एन्रॉन असो की सत्यम, ग्लोबल ट्रस्ट बँक असो की शेरेगरसारखे मध्यमवर्गीयांच्या दामदुप्पट स्वप्नांचे सौदागर.. वित्त क्षेत्रातील हे सारे गुन्हे भांडवलावर आधारलेल्या कोणत्याही व्यवस्थेत घडतच असतात आणि फसवणूक करणाऱ्यांचा तसेच फसवले जाणाऱ्यांचा ऐश्वर्यलोभ हे त्या सर्व गुन्ह्य़ांसाठीचे मूळ भांडवल असते. या लोभाच्या भांडवलावर किती ‘उद्योग’ उभारले गेले, त्यातून ‘अक्कलखाती’ काय जमा झाले, याचा लेखाजोखा घेणारी ही पाक्षिक लेखमाला..
‘बळजबरी’ आणि ‘फसवणूक’ हे गुन्ह्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. काही गुन्ह्यांमध्ये या दोन्हीची सरमिसळ असते. सामान्यत: अपराध किंवा गुन्हा म्हटले की मारहाण, घरफोडी, शारीरिक इजा असे चित्र ठळकपणे अनेकांच्या मनात येते. मात्र असा ‘शारीरिक’पणा नसणारे पण जबर नुकसान करणारे अनेक अपराध असतात. सहसा ज्याला पांढरपेशी (किंवा व्हाइट कॉलर) गुन्हे म्हणतात, त्यांचे प्रमाण बरेच असते. मात्र त्याचा ‘वर्तमानपत्री’ गवगवा फारच बेताचा असतो. अशा पांढरपेशी अपराधांमधून सोसावे लागणारे नुकसान आणि त्याचा बळी ठरलेले लोक संख्येने खूप मोठे असतात.
पांढरपेशी अपराधांमध्ये अनेक प्रकार उपप्रकार आहेत. उदाहरणार्थ विक्रेत्यांकडून केली जाणारी ग्राहकांची फसवणूक, धोकादायक वस्तूंची विक्री, पर्यावरणाची खराबी करणे, वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्ट व्यवहार, संगणकीय क्ऌप्तीने फसवणूक वा गैरव्यवहार, प्रसारमाध्यमांतील भ्रष्ट व्यवहार.. याखेरीज सर्वात नजरेत भरावा असा प्रकार म्हणजे वित्तीय क्षेत्रांमधील फसवणूक व लबाड कारवाया.
औद्योगिकीकरणाचा झपाटा वाढला, रुंदावला की भांडवल उभारणी, गुंतवणूक, त्याची परतफेड आणि परतावा यांची निकड अधिक जोमाने वाढते. पैशाच्या स्वरूपातील बचत अर्थव्यवस्थेत अधिक झपाटय़ाने खेळू लागते. पैदा होणारे वरकड वाढीव उत्पन्न पैशाच्या, रोखीच्या, भावी उधार किंवा जोखीमधारी गुंतवणुकीच्या रूपाने आणखीच खळखळ वाहू लागते. औद्योगिक विकासाच्या अशा टप्प्याला वित्तीय भांडवलाचा ‘शककाळ’ म्हणतात. हे वित्त-शक सरत नाही. ते उत्तरोत्तर फैलावत राहते. निरनिराळे अवतार पैदा करत राहते. या नव्या जगाबरोबर त्याच्या जडणघडणीला साजेशा नव्या पांढरपेशा अपराधांचीही उगवण होते.
चारशे वर्षांपूर्वी भागभांडवल गोळा करून ‘उत्पादक मंडळी’ ऊर्फ ‘कंपनी’ चालविण्याचा मनू आला. (भारतावर ब्रिटिश राज्य स्थापणारीदेखील एक राजाश्रयी भागभांडवल कंपनीच होती.) अशा कंपन्या काढणे, त्या मिषाने पुंजी गोळा करणे आणि पोबारा करणे हा एक नवा फसगत-अध्याय सुरू झाला. त्याची ठेवण आणि धाटणी लक्षात घेऊन, अशी भामटेगिरी बेताने होईल यासाठीची तजवीज करणारे कायदेकानू येऊ लागले. सर्व जगभर आता असे कायदे मौजूद आहेत. पण व्यवसायवाढीचा झपाटा एवढा आहे की, या भांडवली उलाढालीकडे पुरेसे लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेची दमछाक होते. परिणामी कोण कोणत्या मिषाने कुणाला गुंगारा देईल याच्या पायवाटा उमगेपर्यंत या ना त्या वर्गाला त्याचा रट्टा बसतो. भागधारकांची होणारी फसगत ही इच्छाधारी मायावी ‘ठगिनी’ होऊन अनेक पावलांनी वावरत राहिलेली आढळते. अगदी अलीकडील काळातील उदाहरणे म्हणजे अमेरिकेतील एन्रॉन व भारतातील ‘सत्यम’.
