बऱ्याचशा रीसर्च पेपर्समध्ये आपण वाचतो ‘जिल्हा गॅझेटियरच्या अमुक-तमुक पानावरच्या माहितीनुसार!’ हा जिल्हा गॅझेटियर प्रकार काय असतो? त्याची सुरुवात कशी झाली आणि याचा उपयोग काय यावर आपण आज चर्चा करू.
भारतामध्ये इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने सरकार चालवायला सुरुवात केली, पण त्या आधी भारतामध्ये अशी संकल्पना नव्हती का? तर भारतामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या राज्यामध्ये राजाला माहिती देण्यासाठी संकलन होत असे. उदाहरणार्थ, चाणक्याचे अर्थशास्त्र किंवा वराहमिहिराची पुस्तके. पण ही सर्व राज्य चालवण्यासाठी असणारी मार्गदर्शक तत्त्वे होती. खऱ्या अर्थाने गॅझेटियरच्या जवळपास पोहोचणारं पहिलं पुस्तक म्हणजे ‘ऐन-ए-अकबरी.’ अबुल फजलने राज्याच्या पूर्ण सांस्कृतिक, कला, प्रशासन, राज्यकारभाराचा लेखाजोखा अकबराच्या काळात यामध्ये मांडला आहे. पण यामध्ये उल्लेख केलेल्या बऱ्याचशा गोष्टींवर आधुनिक इतिहासकारांना शंका आहे.
गॅझेटियरची संकल्पना मुळात महत्त्वाची आहे. ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केलेल्या राज्यकारभारामध्ये ब्रिटिश सरकारच्या हितांची रक्षा होत होती, पण त्यावर सरकारचे (राणीचे) नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रशासकीय रचना ही तशी ढिसाळ होती. अधिकाऱ्यांची नेमणूक करताना कोणतीही पद्धत/शिस्त पाळली जात नसे आणि त्यांचा कार्यकालसुद्धा निश्चित नसे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाची व्यवस्थादेखील नसायची. प्रशासनाचं मुख्य काम तेव्हा शेतसारा वसुलणे आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याइतपत मर्यादित होतं. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला लक्षात आलं, असं एखादं मार्गदर्शक पुस्तक या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देता आलं तर त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाबतीमधली भौगोलिक, ऐतिहासिक, प्रशासकीय आणि आर्थिक क्षेत्रामधली इत्थंभूत आणि बावनकशी खणखणीत माहिती उपलब्ध करून घ्यायला हवी. यामुळे प्रशासनाची आणि अधिकाऱ्यांची पकड आणखीपक्की होईल.
सुरुवातीच्या काळामध्ये याला ‘जिल्हा गॅझेटियर’ असं नाव देण्यात आलं नव्हतं तर या दस्तावेजाला ‘अकाऊंट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट’ असं म्हटलं जायचं. पहिलं गॅझेटियर हे कुणी लिहिलं यावर बऱ्याचशा लोकांची वेगवेगळी मतं आहेत. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असणाऱ्या फ्रान्सिस बुकानन याने ‘दीनाजपूर स्टॅटिस्टिकल सव्र्हे’ नावाचा दस्तावेज १८१३ मध्ये प्रकाशित केला. खऱ्या अर्थाने गॅझेटियरचा जनक सर वॉल्टर हॅमिल्टन मानला जातो. त्याने प्रथम गॅझेटियर आजच्या परिचित रूपात तयार केले. विल्यम विल्सनने ‘इंपिरिअल गॅझेटियर ऑफ इंडिया’ असा नऊ पुस्तकांचा एक संचच १८८१ मध्ये प्रकाशित केला, ज्यामध्ये इंग्रजांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या तत्कालीन भारताच्या इत्थंभूत माहितीचं संकलन आहे. त्यानंतर त्याचं सुधारित स्वरूपाचं प्रकाशन झालं. १८८५-८७ या तीन वर्षांत १४ खंडांची सुधारित आवृत्ती तयार झाली, तर विल्यम विल्सनच्या मृत्यूनंतर २६ व्हॅल्यूमचा ‘द इंपिरिअल गॅझेटियर ऑफ इंडिया’ १९०८ मध्ये प्रकाशित करण्यात आला. यामध्ये आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक दस्तावेजांसहीत भारताच्या सांख्यिकी माहिती-आकडेवारीचासुद्धा समावेश होता. हा सगळ्यात महत्त्वाचा गॅझेटियर्सचा संच तत्कालीन इंग्रजी आधिपत्याखालील भारताच्या प्रशासकीय ग्रंथागारामध्ये ठेवण्यात आला, तो आजही तेथे आहे.
