सर्वोच्च न्यायालयात लौकिक कमावल्यानंतर वेगवान जीवनशैलीतही संयम आणि समाधानी चित्तवृत्ती यांच्याद्वारे व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यांतील सुवर्णमध्य उदय लळित यांना साधला आहे.
प्रवाही पाण्यातले राफ्टिंग आणि संथ पाण्यातील पोहण्यासारख्या परस्परभिन्न गोष्टींसाठी लागणारे कौशल्य आणि संयम एकाच व्यक्तीच्या ठायी बघायला मिळणे तसे अवघडच. पण सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची वेगवान उलाढाल, झटपट निकाली निघणारी प्रकरणे, एका आठवडय़ात वीस-वीस वेगवेगळी प्रकरणे हाताळताना अचूक दिशा निश्चित करण्यासाठी लागणारे बुद्धिसामथ्र्य आणि त्याच वेळी या वेगाला विराम देत शांत, समाधानी चित्तवृत्तीने जगण्याची जीवनशैली.. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून कर्तृत्वाचे शिखर गाठणारे उदय लळित यांनी व्यावसायिक जीवनातील वेग आणि वैयक्तिक जीवनातील संथपणातला हा सुवर्णमध्य साधला आहे.
लळित यांचे कुटुंब कोकणातील रोह्य़ाजवळच्या आपटय़ाचे. त्यांचे आजोबा रंगनाथ विष्णु लळित लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. टिळकांच्या निधनानंतर १९२० साली सोलापुरात स्थायिक होऊन धुरंधर वकील म्हणून विधी व सामाजिक वर्तुळात त्यांनी दबदबा निर्माण केला. लग्नानंतर एमबीबीएस करणाऱ्या त्यांच्या आजी सोलापूरच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू सोलापूरला आले तेव्हा त्यांचा नागरी सत्कार आजोबांच्या हातून झाला होता. उदय लळितांचा जन्म सोलापूरचाच. ९ नोव्हेंबर १९५७ चा. वडील उमेश लळित यांनी वकिली व्यवसायाची सुरुवात सोलापूरपासूनच केली आणि नंतर मुंबई गाठले. त्यांच्या थोरल्या बंधूंचे कुटुंब अजूनही सोलापुरातच आहे. उदय लळित यांचे वडील अल्पकाळासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूरखंडपीठाचे अतिरिक्त न्यायाधीश होते. १९७६ ते २००४ अशी २८ वर्षे त्यांनी दिल्लीत सर्वोच्च न्यायाालयात प्रॅक्टिस केली. नऊ वर्षांपूर्वी व्यवसायातून निवृत्त होऊन पत्नी उषा यांच्यासह ते पुण्यात स्थायिक झाले. उदय लळित यांचे बंधू सुबोध दिल्लीतच वकिली व्यवसायात आहेत. मात्र, त्यांचे बहुतांश नातेवाईक पुणे आणि मुंबईत आणि दोन्ही बहिणी परदेशात स्थायिक झाल्या आहेत. न्यू जर्सीला राहणाऱ्या उल्का वाघ आणि पुणे इंजिनीअरिंग महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले त्यांचे पती विकास वाघ यांची अमेरिकेत पूल बांधण्याच्या व्यवसायात कन्सल्टन्सी आहेत. धाकटय़ा भगिनी आरती शारदा ब्रसेल्समध्ये फिजिओथेरपिस्ट असून त्यांचे तिचे पती अशोक शारदा व्यवस्थापन सल्लागार आहेत. दिल्लीतले गिरीश आपटे, अनिल खडसे, नीलेश कुलकर्णी, अजय देशपांडे, अ‍ॅड्. शिवाजी जाधव, नागपूरचे श्रीधर घटाटे, शशांक आणि सुनील मनोहर, आनंद जयस्वाल, देशपांडे बंधू, अविनाश घरोटे, जळगावचे डॉ. अजित बोरले, सोलापूरचे बालपणचे सुरेश बांगल, कुमठेकर ही त्यांची व्यवसायातील आणि व्यवसायाबाहेरची मित्रमंडळी. उदय लळित यांच्या पत्नी अमिता मुंबईच्या. कवी बा. भ. बोरकरांच्या कुटुंबातील. एमएस्सी, एलएलबी झालेल्या अमिता नोईडामध्ये दीड ते दोन वर्षांच्या मुलांसाठी विस्तीर्ण जागेत ‘स्टिम्युलस प्ले स्कूल’ नावाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. उदय लळित यांचे थोरले चिरंजीव हर्षद एम. एस. होऊन अमेरिकेत एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये संशोधन आणि पीएच.डी. करीत आहेत. धाकटा श्रीयश आयआयटी गुवाहाटीला मेकॅनिकल इंजिनीअरिंगला तिसऱ्या वर्षांला आहे. दोन्ही मुले अविवाहित. मराठी उत्तम बोलतात. पण सर्वार्थाने उत्तर भारतीय असल्यामुळे मराठी बोलणे वा लिहणे जमत नाही.
