काकासाहेब गाडगीळांच्या कन्या म्हणून दिल्लीशी सुरेखा पाणंदीकरांचा परिचय जुना, पण या शहरातून त्यांनी सुरू केलेल्या बालग्रंथालय चळवळीची पाळेमुळे आता युनेस्कोपर्यंत पोहोचली आहेत. त्याबद्दल सांगताना साने गुरुजी कथामालेचाही उल्लेख आवर्जून होतोच..
मुले आणि पुस्तके यांना एकत्र आणून मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवायची हे सुरेखा पाणंदीकर यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहे. मराठी वाचन संस्कृतीच्या समृद्ध अनुभवाच्या आधारे गेल्या तीन दशकांपासून देशभरात तसेच दिल्लीत श्रीमंत घरच्या मुलांपासून झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या कामाला वाहून घेतलेल्या सुनंदा पाणंदीकरांचा उत्साह पंचाहत्तरी पार करूनही तसूभर कमी झालेला नाही.
सुरेखा पाणंदीकर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उपाख्य काकासाहेब गाडगीळ यांच्या कन्या. १९४७ साली वयाच्या दहाव्या वर्षी त्या पुण्यातून दिल्लीत आल्या. ब्रिटनकडून भारताला सत्ता हस्तांतरित होत असतानाच्या ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार असलेल्या मोजक्याच मराठीजनांमध्ये त्यांचा समावेश होतो. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लॉर्ड माऊंटबॅटन यांनी राजेंद्र प्रसाद यांना सोपविलेली सत्तांतरणाची कागदपत्रे, सुचेता कृपलानींचे वंदेमातरम् आणि पंडित नेहरूंचे ‘ट्राइस्ट विथ द डेस्टिनी’ हे प्रसिद्ध भाषण, सोहळा संपल्यानंतर नेहरूंना लोकांनी खांद्यावर घेऊन सेंट्रल हॉलमध्ये फिरविले तो प्रसंग.. हे सर्व दुर्मीळ क्षण त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून प्रत्यक्ष अनुभवले. दुसऱ्या दिवशी सकाळी, १५ ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल गर्दीत चेंगरतात की काय अशी स्थिती होती. त्या वेळी काकासाहेबांचे सहकारी म्हस्के यांनी पटेलांना खांद्यावर बसवून जीपमध्ये नेऊन ठेवले. तो क्षणही त्यांच्या मनावर कोरला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधींना धाकटे बंधू रामकृष्ण यांच्यासोबत पांढऱ्या फुलांच्या हारानिशी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांचा क्षणही त्यांना आठवतो. प्रचंड गर्दीतून वाट काढत गांधीजींपाशी पोहोचल्यानंतर ‘नही नही, फूल का नही, सूत का हार’ असे बोट हलवत चेहऱ्यावर मिस्कील हास्य करीत गांधीजी उद्गारले. ‘टकली सीखो, चरखा सीखो और सूत निकाल के लाओ. अगली बार जब आओगे तो सूत का हार पहनाना,’ असे सांगणाऱ्या गांधीजींचा तो हसरा चेहरा त्यांना अजूनही आठवतो.
काकासाहेबांच्या सहा मुली आणि दोन मुले यांच्यात सुरेखा पाणंदीकर बहिणींमध्ये चौथ्या आणि एकूण भावंडांत पाचव्या. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांच्या पाठी जन्मलेल्या. लष्करात मेजरच्या हुद्दय़ावरून निवृत्त झालेले धाकटे बंधू स्व. रामकृष्ण यांच्याशी त्यांची विशेष गट्टी होती. आपल्या सर्व भावंडांनी काकासाहेबांचे नाव न वापरता त्यांचा वारसा चालविला, याचा त्यांना विशेष अभिमान आहे. त्यांच्या सर्वात मोठय़ा भगिनी स्व. शुभा केंभावी विजया बँकेच्या पहिल्या महिला व्यवस्थापक झाल्या, दुसऱ्या भगिनी उषा आळेकर (सतीश आळेकर यांच्या आई) यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. तिसऱ्या स्व. शारदा विंचूरकर यांनी आपल्या सामाजिक कार्याने नाशिकमध्ये लौकिक संपादन केला. पाचव्या क्रांती नातू आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या सहाव्या तिलोत्तमा भालेराव यांनी आपापल्या क्षेत्रात कर्तबगारीचा ठसा उमटविला.
दिल्लीतील वास्तव्यादरम्यान सुरेखा मॉडर्न स्कूलमध्ये शिकल्या. त्यांच्या वर्गात गांधीजींचे नातू रामचंद्र गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पती विनोद दीक्षित होते. वडिलांचे मंत्रिपद गेल्यानंतर दिल्लीहून पुण्याला परतल्यावर त्यांनी फर्गसन महाविद्यालयातून अर्थशास्त्रात एम.ए. केले आणि दिल्लीत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९६३ साली त्यांचा दिनकर हरी पै पाणंदीकर यांच्याशी विवाह झाला आणि तेव्हापासून त्या दिल्लीत स्थायिक आहेत. पाणंदीकर यांचे थोरले चिरंजीव विभव सिंगापूरमध्ये वित्तीय क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय करतात, तर अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमध्ये नोकरीला असलेल्या त्यांच्या कन्या राधिका पती समीर मित्तल यांच्यासह न्यूयॉर्कमध्ये राहतात.
