तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती रंगत आणत नाही, तर एका वेगळ्या अनुभवाच्या पातळीवर नेऊन ठेवते. लयीच्या हिंदोळ्यावर स्वार होत तान आकाशात वीज चमकावी तशी उभी ठाकते. आगीचे लोळ दिसावेत असे तानांचे सट्टे सुरू झाले की ऐकणाराही भान हरपून बसतो. अवघा सांगीतिक अनुभव वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद तानेतून दिसायला लागते.
एकामागून एक अशा स्वरांची झर्रकन मांडणी करणारी तान हा भारतीय अभिजात संगीताचा एक खास विशेष! तान हा संगीतातील एक अलंकार असतो. अलंकार म्हणजे सजावटीचं साहित्य. तानेची ही सजावट अभिजात संगीतातच अधिक उठावदारपणे दिसते आणि संगीताच्या अन्य प्रांतांत म्हणजे ललित संगीतात तिचे स्थान जवळजवळ नसल्यासारखे असते. ख्याल हा संगीतप्रकार पहिल्यांदा ऐकणाऱ्या कुणालाही विशिष्ट काळानंतर येणारा हा अलंकार स्तिमित करून सोडतो. गळा हे एखादं यंत्र आहे की काय, असं वाटण्यासारखी ही तान ऐकणाऱ्याला चक्रावून टाकता टाकता, एका वेगळ्याच संगीतानुभवालाही भिडवते. ख्यालाच्या मांडणीत तान हा अलंकार खूप उशिरानं दाखल होतो. म्हणजे ख्याल सादर करणारा कुणीही पहिला स्वर लावण्याऐवजी थेट तानेलाच हात घालत नाही. ते शास्त्रसंमत नाही. शास्त्रानं सांगितलं, म्हणूनच तसं करायचं नाही, असाही याचा अर्थ घेण्याचं कारण नाही. कारण तान ऐकण्यासाठी आणि त्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी मनाची विशिष्ट अशी भूमिका तयार होणं फार गरजेचं असतं. सुरुवातीला स्वरांच्या साहाय्यानं रागाचं व्यक्तिमत्त्व दाखवायला सुरुवात करायची. ते व्यक्तिमत्त्व स्पष्ट होईपर्यंत संगीतातल्या अन्य अलंकारांचा उपयोग करायचा. त्यासाठी त्या रागातल्या बंदिशीचा आधार घ्यायचा. ही बंदिश म्हणजे त्या रागाच्या स्वभावाचं एक दर्शन. कोणत्याही रागातून अशी अनेक दर्शनं वेगवेगळ्या बंदिशींमधून दाखवता येतात. ती वेगवेगळी असली, तरी एकमेकांची भावंडंच असतात. चेहरेपट्टी साधारण सहज ओळखीची वाटावी अशी. राग तोच पण त्याचा चेहरा सगळ्याच बंदिशींमध्ये तसाच्या तसा नाही अशी ही रागाच्या कुटुंबाची ओळख. त्यातले स्वर ठरल्याप्रमाणे एकामागोमाग येतात. त्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही आधीच ठरवून दिलेले असतात आणि त्यांचे एकमेकांना मिळणारे साद-प्रतिसाद हेही बदलत नाहीत. हे सगळं शास्त्र झालं. कलावंत काय करतो? तर त्या बंदिशीतून त्याला काही वेगळं जाणवतंय का, याचा विचार करतो. हा विचार त्याचं संगीत इतरांपासून वेगळं बनवतो. राग तोच, बंदिशही तीच पण कलावंत मात्र वेगवेगळा असेल, तर प्रत्येकाचं म्हणून एक खास वेगळेपण सहजपणे जाणवायला सुरुवात होते. रसिकाच्या आनंदाला इथपासूनच सुरुवात होते. यापूर्वी ऐकलेला तोच राग आणि तीच बंदिश मनात साठवलेली असेल, तरी नव्यानं ऐकताना आणखी काही नवं मिळत असल्याचा त्याचा अनुभवच त्याला अपूर्वतेकडे घेऊन जात असतो. कलावंताची परीक्षा मात्र इथंच सुरू होते. त्याचं स्वत:चं मनन आणि चिंतन ही त्याची खरी ओळख. गुरूनं एखादी बंदिश घोकंपट्टी करून पाठ करून घेतली असली, तरी प्रत्यक्ष मैफलीत, तो जेव्हा स्वत:चं वेगळेपण सिद्ध करायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला हा विचार उपयोगाला येत असतो. गुरूसारखंच गाऊन समोर बसलेला श्रोता संगीतमग्न होण्याची शक्यता कमी हे ज्याला कळतं, तो कलावंत खरा सर्जनशील. सर्जनाचं हे दान प्रत्येकाच्या पदरात वेगवेगळ्या मापानं पडतं, पण त्यावर विचारपूर्वक कलाकुसर करण्याचं सामथ्र्य प्राप्त झालं, की मग तो कलावंत इतरांपेक्षा वेगळा होतो. त्याची म्हणून वेगळी ओळख तयार होते. प्रत्येक कलावंत अशी ओळख निर्माण करण्यासाठीच तर धडपडत असतो.