सोलापुरात हरीभाई देवकरण प्रशाला, मुंबईत चिकित्सक हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकल्यानंतर उदय लळित यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिकून कायद्याची पदवी मिळविली आणि मुंबईत अ‍ॅड्. एम. ए. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायात पदार्पण केले. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड्. तारकुंडे यांच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असलेले ‘रॅडिकल ह्य़ूमॅनिस्ट’चे संपादक राणेंचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. १९८५ अखेर दिल्लीत येऊन त्यांनी पारेख अँड कंपनी आणि नंतर ऑक्टोबर १९८६ पासून पुढची साडेपाच वर्षे सोली सोराबजी यांच्याकडे ज्युनियर म्हणून काम केले आणि १९९२ पासून स्वतंत्र प्रॅक्टिसला सुरुवात केली. २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून मान्यता दिल्यानंतर उदय लळित यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. आज फौजदारी प्रकरणे हाताळणाऱ्या देशातील अग्रगण्य विधिज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. शांत, सौम्य पण करारी बाणा, सहकाऱ्यांच्याही नजरेत न भरणारी साधी वेशभूषा, कुणालाही न दुखावता मुद्दय़ाला धरून युक्तिवाद करण्याची नम्र शैली आणि अभ्यासू वृत्ती असा उदय लळित यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या वर्तुळात लौकिक आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला ‘अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड’ म्हणून काम केल्यामुळे प्रत्येक प्रकरणातील बारीकसारीक तपशील त्यांच्या युक्तिवादात अतिशय उपयुक्त ठरत असतो. चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंह यादव, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, विलासराव देशमुख, मायावती, येडियुरप्पा, एस. एम. कृष्णा, अखिलेश यादव, जयललिता अशा सुमारे डझनभर आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या तसेच जवळजवळ प्रत्येक राज्य सरकारच्या वतीने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. बॉलीवूड स्टार सलमान खान आणि क्रिकेटर खासदार नवजोतसिंग सिद्धूची प्रकरणे लढविली. देशातल्या तीन-चार उच्च न्यायालयांचा अपवाद वगळता सर्व उच्च न्यायालयांमध्ये युक्तिवाद करण्याची कामगिरी बजावली आहे. एम. बी. शाह आयोगाकडे असलेल्या अवैध खनन प्रकरणात ते ओरिसाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तहलका आयोगापुढे त्यांनी संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधित्व केले. न्या. दिनकरन राज्यसभेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नेमलेल्या चौकशी आयोगाचे वकील म्हणून त्यांनी काम केले. गेली कित्येक वर्षे सर्वोच्च न्यायालयाच्या लीगल एड कमिटीचे सदस्य आहेत. ओरिसाच्या उत्कल युनिव्हर्सिटीने गेल्याच वर्षी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. पण उदय लळित यांचे नाव देशात सर्वश्रुत झाले ते साऱ्या देशाचे आणि जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पावणेदोन लाख कोटींच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यामुळे. गेल्या दोन दशकांत दिल्लीच्या विधी वर्तुळावर छाप पाडणाऱ्या उदय लळित यांच्या कर्तृत्वाला मिळालेली ही मोठीच पावती ठरली आहे.
वकिलीच्या व्यवसायाशी प्रत्येक बाबतीत प्रामाणिक राहून सचोटीने काम करण्यावर उदय लळित भर देतात. तुम्ही कसे राहता यावर बरेच अवलंबून असते. लांडीलबाडी न करता व्यवस्थित काम केले तर आज ना उद्या यश मिळतेच, असे ते तीन दशकांच्या स्वानुभवातून सांगतात. या व्यवसायातील वेगाशी जुळवून घेणाऱ्यांना अधिक यश मिळू शकते. दिल्लीत वकिली करण्यासाठी आलेल्या तरुण मुलांना सुरुवातीला त्यांच्याच प्रदेशातून कामे मिळतात. नंतर अन्य प्रांतातून कामे मिळायला लागतात. महाराष्ट्रातून दिल्लीत अनेक तरुण वकील येतात. त्यांचे येणे चांगले आहे. पण तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. दिल्लीला आले तर यश मिळेलच किंवा मिळणार नाही, असे काहीच सांगता येत नाही. आपण किती मेहनत घेतो आणि कसोशीने प्रयत्न करतो, यावर बरेच काही अवलंबून असते, असे ते नमूद करतात.
