अॅडॅम स्मिथचे अर्थशास्त्र ‘उद्योगसमूहा’च्या उदयाने पालटले. त्यानंतरच्या कॉपरेरेट रेटय़ात(सुद्धा), उद्योगसमूह हा ‘समाजघटक’च आहे आणि नैतिक निर्णय माणसांनी करायचे आहेत, याची जाण असणारे नीतिनियम विकसित झाले!
व्यवसायाच्या नीतिशास्त्राचा (Professional Ethics) उपविभाग म्हणून धंद्याचे नीतिशास्त्र (Business Ethics) विकसित झाले आणि त्याचा विस्तार म्हणून उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र (Corporate Ethics) ही उप-उप ज्ञानशाखा विकसित झाली. वाणिज्य, विपणन व व्यवस्थापन अभ्यासक्रमांत ‘उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र’ शिकविले जाते. आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात जनरल लेव्हलवर विद्यार्थ्यांना ‘उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र’चा परिचय करून दिला जातो.
उद्योगसमूहांनी गेल्या ५० वर्षांत सर्वसामान्य माणसाचे जीवन जणू कब्जात घेतले आहे. साबण, घासणी, निरोध, टीव्ही, संगणक, माध्यमे, विविध खाद्यपदार्थ ते भावनिक व सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या घरापर्यंत सर्व गोष्टींचे उत्पादन या कंपन्या करतात. त्यांची स्वतंत्र अतिशय तगडी अर्थव्यवस्था असते. अमेरिका ऑनलाइन, वार्नर ब्रदर्स, जनरल इलेक्ट्रिक, आयबीएम इत्यादी. अमेरिका ऑनलाइनचे बजेट भारताच्या एकूण बजेटएवढे किंवा युक्रेन, हंगेरी, न्यूझीलंड, चेक प्रजासत्ताक, पेरू आणि पाकिस्तान यांच्या एकत्रित बजेटएवढे आहे. राजकारण, समाजकारण, धर्म, संस्कृती, माध्यमे, न्याय व्यवस्था इत्यादी साऱ्या क्षेत्रांवर त्यांचे नियंत्रण आहे. जागतिकीकरण हा त्यांच्या खेळीचा भाग, असे मानले तरी चालेल. जॉन लॉक (१६३२-१७०४) आणि अॅडम स्मिथ (१७२३-१७९०) यांच्या सिद्धांतात वर्णन केले आहे त्यापेक्षा भांडवलशाहीला नवे, वेगळे वळण ‘उद्योगसमूहां’मुळे मिळाले.
एक व्यक्ती, एखादे घराणे किंवा विविध व्यक्तींचा गट यांनी अनेक उद्योगांचा समूह चालविणे हे उद्योगसमूहाचे साधारण स्वरूप असते. त्याचे अतिशय व्यापक रूप म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी. ‘कॉर्पोरेट कल्चर’ ही संकल्पना यातून आली. उद्योगसमूह ही एक सामाजिक संस्था असल्याने त्यातील नोकर, अधिकारीवर्ग, इत्यादी व्यक्ती व मालक गट यांची सामाजिक जबाबदारी कोणती आहे, याचा अभ्यास करणारी ही उपयोजित नीतिशास्त्रातील शाखा आहे. उद्योगसमूहाचे अंतिम टोक त्यांचा ग्राहकवर्ग असतो. सामाजिक जबाबदारी याचा अर्थ हा वर्ग आणि ग्राहक नसलेला पण समाजाचा घटक असलेला इतर सामान्य माणूस यांची जबाबदारी व कर्तव्य असा आहे.
उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र मूलत: आधुनिक भांडवलशाहीच्या समर्थनातून उदयास आले. कंपन्या स्थापन करणे, केवळ नफा हेच उद्दिष्ट ठेवणे, स्पर्धा हेच धोरण मानणे, खासगी संपत्तीचा हक्क मिळविणे, (पसा ही कृत्रिम वस्तू असूनही) संपत्ती (लक्ष्मीपूजन) ही नसíगक बाब समजणे, या भांडवलशाहीच्या वैशिष्टय़ामधून उद्योगसमूहाच्या समर्थकांनी हे नवे नीतिशास्त्र विकसित केले. त्याने अनेक अघोरी प्रथा आणल्या. पण सामाजिक नीती आणि राजकीय नीती या संकल्पना सुस्पष्ट होण्यासाठी हे नवे नीतिशास्त्र एक इष्टापत्ती ठरले.
