ज्यांचे बालपण रम्य होते त्यांना आपले गाव आठवण्यातला आनंदही बरेच काही देऊन जातो. मात्र गावगाडय़ात समाजाच्या सर्वात तळाशी राहणाऱ्या दलितांनी ज्या अमानुष यातना सोसल्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी गाव सोडला. अशा मोठय़ा समूहासाठी गतस्मृती केवळ चटके देणाऱ्याच राहतात..
चारा-पाण्याच्या शोधात घरटय़ाबाहेर पडून दशदिशा धुंडाळणे हे फक्त पाखरांच्या नशिबी असते असे नाही. माणसेही आपल्या पोटापाण्यासाठी गाव, मुलूख सोडतात. पाखरे कधी तरी दिवसभर भटकून सायंकाळी आपल्या घरटय़ात परतात. अनेकांना मात्र असे लगेचच परतता येत नाही. अशांना आपला गाव सोडावा लागतो, परिसर सोडून अन्यत्र जावे लागते. हे स्थलांतर कधी मनाप्रमाणे, स्वेच्छेने असते तर कधी सक्तीने, अनिच्छेने असते. या स्थलांतरामागे आपण इथे रमू शकत नाही किंवा आपल्याला भरारी घेण्यासाठी अन्यत्र जाण्याशिवाय पर्याय नाही असे वाटते. ते स्थलांतर वेदना देत नाही. नवी स्वप्ने या स्थलांतरापाठीमागे असतात, काही करून दाखविण्याची जिद्द असते, मर्यादांना ओलांडण्याचा इरादा असतो. अशा वेळी जर स्थलांतर करणाराने आपल्या मनाप्रमाणे स्वत:चे जग वसवले तर त्याला आपला मुलूख सोडल्याचे दु:ख वाटण्यापेक्षा पायातली बेडी गळून पडल्याचा आनंद होतो.
स्थलांतर कधी हंगामी असते, तात्पुरते असते तर कधी कायमचे. बीड, अहमदनगरच्या दुष्काळी पट्टय़ातून महाराष्ट्राच्या बाहेर ऊसतोडणीसाठी दर वर्षी जाणारे मजूर आहेत. हंगाम सुरू झाला की ते कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडतात. नवा गाव, नवा परिसर, नवी माणसे यांच्यात काही काळ घालवायचा आणि पुन्हा आपल्या गावी परतायचे. मराठवाडा-विदर्भात गावात काम मिळत नाही म्हणून मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी कामाला जाणारांची संख्या मोठी आहे. त्या त्या भागातून या महानगरांकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेने दररोज रात्री पोरे-बाळे, गाठोडय़ांसह ही माणसे लोंढय़ाप्रमाणे शहरात दाखल होतात. गावात काम मिळत नाही. गावातल्या कामातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा इथे पैसाही अधिकचा मिळतो. सलग चार-दोन वर्षे ऊसतोडणीसाठी जाऊन जमा केलेल्या पैशात गावी थोडीफार जमीन घेऊन पुन्हा स्थिरावल्याचीही काही उदाहरणे आहेत. अशांनी स्थलांतरही सुखद केले असे म्हणता येईल. नगर, सोलापूर जिल्ह्य़ाच्या दुष्काळी गावांतून शेळ्यामेंढय़ांचे कळपच्या कळप दर वर्षी उन्हाळ्यात मराठवाडय़ाच्या शिवारात येतात. आधी ही संख्या जास्त होती. कधी कधी गुजरातेतून रब्बारी नावाचे लोक आपल्या मोठमोठय़ा गायींसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत दिसायचे. एखाद्या माळरानावर राहुटय़ा ठोकून ही माणसे राहायची. शक्य तो मुक्कामाची जागा एखाद्या गावाजवळ पण गावाच्या किती तरी बाहेर आणि वहितीत नसलेल्या जमिनीवर असायची. रात्री वेगवेगळ्या राहुटय़ांतून टिमटिमत दिसणारा उजेड आणि त्यांच्या बोलीतून ऐकू येणारे आवाज हे दृश्य अगदी काव्यात्मक वाटायचे. गायीच्या दुधाचे तूप काढून ते आजूबाजूच्या गावात विकायचे हा या माणसांचा धंदा. अजूनही क्वचित हे रब्बारी एखाद्या ठिकाणी उतरलेले दिसतात.
आसपास शिक्षणाच्या सुविधा नाहीत म्हणून शिक्षणासाठी मोठय़ा शहरात दाखल होणारे विद्यार्थी आज अक्षरश: प्रचंड संख्येने आहेत. सुरुवातीला गावाचे अदृश्य ओझे घेऊन ते शहरात दाखल होतात. आल्यानंतर बावरतात, बिचकतात. कोणाच्या तरी ओळखीच्या आधाराने स्थिरावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शहरात दाखल झाल्यानंतर काही दिवस गावाकडच्या आठवणी सतत मनात येत असतात. गावापासून तुटल्यानंतर जाणवणारी एकाकीपणाची भावना आणि या नव्या पर्यावरणात आपली मुळे सहजासहजी रुजत नाहीत अशी जाणीव यामुळे काही दिवस सरभर जातात. आपला गाव आणि हे शहर याची मनातल्या मनात पावलोपावली तुलना केली जाते. अशा वेळी अबोल एकांत जवळचा वाटू लागतो. त्यातून स्वत:शीच नव्याने संवाद सुरू होतो. हळूहळू नवे वातावरण ओळखीचे वाटायला लागते आणि आपला आवाज सापडायला लागतो. आधी बोलतानाही अडखळणाऱ्या मुलांमध्ये नवा आत्मविश्वास दिसू लागतो. गावातून बाहेर पडलेली ही मुले ठळक असे यश मिळवताना दिसतात ती या स्थलांतरामुळेच.
