वायू-नळांचे जाळे असणारी कंपनी, पुरवठय़ाऐवजी सौदय़ांमध्ये जम बसवल्यावर वीजधंद्याकडे वळली. महसूल फुगवून सांगण्यासाठी निरनिराळ्या क्ऌप्त्या लढवू लागली.. लेखापाल बहकले, पण कुणीतरी हे जोखलेच..  

सन २००१, १४ ऑगस्ट. अमेरिकी शेअरबाजारात खळबळ माजविणारी वार्ता धडकली. एन्रॉन कंपनीचा प्रमुख कार्यकर्ता अधिकारी जेफ स्किलिंगने राजीनामा दिला. वॉल स्ट्रीटवरच्या अनेक विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार यांनी या एन्रॉन कंपनीला अद्भुत अवतार असल्यागत नावाजले होते. अनेक गुंतवणूक विश्लेषक एन्रॉन शेअर १२५ पर्यंत जाणार असे भाकीत वर्तवीत होते. अशा गुंतवणूक जगातला ताईत मानल्या गेलेल्या कंपनीला हा हिसका का बसावा?
ह्य़ुस्टन नॅचरल गॅस व इंटरनॉर्थ या कंपन्यांचे विलीनीकरण होऊन बनलेली ही थोराड कंपनी. तिच्या मालकीचे ३७ हजार मैल लांबीचे नैसर्गिक वायू पुरविणारे नळांचे जाळे होते. १९९० च्या सुमारास एकूण वायूच्या ७५ टक्के वायूचा सौदा ‘हजर’ दरानुसार (स्पॉट किंमत) ठरू लागला, तसा  एन्रॉनचा मुनाफा वधारला. एन्रॉन शेअरचा परतावादेखील वधारला. या संधीचा लाभ घेत एन्रॉनने व्यवसाय आणखी क्षेत्रात पसरायचे धोरण स्वीकारले. वायूचा बलाढय़ हजर आणि वायदा (स्पॉट व फॉरवर्ड) सौदा करणाऱ्या व्यापारी कंपनीचे रूप धारण केले. वित्त बाजारातील कंपन्यांशी संधान करून त्या व्यापाराभोवतीची वित्तीय बाजूदेखील आपल्या धंद्याचा भाग बनविली. वीज, कोळसा, पोलाद, कागद, पाणी व त्याच्या जोडीला ब्रॉडबँड माहिती वाहणारे काचतंतूचे जाळे या धंद्यातही एन्रॉनने अशा प्रकारे बस्तान बसविले. कालांतराने या व्यापारी उद्योगाचा व्याप-विस्तार मूळ उद्योगापेक्षा बराच फुगला. पण एन्रॉनचे उपद्व्यापी उद्योजक एवढय़ावर थांबणारे नव्हते. वीजपुरवठा/ निर्मिती, वीज व्यापार या क्षेत्रातील पसरण त्यांच्या मूळ कुवतीत नव्हती. परंतु अन्य देशांतील सज्जेदलाल (लॉबिंग मध्यस्थ) हाती धरून अशी कारखानदारी थाटण्याचा त्यांनी सपाटा लावला. महाराष्ट्रातील दाट नैसर्गिक वायू वापरून वीजनिर्मितीचा प्रकल्पही त्यातलीच उठाठेव.
पण या सर्व घोडदौडीत एन्रॉनची वित्तीय जगातली छबी मोठी आकर्षक होती. उदा.- दर कामगारामागे तेल क्षेत्रातील एक्झॉन मोबिल १९,९६,००० डॉलर इतके महसुली उत्पन्न कमावत होती. जनरल इलेक्ट्रिकल ४,१६,९००, एटी अँड टी ४,१७,६०० व एन्रॉन? ५२,३५,८००! दहा लाख डॉलरचे उत्पन्न उपजायचे तर आयबीएमला ७०५९ तास लागायचे. जनरल इलेक्ट्रिकलला ४८१५ तास, एक्झॉन मोबिलला १००० तास, तर एन्रॉनला फक्त ३७७ तास! पण कुणाला ‘हे सर्व येते कुठून’ असा प्रश्न पडायला फुरसतच नसावी. शेअरबाजारातील विचक्षक तर एन्रॉन शेअर आणखी किती/ केव्हा वर जाणार, याबद्दलच वितंड करण्यात मश्गूल होते.
