परराष्ट्र सेवेत असताना अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, जर्मनीचे एकीकरण, सोवियत संघाचे विघटन, श्रीलंकेतील वांशिक हिंसाचार, वाजपेयी सरकारची पोखरण अणुचाचणी अशा आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून काढणाऱ्या घडामोडींचे साक्षीदार असा विलक्षण अनुभव पाठीशी असलेले सुधीर देवरे आता निवृत्तीनंतरही कार्यमग्न आहेत..
भारताबाहेर राहूनही देशाची सेवा करता येते, याचा अनुभव भारतीय विदेश सेवेतील ३७ वर्षांच्या वाटचालीत सुधीर देवरे यांना आला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या वरकरणी सातत्य असलेल्या परराष्ट्र धोरणांतील सूक्ष्म, पण दूरगामी परिणाम करणारे बदल नेमकेपणाने टिपण्याची संधी देवरे यांना मिळाली. त्याच वेळी अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, जर्मनीचे एकीकरण, सोवियत संघाचे विघटन, श्रीलंकेतील वांशिक हिंसाचार, वाजपेयी सरकारची पोखरण अणुचाचणी अशा आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून काढणाऱ्या घडामोडींचे ते साक्षीदारही ठरले.
विदेश सेवेत दाखल होताच देवरे यांना १९६४-६५ मध्ये मॉस्कोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध शिगेला पोहोचले असताना त्यांची मॉस्कोहून वॉशिंग्टनला बदली झाली आणि तिथून थेट सिक्कीमला. भारताच्या दृष्टीने तो त्या वेळी फारच महत्त्वाचा प्रदेश होता. मूलभूत सुविधांच्या अभावात चार वर्षे कडाक्याच्या थंडीत अगदी कोळशावरील स्वयंपाकावर गुजराण करीत देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या सिक्कीमच्या रक्तहीन सामिलीकरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कुठल्याही मुत्सद्दय़ाच्या दृष्टीने तो अनुभव दुर्मीळ आणि संस्मरणीय ठरेल, असे आज त्यांना वाटते. त्यानंतर जिनेव्हा आणि म्यानमारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दिल्लीत १९७४ ते ७६ दरम्यान परराष्ट्र सचिवांच्या कार्यालयात आणि १९८२ ते ८५ मध्ये संयुक्त सचिव म्हणून ते कार्यरत होते. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आणि म्यानमार या शेजारी देशांशी संबंध हाताळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तेव्हाच श्रीलंकेचा प्रश्न चिघळायला सुरुवात झाली. दक्षिण कोरियात आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन होत असताना १९८५-८९ दरम्यान ते राजदूत होते. त्या काळात भारत-दक्षिण कोरिया संबंधांचा पाया त्या वेळी रचला जात होता. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी बर्लिनची भिंत पडून जर्मनीचे एकीकरण झाले त्या वेळी देवरे जर्मनीत कॉन्सुल जनरल होते. ऑगस्ट १९९१ मध्ये सोविएत संघाच्या विघटनानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी युक्रेन, जॉर्जिया आणि आर्मेनियामध्ये वकिलाती सुरू करण्यासाठी या तीन देशांत त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती केली. त्या वेळी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती. तेथील इमारतींमध्ये किंवा दुकानांमध्ये काहीही नव्हते. शहरांमध्ये उच्चभ्रू लोक रस्त्यांवर भीक मागत होते. शिवाय चेर्नोबिलच्या उत्सर्गाची धास्ती होती. भारताचा या भागाशी महत्त्वाचा संबंध होता. मोठय़ा प्रमाणावर लष्करी सामुग्री सोविएत युनियनच्या अनेक भागांतून येत असे. पण ती कुठून यायची हे कुणी सांगत नसत. तीच गोष्ट व्यापाराची. भारताने घेतलेली वाहतूक विमाने, टर्बाईन, रडार, विविध प्रकारची उपकरणे, सुटे भाग आणि लष्करी सामग्री नेमकी कुठून येते हे शोधून काढून देवरे यांनी व्यापारी संबंध पुनस्र्थापित करण्याची जबाबदारी पार पाडली. युक्रेनमध्ये मोफत शिक्षणाच्या अटीवर आलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना फी भरावी लागेल, असे त्यांना अचानक सांगण्यात आले. देवरे यांनी युक्रेन सरकारशी सतत वाटाघाटी करून हा प्रश्न धसास लावला. आर्मेनियात तर जाणेच अवघड होते. देशाच्या चारही बाजूंनी र्निबध होते. मॉस्कोमधून एखादे विमान जायचे. लोक उभे राहून जायचे. वीज नसल्यामुळे चार-पाच मजले चढून मंत्र्यांना भेटायला जावे लागायचे. पण भारताविषयी आत्मीयता असल्यामुळे हे संबंध पुनस्र्थापित झाले, याचे त्यांना समाधान वाटते.