गॅझेटियर नेमकं असतं काय? १९०८ च्या इंपिरिअल गॅझेटियरमध्ये त्यांनी महत्त्वाच्या दहा घटकांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रत्येक गॅझेटियरच्या ‘जनरल प्लॅन’मध्ये त्या भागाचे भौगोलिक पैलू, हवामान, हरितसंपदा, प्राणिसंपदा, जाती आणि मानववंश, भाषा, धर्म, लोकसंख्या, आरोग्य आणि इतर महत्त्वाचे आकडे या गोष्टींवर सविस्तर चर्चा असते.
भारताच्या गॅझेटियर्सच्या संग्रहामध्ये पूर्ण प्रादेशिक व्याप्ती, नद्या, वेगवेगळ्या खोऱ्यांची माहिती आहे. इतिहासाचं लिखाण आणि त्यामध्ये असणाऱ्या आर्याच्या, द्रविडांच्या आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची माहितीही यामध्ये संकलित करण्यात आली आहे. हवामानासंबंधीची सखोल माहिती आणि प्रादेशिक हवामानाची स्थित्यंतरं हे या संकलनाचं वैशिष्टय़ आहे.
या गॅझेटियरमध्ये कोणत्याही जिल्ह्य़ाच्या गॅझेटियर्सचा आपण विचार केला तर त्याची वेगळी वैशिष्टय़े आपल्याला दिसतील. आमच्या जिल्हा प्रशिक्षणामधला सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासाचा घटक हा ‘गॅझेटियर’चं वाचन आणि त्याच्या महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास हाच असतो. उदाहरणार्थ, माझ्या जिल्ह्य़ाचं पहिलं गॅझेट १८८३ मध्ये प्रकाशित झालं. त्याचा ‘सेटलमेंट रिपोर्ट’ आणि पहिला खर्डा (ड्राफ्ट) १८७० मध्ये एफ. कनिंगहॅम यांनी तयार केला. जसजसा जिल्ह्य़ाचा भाग वाढला किंवा कमी झाला, तसतसं गॅझेटियरचं नवीन संस्करण प्रकाशित करण्यात आलं.
१८५७ चा उठाव झाला तेव्हा इंग्रजांना उपयोगी पडलेल्या महत्त्वाच्या थोडक्या गोष्टींमधली एक गोष्ट होती गॅझेटियर. कारण यामध्ये प्रत्येक भागाची इत्थंभूत माहिती संकलित केलेली होती, जी ब्रिटिश आर्मीला उपयोगी ठरली आणि भारतीय राजांकडे अशा प्रकारची दस्तावेजी नोंद नव्हती.
हे संकलन कुणी केलं? हे संकलन तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलं. त्या काळी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात एका जिल्ह्य़ामध्ये अधिकाऱ्याची नियुक्ती ही पाच-सात वर्षे असायची. या अधिकाऱ्यांना सारा वसुलीसाठी गावांमध्ये जाण्याची गरज असायची. वर्षांतून दोन वेळा आपला सगळा लवाजमा घेऊन जिल्हाधिकारी गावागावांमध्ये प्रवासाला निघत. त्या गावामध्ये त्यांचा ‘कॅम्प’ लागत असे. शेतसारा वसुलीबरोबरच गावातल्या इतर समस्या आणि न्यायालयदेखील चालायचं. अधिकारी जेव्हा गावांमध्ये राहायचे, त्यांना गावामधल्या जातीपाती, रूढीसंकल्पना, हवापाणी, शेतीव्यवस्था, जंगल-झाडे इत्यादी गोष्टींवर चर्चा करायला मिळायची. हे सगळे अधिकारी, या माहितीचं संकलन करत करत पूर्ण जिल्ह्य़ाच्या महिनाभराच्या दौऱ्यानंतर जेव्हा जिल्हा मुख्यालयात पोहोचत, तेव्हा या माहितीचं विभागवार वितरण होत असे आणि सगळ्या माहितीचं संकलन करून अधिकारी आपल्या उच्च अधिकाऱ्यांना पाठवत असत. हे सगळं संकलन १०० टक्के अचूक असेलच असं नाही, पण प्रथमदर्शनी जे दिसलं, जे अनुभवलं याचा आराखडा मात्र असे. सगळ्या जिल्ह्य़ांच्या संकलनामधून राज्यावर या वर्षी काय संकटं आली, कोणत्या पिकाची हानी झाली, कुठल्या ठिकाणी भांडणतंटे, गुन्हे यांमध्ये वाढ झाली, यासारखी माहिती उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे पुढच्या वर्षी कुठे सारा जास्त घ्यायचा, कुठे जास्त भांडखोरी, क्राइम आहे आणि त्यावर नियंत्रण कसं करायचं याचा कार्यक्रम आखला जायचा.
