समाजातल्या वरच्या स्तरातच अभिजात संगीताला प्रवाही होण्याची मुभा असताना, गाणंच करायचं, असं गंगुबाई हनगल यांना का वाटलं असावं? दाक्षिणात्य संगीताचा त्या काळातच नव्हे, तर अगदी अलीकडेपर्यंत दबदबा होता तो अभिजन वर्गात. सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातल्या मुलींनी एक तर भरतनाटय़म या नृत्य प्रकारात प्रावीण्य तरी मिळवायचं किंवा कर्नाटक संगीतात पारंगत तरी व्हायचं, असा जणू दंडक असण्याच्या काळात गंगुबाई हनगल यांनी दाक्षिणात्य संगीताच्या वाटेला न जाता उत्तर हिंदुस्थानी संगीताकडे वळण्याचं कारण काय असेल? त्या धारवाडला राहत होत्या आणि तेव्हा धारवाड हे सांस्कृतिकदृष्टय़ा अगदीच मागासलेलं नव्हतं. तरीही त्यांच्याप्रमाणेच किती तरी आधी शेजारच्या कुंदगोळ गावातल्या रामभाऊ कुंदगोळकर यांनी किराणा घराण्याची तालीम घेण्यासाठी थेट अब्दुल करीम खाँसाहेबांनाच आपलं गुरू केलं होतं. रामभाऊ म्हणजे सवाई गंधर्व यांनीही कर्नाटकातच राहून गायनसेवा न करता तिकडे महाराष्ट्र देशी जाऊन तेथील त्या वेळच्या लोकप्रिय ठरलेल्या संगीत नाटकांत भूमिका करायलाही सुरुवात केली होती. त्यांची नाटय़गीतंही अस्सल मराठी रसिकांना भावत होती. परत कुंदगोळला येऊन गाणंच करायचं जेव्हा सवाई गंधर्वानी ठरवलं, तेव्हा तिथल्या सांस्कृतिक परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांना काही त्रास झाला असेल का, याची नोंद कुठे सापडत नाही. पण गंगुबाईंनी त्यांना गुरू केलं, तेव्हा ते खूपच नावारूपाला आले होते. कर्नाटकातील एक बडं प्रस्थ बनले होते आणि मैफली गवय्या म्हणून त्यांची ख्याती दूर पसरली होती. कर्नाटकात एक स्वतंत्र अशी संगीत परंपरा असतानाही ते हिंदुस्थानी संगीताच्या प्रांतात आले होते. गंगुबाईंच्या बाबतीतही हेच होतं. सवाई गंधर्वाकडे शिकण्यासाठी हुबळीहून कुंदगोळला रेल्वेनं ये-जा करायची हे निदान त्या काळात तरी निश्चितच अवघड वाटणारं होतं. ही छोटीशी मुलगी असा प्रवास करत आपला गळा एका अपरिचित संगीत परंपरेत मुरवत होती आणि त्याला विरोध करण्यासाठी तिथल्या समाजानं शक्य त्या सर्व पद्धतींचा अवलंब केला. गंगुबाईंचं घर काही अभिजन वर्गातलं नव्हतं खास. घरातल्या मुलींनी हौसेपुरतंच गाणं करावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवणाऱ्या समाजात गंगुबाईंनी एक मोठं क्रांतिकारक पाऊल टाकलं होतं.
यंदा जन्मशताब्दी पूर्ण होत असलेल्या गंगुबाई हनगल यांच्या साडेनऊ दशकांच्या जीवनात सुमारे ऐंशी र्वष तर गाण्यातच गेली. जी गेली, ती नुसती तालीम करून पाठांतर करण्यात गेली नाहीत, तर त्याआधी हिराबाई बडोदेकर यांनी केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीची मशाल सर्जनशीलतेनं तेवत ठेवण्यात गेली. ज्या काळात स्त्रीला गळ्यातून आर्तता व्यक्त करण्याचीही परवानगी नव्हती, त्या काळात पुरुषांच्या बरोबरीनं मैफलीत गाणं सादर करणाऱ्या हिराबाईंनी केलेल्या या अजब गोष्टीचं महत्त्व गंगुबाईंना चांगलंच समजलं असलं पाहिजे. त्यांच्या आईच्या गळय़ात मधुर संगीत होतं, पण ते कर्नाटक शैलीचं होतं. गंगुबाईंना उत्तर हिंदुस्थानी संगीताचं वेड असल्याचं लक्षात आल्यावर त्या माऊलीनं आपला गळा बंद ठेवायचं ठरवलं आणि मुलीच्या संगीत शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. किराणा घराण्याचे जनक अब्दुल करीम खाँ यांच्यासमोर गायला मिळण्याची संधी गंगुबाईंना मिळाली, पण त्यांच्याकडे शिक्षण मात्र घेता आलं नाही. त्यांचे शिष्य रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे गाणं शिकायचं ठरवलं तेव्हा कराव्या लागणाऱ्या कष्टाचं सोनं करण्याची हिंमत त्यांच्या मनात असली पाहिजे. १९३७ ते ४१ या काळात सलगपणे सवाई गंधर्वाकडे गाणं शिकायची संधी मिळाली, तेव्हा गांधारी या नावानं त्या जगाला परिचित झाल्या होत्या. या नावानं निघालेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. १९३२ ते ३५ या काळात ग्रामोफोन कंपनीसाठी त्यांनी साठ गाणी ध्वनिमुद्रित केली होती. रागसंगीत आणि मराठी भावगीतं असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांनी कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या अवकाशात गंगुबाई ऊर्फ गांधारीनं आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. त्या काळात मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगुबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आली. ‘आईचा छकुला’ आणि ‘बाळाचा चाळा’ ही ती दोन गाणी तेव्हा घरोघर वाजत होती. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’नं १९३५ मध्ये प्रकाशित केलेल्या ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर छापलं होतं ते असं.. ‘जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेला मिस गांधारीचा रेकॉर्ड इतका लोकप्रिय झाला की प्रमुख गायिकांच्या मालिकेमध्ये तिनं मानाचं स्थान पटकावलं आहे. या गायिकेसंबंधी लिहिताना ‘विविध वृत्त’ म्हणतो, ‘एका गोड गळ्याच्या व अभिजात गायिकेचा परिचय करून देऊन ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ कंपनीनं संगीताच्या अनेक शौकिनांना ऋणी केलं आहे. या चिजा इतक्या उत्तम वठल्या आहेत, की त्यामुळे या गायिकेचा उज्ज्वल भविष्यकाळ स्पष्ट दिसतो.. आजकालच्या भरमसाट तानाबाजीमुळे बधिर झालेल्या कानांवर गांधारी यांच्या मधुर आलापामुळे मधुसिंचन होईल.’ (संदर्भ- सुरेश चांदवणकर) असं नावारूपाला आल्यानंतरही गंगुबाईंनी कष्टपूर्वक साधना करून सवाई गंधर्वाकडून तालीम घेतली आणि त्यात स्वप्रतिभेनं भर टाकली. गोड गळ्यावर झालेल्या आघातावर मात करून पुन्हा उभं राहण्याचं हे सामथ्र्य त्यांना हिंदुस्थानी संगीतानं दिलं. आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर पतीच्या निधनामुळे संगीताकडे पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पाहणं गंगुबाईंना भाग पडलं, पण समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावारूपाला येण्यासाठी आपल्या अंगच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेलाच आव्हान करणं त्यांना अधिक आवश्यक वाटलं असेल. चांगलं संगीत जगभर पोहोचलं पाहिजे, अशी कळकळ असून चालत नाही, त्यासाठी ते देशभर फिरून सादर करावं लागतं, हे लक्षात आल्यानंतर कृष्णा या आपल्या छोटय़ा मुलीला घेऊन त्या सगळीकडे गेल्या. केवळ पैसे मिळवणं हा उद्देश असता तर त्यांनी कदाचित अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केलीही असती, पण गंगुबाईंना उत्तम संगीताचा ध्यास होता.