भागभांडवल बाजाराच्या जोडीने फोफावलेली सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे बँक प्रणालीचा उदय. ठेवीच्या रूपाने पैसा स्वरूपातील बचत देणे म्हणून स्वीकारायची. त्यावर व्याज आणि मुदतीनुसार परतफेड कबूल करायची. आणि जमा झालेली पुंजी वाढीव दराने निरनिराळ्या मुदतीसाठी कर्जाऊ द्यायची. हा या उद्योगाचा मूळ कणा. बहुतेक ‘ठेवी’ छोटय़ा मुदतीच्या पण त्यातून पैदासलेली कर्जे सहसा अधिक मुदतीची, अशीच परिस्थिती असते. पण ठेवींचा एक हिस्सा परतफेडीला पोहोचेपर्यंत दुसरा नवा ठेवींचा ओघ येत राहतो आणि ठेवी-कर्जाचे जोड-गाडे सुरळीत राहते. पण त्यांच्या ओघांचा आकार आणि परतफेडीचा दुहेरी प्रवाह यांच्यात बेबनाव झाला तर सगळाच गाडा घरंगळू लागतो. बँक बुडणार अशी हूल उठली की ठेवी परत घेण्यासाठी ठेवीदारांचे मोहोळ उठते. परिस्थिती आणखीच बिघडते. क्वचित हूल अनाठायी असते; पण ती बरी चालणारी बँकही दुरवस्थेला नेऊ शकते. असा बँका बुडण्याचा आणि नवीन बँका उगवण्याचा खेळदेखील अनेक दशके सुरू होता. त्यातून होणारी फसगत आणि नुकसान आटोक्यात राहावे म्हणून बँकांच्या धंद्यावर नोंदणीपासून व्यवसाय गुंडाळणीपर्यंत सर्व बाबतीचे कायदे आले. त्यामुळे बँक बुडण्याचे प्रमाण कीम झाले, पण थांबले नाही. बँक चालविणाऱ्या संचालक व कर्मचाऱ्यांनी आपल्याच मर्जीधारी पण नालायक लोकांना बेसुमार अविचारी कर्जे दिली तर त्यांची रोजच्या रोज न्याहाळणी कोण व कशी करणार? त्याचा सुगावा लागावा अशा बेताने केंद्रीय बँका काही पडताळणी करतात. पण त्या निमित्ताने द्यायची माहितीच खोटी, बनवाबनवीची असेल तर ही न्याहाळणीदेखील थिटी पडू शकते. परिणामी कायदेकानू असूनसुद्धा बँक बुडणारच नाही, कर्जे नीट पारखून आणि जबाबदारीनेच दिली जातील याची पूर्णाशाने हमी राहात नाही. अलीकडचे उदाहरण म्हणजे मोठा गाजावाजा करून एकाएकी भुईसपाट झालेली ‘ग्लोबल ट्रस्ट बँक’.
वित्तीय बाजाराचे स्वरूप उत्तरोत्तर पालटत जाते. भागभांडवल बाजार, बँका यांखेरीज या दोहोंच्या तळय़ांत हातपाय ठेवून एका गटाची पैसारूपातली बचत दुसऱ्या कुणालातरी उधार म्हणून मिळवून देणाऱ्या मध्यस्थांचे अनेक प्रकार आहेत. उदा. चिट-फंड, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, बँक नसलेल्या पण जवळपास बँकांसारखाच व्यवसाय आणि उलाढाल करणाऱ्या ‘बिगरबँक वित्तीय कंपन्या’.