सुरेखा पाणंदीकर यांचे पती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दिनकर हरी पै पाणंदीकर हे केंब्रिज विद्यापीठातील पंतप्रधान मनमोहन सिंग, अमर्त्य सेन आणि जगदीश भगवती यांचे वर्गमित्र. ते गोव्याचे असल्यामुळे त्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट होता. नंतर पाकिस्तानमार्गे त्यांचा भारतीय पासपोर्ट झाला. फिक्कीमध्ये अनेक वर्षे नोकरी करताना हिंदूस्थान टाइम्समध्ये सलग ४० वर्षे त्यांनी अर्थविषयक स्तंभलेखन केले. आता ते विविध संघटनांमध्ये सक्रिय आहेत.
आईवडिलांचे संस्कार, दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये शिकत असताना वर्गात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल प्रिन्सिपल एम. एन. कपूर यांनी वाढदिवसाला दिलेली पुस्तकाची भेट, पुण्यातील घरी येऊन साने गुरुजींनी सेवादलाच्या मुलामुलींना सांगितलेल्या गोष्टींचा मनावर होणारा परिणाम अनुभवणाऱ्या सुरेखा पाणंदीकरांना इतरांनाही गोष्टी सांगण्याचा आणि वाचनाची आवड निर्माण करण्याचा छंद लागला. वयाच्या अकराव्या वर्षी दैनिक केसरीमध्ये मुलांच्या पानावर त्यांनी लिहिलेली पहिली गोष्ट प्रसिद्ध झाली. त्याचे त्यांना एक रुपया मानधन मिळाले. सई परांजपेंशी त्यांची बालपणीची मैत्री. महाविद्यालयात असताना त्या साने गुरुजी कथामालेतर्फे पिशवीतून पुस्तके घेऊन झोपडपट्टीतील मुलांशी संवाद साधायच्या. विवाहानंतर दिल्लीत त्या फिक्कीमधील संशोधन विभागात अधिकारी म्हणून नोकरीला होत्या. पण मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी नोकरी सोडली. लहानग्या विभवला रोज एक गोष्ट सांगावी लागायची. त्यातून गोष्टी लिहिण्याच्या जुन्या छंदाला चालना मिळाली. १९८१ साली प्रख्यात लेखक आणि व्यंगचित्रकार के. शंकर पिल्ले यांनी चिल्ड्रन्स बुक ट्रस्टची तसेच बाल साहित्यिक, भाषांतरकार, चित्रकथाकार, ग्रंथपाल, संपादक, प्रकाशक व बालसाहित्याशी संबंधित विविध लोकांचा समावेश असलेल्या असोसिएशन ऑफ रायटर्स अँड इलस्ट्रेटर्स फॉर चिल्ड्रेन (एडब्ल्यूआयसी) या संस्थेची स्थापना केली. या संस्थांमध्ये सुरेखा पाणंदीकर सुरुवातीपासून कार्यरत आहेत. एडब्ल्यूआयसीच्या ग्रंथालय प्रकल्पाच्या त्या संयोजक आहेत. ही संस्था खासगी शाळा, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांच्या आयोजनात सक्रिय आहे. शहरी झोपडपट्टय़ांमध्ये तसेच ग्रामीण भागात वंचित व उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या ‘बचपन’ या बालसाहित्य आणि संस्कृती जोपासणाऱ्या संस्थेच्याही त्या अध्यक्ष आहेत. शाळांच्या ग्रंथालयांमध्ये कुलूपकिल्लीत बंदिस्त झालेल्या बालसाहित्याचा मुलांशी परिचय घडवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १९८५ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘चिटकू’ प्रकाशित झाले. त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला. आर्थिक क्षेत्राशी संबंधित लहानसहान संशोधन प्रकल्पांचे काम करून मुलांसाठी लेखन प्रसिद्ध करण्यात त्या गुंतल्या. मराठी आणि इंग्रजीबरोबरच दिल्लीत राहिल्याने हिंदूीवरही प्रभुत्व प्रस्थापित झाल्याने नावाजलेल्या प्रकाशन संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तिन्ही भाषांमध्ये ७५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
आपण लिहितो खरे, पण पुस्तके मुलांपर्यंत पोहोचतच नसतील तर उपयोग काय, असा सवाल त्यांना पडला आणि त्याचे उत्तरही सापडले. शाळांमधील वाचनालयातील पुस्तके मुलांना उपलब्धच होत नव्हती. मग मुलांसाठी शाळाबाह्य़ ग्रंथालय सुरू करण्याची कल्पना अमलात आणून दिल्लीत नऊ ग्रंथालये सुरू केली. सर्व प्रकाशकांना पत्रे लिहून चार हजार पुस्तके एकत्र केली. आता देशभरात अशा ग्रंथालयांची संख्या पावणेदोनशेच्या घरात पोहोचली आहे. या अनुभवाची दखल घेत युनिसेफने मुलांच्या ग्रंथालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. मुलांसाठी नुसती पुस्तके ठेवून चालत