आंतरराष्ट्रीय साहित्य क्षेत्रात तसेच भारतात दुसऱ्या फळीच्या लेखकांमध्ये गणना होणारे मकरंद परांजपे ‘हिंदूस्थानीपणा न सोडता आधुनिक होऊन पाश्चात्त्य वर्चस्वाला प्रत्युत्तर देता येईल’असे संस्कृतीच्या अभ्यासातून म्हणतात, तेव्हा जेएनयूतले हे परांजपे डावे की उजवे ही चर्चा फोल ठरते आणि हा माणूस घडला कसा, याचे कुतूहल वाढते..

स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन पाश्चात्त्यीकरण आणि वसाहतवादाचा न घाबरता सामना करणारी संकुचित नव्हे तर उदार अशी भारतीय विचारांची परंपरा निर्माण करणे शक्य आहे काय? प्रा. मकरंद परांजपे गेल्या २५ वर्षांपासून या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळी उत्तरे मिळतात. कधी त्यांना वाटते हे शक्य आहे. कधी त्यांची साफ निराशा होते. दिल्लीच्या विख्यात जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाषा, साहित्य आणि संस्कृती विभागात इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या परांजपे यांनी वर्चस्ववादी पाश्चात्त्य संस्कृतीला पर्याय देण्याचा ध्यास घेतला आहे. जेएनयू म्हणजे डाव्या विचारसरणीचा राजकीय अड्डाच. त्यात प्रा. परांजपे भारतीय संस्कृती, सभ्यता, धर्म आणि अध्यात्माच्या आधारे पाश्चात्त्यांच्या चंगळवादी संस्कृतीला आव्हान देण्याच्या चिंतनात गुंतलेले. जेएनयूमध्ये डाव्या विचारांचे पुरस्कर्ते नसाल तर तुम्ही उजवे असल्याचा शिक्का बसणार हे निश्चित असते. परंतु प्रा. परांजपे उजव्या विचारांचे नाहीत. ते कुठल्याही गटात नाहीत. त्यामुळे असल्या ब्रँडिंगची ते पर्वाही करीत नाहीत. चंगळवादी, भोगवादी संस्कृतीचे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्यांना मार्क्‍सवादावर आधारित किंवा आयात केलेल्या आमूलाग्र पाश्चात्त्य विचारांद्वारे पर्याय देता येणार नाही, कारण त्यांना भारतीय संस्कृतीविषयी मुळीच आकर्षण नसते. शिवाय त्यांचे विचार भांडवलवादविरोधी वळणावर पोहोचतात आणि तिथेच आपले त्यांच्याशी मतभेद आहेत, असे प्रा. परांजपे सांगतात. डाव्या विचारसरणीशी बांधीलकी नसतानाही जेएनयूमध्ये स्वातंत्र्य आणि विचार मांडण्याची संधी मिळाली, याचे त्यांना प्रचंड समाधान आहे. शेवटी चांगले काम केले तर विद्यार्थ्यांचे नेहमीच समर्थन मिळते, याची त्यांना खात्री पटलेली आहे.
प्रा. परांजपे यांच्या या वैचारिक भूमिकेचे मूळ कदाचित सत्तरीच्या दशकात विरलेल्या ‘काउंटर कल्चर’मध्ये दडले असावे. बंगळुरूमध्ये दहावी करून मद्रासमध्ये प्री-युनिव्हर्सिटी शिकत असताना ड्रग्ज आणि पॉटच्या ‘संस्कारां’शिवाय ही समांतर संस्कृती जवळून न्याहाळण्याची त्यांना संधी मिळाली. आपल्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी त्यांनी बंडखोरी केली ती त्याच काळात. वडील रामचंद्र लक्ष्मण परांजपे आणि थोरले भाऊ मिलिंद यांचे अनुकरण करीत इंजिनीअरिंग प्रवेशाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या मकरंद परांजपेंनी अचानक घूमजाव करीत आईच्या वळणावर जात इंग्लिश शिकण्याचा आग्रह धरून घरच्यांना धक्काच दिला. गणित १००, भौतिकशास्त्र ९५, रसायनशास्त्र ९३, हिंदूी ७८ आणि इंग्रजीमध्ये सर्वात कमी ६३ गुण मिळविणाऱ्या परांजपेंना गणित आणि अभियांत्रिकीविषयी नफरत निर्माण झाली. मला इंग्लिश शिकायचे आहे. आयुष्यात पुस्तके वाचायची, लिहायची आहेत, असे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे इंग्रजीत बी.