त्यासाठी त्याला आपल्या गळ्याची मशागत करावी लागते. एखादा सोनार दागिना घडवताना, जसे वेगवेगळे ‘तास’ देऊन त्या दागिन्याचं सौंदर्य खुलवतो, तसं जन्मत: मिळालेल्या गळ्यावर कलावंतालाही तास द्यावे लागतात. त्यानं गळ्यातून बाहेर येणाऱ्या स्वरांचा दर्जा बदलतो. स्वर अधिक नेमके लागतात आणि त्याबरोबरच त्या स्वरांना नवा अर्थ देण्याची क्षमताही निर्माण होते. गळा तयार होण्याची ही क्रिया म्हणजे संगीत नाहीच. संगीत निर्माण करण्यासाठीची ती फक्त गरज असते. या मशागतीमधला सर्वात कठीण म्हणता येईल, असा अलंकार म्हणजे तान. निसर्गत:च काहींच्या गळ्यात तान असते, हे खरं असलं, तरी प्रयत्नपूर्वक ती गळ्यात आणताही येते. स्वरांचा समुदाय इतक्या वेगानं एकमेकांना जोडत एक नक्षी तयार करणं, हे भारतीय अभिजात संगीताचं सहज दिसणारं वेगळेपण. भावगीत आणि चित्रपट संगीतात तुम्हाला अशी तान क्वचित दिसेल. याचं एक कारण तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती रंगत आणत नाही, तर एका वेगळ्या अनुभवाच्या पातळीवर नेऊन ठेवते. पण म्हणून तान म्हणजे संगीत नाही. ती सगळं संगीत व्यापून टाकत नाही. तिची जागा मर्यादित असते. त्या मर्यादेत राहूनच तिला आपला संसार उभा करावा लागतो. कोणत्याही माणसाला आपल्या गळय़ातून व्यक्त होणाऱ्या संगीताचा तसा अंदाज नसतो. आपण गाणं म्हणू शकू की नाही, याचा नेमका अंदाज येईपर्यंत त्या गळ्यातून आणखी काय काय प्रकारचे आवाज निघू शकतात, याचा विचारही करण्याची गरज त्याला वाटत नाही. तारुण्यात पदार्पण करेपर्यंत पुरुषांचा आवाज एकदम कोवळा असतो. नंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे गळ्यातील स्वरयंत्रातही फरक पडतो आणि त्यातील कोवळेपणा जाऊन तो आवाज जरासा मोठा किंवा बसका किंवा धारदार किंवा घोगरा होतो. निसर्गाचा हा नियम स्त्रीजातीला मात्र लागू नाही. तिचा आवाज पौगंडावस्थेत येतानाही बदलत नाही आणि शेवटपर्यंत त्यात फार मोठे बदल होत नाहीत. (तरीही भारतीय संस्कृतीत स्त्रीला गाणं म्हणण्यास बरीच शतकं बंदी होती. ती इतकी की स्वर्ग नावाच्या कविकल्पनेतही स्त्रीचं काम नृत्य करण्याचं होतं आणि पुरुषांना गंधर्वपद बहाल करण्यात आलं!) संभाषणासाठी आपण आपल्या गळ्यातून ज्या प्रकारचे ध्वनी काढतो, त्यापेक्षा वेगळे आवाज गाणं म्हणण्याच्या प्रक्रियेत येतात. म्हणजे स्वरयंत्र एकच पण त्यातून गरजेनुसार येणारे आवाज मात्र वेगवेगळे. ही निसर्गाची किमया ज्या माणसाला सर्वात प्रथम लक्षात आली असेल, त्यानं खऱ्या अर्थानं कंठसंगीताचाच प्रारंभ केला.
