आपली चित्रकला भारतीय असेल तरच लोकांना ती ‘आपली’ वाटेल, असं स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगितलं जात आहे. आज ते कुणी ऐकत नाही असं दिसतं, म्हणून मग ‘भारतीयते’ऐवजी असा कोणता मुद्दा आहे की जो समाज आणि चित्रकार या दोघांना समान भूमीवर आणू शकतो? आजकालचं ‘बाजारकेंद्रित्व’ हा तसा मुद्दा ठरू शकतो का? की ‘दृश्यानुभवाच्या भारतीय रीती’ कुठे-कशा सापडतात, याची चर्चा आजही महत्त्वाचीच आहे? याबद्दलचे हे दोन दृष्टिकोन..
‘भारतीयतेनंतर काय?’ या लेखाच्या अखेरीस (कलाभान, ९ डिसेंबर) एक आवाहनवजा प्रश्न होता : चित्रकलेबद्दलच्या चर्चेसाठी आज असा कोणता विषय आहे की ज्याला ‘वाचक आणि लेखक’ या दोघांचाही सामायिक विषय मानता येईल? ‘चित्रकलेतली भारतीयता’ हा विषय अगदी १९५० पर्यंत तसा सामायिक विषय होता. तसं आज मराठीत काय आहे?
यावर महेंद्र दामले यांनी उत्तर लिहिलं. ते लेखवजाच आहे. म्हणून आजच्या ‘कलाभान’मध्ये, सदराचा शिरस्ता मोडून – काहीसा शिस्तभंगच करून- या लिखाणाला स्थान दिलं आहे. ‘पाश्चात्त्य कलासंस्कार नाकारून मुळांचा शोध घेणं’ म्हणजे भारतीयता आणि स्वातंत्र्योत्तर काळात कलावंत म्हणून आत्मशोध घेताघेता, स्वत:बद्दल स्वत:ला जे कळलं त्याचा संबंध व्यापक भारतीयतेशी आहे का हे पडताळून पाहणं, हे दोन प्रकार असल्याचं दामले यांचं म्हणणं, हा मुद्दा इथं पहिल्यांदा येतो आहे.
पण दामले यांनी भारतीयता आणि स्वातंत्र्योत्तर काळातली कला याबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडून झाल्यावर, १९९०च्या भारतीय कलेचं वर्णन ‘गुंतवणुकीवर आधारित कलाबाजार’ असं केलं आहे. त्याची चर्चा (त्यांनीच नव्हे, इतरांनीही) करायला हवी. ‘बाजारकेंद्रित्व’ हा प्रकार खरोखरच आपणा सर्वाना- एक समाज म्हणून- विचार करायला लावतो आहे. इतका की, ‘मी स्वत: बाजारकेंद्रित्वापासून किती अंतरावर आहे? बाजारकेंद्रित्व मी कितपत स्वीकारलंय आणि कुठे-कधी नाकारलंय?’ असे प्रश्न प्रत्येकाला पडू शकतात! मग हेच प्रश्न चित्रकारांनाही पडत नसतील का?
आजच्या यशस्वी चित्रकारांना विद्यार्थीदशेपासून पाहात आलेले काही जण सांगतील की होय, आज बाजाराशी सख्य असलेले हे चित्रकार ‘आपापल्या संवेदनांचं, सांस्कृतिकतेचं आणि सामाजिकतेचं भान आपल्या कलेतून जपलं गेलं पाहिजे,’ अशा विचाराचेसुद्धा (अजूनही) आहेत. हे आज कुणाला पटणार नाही. पण ‘बाजार’ नावाची जी काही व्यवस्था आज आहे, तिच्या संदर्भात (उदाहरणार्थ) कृष्णम्माचारी बोस, अनंत जोशी, यशवंत देशमुख, रियाज कोमू, हे सारे- १९९०च्या दशकारंभी कलाक्षेत्रात नवतरुण असलेले (म्हणजेच आता बऱ्यापैकी मुरलेले) चित्रकार कुठे आहेत, हे मोजताना आपण – म्हणजे अन्य कलांप्रमाणेच चित्रकलेबद्दलही आकर्षणयुक्त कुतूहल (रस) असलेल्या मराठी भाषकांनी- फक्त बाजारातलं त्यांचं यश मोजून गप्प बसावं, अशी सक्ती आपल्यावर अजिबातच नाही. कारण आपण त्या कलाबाजाराचे कुणीच नाहियोत. हे सारे चित्रकार किती प्रमाणात स्वत्व टिकवून आहेत, याची चर्चा आपण करू शकतोच. ती चर्चा करणं, हे आपलं कलाभान सतत ताजं ठेवण्यासाठी आव्हानच ठरेल.