तोपर्यंत हिंदुस्थानी संगीत ही अभिजनांची मालमत्ता राहिलेली नव्हती. तंत्रज्ञानानं ते समाजातल्या सगळ्याच स्तरांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. बहुजन समाजातील अनेक जण आपल्यामध्ये असलेल्या प्रज्ञेचा आविष्कार करण्यासाठी धडपडत होते आणि त्याची अनेक उदाहरणं त्या काळातही ठळकपणे समोर येत होती. बाई सुंदराबाई, केशवराव भोसले ही त्यातली सहज लक्षात येणारी नावं. गंगुबाईंनी कर्नाटक संगीताचीच कास धरली असती तर असं झालं असतं का, असा प्रश्न मनात काहूर मात्र उठवतो. संगीत हे कोणत्या एका वर्गाचं अभिव्यक्तीचं साधन असता कामा नये, हे मान्य होण्यासाठी यंत्रयुग अवतरावं लागलं. तोपर्यंत सत्ताधीश असलेल्या सम्राटांच्या दरबारात किंवा अभिजनांनाच प्रवेश असलेल्या देवळांमध्ये अडकलेलं संगीत यंत्रयुग अवतरण्यापूर्वीच अण्णासाहेब किलरेस्करांच्या प्रयत्नानं खुलं झालं होतं. त्यांच्या संगीत नाटकांनी असं अभिजात संगीत कुणालाही ऐकण्याची मुभा निर्माण केली होती. यंत्रयुगानं हे प्रयत्न अधिक वेगानं आणि प्रभावीपणे पुढे नेले, पण त्यासाठी सामाजिक चौकटी मोडून पडण्याचीही आवश्यकता होती. संगीत नाटकांमध्ये स्त्रियांना काम करण्यास मुभा नसतानाच्या काळात विष्णू दिगंबर पलुस्करांनी मुंबईत १९०८ मध्ये गांधर्व महाविद्यालयात स्त्रियांचे स्वतंत्र गायन वर्ग सुरू केले होते. ही गोष्ट गंगुबाईंच्या जन्माच्याही आधीची. त्याचा संबंध महात्मा फुले यांच्या १८४८मध्ये सुरू झालेल्या मुलींच्या शाळेशी जोडता येतो. हा बदल गंगुबाईंच्या आगमनाला पूरक ठरला असल्यास नवल नाही. तरीही कर्नाटकातील त्या वेळची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती पाहता, एखाद्या मुलीनं व्यावसायिक स्तरावर गायन या कलेला आपलंसं करावं, ही गोष्ट वाटते तेवढी किरकोळ नव्हती. ‘संसार सोडून गाणं करते’ अशा प्रकारच्या समाजाच्या हेटाळणीला सामोरं जावं लागणं ही तेव्हाची रीत होती, पण गंगुबाईंच्या खांद्यावर हिराबाईंनी दिलेली सांस्कृतिक क्रांतीची तेवती मशाल होती. आईवडिलांच्या पश्चात पतीचा पाठिंबा होता, म्हणून त्यांना हे करता आलं, हे विधानही त्यांच्या कर्तृत्वाला झाकोळून टाकणारं म्हणायला हवं. गाणंच करण्याचा निर्णय गंगुबाईंना कठोरपणेच घ्यावा लागला असणार, यात शंका नाही. समाजाच्या सर्व स्तरांत केवळ आपल्या अंगी असलेल्या अभिजाततेच्या गुणांनी पोहोचण्याची ही ताकद गंगुबाईंनी मिळवली आणि पुढच्या पिढय़ांकडे सुपूर्द केली. १३ मार्च १९१३ ला जन्मलेल्या या कलावतीच्या जन्मसाली तंत्रयुगातील एक मोठा चमत्कार मानल्या गेलेल्या जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) यांनी जगाचा निरोप घेतला होता. गंगुबाई हनगल हे नाव त्यांच्या प्रतिभावान आविष्कारासाठीच केवळ आळवायचं नाही, तर कर्नाटकातील आणि देशातील सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अपार कष्टासाठीही आठवत राहणं आवश्यक आहे.