या गॅझेटियरमध्ये उपलब्ध केलेली माहिती ही बऱ्याच अधिकाऱ्यांच्या कष्टाचं फळ आहे. हरितसंपदा आणि प्राणिसंपदेच्या माहिती संकलनाची व्याप्ती शास्त्रज्ञांना लाजवणारी आहे. पण याचबरोबर काही संकल्पना त्यांना पूर्णपणे न कळल्यामुळे किंवा तत्कालीन प्रभावशाली लोकांनी चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे इंग्रजांनी अमुक ही जाती चांगली, अमुक चोरी करणारी यासारखे विभाजन केले. आपल्याकडच्या अनेक काटक, निडर जातींना याचा फटका बसला. इतिहासाचं पुनर्लिखाण इंग्रजांनी त्यांना होणाऱ्या सोयीप्रमाणे केलं. भारतीय माणसाचा स्वाभिमान आणि त्याच्या परंपरा खंडित करत त्यांना इंग्रजांवरच जास्तीत जास्त निर्धारित करण्याचं कामही या माहिती संकलनानंतर माहितीची मोडतोड करून करण्यात आलं.
आजही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आणि जिल्ह्य़ामधल्या महसूल अधिकाऱ्यांना काही गावांमध्ये जाऊन राहून आपलं कॅम्प ऑफिस उघडण्याचे आदेश महसूल विभागाचे आहेत. तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगामध्ये अधिकारी आणि सामान्य माणसाची जोड करण्याचा यासारखा चांगला प्रयोग होऊ शकत नाही. पण तंत्रज्ञान आणि साधनांच्या वेगामुळे आज कुणीही अधिकारी गावामध्ये राहत नाही. (फार कमी संख्या असेल) बऱ्याचशा राज्यांनी ही प्रथा मोडीत काढलेली आहे. कोणत्याही जिल्ह्य़ाच्या लोकांची माहिती अगोदर कोठेही उपलब्ध नसल्याने ती त्यांच्याशी संवादानेच मिळू शकते हा इंग्रजांच्या कारभाराचा मूलमंत्र आपण विसरलोच आहोत. पण त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या आपल्या कार्यक्षेत्रातल्या माहितीचं, अनुभवाचं संकलन करण्याची प्रथा ही संपत चालली आहे. विज्ञानांच्या युगामध्ये ‘गुगल सर्च’ करून माहिती घेणं हा पायंडा पडत चालला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला बदलीनंतर आपल्या अनुभवाची आणि जिल्ह्य़ाच्या महत्त्वाच्या गोष्टींची एक गोपनीय नोंद आपल्या नंतर येणाऱ्या अधिकाऱ्याला सूत्रे सोपवताना- स्वीकारताना द्यायची असते, त्यामध्ये कुशल प्रशासनाचे रहस्य आहे.
*लेखक भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी आहेत.
त्यांचा ई-मेल joshiajit2003@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित
गॅझेटियर
आपल्या अमलाखालील प्रदेशावर नियंत्रण राखण्यासाठी त्या प्रदेशाची इत्थंभूत माहिती हाती असण्याची गरज लक्षात घेऊन इंग्रजांच्या राजवटीत जिल्हयांच्या संदर्भपुस्तिका अर्थात, ‘गॅझेटियर’ तयार होत गेल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व प्रशासनयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District gazetteer