ए. केलेल्या त्यांच्या आईला धक्काच बसला. दारोदारी जाऊन डिर्टजट विकायचे असेल किंवा आयुष्यभर मास्तरकी करायची असेल तरच इंग्लिश शीक, नाही तर अजिबात इंग्लिश शिकू नको, असा सल्ला त्यांना आईचे इंग्रजीचे शिक्षक एम. के. नायक यांनी दिला. पण इंजिनीअर पित्याने मात्र त्यांच्या मनपरिवर्तनाचे बिनशर्त समर्थन केले. त्यांना ज्योतिषशास्त्राचा गाढा व्यासंग होता. जवळच्या लोकांची पत्रिका बघायची नसते, हे संकेत बाजूला ठेवून त्यांनी परांजपेंची पत्रिका बघितली. वाङ्मयाचा अभ्यास करणे तुझ्यासाठी जास्त उचित ठरेल. आयुष्यभर तू खूश राहशील. इंजिनीअरिंग केले तर कामाचे समाधान कधीच मिळणार नाही. दुसरे काही केले असते तर जास्त बरे झाले असते, असेच तुला वाटत राहील, असे सांगून त्यांनी परांजपेंच्या पत्करलेल्या शैक्षणिक जोखमीचे पूर्ण समर्थन केले.  त्याच सुमाराला परांजपेंची भेट त्यांच्या थोरल्या भावाचे मित्र रवी मुजुमदार यांच्या भगिनी बायोकॉनच्या किरण मुजुमदार शॉ यांच्याशी झाली. किरण त्या वेळी ऑस्ट्रेलियात ब्रुइंग शिकत होत्या. परांजपेंनी त्यांना आयआयटीऐवजी इंग्लिश ऑनर्स करण्याचा विचार बोलून दाखविला. इंग्लिश शिकायचे असेल तर दिल्लीतल्या सेंट स्टीफन्समध्ये प्रयत्न कर, असा सल्ला त्यांनी परांजपेंना दिला.
सेंट स्टीफन्समध्ये वडिलांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार दिल्ली विद्यापीठात इंग्लिश ऑनर्सच्या परीक्षेत मकरंद परांजपे अव्वल आले आणि तिथून पुढची सहा वर्षे अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून एम.ए. व पीएच.डी. करून ते देशप्रेमाखातर भारतात परत आले. १९८९ ते १९९४ दरम्यान हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात आणि १९९४ ते १९९९ दिल्लीच्या आयआयटीमध्ये वाङ्मय आणि समाजशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर गेली १४ वर्षे ते जेएनयूमध्ये प्राध्यापक म्हणून एम.ए., एम.फिल.ला शिकवतात. मागे वळून पाहताना अमेरिका सोडून भारतात येण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे सांगणे त्यांच्यासाठी अवघड ठरले आहे. देशाभिमान ओतप्रोत असला तरी समाजाशी, परिसराशी, वातावरणाशी त्यांचे नाते संघर्षपूर्ण राहिले आहे.
मकरंद परांजपेंचा जन्म ३१ ऑगस्ट १९६० चा. परांजपे यांचे कुटुंब द्वैभाषिक मुंबई प्रांतातील उंबरगावचे (सध्याचे उमरगाम- गुजरात). शेती महाराष्ट्रात आणि राहायला गुजरातमध्ये. वडील बडोद्यात अलेम्बिक ग्लासमध्ये प्रकल्प व्यवस्थापक होते. आई प्रभा देवधर मीठाकळी- अहमदाबादच्या. त्यांच्या आत्या नलिनी देवधर पुण्याला असतात. इतर नातेवाईक पुणे, मुंबई, नाशिकला असतात. मकरंद सहा वर्षांचे असताना परांजपे कुटुंब बंगळुरूला आले. बंगळुरूमध्येच गोल्डविन बॉइज आणि बिशप कॉटन शाळेत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. या काळात महाराष्ट्राशी कधीही संबंध आला नाही. पण त्यांचे मराठी मात्र शाबूत राहिले.
लेखक, कवी, लघुकथाकार, समीक्षक, साहित्यविषयक स्तंभलेखक अशी इंग्रजी साहित्यक्षेत्रात आणि दिल्लीतील माध्यमांमध्ये ओळख असलेल्या प्रा. परांजपे यांनी ‘द सिरीन फ्लेम,’ ‘प्लेइंग द डार्क गॉड,’ ‘यूज्ड बुक्स,’ ‘पार्शल डिस्क्लोजर,’ आणि ‘कन्फ्लुअन्स’ असे पाच काव्यसंग्रह, ‘धिस टाइम आय प्रॉमिस इट विल बी डिफरन्ट,’ हा लघुकथासंग्रह, ‘द नॅरेटर’ ही कादंबरी लिहिली आहे. याशिवाय अध्यात्म, धर्म, श्री अरविंद, स्वामी विवेकानंद, सरोजिनी नायडू, राजा राव यांच्यावरील पुस्तके संपादित केली आहेत आणि हेमंत गोविंद जोगळेकरांच्या ‘होडय़ा’चे भाषांतर केले आहे. जगातील अनेक बडय़ा विद्यापीठांमध्ये शिकवायला गेलेल्या प्रा. परांजपे यांनी शंभराहून अधिक देशांचे दौरे केले आहेत. त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. आंतरराष्ट्रीय साहित्य क्षेत्रात तसेच भारतात दुसऱ्या फळीच्या लेखकांमध्ये त्यांचा समावेश होतो.
