प्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव? प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल. पण मग प्रकाश कोणत्या रचनेतून येतो आहे, हे महत्त्वाचं नसतं का? त्या रचनेचाही अनुभव आपण घेत असतो का? प्रकाशाधारित कलांचा इतिहास मोठा आहे, पण तो प्रकाशाइतकंच रचनेच्याही अनुभवाला महत्त्व देणारा आहे!
‘प्रकाशाचा सण दिवाळी’ वगैरे वाक्यं लिहिलेले भ्रमणध्वनी-संदेश अनेक वाचकांनी एव्हाना डिलीटही केले असतील. मंगळवारच्या भाऊबिजेसोबत प्रकाशाचा हा सण संपेल. दिवाळी संपली तरी आकाशकंदील मात्र बरेच जण काही दिवस तसाच ठेवतात. देवदिवाळीपर्यंत वगैरे. का ठेवतात? बरं वाटतं म्हणून! देवदिवाळी किंवा तुळशीचं लग्न वगैरे हे एक निमित्त.. एरवीच प्रकाश पाहिला की बरं वाटतं. रंगीत प्रकाशाचा खेळ दिसला की त्याहीपेक्षा अधिक बरं वाटतं. प्रकाश अडवायचा कुठे आणि प्रकाशाला कुठून बाहेर पडू द्यायचं याच्या निरनिराळ्या कल्पना आपल्यासमोर साकारलेल्या असतात तेव्हा, प्रकाशाचं ते डिझाइन पाहण्यात मन रमतं. काळोखात एकच प्रकाश-स्रोत असेल, तर तो नाटय़ निर्माण करतो. आकाशातल्या तारका, एकच दूरवरला दिवा, एकच तिरीप, एकच कवडसा, रांगोळीशेजारची किंवा डिनरच्या टेबलावरली एखादीच मिणमिणती ज्योत.. ही प्रकाशाची एकेकटी रूपं अपेक्षा ते उत्कंठा यांच्या चढत्या तारांतून एखादा सूर छेडतात. कशाच्या तरी आडून येणारा प्रकाश आभासाला आवाहन करतो. याउलट, रोषणाईचा भरपूर प्रकाश सामथ्र्य, भव्यता, शिस्तबद्ध कवायतीतून किंवा अन्य कुठल्या एकसारखेपणातून होतो तसा सामूहिक हुंकाराचा भास, प्रकाशाचेच आकार झाल्यासारखं वाटल्यामुळे येणारा विस्मय यांचा प्रत्यय देतो.. रोषणाईचं हे नेहमीचंच आहे.
प्रेक्षकाला, श्रोत्याला येणारा अनुभव नटाला, गायकाला माहीत असतो. तरीही तो अनुभव तेव्हा मात्र नवा असतो. असंच प्रकाशाचं. दिसण्याशी संबंधित असणाऱ्या कला या प्रकाश वापरण्याच्या कला आहेत, एवढं तरी नक्की असतं. नाटकांतली प्रकाशयोजना, चित्रपट हे छायाप्रकाशाचंच माध्यम असल्याचं जाणून केलेली दृश्यरचना, वास्तूच्या सजावटीमध्ये प्रकाश वापरून घेणारी नवी शाखा.. अर्थातच छायाचित्रण कला आणि दूरान्वयानं रंगचित्रकला (पेंटिंग) यांच्याशी प्रकाशाचा संबंध आहेच. पण या साऱ्यांतून प्रकाशाचे कसकसे अनुभव यावेत, याचे आडाखे गेल्या कैक वर्षांत, किमान तेराव्या-चौदाव्या शतकापासून ठरत आलेले आहेत. प्रकाशाचा नवा अनुभव देता येईल का, हे शोधणं आजच्या कलावंतांचं काम आहे. ते एकीकडे मांडणशिल्पांच्या (इन्स्टॉलेशन) कलेतून होतं आहे, तर दुसरीकडे संगणकीय प्रकाशात बरंच काम सुरू आहे. आजपासून पाऊणशे वर्षांपूर्वी हे (प्रकाशाचे अपरिचित अनुभव शोधण्याचं) काम ‘फोटोग्राफी’ या त्या काळी तुलनेनं नव्या असलेल्या तंत्राकडे होतं. १९२० आणि ३० च्या दशकात मॅन रे, लाझ्लो मोहिले-नॅश (स्पेलिंगबरहुकूम उच्चार ‘मोहोली – नॅगी’) यांनी केवळ डार्करूममध्ये, म्हणजेच कॅमेरा न वापरता केवळ एन्लार्जरच्या साह्य़ानं ‘रायोग्राम’, ‘फोटोग्राम’ केले. त्यानंतर २०१२ साली संगणकीय कला हे या तंत्राचं डिजिटल पुनरुज्जीवनच आहे, असं मानून थॉमस रफ नावाच्या एका चतुर फोटोग्राफरनं संगणकीय कलाकृतींच्या मालिकेला ‘फोटोग्राम’ हेच नाव दिलं होतं. अर्थात, त्याही आधीपासून संगणकावरलं फ्रॅक्टल डिझाइन हे प्रकाशावरच आधारित आहे. तेच खरं तर, फोटोग्रामला अधिक जवळचं आहे. असो.
