पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्थापनेला विरोध करताना सतीश आळेकर यांनी म्हटले होते की पीडीए, कलोपासक, थिएटर अकादमी यांसारख्या नाटय़संस्थांमध्ये रंगकर्मी जसे काही ना काही करीत शिकत जातात आणि रंगभूमीची त्यांना पूर्ण ओळख होते तसे औपचारिक शिक्षणाने होणार नाही. (पुढे आळेकर तिथेच विभागप्रमुख झाले ते अलाहिदा!)
आळेकर म्हणाले त्यामध्ये तथ्य आहेच. पडेल ते काम नाटय़संस्थांमध्ये (आजही) करावे लागते. शिवाय, आपणहोऊन एखाद्या कामामध्ये स्वारस्य दाखवले तर तेही करून पाहण्याची मुभा अशा संस्थेमध्ये असते. आजच्या प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर सतत वावर असलेला प्रदीप वैद्य हा तरुण रंगकर्मी त्याचे उत्तम उदाहरण आहे.
‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’मध्ये त्याने हरतऱ्हेची जबाबदारी सांभाळली आहे. त्याचा पिंड खरेतर संगीतकाराचा, अनेक वर्षांपूर्वी, ‘झाडे-मातीच्या मनातील कविता’ हा कविता वाचन-गायनाचा कार्यक्रम त्याने मित्रमैत्रिणींच्या साहाय्याने उभा केला, हे आज कदाचित अनेकांना माहीत नसेल. पीडीएमध्ये तर त्याने रंगभूमीच्या विविध विभागांमध्ये अक्षरश: संचार केला. तो काही नाटककार नाही, पण त्याने सहस्रचंद्रदर्शन, अचलायतन, प्राइजटॅग ही नाटके लिहिली. त्या नाटकांच्या प्रयोगांचे दिग्दर्शन, प्रकाशयोजना, संगीतयोजना हेदेखील प्रदीपने सांभाळले. पीडीएमध्येच त्याने नाटय़प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षक म्हणून एक बाजू सांभाळली. काही काळानंतर तो ‘आसक्त’ या नाटय़संस्थेमध्ये रमला. ‘आसक्त’च्या ‘तू’, ‘तिची सतरा प्रकरणे’ आणि ‘कॉम्रेड कुंभकर्ण’ या नाटय़प्रयोगांची प्रकाशयोजना प्रदीप वैद्यने केली होती. ‘सु-दर्शन’मध्ये अत्यंत लहान आकारमानाच्या रंगमंचावर, १५-२० युवा-युवतींच्या भूमिका असलेल्या प्रयोगाची प्रकाशयोजना त्याने आशयानुरूप आणि मर्यादांवर मात करून कौशल्याने केली. त्याची दखल, राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि त्याला अनेक पारितोषिकेही मिळाली. ‘जागर’च्या ‘तुघलक’ नाटय़प्रयोगाचे संगीत नियोजन प्रदीपचे होते.
उत्सुकता, अभ्यासू वृत्ती, कष्ट, नम्रता आणि कलात्म असमाधान यामुळे प्रदीप वैद्य हा समांतर रंगभूमीवर ‘सर्वाचा’ झाला आहे!
समांतर रंगभूमीवर ‘सर्वाचा’
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्थापनेला विरोध करताना सतीश आळेकर यांनी म्हटले होते की पीडीए, कलोपासक, थिएटर अकादमी यांसारख्या नाटय़संस्थांमध्ये रंगकर्मी जसे काही ना काही करीत शिकत जातात आणि रंगभूमीची त्यांना पूर्ण ओळख होते तसे औपचारिक शिक्षणाने होणार नाही.
First published on: 08-12-2012 at 10:32 IST
मराठीतील सर्व रविवार विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everybodies on parallel theater