केतन पारिख याने भांडवल बाजारात घोटाळा करण्यासाठी हर्षद मेहतासारख्याच क्ऌप्ती वापरल्या, शेअर फुगवण्यासाठी दोन बँकांचा पैसा त्याने ओरपला. पण त्याचा भर होता तो ‘नव्या, उदयोन्मुख क्षेत्रां’कडे लोकांना भुलवण्यावर.. कंपन्यांनाही या सुजेत सामील करून घेण्याची त्याची कार्यशैली ही नव्या डावपेचांची नांदी ठरली.
हर्षद मेहताची शिकवण घेत आणि बघत बघत मोठा झालेला आणखी एक नंदीबैल अवघ्या चार-पाच वर्षांत अवतरला. त्याचा धुमाकूळ २००१ साली पुरेसा उजेडात आला. या नंदीचे नाव केतन पारिख. मूळचा चार्टर्ड अकाऊंटंट आणि हर्षदचा भाऊ अश्विन मेहता याची ‘तालीम’ घेतलेला मध्यस्थ. हर्षदच्या धोरणाशी त्याचे धोरण बरेच मिळतेजुळते होते; पण निदान सुरुवातीच्या काळात त्याचे व्यवहार हर्षदएवढे धश्चोट वा सर्वागी निधडे नव्हते; परंतु निवडक शेअरच्या किमती उचलून उचलून वर भिडवायची बैलधडक तशीच होती. हर्षदसारखी जुनी कंपनी नव्या रूपाने उभी करायची तर किती मोल होईल अशी भाकडपुराणे तो सांगत नसे; परंतु शेलक्या कंपन्यांचे मोल फुगवण्यासाठी बाजारगप्पा फुलवण्याचे लाघव त्याच्याकडे भरपूर होते.
परंतु बाजारगप्पा खुलवल्या तरी शेअरच्या किमती आपोआप थोडय़ाच फुलणार? त्यासाठी खरेदी करणारे द्रव्य हवे. हर्षदने असा ‘द्रव्यस्रोत’ दोन प्रमुख मार्गानी साकारला होता. एक म्हणजे सरकारी रोख्यांची बँकांनी पोसलेली उलाढाल आणि दुसरा मार्ग शेलक्या कंपन्यांचे संस्थापक शेअरमालक हाताशी धरून त्यांच्याकडील शेअरधारणेचे मूल्य वधारून देण्याचे काम मध्यस्थ म्हणून पार पाडायचे. केतनने दुसरा पर्याय धडाक्याने हाताळला. या देवाणघेवाणीतून काही कंपन्यांचे द्रव्यस्रोतदेखील त्याला हवे तसे मिळू लागले; पण त्यालादेखील मर्यादा असते. म्हणून आणखी मोठा द्रव्यस्रोत हाताशी असला पाहिजेच! मग त्याने काही बँकांशी त्याच प्रकारचे संधान बांधले. त्यातील एक मोठी घबाड आणि लबाड बँक म्हणजे ‘ग्लोबल ट्रस्ट बँक.’ दुसरी बँक साधीसुधी कुणाच्या फार ध्यानीमनी नसावी अशी ‘माधवपूर को-ऑपरेटिव्ह बँक.’