स्वरयंत्रातून हवा तेव्हा हव्या त्या प्रकारचा आवाज काढता येण्यासाठी त्यावर कमालीचं नियंत्रण हवं. मेंदूचा हुकूम तंतोतंत पाळता येण्याएवढं प्रभुत्व गळ्यावर प्राप्त झालं की मग त्या गळ्यातून काय काय काढता येईल, याची चाचपणी सुरू होते. तान येण्यासाठी गळ्यावरही ही हुकमत अधिक उपयोगाची. गळा तयार करायचा, तो मनातलं गाणं बाहेर येण्यासाठी. ते स्वरयंत्र आपल्या बुद्धीच्या आणि भावनेच्या काबूत ठेवता येणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण विशिष्ट रागातलेच स्वर तानेतूनही व्यक्त होत आहेत, हे पाहणं अधिक गरजेचं. ज्याचा जसा गळा, तशी त्याची तान. त्यामुळेच कुणाची तान दाणेदार, तर कुणाची गोलाकार. कुणाची चमकदार, तर कुणाची जबडय़ाची. तानांचे हे विविध प्रकार कलावंतानुरूप बदलतात. रागाचं स्वरूप स्पष्ट होत होत कलावंत वरच्या षड्जापर्यंत पोहोचेपर्यंत गळाही तापलेला असतो आणि त्यातून हवं ते बाहेर येण्याची खात्रीही वाटू लागते. तान अशा ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात करते आणि स्वरांचा तोपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होतो. लयीच्या हिंदोळ्यावर स्वार होत तान आकाशात वीज चमकावी तशी उभी ठाकते. आगीचे लोळ दिसावेत असे तानांचे सट्टे सुरू झाले की ऐकणाराही भान हरपून बसतो. ही अद्भुतता कलावंत आणि रसिक एकाच वेळी अनुभवतात, तेव्हा हे स्वरलयीचं मीलन अधिक समीप येतं. अर्थपूर्णता येत असल्याची एक जाणीव तानेतून येते आणि कलावंताचं स्वरांच्या साहाय्यानं केलेलं निवेदन (स्टेटमेंट) स्पष्ट होत जातं. अवघा सांगीतिक अनुभव वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद तानेतून दिसायला लागते. तोवरच्या स्वरांचा शांत शीतल प्रवास वेगवान होतो, वाटा-वळणं क्षणार्धात मागे पडू लागतात आणि मुक्कामी पोहोचत असल्याची खूण दृष्टिपथात यायला लागते. गळ्यातलं स्वरयंत्र काय चमत्कार करू शकतं, याचा साक्षात्कार घडायला लागतो. परिपूर्णतेचा कलावंताचा ध्यास तानेतून व्यक्त व्हायला लागतो आणि मग सगळं वातावरणच बदलून जातं. कलावंत आणि रसिक यांच्यासाठी असलेलं प्रेयस ते हेच!
तान कपतान..
तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती रंगत आणत नाही, तर एका वेगळ्या अनुभवाच्या पातळीवर नेऊन ठेवते.
आणखी वाचा
First published on: 24-05-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music classical music indian classical music