या निरनिराळ्या वित्तीय मध्यस्थांचे ‘बचतदार आणि कर्जदार’ यांच्याखेरीज आपापसांतदेखील मोठय़ा रकमांचे व्यवहार अधिक जोमाने आणि अधिक वारंवार घडत असतात. उदा.- एक वित्त कंपनी घरासाठी कर्ज देते. पण परतफेडीचे आणि वसुलीचे सगळे उत्पन्न आणि अधिकार दुसऱ्या कंपनीला देऊन काहीशी नामानिराळी होते. परतफेडीचे आणि व्याजवसुलीचे अधिकार मिळालेली कंपनी त्याच उत्पन्नाचे आधार दाखवून कर्जरोखे बाजारात विकायला काढते. म्हणजे घर एकाचे, मूळ कर्ज दुसऱ्याचे, त्याचे हक्क तिसऱ्याचे आणि हे हक्क राबविणारा निधी पुरवतो चौथा. जर काही कारणाने मूळ कर्ज घेऊन घर बांधणारा हप्ते आणि व्याज द्यायला असमर्थ ठरला तर ही एकावर एक बांधलेली माडी हादरू लागते. असे कर्ज घेऊन घर बांधणारे अनेकजण एकाच वेळी- बहुसंख्येने ढपले तर हा सगळाच इमला कोसळतो. याचा प्रत्यय २००६ ते २००८ मध्ये अमेरिकेत आला. कच्च्या घरकर्ज पायावर उभारलेले कर्जरोखे, कर्जरोख्यांवर आधारलेली अनुवंशी मत्ता याची साखळी एकदम कोसळली.
वित्तीय जगातल्या घडामोडी, त्यातले छुपे अपराध हे एक वेगळे पांढरपेशा गुन्ह्यांचे जग आहे. वित्तीय विकासाच्या टप्प्यानुसार त्याचे रूप थोडेबहुत पालटत राहते. त्यात कधी साधा भोळा वाटणारा कारकून मोठा कळीचा कावेबाज असतो, कंपनीमध्ये आपले एक कोंडाळे करून जमेल तसा हात मारत राहणारा गट असतो, कधी त्यांचे बँक किंवा न्याहाळणी करणाऱ्या ‘कायदेबाज’ अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण सख्य असते, तसेच काहीतरी अघटित शिजते आहे वा घडते आहे याचा सुगावा घेणारे प्रामाणिक रखवाली-अधिकारी, सरकारी नियंत्रक हेदेखील या जगात असतात. या गुन्हा व अपराधांचे जाळे इतर रस्तोरस्तीच्या शारीरिक गुन्ह्यांपेक्षा निराळे असते. अशा घटनांच्या कथा जेव्हा वर्तमानपत्रांत येतात, तेव्हा त्याचे सगळे रूप व पैलू नेहमीच पुढे येतात असे नाही. हे सगळे विश्व ठकसेनांनी भरले आहे, असे मुळीच नाही. त्यात सत्प्रवृत्त धोरणी आणि सत्प्रवृत्त धूर्तदेखील आहेत. इतर गुन्ह्यांप्रमाणेच संपत्तीची हाव, झटपट मिळू शकेल पण आयुष्यभर पुरेल असा ऐश्वर्यलोभ, या प्रेरणा चांगल्याच शिरजोर असतात. त्यात छोटय़ा-मोठय़ा गुंतवणूकदारांची, ‘अधिकाऱ्यां’ची दिंडीच असते. बरोबरीने कायद्यातल्या पळवाटा, कायद्याची नजरबंदी यांत वाकबगार असणारे बदमाशदेखील असतात. ते या लोभी दिंडीला डोळा घालून आपला डाव साधू पाहतात.
अशा दोन्ही प्रकारच्या धूर्त-धोरणींचे आणि लोभी, बदमाशांचे अवघे विश्वरूप नव्हे पण त्याची थोडीशी चुणूक दर्शविणे आणि त्यामागच्या हेतू-प्रेरणा आणि ‘कारवाई’ची तोंडओळख करून देणे, यासाठी आणि यापुरती ही लेखमाला.
* लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.
 त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com

Story img Loader