राजाश्रयाच्या काळात तो मिळणाऱ्या कलावंतांची संख्या फार मोठी नव्हतीच. म्हणून बाकीचे सगळे संगीत करत नव्हते, असं काही घडलं नाही. लोकाश्रयाच्या काळात स्थिती अधिक बिकट झाली, कारण कशाचीच खात्री वाटेनाशी झाली. अशा अस्थिर आणि अशांत परिस्थितीत सर्जनाचं आव्हान पेलण्याएवढी ताकद गोळा करता करताच दमछाक होते. सर्जनाच्या बेटाकडे जाणारा मार्ग अंधूक आणि अस्पष्ट होतो.
संगीताला कलावंतांनीच नव्हे, तर आस्वादकांनीही बेट मानलं. या बेटावर येणाऱ्या प्रत्येकाला स्वत:चं नवसर्जन करण्याची मुभा असते. नवं काही घडवताना आधी जे अस्तित्वात आहे, ते पूर्णपणे मोडण्याची वा त्यातच हवे तसे बदल करण्याचं स्वातंत्र्य या बेटावरील रहिवाशांना असतं. त्या रहिवाशांना, म्हणजे कलावंतांना असं का केलं, असा प्रश्न कुणी विचारायचा नसतो आणि असं कसं झालं, याची प्रक्रियाही जाणून घेण्याच्या फंदात पडायचं नसतं. मुक्तपणे हवं तसं कलाजीवन व्यतीत करण्याचा असा परवाना फारच थोडय़ांना बहाल होतो. कलावंत हा सामाजिक घटनांशी, त्याच्याशी संबंधित असलेल्या विचारांशी विचारपूर्वक संधान बांधतो की त्याच्या नकळत त्याच्यावर या सगळय़ाचा परिणाम होत असतो, याचं उत्तर क्वचितच कुणा संगीतकारानं दिलं आहे. कलेचं निसर्गाशी आणि त्याच्या नियमांशी जेवढं जवळचं नातं असतं, तेवढं आजूबाजूला सतत घडत असणाऱ्या विचारप्रवाहांशी पण असायला हवं. ते असतंही. पण त्याचा स्पष्ट उच्चार होताना मात्र दिसत नाही. कलावंताकडे एक तरतरीत मेंदू असतो. असलेल्यातून नवं घडवण्याची क्षमता असते आणि हे नवं आहे, हे सिद्ध करण्यासाठीचं बळही असतं. सगळेच जण कलावंत का नसतात याचं हे एक सरळ दिसणारं कारण. प्रत्येक जण कलावंत नसेल, पण त्याला कलेची समज तर असू शकते. कलावंत जे काही नवनिर्माण करतो आहे, त्याकडे डोळसपणे पाहण्याची एक दृष्टी असते. त्यामुळेच तर हे सगळं नवं समजून घेत बसण्यापेक्षा त्याला निर्भयपणे सामोरं जाणाऱ्यांची अत्यावश्यकता कलेच्या सगळय़ाच प्रांतांत सदैव असते.
माणसानं समूह नावाची संकल्पना निर्माण केल्यानंतरच्या काळात कलांचा विकास अधिक जोमानं झाला. एकत्र राहण्यानं जगणं केवळ सुकरच होत नाही, तर त्याला अनेक अर्थानी सुरक्षितताही लाभते, हे लक्षात आल्यावर माणसानं एकत्र राहण्यासाठी नियम तयार करायला सुरुवात केली. त्या नियमांवरूनच मग वादंग सुरू झाले आणि त्यातून विविध प्रकारचे ताणतणाव. ज्या निसर्गातून संगीताच्या निर्मितीचं आव्हान मिळालं, त्या निसर्गाच्या बरोबरीनं माणसांनी तयार केलेल्या नियमांच्या चौकटीत राहून आपली कला जोपासायची की त्यांना धुडकावून लावून आपले स्वत:चे नियम तयार करायचे, याचा सोक्षमोक्ष लावण्याच्या फंदात न पडता कलावंतांनी सतत नव्याचा ध्यास घेतला. भारतीय उपखंडात संगीताला मिळालेल्या दीर्घ आणि संपन्न परंपरेत निसर्गातील सगळय़ा बारीकसारीक हालचालींचा ऊहापोह झाला. निसर्गाला आवाहन करणारं आणि त्यालाच समर्पित होणारं भारतीय संगीत बराच काळ अविचल राहिलं. पण परिस्थितीच्या रेटय़ानं त्यालाही आपोआप बदलणं भाग पडलं. हा बदल सूक्ष्म होता, पण कालांतरानं तो अधिक सुस्पष्ट होऊ लागला. मग ते स्त्रियांनी संगीतात येणं असो की बिदागी असो. जात, धर्म असो की घराण्यांचा कडेकोट बंदोबस्त. कलावंत असला, तरी त्याला जगण्यासाठी किमान गोष्टींची आवश्यकता असतेच. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गोष्टींच्या उपलब्धतेनंतरच त्याला काही नवं करण्याची गरज वाटू लागते. जे घडवायचं आहे, ते आधी मेंदूत तयार होतं आणि तिथून ते संगीत व्यक्त करण्यासाठीच्या माध्यमातून बाहेर येतं. शेजारी चालू असलेलं भांडण, घरात नसलेलं पाणी, समाजात मिळणारी वागणूक, कलावंत म्हणून जे व्यक्त केलं जात आहे, त्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन अशा अनेक गोष्टी कलावंतालाही भेडसावतच असतात. त्याकडे दुर्लक्ष करून त्या सर्जनाच्या बेटावर जाऊन राहणं, हे तसं फार अवघड. पाण्यात राहून कोरडं राहता येणारी अशी ती जागा. पण तरीही तिथं फार काळ राहता येत नाही. संगीतातल्या अनेक कलावंतांना त्या बेटाचं आकर्षण असतं, ते तिथल्या निर्लेपतेमुळे.
कोणत्याही कलांच्या विकासात अर्थकारण, समाजकारण आणि संस्कृतिकारण यांना महत्त्वाचं स्थान असतं, हे भारतीय परंपरेनं फार उशिरा मान्य केलं. कोणत्याही प्रकारच्या आक्रमणानं होणारे बदल संगीतालाही लागू झाले. भारतात परकीय सत्ता आल्यानंतर तिचे दास होण्यात धन्यता मानणाऱ्या सगळय़ांना कलेच्या क्षेत्रात मात्र आपण स्वायत्त असल्याचं ‘भासत’ होतं. सत्ताधीशांच्या सगळय़ा नखऱ्यांना शिरोधार्य मानून ते आळवत बसणारे कलावंतही समाजात असतातच. संगीतातल्या कलावंतांना परिस्थितीतील या बदलाशी जुळवून घेताना नक्कीच कोण कष्ट पडले असणार! कलांना राजमान्यता मिळाली, की सुरक्षेचं एक कवच आपोआप तयार होतं. जगण्याची भ्रांत निमते आणि नवं काही करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते, असा समज आजही तेवढाच बळकट आहे. आपण जे काही सर्जन करतो आहोत, त्याचा इतरांच्या जाणिवांशी संबंध जोडण्याचा हट्ट कलावंतांनी सुरू केला, तेव्हाच त्यांना कलेच्या अस्तित्वाची जाणीव झाली. स्वत:च्याच आनंदासाठी संगीत निर्माण करणाऱ्या प्रत्येक कलावंताला, ते कुणीतरी ऐकायला हवं, असं वाटत असतं. संगीतातून जे सांगायचं आहे, ते समजून घेणारा समानधर्मी रसिक त्याला हवा असतो. मग तो आनंद एकटय़ाचा राहात नाही. आपल्याला नवं काही सुचतं आहे, याची जाणीव जेवढी सुखद, तेवढीच ते ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतं आहे, याची सुखकारकताही आनंदमय.