तात्पर्य हे की, प्रकाशाचा अपरिचित अनुभव देणं हे फोटोग्राफी वा संगणक यांपेक्षा अन्य तंत्रांना हल्ली तरी अधिक साधलं आहे. इथं ‘तंत्रं’, ‘हल्ली’ हे शब्द जरा जपूनच वाचावेत, कारण ते निव्वळ शब्दसंक्षेपाची सोय म्हणून वापरलेले आहेत. उपयोगविरहित (अनुपयोजित) आर्किटेक्चर किंवा वास्तुरचना, ही कलाच.. ते निव्वळ ‘तंत्र’ नव्हे. शिवाय ते ‘हल्ली’च पुढे आलंय, असंही नाही. ‘बिल्डिंग फॉर व्हॉइड’ ही सूर्यप्रकाश आणि कुट्ट अंधारलेलं विवर यांचा मेळ घालणारी वास्तुकलाकृती अनिश कपूर या ब्रिटिश दृश्यकलावंतानं स्पेनमध्ये उभारली, ती १९९२ साली. त्यानंतरची महान वास्तुकलाकृती म्हणजे जेम्स टरेल या ‘महान प्रकाश-कलावंत’ (लाइट आर्टिस्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलावंताची ‘रोडेन क्रेटर’ ही अमेरिकेतली कलाकृती. १९७९ पासून या ‘रोडेन क्रेटर’चं बांधकाम अमेरिकेतल्या एका मृत ज्वालामुखीच्या विवरामध्ये सुरू आहे आणि ते अद्यापही लोकांसाठी खुलं झालेलं नाही, तरीही महानच (का, ते कदाचित ‘कलाभान’मध्येच पुढल्या दोन-तीन आठवडय़ांत कधी तरी पाहू). जेम्स टरेलच्या आधी- १९७७ साली वॉल्टर डि मारिया या अमेरिकी दृश्यकलावंतानं ‘लायटनिंग फील्ड’ नावाची जी दृश्यकलाकृती केली होती, ती आता जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.. ४०० खांबांमधून आकाशात फेकला जाणारा विजेचा (इलेक्ट्रिसिटी) प्रवाह आणि त्यामुळे आकाशात विजा कडाडण्याचा साधलेला परिणाम, असं या कलाकृतीचं स्वरूप आहे!
या महान कलाकृतींच्या तुलनेत अगदीच छोटी ठरेल, अशी एक कलाकृती चार-पाच महिन्यांपूर्वी फ्लोरेन्सला एका प्रदर्शनात पाहिली. ते मांडणशिल्प, मूळची पोलिश आणि आता जर्मन तरुण दृश्यकलावंत अ‍ॅलिसिया क्वेड हिनं केलं होतं. अगदी साधंसं वाटत होतं. मोठमोठय़ा काचा, एवढाच काय तो त्यातला जरा दडपवणारा भाग. तीन-तीन टेबललॅम्पची त्रिकुटं तिनं जमिनीवर मांडली होती. पण तेवढय़ासाठी तिनं एक खोलीच व्यापली होती. हे तिन्ही दिवे जणू एकमेकांकडे पाहत प्रकाश-संवाद साधताहेत, असं गॅलरीच्या त्या खोलीत शिरता क्षणी दिसत होतं. पण.. पण काचा होत्या ना मध्ये.. त्या कशाकरिता..? आणि हे काय? तीनपैकी दोन टेबललॅम्पच्या वायरी बघितल्या का कशा कुठल्याही कनेक्शनविना तशाच भुंडय़ा पडल्यात ते?