शेअर बाजारामध्ये एकेका काळामध्ये काही विशेष क्षेत्रांचा आणि त्यातल्या कंपन्यांचा गाजावाजा असतो. त्याची काही तात्कालिक कारणे असतात. त्या वेळची तीन क्षेत्रे म्हणजे भ्रमणध्वनी, दूरचित्र आणि सॉफ्टवेअर. १९९४ सालापासून अशी काही नवी क्षेत्रे उदयाला येत होती. त्यातले एक मोठे क्षेत्र म्हणजे ‘भ्रमणध्वनी’ ऊर्फ ‘मोबाइल टेलिफोन.’ सुखराम नामक ‘हिमाचली नटवरलाल मंत्र्याने आपल्या कारकिर्दीत हे क्षेत्र खुले केले. धोरणकर्ते दार बंद करण्याचे पैसे करतात तसेच दार उघडण्याचेही करतात! त्या गलबल्यामध्ये ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स’ नावाच्या कंपनीने खळबळ उडवून दिली. या एका कंपनीने वेगवेगळय़ा राज्य-क्षेत्रांमध्ये भ्रमणध्वनी परवान्यासाठी ८५,००० कोटींची बोली लावली होती; पण त्याचे शेअर्स मात्र नंतर चाळीस रुपयाला खितपत होते. हर्षद मेहता, अजय कायान यांनी अयशस्वी प्रयत्न करूनदेखील त्याला उभारी मिळाली नव्हती. अखेर केतनच्या परीस-पारखीमुळे हा शेअर १९९९ मध्ये २५०० रुपये इतका वर भिडला! फर्स्ट ग्लोबल सिक्युरिटीज नावाच्या आणखी एका लबाड-घबाड कंपनीकडे त्याची खासगी सुपूर्दी झाली होती आणि अनेक मध्यस्थ, गुंतवणूक फंड आपल्याला त्यात हिस्सा मिळावा म्हणून जीव टाकत होते. एवढेच काय, कॅरी पॅकर नामक ऑस्ट्रेलियन ‘सर्कसपटू’ धनाढय़ाने त्यात दहा टक्के वाटा घेण्याचेपण जाहीर केले होते.
अशीच दुसरी केतनस्पर्शी कंपनी म्हणजे ‘झी’ टेलिफिल्म्स. त्याची किंमतही १५०० पर्यंत भिडवली. केतनची नभोवाणी बाजारात तर अजून मोठे स्वप्न भाकीत होती. दहा रुपयांचा शेअर तोडून त्याचे एक रुपयाचे दहा शेअर होणार आणि एक रुपयाच्या शेअरची किंमत दहा हजाराला जाऊन भिडणार म्हणून त्यांची सुटसुटीत सूचना होती ‘दस का एक; एक का दस!’ अशीच कथा ‘डीएसक्यू’ नामक सॉफ्टवेअर कंपनीची. त्याचा समभाग (शेअर) २५० रुपयांवरून २.५ हजाराला जाऊन ठेपला.
दूर/भ्रमणध्वनी (टेलिफोन- टी), चित्रवाणी (मीडिया- एम) तसेच सॉफ्टवेअर तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजीचा ‘टी’) असे ‘टीएमटी’ क्षेत्र हे केतनने माजवलेले खूळ. या धुमाळीदरम्यान त्याने ‘ग्लोबल ट्रस्ट बँके’चे समभाग घेतले. ही बँक  ‘संगणकवृत्ती’ने काम करून आयसीआयसीआय वा एचडीएफसीसारखी फार मोठी बँक होणार असा गवगवा सुरू झाला. अधिकृतरीत्या केतनचे फक्त चार टक्के समभाग होते. प्रत्यक्षात बरेच जास्त होते!
परिणामी, केतनच्या संध्याकाळच्या जल्लोषामध्ये सॉफ्टवेअरसम्राट, दूरचित्रवाणी महाराजे यांची वर्दळ भलतीच वाढलेली असायची. केतनने ‘टिप्स इंडस्ट्रीज’ नावाची रेकॉर्डिग कंपनी नावारूपाला आणली. (या कंपनीच्या एका संचालकावर खुनाचा आरोप होता!) त्याची समभाग विक्रीच केतनच्या ‘ट्रायम्फ इंटरनॅशनल’ नामक कंपनीने केली होती.
पण एवढय़ाने थोडेच भागते? ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ नावाने खुद्द अमिताभ बच्चनने एक कंपनी काढली. ती साफ बुडाली. कर्जदार व देणेकऱ्यांनी बेजार झालेल्या अमिताभला समाजवादी पक्षाचे खासदार अमरसिंह यांनी वाचवण्याचे असिव्रत घेतले होते. म्हणे आयकर विभाग त्यांनी सांभाळला; पण बुडीत कंपन्यांचे खरकटे आवरण्यासाठी बोर्ड ऑफ इंडस्ट्रिअल अँड फायनान्शिअल रिकन्स्ट्रक्शन असते. त्याच्यामार्फत देणेकऱ्यांचे भिजत घोंगडे आवरावे लागते. त्यासाठी लागणारी धनराशी कुठून येणार? त्याची ‘तोड’ केतनने केली. अशा रीतीने अमिताभचा ‘ए’ ते ‘झी’ टेलिफिल्म्सचा ‘झेड’ अशी ‘ए टू झेड’ फौज केतनच्या गोतावळय़ात आली होती.