अनेक प्रकल्पांच्या जमिनी घेतल्या जातात. मानवी सुधारणांचा चेहरा असलेले प्रकल्प होण्यात काही गैर नाही पण या प्रकल्पांसाठी जमिनी देऊन ज्यांनी किंमत चुकवली त्यांना पुढची अनेक वर्षे संघर्ष करावा लागतो. धरणासाठी जमिनी देताना तुमच्या जमिनी हिरव्या होतील, तुमच्या शेता-शिवारात पाणी खेळेल, असे आश्वासन दिले जाते. अन्यही औद्योगिक प्रकल्पांच्या निमित्ताने जमिनी घेतल्या जातात तेव्हा प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे सांगितले जाते. प्रत्यक्षात जमिनीवरून हुसकावून लावल्यानंतर निराधार झालेली ही माणसे न्याय्य हक्कांसाठी तळमळताना दिसतात. प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला दिला जाईल, त्यांच्या कुटुंबांत नोकरी दिली जाईल, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागांत प्रकल्पग्रस्तांचे लढे चालूच आहेत. सुधारणा होण्याविषयी कोणाचेच दुमत असणार नाही किंबहुना विकास प्रक्रियेत असे प्रकल्प आणि त्यांचे महत्त्व निश्चितपणे आहे पण कोणाला तरी पायाचे दगड म्हणून घातले जात असेल आणि त्यांना टाचेखाली चिरडूनच त्यावर नवे काही बांधले जात असेल तर या असाहाय्य, निराधार आणि दुबळ्या लोकांच्या आयुष्याबद्दल चिंता कोणी वाहायची. अजस्र अशा शक्तींशी लढता लढता त्यांच्यातले बळ संपून गेले तरी त्यांना न्याय मिळत नाही. शासन दरबारी त्यांचे लढे सुरूच आहेत. वीस-वीस वर्षांपूर्वी झालेल्या प्रकल्पांनी ज्यांना विस्थापित केले त्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. जो मोबदला मिळतो तोही टप्प्याटप्प्याने. तोवर दुसरीकडे जमीन घ्यायची म्हटली तरी भाव वाढलेलेच असतात. आपले सर्वस्व देऊन निराधार होण्याचे प्राक्तन अनेक प्रकल्पग्रस्तांच्या नशिबी येते.
विस्थापित होण्याचेही अनेक प्रकार आहेत. फाळणीनेही अनेकांना विस्थापित केले. किती तरी वर्षे या जखमा अनेकांच्या मनावर कायम राहिल्या. ‘तमस’, ‘आग का दर्या’, ‘आधा गाँव’ यांसारख्या कादंबऱ्या जर वाचल्या तर त्यांतून एक वेदना ठिबकत असल्याचे पाहायला मिळेल. स्थलांतर स्वेच्छेने झाले असेल, कोणतीही सल मनात न ठेवता झाले असेल तर ते आनंददायी होऊ शकते पण बहिष्कृत केल्याने ज्यांना स्थलांतर करावे लागते त्यांचे विस्थापन मात्र क्लेषकारक असते.
ज्यांचे बालपण रम्य होते त्यांना आपले गाव आठवण्यातला आनंदही बरेच काही देऊन जातो. अशांना कुठल्या तरी निमित्ताने आपला गाव आठवत जातो. गतस्मृती त्यांना कातर करतात पण तो गाव मात्र आज त्यांना वास्तव्यासाठी नको असतो. अशी रमणीयता त्यांना केवळ स्मरणरंजनापुरतीच हवी असते. सगळ्यांनाच गाव आठवताना आनंद होतो असेही नाही. गावगाडय़ात समाजाच्या सर्वात तळाशी राहणाऱ्या दलितांनी ज्या अमानुष यातना सोसल्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी गाव सोडला. साधे माणूसपणही जिथे नाकारले जाते त्या गावात राहण्यापेक्षा शहरांचा रस्ता धरला. खेडी ही सामाजिक विषमतेचे आगर आहेत, खेडी सोडा हा बाबासाहेबांचा संदेश समाजापर्यंत पोहोचल्यानंतर खेडय़ांकडून शहरांकडे मोठे स्थलांतर झाले. अशा मोठय़ा समूहासाठी गतस्मृती केवळ चटके देणाऱ्याच राहतात. अशा वेळी गाव आठवणे ही बाब कधीच आनंददायी असू शकत नाही. जेव्हा जेव्हा स्थलांतर होते तेव्हा तेव्हा जणू रोपच नव्या ठिकाणी रुजू घातले जाते. काही रोपांची मुळे नव्या जमिनीत रुजतात तर काहींची कोमेजतात. जिथे स्थलांतर सुखद होते तिथे मोराचा पिसारा दिसतो आणि जिथे स्थलांतरामागे काही सल असते तिथे मोरपीस गळून पडल्यानंतरचा व्रण दिसतो.
गळून पडलेले मोरपीस
ज्यांचे बालपण रम्य होते त्यांना आपले गाव आठवण्यातला आनंदही बरेच काही देऊन जातो. मात्र गावगाडय़ात समाजाच्या सर्वात तळाशी राहणाऱ्या दलितांनी ज्या अमानुष यातना सोसल्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी गाव सोडला. अशा मोठय़ा समूहासाठी गतस्मृती केवळ चटके देणाऱ्याच राहतात..

First published on: 14-07-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व धूळपेर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalits left villages facing atrocities memories plight of that days