तरीही प्रकाश दिसतोय, तिन्ही टेबललॅम्पमधून येणारा. ही काचांचीच करामत. प्रकाशाचं प्रतिबिंब थेट ‘यें हृदयींचे तें हृदयी’ घातल्यासारखं या टेबललॅम्पच्या दिव्यासाठी केलेल्या शंकूतून दुसऱ्या आणि तिसऱ्याही शंकूत सोडणारं. त्रिकुटातला एकच प्रकाशित. बाकीचे परप्रकाशित. हे काही तरी विषमता आणि आभासी ‘समता’ वगैरे असं आहे का? नाही. म्हणजे, किमान अ‍ॅलिसिया क्वाडे हिला तरी तसं म्हणायचं नाही. तिनं या कलाकृतीचं नाव ‘टेलिपोर्टेशन’ असं ठेवलंय. संवाद, दूर असूनही ‘अ’ ते ‘ब’ आणि ‘क’ असा अगदी सहज शक्य झालेला संचार, या अर्थानं. हे फारच सकारात्मक आहे.
या कलाकृतीमागची जी काही कल्पना आहे, ती अत्यंत साधी आहे. ती परिचितही आहे. तरीदेखील, आधी थोडासा संदेह, गोंधळ, फसगत आणि मग मात्र ‘हँ:’ म्हणत शहाणं होणं, या भावनांचा खेळ या कलाकृतीतला प्रकाश तुमच्याशी खेळू शकतो. आर्ट गॅलरीची अख्खी खोलीच व्यापण्यामधून या कलाकृतीला उगाचच्या उगाच आलेला दरारा, त्या दिव्यांची आणि काचांची ‘नेपथ्यरचना’ बेमालूमपणे करण्यामागचं अगदी हिशेबीच तंत्रकौशल्य, असं सारं या ‘टेलिपोर्टेशन’ नावाच्या मांडणशिल्पात आहे. तुम्ही तिला भुक्कड वगैरे म्हणा, पण ती कलाकृती हे आपलं आजचं उदाहरण आहे. हेच उदाहरण आहे म्हणजे कलाकृती महान किंवा चांगलीच असायला हवी, असं इथं अभिप्रेत नाही. हे उदाहरण प्रकाशाचा अनुभव देणाऱ्या ‘एका कुठल्या तरी रचने’चं आहे आणि त्या रचनेमागचं शास्त्रीय तत्त्व जरी बऱ्याच जणांना परिचित असलं तरी, गॅलरीत हे असं पाहण्याचा अनुभव मात्र निराळा होता, इतकंच.   
हे- नेमकं हेच प्रकाशाचा अनुभवांबद्दल होतं. प्रकाशाचे अनुभव आपल्याला या ना त्या प्रकारे परिचित असतात. त्यामागचं तत्त्व समजलं की, नावीन्य वाटेनासं होतं. पण तरीही, प्रकाशाच्या रचनेकडे पाहिल्यावर आकाराचा, घडणीचा प्रत्यय येतो.
प्रकाशाच्या अनुभवाकडून या आकार/ घडण वगैरे अनुभवांकडे जाणं म्हणजे ‘प्लास्टिक आर्ट्स’च्या – सुघटित कलांच्या- अनुभवाचा विचार करणं.
ते आपण कमी वेळा करतो. सॉफ्टी आइस्क्रीमच्या कोनमध्ये वळीदारपणे भरलं जाणारं हंसशुभ्र आइस्क्रीम पाहून आपल्यापैकी फार थोडय़ा जणांना तशाच वेटोळेदार सीएफएल-दिव्याच्या आकाराची आठवण होत नाही. त्या वीजदिव्याचा आकार आपल्यासाठी महत्त्वाचा असतोच असं नाही. जे असे साधेच आकार पाहून क्षणभर हरखतात वगैरे, त्यांना आपण कलावंत तरी मानतो किंवा बालिश तरी. याच्या मधलं काहीच नसतं का?

Story img Loader