आत्मा हे तत्त्व ईश्वरनिर्मित; परंतु प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक अशी विभागणी देकार्तने केल्यामुळे ‘ज्ञानाचे झाड’ धर्माच्या अंगणातून तत्त्वज्ञानाच्या अंगणात आणणे शक्य झाले..
‘पशाचे झाड’ ही संकल्पना फारच मोहक आहे. या नावाने अनेक कथा, कादंबरी, सिनेमा, नाटके, नाटुकले असे साहित्य लिहिले गेले. देश-प्रदेश, संस्कृतींनुसार अनेक म्हणी, वाक्प्रचार इत्यादी रूढ झाले. घरात असे झाड असावे, असे जवळपास प्रत्येकाला वाटते. सरकारकडे काही पशाचे झाड नाही, असे दु:ख माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकदा सबसिडीबाबत बोलताना व्यक्त केले होते. ‘पशाचे झाड’ या प्रश्नाच्या धर्तीवर ज्ञानाचे झाड असते का? ज्ञान झाडाला लागते का? (मराठी वळणाचा वाटणार नाही) असा प्रश्न उपस्थित करू. त्याचे उत्तर- ‘होय, ज्ञानाचे झाड असते! त्याचे फळ खाल्ले की ज्ञान होते!’ असे दिले जाते.
‘ज्ञानाचे झाड’ ही संकल्पना मुख्यत: धर्मसंस्थेकडून मिळते. ‘विश्वात खरोखरच ज्ञानाचे झाड असते! ईडन बागेत ईश्वराने ज्ञानाचे झाड लावले.’ हे उत्तर ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माकडून दिले गेले आहे. ज्यू धर्मानुसार या ज्ञानवृक्षाचे फळ खाणे ही शुभ-अशुभाच्या मिसळण होण्याची सुरुवात आहे, ख्रिस्ती धर्मानुसार असे फळ खाणे हे आदम-ईव्हने केलेले ‘सनातन पाप’ असून तिथून मानवाचे ‘अध:पतन’ सुरू झाले, तर इस्लाम धर्मानुसार ज्ञानवृक्षाचे फळ खाण्याने मानवाला मृत्यू भोगावा लागतो (हा ईश्वराचा वियोग असतो) आणि फळ खाणे टाळले तर माणूस अमर होतो, फळ खायचे नसते; पण ही झाली ज्ञानवृक्षाची धार्मिक संकल्पना.
तत्त्वज्ञानात ज्ञानवृक्षाची संकल्पना ‘आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक’ या बिरुदाने ओळखल्या जाणाऱ्या रेने देकार्त (१५९६-१६५०) या ईश्वरवादी तत्त्ववेत्त्याने अॅरिस्टॉटलवर टीका करताना मांडली. आधी सुटय़ा सुटय़ा विज्ञानाचा विकास होतो आणि मग तत्त्वज्ञानाचा उदय होतो, असे अॅरिस्टॉटलचे म्हणणे होते. तत्त्वज्ञान हे नेहमी विज्ञानानंतर येते. मानवी ज्ञानाचा प्रवास विज्ञान ते तत्त्वज्ञान असा असावा, असे अॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे. देकार्तने ते फेटाळले. त्याने हा क्रम उलटा केला.
झाडाचे तीन भाग असतात: मुळे, त्याचा बुंधा आणि फांद्या व पाने-फुले. मुळे जमिनीत घट्ट रुजलेली व पोषण द्रव्ये पुरविणारी असतात, बुंधा हा झाडाचे एकूण वस्तुमान धारण करणारा व फांद्यांना तोलणारा मुख्य हिस्सा, तर पाने ही फळांची पूर्वतयारी असते आणि अखेरीस फळे. फळे म्हणजे झाडाचा सर्वोच्च आविष्कार आणि सर्वोत्तम निर्मिती असते.
देकार्तच्या मते तात्त्विक ज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान यांचे स्वरूपही असेच असते. त्याच्या म्हणण्यानुसार सर्व तत्त्वज्ञान हे जणू काही एखाद्या वृक्षासारखे आहे, ज्याची मुळे म्हणजे सत्ताशास्त्र, त्याचा बुंधा म्हणजे भौतिकशास्त्रे आणि त्याच्या शाखा म्हणजे सारी मानवनिर्मित सामाजिक विज्ञाने आहेत.
ईश्वर, आत्मा हे विचार करणारे तत्त्व आणि बाह्य़ भौतिक विश्व या तीन तत्त्वांना देकार्त ज्ञानाची मूलतत्त्वे म्हणतो. त्यांच्या ज्ञानाचे शास्त्र ते सत्ताशास्त्र. विश्वाची रचना, पंचमहाभूते आणि समग्र प्राणिसृष्टी यांचे ज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र. त्यांचा विशेष अभ्यास म्हणजे विविध निसर्ग विज्ञाने. देकार्तने या विज्ञानांचे मुख्य वर्गीकरण केवळ तीन तत्त्वांमध्ये केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान आणि नीतिशास्त्र.
