विद्यापीठीय क्षेत्रातील तत्त्वज्ञानाचे पुरुष प्राध्यापक महिला सहकारी वा विद्यार्थिनींशी कसे वागतात, इथपासून ते तत्त्वज्ञानाचा ज्ञात पाश्चात्य इतिहासच पुरुष तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांची हेळसांड केल्याचा आहे काय, इथपर्यंतचे प्रश्न विचारत, काहीशी उलटतपासणी करण्याच्या पद्धतीतून महत्त्वाचे नैतिक प्रश्न समोर आले. स्त्रियांचे तत्त्वज्ञानक्षेत्रातील योगदान समजून घेतले पाहिजे, हा विचार प्रयत्नपूर्वक दृढ करण्यात आला. अशा काही प्रयत्नांची ही दखल..
स्त्री पुरुषापेक्षा अधिक सबळ, स्थिरचित्त आहे आणि ईश्वरापासून दूर जाणाऱ्या, ईश्वराला काहीही देण्याची इच्छा न करणाऱ्या पुरुषापेक्षा अधिक उत्तम आहे. तिचा समर्पण भाव भक्तीने रसरसलेला असतो, असे ऋग्वेद म्हणतो (५.६१.६).   महर्षी व्यास, वाल्मीकी, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, महंमद पगंबर, येशू, झरतुष्ट्र, पाणिनी, कालिदास किंवा राम, श्रीकृष्ण, लोकहितवादी, नामदार गोखले, न्या. रानडे, फुले, टिळक, आगरकर,आंबेडकर, गांधी, होमर, सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, कांट, हेगेल, रुसो, गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाइन किंवा मार्क्‍स, लेनिन, मिल, विटगेन्स्टाइन, रसेल, चॉमस्की, ही आणि अशी नावे नीट निरखून पाहिली तर काय लक्षात येईल?
तर, ‘ही सर्व मोठी माणसे धर्मसंस्थापक, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, विचारवंत आहेत (म्हणजे होती!). त्यांनी खूपच मूलभूत विचार मांडून मोठी क्रांती केली, दिशा दिली, समाजजीवनाचा ढाचाच बदलून टाकला,’ इत्यादी इत्यादी महान विचार सुचतील, यात शंका नाही. पण आपल्या एक लक्षात येते का? की  यात एकही स्त्रीचे नाव नाही.
वैचारिक क्षेत्रात स्त्रिया का नसतात, असा प्रश्न एके काळी उपस्थित केला गेला, आजही केला पाहिजे. ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान असो की भारतीय दर्शन परंपरा असो अथवा अन्य संस्कृती असो; तत्त्वचिंतनाच्या इतिहासात स्त्रियांचा उल्लेख आढळत नाही. स्त्रियांनी विचार निर्माण करणे, त्यातून त्यांनी स्वतंत्र, सुसंगत ज्ञानरचना करणे हे मुद्दे पुरुषांनी वादग्रस्त बनविले आहेत. तत्त्वचिंतनातील स्त्रीचे स्थान हा विषय खूप व्यापक आणि बहुआयामी आहे. त्यातील प्रत्येक आयामाचा केवळ उल्लेख करणे, हेसुद्धा या मर्यादित जागेत शक्य होईल, असे नाही. स्त्री आणि तत्त्वज्ञान अशा आशयाचा अभ्यास बहुधा लिंगभाव अभ्यासाचा एक भाग म्हणून होतो, स्त्रीने तत्त्वज्ञ असणे, या तात्त्विक भूमिकेतून होत नाही.
प्राचीन काळापासून स्त्रीचे स्थान पुरुषांच्या राजकारणात केवळ युद्धाचे किंवा तडजोडीचे साधन म्हणूनच राहिले आहे. तत्त्वज्ञानाचे क्षेत्रही त्यास अपवाद नाही, किंबहुना त्यासाठीच तत्त्वज्ञान राबविले गेले. स्त्री आणि पुरुष यांच्यातील युद्धाचे सविस्तर विश्लेषण मराठीत मार्क्‍सवादी-फुले-आंबेडकर अन्वेषण पद्धती वापरून कॉ. शरद् पाटील यांनी केली. ही चिकित्सा अभ्यासक्रमाचा भाग बनू शकत नाही, हे आपले दुर्दैव.