संस्कृती हे एक क्रांतिकारक तत्त्व आहे, हे लिखाणाद्वारे सिद्ध करण्याचा प्रा. परांजपे यांचा प्रयत्न असतो. संस्कृतीविषयी महाराष्ट्रात टिळकांनी, चिपळूणकरांनी, तर बंगालमध्ये बंकिमचंद्रांनी बरीच चर्चा केली. आपली संस्कृती सोडून दुसरी संस्कृती स्वीकारणे म्हणजे आईचे दूध सोडून दुसरीकडे जाण्यासारखे आहे, या हिंदू स्वराजमधील गांधीजींच्या विचारांचा ते पुरस्कार करतात. आज आपल्याला जे जग दिसते आहे त्याची निर्मिती पश्चिमेने केली आहे. पंधराव्या शतकापासून पाश्चात्त्य देशांनी अख्खे जग बदलले. अनेक देशांमधली मूळ संस्कृती त्यांनी संपुष्टात आणली. आपली परिस्थिती त्यामानाने थोडी बरी आहे. पण इंग्लिशच्या दबदब्यातून बाहेर पडायला आम्हाला बराच वेळ लागणार आहे. आम्ही स्वत:चा द्वेष करणारे भारतीय आणि हिंदूू आहोत. पाश्चात्त्य वर्चस्वाचे आम्हाला एवढे आकर्षण आहे की पाश्चात्त्य संस्कृतीतील आपण दुसऱ्या-तिसऱ्या दर्जाचे नागरिक असलो तरीही आपण सुखात जगू, असे अनेकांना वाटते. दुर्दैवाने लोकांना वैचारिक स्वराज नको आहे. सलमान रश्दी, विक्रम सेठ, व्ही. एस. नायपॉल यांच्या भारतीय इंग्लिश साहित्यात हा संघर्ष दिसत असला तरी त्यात मोठे दोष आहेत. त्यात विदेशासाठी भारताचे प्रदर्शन केले जाते. फक्त इंग्रजी साहित्यच नव्हे तर भारतीय भाषांमध्ये लिहिणारेही हेच करतात, अशी कडवट भावना ते व्यक्त करतात.
प्रा. परांजपेंना देश, समाज, संस्कृतीसाठी दोन-तीन मार्ग दिसतात. पाश्चात्त्य विचार आपल्याला नको आहे असे म्हणणारे अल्पमतात आहेत. खरेतर त्यांनीच देशाचे नेतृत्व करायला हवे होते. आपल्याला भारतीय संस्कृती अजिबात नको. आपल्याला पाश्चात्त्य आधुनिक व्हायचे आहे, असे वाटणारे लोकही कमी आहेत. बहुतांश लोक असे आहेत ज्यांना आपल्याला आधुनिक, पाश्चात्त्य व्हायचे आहे, पण हिंदूुस्थानीपणाही पूर्णपणे सोडायचा नाही. भारतीय संस्कृतीला नाकारणारी मंडळी त्यांच्यात सामील झाली तर पाश्चात्त्य वर्चस्ववादाला ठोस पर्याय उभा करता येईल, असे त्यांना वाटते.
अशा धारणांमुळे प्रा. परांजपे ‘उजवे’ वाटत असले तरी जेएनयूमधील विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. जेएनयूमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या काळातही ते पूर्ण दोन तास शिकवतात आणि विद्यार्थी संघटनांना प्रचारासाठी आपल्या वर्गाचे शोषण करू देत नाहीत. भारतात हुशार लोकांचा अजिबात अभाव नाही. सेंट स्टीफन्स, जेएनयू, आयआयटीसारख्या उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जगातील कुठल्याही उच्च दर्जाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरसच आहेत, असे त्यांचे मत आहे. सत्याविषयी निष्ठा असणे हेच बुद्धिजीवीचे लक्षण असल्याने विद्यार्थ्यांना विषयाबद्दल, जीवनाबद्दल आणि सत्याविषयी प्रेरणा देण्यावर त्यांचा भर असतो. खासगी आयुष्य अनेक वादळांनी ढवळून निघत असतानाही शिकवायला सुरुवात केल्यानंतर मानसिक अवस्थेत अद्भुत परिवर्तन होऊन विषयात तल्लीन होऊन जातात. त्यांच्या मते, असे सकारात्मक समाधान कुठेही मिळत नाही. वाङ्मयाच्या साधनेत खूश राहशील, ही वडिलांनी वर्तविलेली भविष्यवाणी त्यांच्याबाबतीत खरी ठरली आहे.

Story img Loader