देवरे यांची परदेशातील शेवटच्या देशातील नियुक्ती इंडोनेशियातली होती. भारत आणि इंडोनेशियात अनेक बाबतींत साम्य आहे. धार्मिक व भाषिक वैविध्य, हिंदू मुस्लीम आणि बौद्ध संस्कृतीचे सुंदर मिश्रण, रामायण, महाभारत, साहित्य, वेशभूषा, ऐतिहासिक इमारती, जगातील सर्वात सुंदर बौद्ध आणि हिंदू मंदिरे अशी वैशिष्टय़े असलेल्या इंडोनेशियाने आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात भरभराट करणाऱ्या दक्षिण कोरियाने देवरेंना भुरळ पाडली. जकार्ता हे आसियान देशाचे मुख्यालय होते. त्या वेळी ‘लुक ईस्ट’ धोरणाचे बरेचसे काम दिल्ली आणि जकार्तामध्ये सुरू झाले. वाजपेयी सरकारच्या काळात देवरे यांची दिल्लीत १९९८ साली सचिवपदी नियुक्ती झाली. चीन वगळता आशिया-प्रशांतसागर विभागाचे कोरियापासूून ऑस्ट्रेलियापर्यंत म्यानमार, आसियान देश आणि संपूर्ण आफ्रिका आणि आर्थिक विषयांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी, राष्ट्रपती के. आर. नारायणन आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह आणि यशवंत सिन्हा यांच्याशी त्या वेळी त्यांचे निकटचे संबंध होते. ११ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये अणुस्फोट चाचणी झाल्यानंतर पुढचे दीड वर्षे देवरेंना आण्विक मुत्सद्देगिरी करणे भाग पडले. देशाच्या संरक्षणासाठी व हितासाठी अणुचाचणी केली हे अतिशय कौशल्याने आणि आत्मविश्वासाने जगाला पटवून देण्यात वाजपेयी सरकार यशस्वी ठरले. युरोप आणि आफ्रिकेसह अनेक देशांना भारताची भूमिका पटली. भारतावर अवाजवी दबाव आणणे फारसे हितावह ठरणार नाही, याची सर्वच बडय़ा देशांना कल्पना आली. त्या वेळी देवरे यांना २५-३० देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका समजावून द्यावी लागली. तो अनुभव वेगळाच होता, असे देवरे सांगतात. एखादा देश खंबीरपणे भूमिका घेतो तेव्हा परराष्ट्र धोरण कसे बदलत जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव अणुचाचणीचा प्रभाव वर्षभरात ओसरल्याचे पाहताना देवरे यांना आला.
परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गेल्या बारा वर्षांत देवरे नवनव्या जबाबदाऱ्यांमुळे सतत कार्यमग्न राहिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे ते दोन वर्षे सदस्य, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वर्षभर प्राध्यापक, इन्स्टिटय़ूट ऑफ साऊथ ईस्ट एशियन स्टडीज या सिंगापूरमधील संस्थेमध्ये व्हिजिटिंग फेलो, हार्वर्ड विद्यापीठात वर्षभर फेलो अशी व्यग्रता त्यांच्या वाटय़ाला आली. सिंगापूरला असताना त्यांनी ‘इंडिया अॅण्ड साऊथ ईस्ट एशिया – टुवर्डस् सिक्युरिटी कन्व्हर्जन्स’ आणि ‘ए न्यू एनर्जी फ्रंटियर- द बे ऑफ बेंगाल रीजन’ अशी दोन पुस्तके लिहिली. यापैकी पहिले पुस्तक अनेक देशांमध्ये पाठय़पुस्तकासारखे वापरले जाते, याचे समाधान आणि सार्थ अभिमानही त्यांना आहे. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांची ‘इंडियन कौन्सिल ऑफ वल्र्ड अफेअर्स’ या संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती केली. भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यासाठी नेहरूंनी स्थापन केलेली ही संस्था खूप जुनी असली तरी ती ज्या उद्दिष्टांसाठी स्थापन झाली ते साध्य होत नव्हते. या संस्थेचे नेतृत्व करणारे एकमेव मराठी ठरलेले देवरे यांनी तीन वर्षांनंतर संस्थेला पुन्हा महत्त्व प्राप्त करून दिले.
आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्दय़ांवर अभ्यास करण्यासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी ‘रीसर्च अॅण्ड इन्फो सिस्टिम्स ऑफ डेव्हलपिंग कन्ट्रीज’ ही संस्था १९८३ साली इंदिरा गांधी यांनी स्थापन केली. त्याचेही देवरे चार वर्षे उपाध्यक्ष होते. अशा अनेक संस्थांमध्ये मराठी माणूस म्हणून काम करताना अभिमान वाटायचा, असे ते आवर्जून सांगतात. पुण्यातही (बाणेर) घर असलेले देवरे यांनी यंदा एप्रिलपासून पुण्यातील सिम्बायॉसिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्मध्ये भारताचे दिवंगत विदेश सचिव राम साठे अध्यासनाचे पहिले प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारल्याने त्यांचा अनेक वर्षांनंतर प्रथमच महाराष्ट्राशी थेट संबंध येणार आहे.
देवरे यांचे कुटुंब मूळचे नांदेडशेजारच्या एका खेडय़ातले. आई सुमती यांचे माहेर तुळजापूरच्या एकबोटेंचे. उर्दू, पर्शियन, अरेबिक भाषांचे जाणकार आणि हिंदी भाषेचे पुरस्कर्ते असलेले वडील डॉ. तुकाराम देवरे पुण्यात वाडिया महाविद्यालयात उपप्राचार्य होते. जून १९४१ चा जन्म असलेले सुधीर देवरे यांचे इंटपर्यंतचे शिक्षण पुण्यातल्याच मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. मुंबईत पार्ले महाविद्यालय आणि इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी बी.एस्सी. केले आणि एम.एस्सी. करीत असताना आयएएसच्या परीक्षेद्वारे विदेश सेवेसाठी पात्र ठरले. देवरे यांची चार दशकांची मुलूखगिरी पत्नी हेमा यांच्या संगीत, नाटय़ आणि लेखनाने सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाने समृद्ध झाली. हेमा देवरे बी. ए.च्या परीक्षेत नागपूर विद्यापीठात सुवर्णपदकाच्या मानकरी होत्या. त्यांचे वडील डॉ. एन. आर. देशपांडे पुण्यातील फर्गसन कॉलेज आणि नागपूर विद्यापीठामध्ये अधिष्ठाता होते. दिल्लीत तसेच भारताबाहेर असताना त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन करताना ‘विश्व विदेश सेवेचे’, ‘बळी यात्रा’ आणि ‘साडी सूत्र’ अशी पुस्तके लिहिली आणि ‘थ्रेड्स दॅट बाइण्ड’ ही भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधांवरील डॉक्युमेंटरीची निर्मिती केली. देवरे यांच्या दोन्ही मुली अमेरिकेत शिकल्या. बीबीसी आणि सीएनबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम केलेल्या थोरल्या अश्विनी देवरे-मोदी आता सिंगापूरमध्ये स्थायिक झाल्या आहेत. धाकटय़ा कन्या अपर्णा देवरे-जोशी हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात राज्यशास्त्राच्या साहाय्यक प्राध्यापक आहेत. देवरे यांच्या पुण्यात असलेल्या भगिनी सुधा कानेटकर वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झाल्या आहेत, तर त्यांचे बंधू बंगळुरूला एच. आर. कन्सल्टन्ट आहेत.
इंग्रजी व मराठी साहित्याच्या वाचनाची, हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताची, टेनिस आणि गोल्फची, बागकामाची आणि प्रवासाची देवरे यांना आवड आहे. मराठा इतिहासाविषयी राष्ट्रीय पातळीवर आणि इंग्रजी भाषेत फारसे लिहिले गेलेले नाही, याची त्यांना खंत वाटते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते होते. त्याची जाणीव दिल्लीतून देशाला व्हायला हवी, अशी भावना ते व्यक्त करतात. मराठा इतिहासावर पुस्तक लिहिता आले असते तर, सरोद वाजवायला शिकता आले असते तर, गिर्यारोहण करता आले असते तर आणि आणखी चांगले गोल्फ खेळता आले असते तर.. या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नसली तरी देशाभिमानी मुत्सद्दय़ाला साजेशी कामगिरी बजावताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान राखून संशोधन आणि लिखाणाच्या बाबतीत प्राध्यापकी सवयींचे शांत जीवन लाभले, याचे त्यांना समाधान आहे.
मुत्सद्दय़ाचे मनोगूज
परराष्ट्र सेवेत असताना अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, जर्मनीचे एकीकरण, सोवियत संघाचे विघटन, श्रीलंकेतील वांशिक हिंसाचार, वाजपेयी सरकारची पोखरण अणुचाचणी अशा आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून काढणाऱ्या घडामोडींचे साक्षीदार असा विलक्षण अनुभव पाठीशी असलेले सुधीर देवरे आता निवृत्तीनंतरही कार्यमग्न आहेत..
First published on: 04-05-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secret mind of statesman