पण हा सगळा देखणा सोहळा चालवायला लागणारा निधी आणि त्यासाठी होणाऱ्या ‘क्ऌप्ती’ याच खऱ्या महत्त्वाच्या. केतनच्या पोतडीतल्या चलाख क्ऌप्ती फार वेगळय़ा नव्हत्या. खरे तर बरेचसे दलाल करतात तेच अवैध उद्योग तोही करत होता; पण एकाच वेळी खूप मोठय़ा प्रमाणात आणि विविध क्ऌप्त्यांचा अवलंब करणे हे त्याचे धाडस होते. त्यासाठीची जुळवाजुळव तेवढीच क्लिष्ट होती. हिमाचल फ्युचरिस्टिकचा प्रमुख विनय मल्लू, ग्लोबल टेलेचा प्रमुख मनोज तिरोडकर व झी टेलिफिल्म्सचा सुभाषचंद्र यांचे वैयक्तिक आणि वित्तीय ‘संघटन’ होते. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स त्यानेच वर नेऊन ठेपविले आणि त्याअगोदर स्वस्तात स्वत:साठी घाऊक खरेदी करून ठेवले होते. तो त्यांचा मोठा ‘समभागी’ दोस्त. त्याचा वाटा मोठा होता. वरवर चढणाऱ्या शेअर्सकडे पाहून मोठे गल्लेलठ्ठ फंड व्यवस्थापक खरेदी करत होते आणि शेअर आणखी वर जात होता. मालकांनीच आतल्या खास माहिती आधारे आपल्या शेअरची किंमत हवी तशी वाकविणे, मध्यस्थांनी अशा माहितीद्वारे किंमत वधारणे किंवा खाली पाडणे हे सर्व अवैध आहे. आपापसात ठरवून खरेदी-विक्री फिरवत राहणे अवैध आहे. खरेदी-विक्रीसाठी परस्परांत पैसे पुरवून व्याजाची रक्कम दलालीमध्ये लपविणे गैर व अवैध आहे. ठरवून किंमत वर-खाली करून अन्य मध्यस्थ वा गुंतवणूक फंडांच्या गळी उतरविणे अवैध आहे; परंतु केतन आणि त्याच्या मुखवटा कंपन्या नेमके हेच घाऊक प्रमाणात करीत होत्या. त्यांच्या व्यवहाराचे वित्तीय वंगण ‘ग्लोबल ट्रस्ट बँक’ आणि ‘माधवपूर सहकारी बँक’ पुरवत होत्या. शेअर्सच्या गहाणवजा ताब्यावर बँकांनी किती कर्ज द्यायचे याची मर्यादा ठरलेली असते. ती तर पार धाब्यावर बसवली होती. शेअर्सच्या मूल्यांच्या किती तरी पट कर्ज केतनच्या मुखवटा कंपन्यांना दिले जात होते. एवढेच काय, याच बँका दुसऱ्या बँकांचे देणेघेणे सांभाळत होत्या. शेअर बाजार कोसळला तर हा डोलारा नंगेपणे कोसळणार होता. त्याचा फटका ठेवीदारांना बसणार होता. तसे झालेही. त्यामुळे तर केतनला धूळ खावी लागली; पण केतन हर्षदपेक्षा वेगळय़ा काळात वावरत होता. काही नवे धूर्त आणि नवे डावपेच बाजारात बोकाळू लागले होते. ते चालविणारे केतनशी भले संबंधित असतील; पण त्यांची कार्यशैली हा एक निराळा कथाभाग आहे त्याबद्दल पुढच्या वेळी.
* लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!