व्यवसायाचे नीतिशास्त्र या लेखात आपण पाहिले की, व्यवसायाचे नीतिशास्त्र उद्योगसमूहांचे विश्लेषण तीन पातळ्यांवर करते. पहिली- उद्योगसमूह ज्या व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आíथक परिसरात उभारले जातात त्यातील स्थानिक मूल्ये तपासणे आणि मुक्त बाजारपेठेचे औचित्य लक्षात घेता व्यापक मानवी न्याय व सामाजिक कल्याण या मूल्यांशी त्या स्थानिक मूल्यांची सांगड घालणे, दुसरी- खासगी उद्योगसमूहांनी बनविलेल्या नीतिनियमांच्या आधारे एकूण उद्योगसमूहांच्या नतिक वर्तनाच्या निकषांची थेट पारदर्शी तपासणी करणे, तिसरी- एखाद्या विशिष्ट व्यावसायिक संस्थेतील किंवा उद्योगसमूहातील व्यक्तींचे हक्क आणि त्यांच्या नतिक बांधीलकीचे स्वरूप निश्चित करणे.
उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र या साधारण नतिक नियमांना विशिष्ट स्वरूप देण्याचा प्रयत्न करते. यात उद्योगसमूहाचे स्वरूप व उदय, उद्योगसमूहाचे सामाजिक पातळीवरील नतिक प्रतिनिधी या अर्थाचे स्थान, उद्योगसमूहाच्या सामाजिक जबाबदारीबाबत संकुचित आणि व्यापक दृष्टिकोनांचे चिकित्सक परीक्षण, मालक आणि नोकर यांच्यातील काही मूलभूत नतिक समस्यांचे परीक्षण यांचा समावेश होतो. या समस्यांत नोकराने स्वत:च्या कार्यालयीन पदाला दोष देणे, सहकाऱ्यांचा अवमान, लाचखोरी (कमिशन, कट प्रॅक्टिस, किकबॅक, अवास्तव भेटी), खुशमस्करी/ चमचेगिरी, व्हिसल ब्लोइंग (जागल्यागिरी) करणे यांचा समावेश होतो.
उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र सामाजिक जबाबदारी निश्चित करू पाहते. तिला ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)’ म्हणतात. उद्योगसमूहाच्या सामाजिक नतिक भूमिकेबाबत साधारणत: दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. पहिला, संकुचित आणि दुसरा व्यापक. संकुचित दृष्टिकोन प्रामुख्याने मिल्टन फ्रीडमन (१९१२-२००६) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने मांडला, तर व्यापक दृष्टिकोन हॉवर्ड बोवेन, विल्यम फ्रेडरिक, मेलविन अन्शेन इत्यादींनी मांडला.
संकुचित दृष्टिकोन म्हणजे कंपनीची जबाबदारी फक्त भागभांडवलदार यांच्यापुरती असते असे मानणे आणि व्यापक दृष्टिकोन म्हणजे उद्योगसमूह ही प्रचलित कायदे, नतिक धारणा व नियमांना अनुसरून कायदेशीररीत्या निर्माण झालेली सेवा व पुरवठादार संस्था असते, त्यामुळे तिच्यावर निश्चित काहीएक जबाबदारी असते, असे सांगणारा युक्तिवाद होय.
मिल्टनच्या दृष्टिकोनामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या या शोषणाच्या संस्था बनल्या. त्यांना कोणतेही नियम उरले नाहीत, केवळ नफा हेच उद्दिष्ट बनल्यामुळे अनेक समाजविरोधी वस्तूंनाही उत्पादनाचा दर्जा मिळाला, त्यांचा ग्राहकवर्ग तय्यार करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. शस्त्रे, व्यसने, अश्लील साहित्यनिर्मिती ते युद्ध यांना उद्योगाचा दर्जा मिळून सामाजिक नीतीस धक्का बसला.