प्राचीन भारत आणि ग्रीसमध्ये अनेक तत्त्वचिंतक स्त्रिया होऊन गेल्या. लोपामुद्रा, विश्ववरा, शाश्वती, गार्गी, मत्रेयी, घोषा आणि आदिती या स्त्रिया देवराज इंद्राच्या गुरू होत्या. त्यांना ब्रह्मवादिनी म्हटले आहे. सांख्य दर्शनातील प्रकृति, ज्ञानदेवता सरस्वती स्त्रीरूपिणी आहेत, आदि शंकराचार्याना हरविणारी पंडिता भारती वा सरस्वती, ग्रीक (पायथागोरसची गुरू) थेमिस्टोक्ली वा  पायथिया, अस्पेशिया, डायोटिमा (तिघी सॉक्रेटिसच्या गुरू), हायपेशिया, अ‍ॅरेटी, अ‍ॅसक्लेपीजेनिया (ग्रीक-इंग्लिश नावाचे अंदाजे उच्चार) ही काही नावे. या स्त्रियांचे कार्यकर्तृत्व तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा भाग बनू दिला गेला नाही. तत्त्वज्ञानातील स्त्रियांचा इतिहास विसाव्या शतकाच्या अखेरीस लिहिला जाऊ लागला.
मेरी अ‍ॅलन व्हेथ (प्राध्यापक, क्लीव्हलॅण्ड स्टेट युनिव्हर्सिटि) या अमेरिकी विदुषीने ‘ए हिस्ट्री ऑफ विमेन फिलॉसॉफर्स’ या नावाचे चार मोठे खंड प्रसिद्ध केले. ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान प्रथमपासून कसे पुरुषी, उर्मट आणि अरेरावीचे आहे, याचे सविस्तर विश्लेषण देणारे अनेक संशोधन प्रकल्प तिने सिद्ध केले आहेत. स्त्री तत्त्ववेत्त्या कशा वैचारिक यज्ञात हेतुत: बळी दिल्या गेल्या याचे भेदक वर्णन करणारे  ‘हिस्टेरेक्टोमायिझग फिलॉसॉफी : हाउ फिलॉसॉफी बिकेम मॅस्क्युलीन’सारखे शेकडो लेख तिने लिहिले. स्त्री तत्त्ववेत्तींचे तत्त्वज्ञान शिकवताना संभाव्य पुरुषी धोके लक्षात घेऊन व्हेथने ‘स्त्री तत्त्ववेत्तींचे तत्त्वज्ञान शिकवावे कसे याचा अभ्यासक्रम’ तयार केला (डेव्हलिपग अ करिक्युलम फॉर टीचिंग वर्क्‍स ऑफ विमेन फिलॉसॉफर्स). व्हेथबरोबरच सेसिली टोगास (प्रेझेंटिंग विमेन फिलॉसॉफर्स), मेरी वॉरनॉक, (विमेन फिलॉसॉफर्स), जॉर्ज यान्सी डय़ूकेस्ने (दि सेंटर मस्ट नॉट होल्ड : व्हाइट विमेन ऑन व्हाइटनेस ऑफ फिलॉसॉफी) ही अन्य काही महत्त्वाची नावे सांगता येतील. इतरही बरेच अभ्यासक आहेत.
तत्त्वज्ञानातील स्त्रीचे योगदान या विषयाच्या निमित्ताने विसाव्या शतकाच्या अखेरीस युरोप-अमेरिकेत प्राध्यापकी करणाऱ्या पुरुष तत्त्ववेत्त्यांकडून या क्षेत्रातील स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाचा  मुद्दा पुढे आला. त्यामुळे तात्त्विक स्त्रीवादाला नवा आयाम मिळाला. त्याचा इतिहास अद्यापि लिहिला गेला नाही, पण लेखनातून शोषणाचे स्तर आणि पुरुषी दहशतीचे प्रकार उजेडात आले.