या देदीप्यमान यशाला मुख्यत: दोन कारणे होती. पहिले म्हणजे आपला विक्री व्यवहार, त्यातून रोकड रूपात येणारे प्रत्यक्ष रोख उत्पन्न मोजण्याची एन्रॉनने वापरलेली पद्धत. दुसरे कारण म्हणजे एन्रॉन ज्या प्रकारे खरेदी-विक्री व्यवहार करीत होता, त्यात दीर्घ मुदतीचे (उदा. १५ ते २० वर्षे) करार असत. त्या करारातल्या मंजूर किमतीमध्ये सतत बदल होत. त्यातून येणारा अनुस्यूत नफा-तोटा आणि हे नफा-तोटय़ाचे स्रोत असणाऱ्या मत्ता (अ‍ॅसेट्स) याचे मोल सतत धारेवर असे. पण ही त्यांच्या मोलात होणारी वध-घट एन्रॉनच्या ताळेबंदात कधीच दिसत नसे. तशी ती दिसूच नये या बेताने एन्रॉनच्याच प्रमुख वित्त अधिकाऱ्याने आणखी पाच कंपन्या तयार केल्या होत्या. त्यांच्या माथी ही खातीही वध-घट वायदा किमतीच्या प्रमाणात दिसणे अपेक्षित होते. व्यवसायात काही बाबी नेहमीच्या धाटणीने ताळेबंदात हाताळता येत नाहीत. त्या ताळेबंदामध्ये सहजी मावत नाहीत. म्हणून अशा व्यवहाराचे तपशील स्वतंत्रपणे देणे व उलगडून सांगणे हे क्रमप्राप्त असते. परंतु या पद्धतीचा गैरवापर करून उद्योजक गुंतवणूकदार, कर्जदार, बँका यांची हातोहात फसवणूक करतात. एन्रॉनने तेच केले. तेही मोठय़ा प्रमाणावर व झपाटय़ाने.
एन्रॉनचा मुख्य व्यवस्थापक स्किलिंग याने महसूल फुगविण्याच्या पद्धतीचा धोशा धरला. त्याचे म्हणणे असायचे, उद्योगात कल्पक विचार खरा मोलाचा. धंद्याची स्थिती कशी सतत हेलकावत असते, त्याचबरोबर धंद्याचे मोलदेखील बदलते. हे आपल्या वित्तचित्रामध्ये प्रतिबिंबले पाहिजेच. तात्पर्य, आज एखादे कंत्राट मिळाले की त्या कंत्राटात आलेली सगळी भावी रक्कम आजच दाखवायची. त्यात होणारे बदल? तेही दाखवायचे, पण ते बदल तर दुसऱ्याच कंपनीच्या ताळेबंदात ठेवलेले! जो नफा-तोटा होईल तो एन्रॉन देईल, पण वेळ येईल तेव्हा. याला तारण काय तर एन्रॉनचे स्वत:चे झळाळत्या मोलाचे शेअर.
शेअरबाजार वा अन्य वित्तीय व्यवहारांत बाजारनुसारी मूल्य (मार्केट टू मार्केट) हे तत्त्व अवलंबले जाते. तसे तिथे वापरणे उचितदेखील असते. कारण योग्य वेळी लाभकारक वा किमान हानीकारक किमतीस विकणे-खरीदणे हे व्यवसायाचे मूळ गमक असते. हे गमक व सदोदित व्यवहारक्षम बाजारपेठ या दोन काटय़ांवर बाजारानुसार मूल्याची कसोटी उचित असते. एन्रॉन विकत होती ती कंत्राटे या कसोटीवर उतरणारी नव्हती. तिथे या ‘लेखा’तत्त्वाचा वापर पूर्ण गैरलागू, धूळफेक करणारा होता.
एन्रॉन संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) हे तत्त्व अंगीकारलेच, पण सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशननेही त्याला मान डोलावली, हे विशेष! मुद्दा नियंत्रण असण्या-नसण्यापेक्षा नियंत्रणाच्या गुणवत्तेचा असतो. नियंत्रणाचा कैफ लागेल तेवढी माहिती मागत सुटतो. पण त्याचा वापर करण्याची कुवत पैदा करायचे राहून जाते. एन्रॉन प्रकरण झाले कारण ही कुवत सुमार होती. कुणाही सामान्य हिशेबनीसाला पडावा असा प्रश्न एक्स्चेंज कमिशनला पडला नाही. परंतु एन्रॉनचे अधिकृत ‘हिशेब-नवीस’ ऑर्थर अँडरसन या जगातील लेखा-पंचायतनात मिरवणाऱ्या लेखापालांना ही समस्या जाणवू नये? निव्वळ एक्स्चेंज कमिशनने मंजूर मुंडी दाखविली म्हणून त्यांनीही या ढळढळीत लबाडीला दुजोरा द्यावा? अँडरसनच्या दुजोरा किंवा संमतीमागे आणखी एक कारण असावे. अँडरसन एकीकडे लेखापाल (ऑडिटर) होते तसेच त्यांचा दुसरा व्यवसाय सल्लागारीचा होता. कंपन्यांचे ‘मोल तोलून’ त्यांना बाजारातून छोटे-मोठे वित्त-झरे शोधून देणे हे या सल्लागारांचे मुख्य काम. अँडरसनकडून एन्रॉनला मिळणाऱ्या एकूण महसुलात या जोडधंद्याचा वाटा अधिक मोलाचा होता. अँडरसनने संशयाची टाचणी उचलली, तर आम्ही अन्य तत्सम थोराड लेखापालांकडे जाऊ अशा धमकीवजा खुणा एन्रॉन चमकावीत असे. तळे राखी तो पाणी चाखीच्या मोहात अँडरसन अडकले. जेव्हा एन्रॉनचे बिंग फुटले, तेव्हा अँडरसनला आपला बचाव करता करता नाकी नऊ आले. अखेरीस गाशाच गुंडाळावा लागला. हा बोभाटा सुरू झाला, तेव्हा अँडरसनच्या एका शहाण्या अधिकाऱ्याला वकील सल्ल्याने सारे कागद कातरून टाकायचा हुकूम दिला गेला होता.
गैरलागू पद्धत वापरून महसूल फुगवायचा, त्या जोरावर शेअरची किंमत वाढवायची. त्यातून ताळेबंदबाह्य़ कंपन्यांनाही फायदा! तसे झाले म्हणून एन्रॉनच्या प्रमुख वित्त अधिकाऱ्यालाही गलेलठ्ठ कमिशन! हे सगळे शेअर-किमतीवर चालविलेले लटके गौडबंगाल नेमके काय आहे, याची पूर्ण कल्पना ना संचालक मंडळाला होती, ना कंपनीच्या लेखापाल समितीला. या समितीत अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठातले, व्यवस्थापन संस्थातले अकौंटन्सी प्रोफेसर होते; सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनचे माजी सदस्य होते! सगळे भारून गेले होते एन्रॉनच्या वायुवेगाने वाढणाऱ्या महसुलामुळे व त्यायोगे वाढणाऱ्या शेअर-किमतीमुळे. वॉल स्ट्रीट विश्लेषकांची गुणगान पुंगी चिरकली ती एका शेअरविक्रेत्या दलालामुळे. त्याने विचारले की, तुमचा ताळेबंद आणि महसुली उत्पन्न व खर्च याचा पुरा ऐवज तुम्ही एकत्र वा तपशिलाने कधीच देत नाही? असे का? या प्रश्नाने स्किलिंग महाशयांचा तोल सुटला आणि त्यांनी अर्वाच्य उत्तर दिले. एवढे कारण पुरेसे झाले. अनेकांनी आपली भिंगे परजली. एके काळी नव्वदीला घुटमळणारा, शंभरी ओलांडू पाहणारा एन्रॉनचा शेअर एक डॉलरला आला. कंपनीने दिलेली १०-के नमुन्यातली माहिती जरी कुणी चाळली असती तर ही नौबत आली नसती. पण तळटिपांचे पैंजण या धोक्याच्या घंटा असतात, हे कोणी कोणाला सांगायचे? गुंतवणूकदारांनी लेखापालाला की लेखापालाने गुंतवणूकदाराला?
* लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
Story img Loader