या धोरणाचा विरोध करण्यासाठी व्यापक दृष्टिकोन मांडण्यात आला. त्यानुसार, कंपनी ही समाजातील मोठी आíथक ताकद > आíथकतेशी राजकीय सत्ता जोडलेली असते > समाजकल्याण हाच सत्तेचा चिरस्थायी हेतू असतो. या अर्थाने कंपनीवर सामाजिक जबाबदारी असते, असे व्यापक दृष्टिकोन सांगतो. या संबंधात चार युक्तिवाद आहेत. अदृश्य हात युक्तिवाद, शासनमुक्त युक्तिवाद, अकार्यक्षम रक्षक युक्तिवाद आणि समाजाचे वस्तूकरण युक्तिवाद. उद्योगसमूहांनी कोणती नीती पाळावी, कोणती आचारसंहिता अमलात आणावी, यासाठी प्रत्येक उद्योगसमूहाने एक नतिक समिती स्थापन करावी, असे हा युक्तिवाद सुचवितो.
व्यापक दृष्टिकोन युक्तिवादाच्या मते एक- उद्योगसमूह हे नेहमी देशातील कायद्याच्या आधारे उभे केले जातात. म्हणजेच उद्योगसमूह ही कायदेशीर संस्था आहे. दोन- कायदा हा नेहमी रूढी, परंपरा व नीती या आधारे रचला जात असतो. समाजातील व्यक्ती आणि उद्योगसमूह हे नीतीचे वाहक घटक असतात. तीन- अशा कायद्याच्या आधारे रचला गेलेला उद्योगसमूहसुद्धा स्वरूपाने सामाजिक असतो. उद्योगसमूह मानवनिर्मित असल्याने ती मानवी नियंत्रणाखाली असते, त्यामुळे उद्योगसमूहास ‘कृत्रिम व्यक्ती’ हा दर्जा लाभतो. चार- त्यामुळे सामाजिक नीतीचे वाहक व प्रचारक या अर्थाने उद्योगसमूह हा ‘सामाजिक नतिक प्रतिनिधी’ असतो.
उद्योगसमूहाच्या संदर्भात नतिक जबाबदारी या संकल्पनेला तीन अर्थ असतात. एक- कृतीबद्दल जबाबदार धरणे. दोन- त्यामुळे निष्पन्न होणाऱ्या पुढील परिणामांची जबाबदारी स्वीकारणे, नतिक निर्णय हा बौद्धिक व ताíकक निर्णय असतो याचे भान ठेवणे. हे काम केवळ माणूसच करतो, याचेही भान विकसित करणे. तीन- नतिक निर्णय कोणत्याही यंत्रणेवर अथवा एखाद्या यंत्रावर (उदा., सर्व संभाव्यता जोखणाऱ्या काटेकोर निकषांविनाच, निवड/ छाननीचा निर्णय संगणकावर) न टाकणे. तसे केल्यास मानवी बुद्धी दुय्यम होते, यंत्रे श्रेष्ठ होतात. हे नवे एलिएनेशन असते!
आजची समस्या म्हणजे राजकारण, संघटित गुन्हेगारी आदींचे झालेले मिल्टनप्रणीत उद्योगसमूहीकरण! गॉडफादर, धर्मात्मा, सरकार, कॉर्पोरेट, सामना, सिंहासन इत्यादी सिनेमे हे ढोबळ उदाहरण. प्रत्यक्ष अनुभव निवडणुका, सत्तेचा घोडेबाजार व त्यात गुंतलेली कुडमुडी (क्रोनी) भांडवलशाही.
लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र
अॅडॅम स्मिथचे अर्थशास्त्र ‘उद्योगसमूहा’च्या उदयाने पालटले. त्यानंतरच्या कॉपरेरेट रेटय़ात(सुद्धा), उद्योगसमूह हा ‘समाजघटक’च आहे आणि नैतिक निर्णय माणसांनी करायचे आहेत, याची जाण असणारे नीतिनियम विकसित झाले!
First published on: 16-10-2014 at 02:32 IST
मराठीतील सर्व तत्वभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ethics of trade