युरोपात स्त्रीमुक्ती चळवळ आणि वर्णभेदाविरुद्ध चळवळ सामान्य स्त्रियांसाठी झाली. तिचे पडसाद उच्च शिक्षण क्षेत्रातही झाले. त्या काळी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका यांना पुरुष प्राध्यापकांच्या मानसिक आणि लैंगिक छळणुकीविरुद्ध लढा द्यावा लागला. या लढय़ात स्त्रियांची सरशी झाली, पण फक्त गोऱ्या विद्याíथनी आणि प्राध्यापिका यांचीच. पण नंतरच्या स्त्रीमुक्ती लढय़ात वर्णभेदाची भर पडली. कारण गोऱ्या पुरुष प्राध्यापकांनी काळ्या विद्यार्थिनी आणि काळ्या प्राध्यापिका यांचा छळ चालूच ठेवला होता. त्याचा विपरीत परिणाम तत्त्वज्ञान या विषयावरही झाला. एक तर, गोऱ्या पुरुष प्राध्यापकांच्या अरेरावीमुळे काळ्या विद्यार्थिनी तत्त्वज्ञान या विषयाकडे येऊ शकत नव्हत्या. दुसरे म्हणजे, पात्रताधारक काळ्या स्त्रियांना प्राध्यापकी मिळू द्यायची नाही, असा चंग गोऱ्यांनी बांधला होता. या साऱ्या व्यवस्थेविरुद्ध काळ्या विद्याíथनी आणि काळ्या प्राध्यापिका यांना वेगळा लढा द्यावा लागला. लिंगभेद आणि वर्णभेद यामुळे काळ्या विद्याíथनी आणि काळ्या प्राध्यापिका यांना तत्त्वज्ञान या विषयाचे शिक्षण, संशोधन, नोकरी यात भयंकर छळ सोसावा लागला. यासंबंधात अनेक ब्लॉग आहेत.
‘अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड’ या लेविस कॅरोलच्या दीर्घकथेतील अ‍ॅलिस ही स्त्री म्हणून तत्त्वज्ञान शिकायला एखाद्या विद्यापीठात गेली तर तिचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कसा छळ करतील याचे वर्णन करणारी ‘अ‍ॅलिस इन फिलॉसॉफी लॅण्ड’ नावाची विडंबन कथा प्रस्तुतच्या व्हेथ यांनी लिहिली.
लिंगभेद करणारे पुरुष तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक पाहता यांना ‘ज्ञानाचे प्रेमिक’ (लव्हर्स ऑफ विज्डम = फिलॉसॉफर) का म्हणावे, असा प्रश्न मारियाना ओत्रेगा ही अभ्यासक विचारते आणि ‘जर परीक्षण न केलेले जीवन जगण्यालायक नसेल’ (सॉक्रेटिसचे वचन) तर स्वत:चे परीक्षण न करणारे तत्त्वज्ञान, ते दूषित तत्त्वज्ञान शिकविणारे तत्त्वज्ञान विभाग आणि ते पाखंडी प्राध्यापक काय कामाचे, असा सवाल एलिझाबेथ स्पेलमन ही विदुषी उपस्थित करते. तत्त्वज्ञान विभागातील पुरुष सहकारी प्राध्यापकाकडून सच्च्या दिलाने सहकार्य न मिळणे ,  तत्त्वज्ञान विभागातील एकूण थंड, बेमुर्वत व परकेपणाचे वातावरण यामुळे तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांवर विपरीत परिणाम होतो, असे निरीक्षण सॅली हॅस्लंगर (एमआयटी, केम्ब्रिज) ही तत्त्वज्ञानाची प्राध्यापिका नोंदविते. अशा प्रकारचा अभ्यास युरोपीय-पाश्चात्त्य राष्ट्रांत होतो, भारतात का होत नाही, यावर स्वतंत्र लेखन करावे लागेल.
लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.  ई-मेल: tattvabhan@gmail.com

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू