहेत. बीटी वांगं आलं की त्याला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळं ही सगळी वाणं दुर्लक्षित होतील. एकमेव बीटी वांगं सगळीकडं दिसेल.. प्रा. गायकवाड यांची ही चिंता होती.
अलीकडच्या सर्व घडामोडी पाहता आपल्याकडील पिकांची विविधता वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होत चालली आहे. सरकार किंवा प्रशासनाकडून कोणत्या जातींसाठी प्रोत्साहन दिले जाते, लोकांकडून कोणत्या जातींना मागणी आहे आणि कोणत्या जाती उत्पादकाच्या म्हणजेच शेतकऱ्याच्याआर्थिक गणितात बसतात, ही कारणे त्यावर प्रभाव टाकतात. आता पर्यावरणाची स्थिती बदलत असल्यामुळे इतरही कारणांची त्यात भर पडली आहे. सांगलीचेच उदाहरण द्यायचे तर आता कृष्णा नदीच्या काठावर किती प्रमाणात मळ राहिली आहे हा प्रश्नच आहे. कृष्णेचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. त्यावर अतिक्रमण झाले आहे, गाळाची मातीही म्हणावी इतकी उरलेली नाही. त्यामुळे तिथे मळीचं म्हणून प्रसिद्ध असलेलं वांगं कसं पिकणार? आणि मग वांग्याची विविधता तरी कशी टिकणार? असेही अनेक मुद्दे आता नव्याने उपस्थित झाले आहेत. वसतिस्थाने नष्ट होत असल्याने महाराष्ट्र तसेच, देशातील अनेक वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नदीकाठची मळ संपणे हेसुद्धा हिरव्या वांग्याचे वसतिस्थान नष्ट होण्यासारखेच आहे. ही मळ गेली की अशा प्रकारच्या गाळात येणारी वांग्याप्रमाणेच इतरही पिकेही नामशेष होण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ जैवविविधता टिकवण्यासाठी केवळ वनं, गवताळ रानं किंवा जलसाठे इतक्याच गोष्टी आवश्यक नाहीत, तर आसपासच्या लहान-मोठय़ा गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
बदलत्या वातावरणात सर्वच भागात नदीची मळ नष्ट होत आहे. कृष्णेपासून गोदावरीपर्यंत आणि कोल्हापूरच्या पंचगंगेपासून ते धुळ्याच्या पांझरा नदीपर्यंत सगळीकडेच नद्यांचे काठ उपसले जात आहेत. पात्रांमधील वाळूसुद्धा मोठय़ा प्रमाणात काढून घेतली जात आहे. घराच्या जवळची मोकळी जमीन फरशा, टाइल्स, काँक्रिट घालून संपवली जात आहे. आसपासच्या परिसरातील डबकी, लहान-मोठी तळी किंवा पाणथळ जागा आता उरलेल्या नाहीत. या सर्वच बदलांमुळे असंख्य प्रकारचे जीव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या हद्दपार झाले आहेत, उरलेले हद्दपार होत आहेत. घराजवळ किंवा गावाजवळ पूर्वी वाहते झरे, लहान-मोठे प्रवाह असायचे. नैसर्गिकरीत्या वाढलेला झाडोरा असायचा. या प्रवाहांचा ओलावा व झाडोऱ्याच्या आधाराने वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहायचे आणि वाढायचेसुद्धा. आता नैसर्गिक व्यवस्थांची पुरेशी काळजी न घेतली गेल्याने या गोष्टी व त्यांच्या सान्निध्यात राहणारे जीवही नाहीसे होत आहेत.
यातील गंभीर बाब म्हणजे हे जीव व विविधता आपण हरवत चाललो आहोत, याचे गांभीर्य फारसे कोणाला उरलेले नाही. आपण हरवत आहोत ती जैवविविधता किती मौल्यवान आहे, याची फारशी कोणाला कल्पनाही नाही. स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशात कायदा लागू आहे. त्यानुसार गावांनी, शहरांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. संपूर्ण देशात मोजकीच काही गावे वगळता त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत महाराष्ट्रातही हीच गत आहे. असा काही कायदा आहे हे अनेकांना माहीतही नाही आणि माहीत असले तरी त्याकडे पाहण्याची कोणी तसदी घेत नाही. त्यामुळे वाघ, माळढोक, ब्लू व्हेल (देवमासा) यांसारख्या दूरवरच्या जिवांच्या संरक्षणाबाबत गप्पा मारत असताना आपल्या अंगणात काय जळत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही.. हे बदलून आताच्या परिस्थितीत आपल्या घराजवळ बेडकं उरली आहेत का? आणि नदीच्या काठावर मळ आहे का?, त्यात पूर्वी येत असलेली पिकं आजही कायम आहेत का? हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याकडे लक्ष दिले तर आपण जैवविविधचेची काळजी घेतल्यासारखे होईल, अन्यथा आपल्या हातात असलेली संधी आपण गमावून बसू!
आपल्या हातची संधी..
स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशात कायदा लागू आहे.. गावांनी, शहरांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे, असं हा कायदा सांगतो, तरीही महाराष्ट्रच काय, देशभरातली अगदी मोजकी गावं अशा नोंदी ठेवतात..
First published on: 27-12-2012 at 12:12 IST
मराठीतील सर्व भवताल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance in our hand