वडिलांचा उत्तम जम बसल्यावर उदय लळित दिल्लीत आले. त्यामुळे नव्या व्यक्तीला दिल्लीला येताना स्थिरस्थावर होताना येणाऱ्या अडचणी त्यांच्या वाटय़ाला आल्या नाहीत. व्यवसायात कौटुंबिक पाश्र्वभूमीचा फायदा होतो आणि पण अशी पाश्र्वभूमी ओझेही ठरू शकते. तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लोकांना अभिप्रेत असतात. त्यावर खरे उतरावे लागते. त्यामुळे हा फायदा वाटतो तेवढा मोठा नसतो, असे ते सांगतात. सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करावी, असे वाटले म्हणून ते महाराष्ट्र सोडून दिल्लीत आले. त्यांना एवढे यश मिळाले की दिल्लीत येण्याचा निर्णय चुकला असे त्यांना कधीच वाटले नाही.
नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून    नियुक्ती झाल्यानंतर उदय लळित यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात सेवेत कायम न झाल्याने पद गमवावे लागले. या घटनेचा प्रभाव पडून त्यांचे विधी क्षेत्राविषयीचे आकर्षण आणखीच वाढले. विधी व्यवसायाशिवाय दुसरे काही करू शकलो असतो, असे कधीच वाटले नाही, असे ते सांगतात. गेल्या ९३ वर्षांपासून लळित कुटुंबात आजोबा, सर्व काका, वडील अशी सर्व पुरुष मंडळी वकील आहे. लळित कुटुंबात जन्मलेले मूल पहिल्यांदा माय लॉर्डच म्हणायला शिकत असेल, असे त्यांच्याबाबतीत म्हटले जाते. पण आता ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे आहेत. त्यांनी मुलांवर विधी क्षेत्राकडे वळण्याचे बंधन घातले नाही. घरात वकिली असण्याचा आपल्यावर जसा सकारात्मक परिणाम झाला, कदाचित तसाच नकारात्मक परिणाम मुलांवर झाला असावा आणि त्यातूनच दोघांनीही जाणीवपूर्वक इंजिनीअरिंगचे क्षेत्र निवडले, असे त्यांना वाटते. मुंबईला असताना उदय लळित एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते. मराठी साहित्याचे त्यांनी भरपूर वाचन केले आहे. त्यांना मराठी नाटके बघण्याची आवड आहे. मुंबई, पुणे किंवा नागपूरला गेले की येताना मराठी पुस्तके घेऊन येतातच. शिवाय इंटरनेट आणि मराठी चॅनेल्समुळे मायबोलीशी त्यांचे नाते कायम असते. त्यांना प्रवास करायला, नवनवे प्रदेश बघायला आवडतात. महाराष्ट्रातील जिल्हान्जिल्हा त्यांना ठाऊक आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये ते मोटरसायकलवरून फिरले आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात गेले आहेत.
उदय लळित संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत. कर्मकांडावर नसला तरी त्यांचा देवावर विश्वास आहे. २००४ साली त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारकऱ्यांबरोबर पूर्ण यात्रा केली. वारकऱ्यांसोबत जाण्याचा तो विलक्षण अनुभव शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान झळकत असते. तेव्हापासून दरवर्षी सपत्निक पंढरीच्या यात्रेचा कधी आळंदी-पुणे, तर कधी वाखरी-पंढरपूर असा एकना एक टप्पा ते आवर्जून पूर्ण करतात. पंढरीच्या वारीचा त्यांच्या विचारांवर एवढा प्रभाव पडला की २००८ साली त्यांनी नोईडामध्ये प्रशस्त बंगला बांधला तेव्हा त्याचे नाव ‘माऊली’ ठेवले. व्यवसायात त्यांनी कोणतेही ध्येय ठेवलेले नाही. उद्दिष्ट ठेवून त्यामागे धावत बसण्यापेक्षा ईश्वराने दिले त्यात खूप समाधान असल्याचे ते सांगतात. मात्र, पंढरपूरच्या यात्रेप्रमाणेच दिल्लीपासून लेहपर्यंत मोटरसायकलने जाण्याचे, गोवर्धन पर्वताला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याचे आणि नर्मदेची परिक्रमा करण्याचे विचार त्यांच्या मनात सतत घोळत असतात. दैनंदिन जीवनातील वेगाला थोपविण्यासाठी आवश्यक असलेला संयम लाभावा म्हणून.

Story img Loader