देवळातल्या देवाला खूश करण्यासाठी करायचं गाणं, एकतर्फीच. पण ते ऐकणाऱ्याचे डोळे लकाकायला लागले की तेच गाणं दुतर्फी होतं. त्यातून संवाद सुरू होतो. एकानं सांगायचं आणि दुसऱ्यानं फक्त ऐकायचं, असा हा दिसायला एकतर्फी वाटणारा संवाद. रसिकाला आपलं म्हणणं कळतंय, या आनंदासाठी दाद आवश्यक असते. संवाद दुतर्फी करणारी ही दाद, कलावंतांना नवस्फुरण देते आणि मग त्याच्या सर्जनाचे झरे अधिक तेज:पुंज होऊन झरायला लागतात. भारतीय संगीतपरंपरेत देवळातलं गाणं असं समाजात येऊन अलगदपणे उभं राहिलं, तेव्हाच त्याला निर्मितीचे उमाळे फुटायला लागले. हा दुतर्फी संवाद अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी कलावंत बेचैन होऊ लागला. सतत काही नवं, यापूर्वी कधी न ऐकलेलं, पण तरीही काहीसं परिचित तयार होण्यासाठी रसिक नावाची एक आवश्यकता संगीतात व्यक्त झाली. निसर्गाशी जे नातं कलावंताचं, तेच रसिकाचंही. त्या निसर्गायनात नवा साक्षात्कार घडवण्याची किमया जेव्हा घडते, तेव्हा सर्जनाची कविता उलगडायला लागते. राग, लोभ, मद, मत्सर यांसारख्या मानवी मेंदूत भरून राहिलेल्या शत्रूंचा पाडाव करत कलांचा प्रवास सुरू होतो. स्वर तेच. त्यांचा एकमेकांशी असलेला संबंधही तोच. त्यांचे नातेसंबंधही न बिघडणारे. त्या स्वरांमधून नेमका अर्थ सांगण्यापेक्षा त्याचे अनेक अर्थ लागण्याची शक्यता कलावंताला अधिक हवीहवीशी वाटणारी. असे अर्थ शोधण्याच्या रसिकाच्या क्रियेला प्रोत्साहन देणाऱ्या स्वरांमधून जी अमूर्ताची वाट सापडत जाते, त्यानं कलावंत आणि रसिक एकाच वेळी हर्षित होतात आणि कैवल्याच्या आनंदाचा अनुपम अनुभव घेतात. अशा वेळी सगळं फक्त संगीत होतं. जगण्याचे सगळे प्रश्न निरुत्तर होतात. कलावंत म्हणून जन्माला येणं आणि नवनिर्मिती करता येणं, ही निसर्गदत्त देणगी असते. आपल्याला हे नवं काही करता येईल, याचा विश्वास वाटणं ही पहिली पायरी आणि तो विश्वास रसिकांनी मान्य करणं, ही शेवटची. पोट भरण्यासाठी कलेची आराधना करण्यापेक्षा अन्य व्यवसाय केव्हाही फायद्याचा. पण कलेच्या जगात पछाडलेल्यांना पोटापेक्षा जगण्यासाठीच कलेची गरज अधिक वाटायला लागते. त्यातूनच काही सृजनात्मक घटना घडतात.
कलावंत हाही समाजाचा अविभाज्य घटक असतो आणि त्याच्यावर सगळय़ाच घटनांचा परिणाम होत असतो. या परिणामांना कलेच्या प्रांतात किती येऊ द्यायचं, हे त्याचं स्वातंत्र्य असतं. पण राजकारणापासून किंवा समाजकारणापासून तो अलिप्त राहूच शकत नाही. त्याचा अदृश्य परिणाम त्याच्या कलाचिंतनावर होत असतो. राजाश्रयाच्या काळात तो मिळणाऱ्या कलावंतांची संख्या फार मोठी नव्हतीच. म्हणून बाकीचे सगळे संगीत करत नव्हते, असं काही घडलं नाही. लोकाश्रयाच्या काळात स्थिती अधिक बिकट झाली, कारण कशाचीच खात्री वाटेनाशी झाली. अशा अस्थिर आणि अशांत परिस्थितीत सर्जनाचं आव्हान पेलण्याएवढी ताकद गोळा करता करताच दमछाक होते. सर्जनाच्या बेटाकडे जाणारा मार्ग अंधूक आणि अस्पष्ट होतो.
जिथे खऱ्याखुऱ्या निर्मितीलाच महत्त्व आहे आणि अनुकरण अमान्य आहे. सर्जनाच्या बेटाचा हा प्रवास सुखकर होण्याच्या धडपडीत असणारे सारे कलावंत म्हणूनच पुन्हा पुन्हा त्या वाटेसाठी ओढाळ होतात.
सर्जनाचं बेट!
राजाश्रयाच्या काळात तो मिळणाऱ्या कलावंतांची संख्या फार मोठी नव्हतीच. म्हणून बाकीचे सगळे संगीत करत नव्हते, असं काही घडलं नाही.
First published on: 29-03-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music towards creative isle