नाहीत. त्यांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे लागते. त्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे गोष्ट सांगणे. ही परिणामकारकता साधण्यासाठी त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक-गाडीवरून गावागावांत लाऊडस्पीकरवरून गोष्टी सांगण्याचा उपक्रम राबवला. पारंपरिक झांज वाजवून गोष्टी सांगायच्या. गोष्ट सांगून झाली की अशा गोष्टी पुस्तकातही वाचायला मिळतील, असे सांगून पुस्तकाविषयी आकर्षण निर्माण करायचे. गोष्टीवर आधारित चित्र काढायला सांगायचे. चित्र काढण्यासाठी मुलांना गोष्ट काळजीपूर्वक ऐकणे भाग पडते. मुलांना एखाद्या घटनेवर गोष्ट लिहायला सांगायची, अशा नवनव्या प्रयोगांद्वारे त्यांनी दिल्लीतील झोपडपट्टय़ांपासून सुनामीग्रस्त नागपट्टणम आणि अंदमान-निकोबापर्यंत मुलांवर गोष्टींचे माहात्म्य बिंबविण्यात यश मिळविले. शाळा सोडून देणाऱ्या मुलामुलींसाठीही त्या ग्रंथालयाचा उपक्रम राबवतात. सिंगापूरमध्ये बालगुन्हेगारांच्या तुरुंगात वाल्मीकीची कथा ऐकवून त्यांनी एका मुलाचे मनपरिवर्तन घडवून आणले. तो आता महाविद्यालयीन मासिकाचा संपादक झाला आहे.  
आज मुलांचा आई-वडिलांशी संवाद राहिलेला नाही. सतत टेलिव्हिजनमध्ये गुंतलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष मुलांसोबत बसून वाचन करण्याची गरज आहे. साधने भरपूर आहेत आणि त्यांचा मुलांमधील हिंसक प्रवृत्ती संपविण्यासाठी आणि मानवी मूल्ये रुजविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पण मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडील किंवा शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पालकांनी, विशेषत: वडिलांनी मुलासोबत बसून रोज वर्तमानपत्र वाचले पाहिजे. शाळेत एका विशिष्ट वेळेला चपराशापासून मुख्याध्यापकापर्यंत सर्वानी वाचन केले पाहिजे, असे उपायही त्या सुचवितात. ग्रंथालयाची संकल्पना यशस्वी करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील झोपडपट्टय़ा धुंडाळून काढल्या. झोपडपट्टीतील मुलांसाठी बचपन नावाच्या संस्थेमार्फत दरवर्षी दिल्ली पुस्तक मेळा किंवा जागतिक पुस्तक मेळ्यात संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला. दिल्लीत मीसुद्धा एवढय़ा झोपडय़ांमध्ये फिरलेली नाही, अशी प्रशस्ती मुख्यमंत्री शीला दीक्षितही त्यांना देतात. गरिबांच्या वस्त्यांसाठी जिथे कम्युनिटी हॉल बांधले, तिथे ग्रंथालय स्थापन करण्यासाठी शीला दीक्षित यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सच्या वतीने पुस्तकांचे संच दिले जातात. त्यामुळे पुस्तकांची कमतरता नाही, पण मुलांनी तिथे येऊन ग्रंथालय तेवढय़ा निष्ठेने चालवणे आवश्यक आहे. त्यांना प्रशिक्षित करणे आणि ग्रंथालय चालविण्याची त्यांच्यात प्रेरणा निर्माण करणे हेच आपले ध्येय असल्याचे पाणंदीकर सांगतात. झोपडपट्टय़ांमधील ग्रंथालयात जास्तीत जास्त मुली येतात. त्यांच्यासाठी ग्रंथालय हे छेडखानी करणाऱ्या मुलांपासून एक प्रकारे सुरक्षा कवचाचे काम करते. पालकांनाही याची जाणीव असते, पण केवळ ग्रंथालय स्थापन करून चालणार नाही.  शिक्षण अनिवार्य झाल्यामुळे मुलांना लिहिता-वाचता येते, पण ग्रंथालयांशिवाय मुलांना वाचनाची आवड निर्माण होत नाही. पाठय़पुस्तकापर्यंतच त्यांचे वाचन मर्यादित होते. मुले चौथी-पाचवीपर्यंत शिकतात. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागते. विशेषत: मुलींनी शाळा सोडली की त्या लिहिणे-वाचणेही विसरून जातात. अशा मुलामुलींनाही प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्या व्यक्त करतात.  चांगल्या कुटुंबात जन्मल्याने आपल्यावर आई-वडिलांचे चांगले संस्कार झाले. ज्यांना असे संस्कार मिळत नाही त्यांच्यासाठी काम करणे, ही आपली सामाजिक बांधीलकी आहे, असे त्यांना वाटते. मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी त्या आजीच्या भूमिकेत सदैव तत्पर असतात. पुढच्या पिढीचे भवितव्य वाचन संस्कृतीतूनच घडेल, या दृढभावनेतून.

Story img Loader