त्याच्या मते ही तीन विज्ञाने सत्ताशास्त्रीय ज्ञानावर आधारलेली असली तरच माणूस निसर्गावर प्रभुत्व मिळवू शकेल. म्हणजे कसे? तर देकार्तच्या मते विश्व व मानवी आत्मा ही तत्त्वे ईश्वरनिर्मित आहेत, तर विज्ञाने मानवनिर्मित आहेत. ही समस्त प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक आहे. परिणामी त्यांचे ज्ञान करून घेणे याचा अर्थ विविध विज्ञाने-शास्त्रे निर्माण करून विश्व जाणणे. विश्व जाणून घेण्याची प्रक्रिया ही त्याच्या मते अभियांत्रिकी आहे. शेवटी प्राणिसृष्टीचा सर्वात महत्त्वाचा प्राणी म्हणून माणूस समजावून घेणे. माणूस समजावून घेणे हे वैद्यकीय विज्ञान आहे, तर माणसाचे आध्यात्मिक व नतिक जीवन समजावून घेणे हे नीतिशास्त्र आहे.
या मांडणीतून देकार्त तीन गोष्टी साधू इच्छितो. पहिली- सर्व विज्ञानांमध्ये आंतरिक सुसंगतता असते, एकाचा दुसऱ्याशी निश्चित प्रकारचा ताíकक संबंध असतो. दुसरी म्हणजे कोणतेही विज्ञान माणसाच्या रोजच्या जगण्यात व्यावहारिकदृष्टय़ा उपयुक्त असले पाहिजे. तिसरे म्हणजे कोणत्याही ज्ञान-विज्ञानाची रचना उथळपणे न करता मूलभूत तात्त्विक पायापासून केली पाहिजे तरच ते ज्ञान-विज्ञान समाजजीवनात उपयुक्त ठरेल.
देकार्तच्या मते, सर्व विज्ञानांमध्ये आंतरिक सुसंगतता प्रस्थापित करता आली तर कोणतेही विज्ञान सामाजिकदृष्टय़ा उपयुक्त होईल. प्रत्येक ज्ञान-विज्ञान तांत्रिकदृष्टय़ा बोजड न होता सुगम शैलीत मांडता येईल. वैद्यक विज्ञान जीवरक्षक आहे, अभियांत्रिकी सर्व ज्ञानाचा गाभा ठरेल आणि नीती ही तर मूलभूतच असते. या रचनेतून प्रत्येक विज्ञानाला एक नतिक आधार मिळेल.
अॅरिस्टॉटलच्या मते, विज्ञान ते तत्त्वज्ञान असे ज्ञान मिळवावे, तर देकार्तच्या मते नीतीचे ज्ञान ते तत्त्वज्ञान व्हाया विज्ञान असे ज्ञान मिळवावे. असे का करावे? तर, झाड महत्त्वाचे कधी असते? झाडाचे महत्त्व जोखले जाते ते फळावरून. फळ रसरशीत, सुमधुर, सुगंधी असेल तर झाड चांगले. त्यासाठी झाडाची मुळे मजबूत आणि बुंधा भरभक्कम सकस पाहिजे. मुळे जमिनीत गाडली गेलेली असतात, त्यामुळे ती दिसत नाहीत; पण फळे चटकन हाताशी येतात, बाजार त्यांनाच मिळतो. म्हणून मुळे मजबूत, रसरशीत व बुंधा भक्कम हवा. फळांमध्ये उपयुक्तता आणि गुणवत्ता असेल तर ती रसाळ गोमटी असतात, तसे नसेल तर फळे निकृष्ट निपजतात!
हाच नियम ज्ञानवृक्षाला लावावा. फळरूपी नीतीपासून ज्ञानार्जन सुरू करावे, मग विविध सामाजिक आणि निसर्ग विज्ञाने यांचा अभ्यास करावा आणि अखेरीस ईश्वराकडे जावे. ज्ञान खालून, मुळापासून नाही तर वरून मुळाकडे असे मिळवीत जावे. देकार्तच्या मते, जे ज्ञानविज्ञान यथार्थ नतिकता निर्माण करीत नाही ते ज्ञानविज्ञान अनतिक असते. समाजाची प्रत, दर्जा हा नेहमी त्या समाजाच्या नतिकतेवरून निश्चित होतो. म्हणून व्यक्ती व समाजाची नतिकता मोजूनच समाजाची प्रगती मोजता येते, अन्यथा नाही. म्हणून नीतीपासून सुरुवात करावी, मग अध्यात्माकडे, तत्त्वज्ञानाकडे जावे.
देकार्तची महती नीतिशास्त्राबद्दल फारशी नाही. त्याने नतिक आणि सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाचे चिंतन केले नाही, असा समज आहे. त्याच्या मते तत्त्वज्ञानाचा अंतिम मानवी हेतू आनंद आणि सुख मिळविणे हाच असतो, हे व्यावहारिक धोरण असते. राणी एलिझाबेथबरोबर झालेला पत्रव्यवहार आणि ‘तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे’ या ग्रंथात त्याने त्याचे नीतिशास्त्र मांडले. ते करताना त्याने ‘तत्त्वज्ञानाचे झाड’ ही संकल्पना मांडली.
देकार्तची हे ‘तत्त्वज्ञानाचे झाड’ लक्षात घेता आज विसाव्या-एकविसाव्या शतकात या झाडाला अनेक उपयोजित नीतीची आणि उपयोजित तत्त्वज्ञानाची अनेक फळे आलेली आहेत. त्यांचे स्वरूप क्रमश: पाहू.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
ज्ञानाचे झाड..
आत्मा हे तत्त्व ईश्वरनिर्मित; परंतु प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक अशी विभागणी देकार्तने केल्यामुळे ‘ज्ञानाचे झाड’ धर्माच्या अंगणातून तत्त्वज्ञानाच्या अंगणात आणणे शक्य झाले..
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 28-08-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व तत्वभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knowledge tree