महेंद्र दामले
‘भारतीयतेनंतर काय’ या लेखाने स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेत वर्तमानपत्रं आणि नियतकालिकं यांतील चित्रकलाविषयक लिखाणाचा एक व्यूह घेतला. हा व्यूह घेताना चित्रकार- समाज- समीक्षक यांच्या जिव्हाळय़ाचे विषय कोणते होते, याची नोंद घेत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील चित्रकलेमधील संकल्पनांचा प्रवास याबद्दलही चर्चा लेखात झाली. या चर्चेत दोन मुद्दे ठळकपणे समोर येतात..
१. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी कला, भारतीयतेचे प्रतिबिंब चित्रकलेत असावं असं चित्रकार, समीक्षक, विचारवंतांना वाटत असे. हे प्रतिबिंब तत्कालीन कलेत नाही, याची त्यांना खंत होती. भारतीयतेचं प्रतिबिंब निर्माण व्हावं यासाठी विचारदृष्टीने दिशेचा शोध घेणं चालू होतं.
२. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र चित्रकार भारतीयतेचं प्रतिबिंब चित्रकलेत नाही याची खंत न बाळगता त्यांची कला ही पौर्वात्य किंवा भारतीय आशयमूल्यांशी कशी जुळलेली आहे, याविषयी भूमिका घेत होते.
या दोन मुद्दय़ांनंतर स्वातंत्र्योत्तर काळातली महत्त्वाची संकल्पना कोणती, असा प्रश्न विचारत महाराष्ट्रातील कलेमध्ये काही नवीन संकल्पनात्मक घडत होते/आहे का, अशीही एक शंका उपस्थित केली गेली आणि या सर्व परिस्थितीमुळे मराठीत चित्रकलेवर सकस लिखाण होत नाही असाही मंद सूर लावला गेला.
समकालीन मराठी चित्रकार, विचारवंत, समीक्षक यांच्या विश्वाची आज जी काही स्थिती आहे, तिला भारतीयता या संकल्पनेभोवती चर्चा सतत फिरत राहणेच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष लेखातून खुणावतो. परिणामी भारतीयतेचा मुद्दा कुतूहल निर्माण करतो.
भारतीयता म्हणजे काय, त्याचं चित्रकलेत प्रतिबिंब म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पिढीसाठी वेगळं होतं. परिणामी, भारतीयता शोधण्याची दिशाही वेगळी होती. आपल्या व्यक्तिगत कलेची नाळ आपल्या भूमीच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडली जावी, हे वाटणं साहजिक आहे. चिनी, जपानी लोकांना तसं वाटतंच. अमेरिकेतल्या चित्रकारांनाही दुसऱ्या महायुद्धानंतर तसंच वाटलं की!
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढी आर्टस्कुलात युरोपीय (फ्रेंच) कलेवर आधारित धडे गिरवून तयार झालेली. शिकलेली कलाशैली सोडून भारतातील परंपरागत कलाशैली – पोथीचित्रं, अजिंठा, लोककलेवर दम्ृश्यभाषेवर – त्यांनी भर दिला. पण हा फरक बऱ्याच प्रमाणावर वरवरचा होता. स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीने असे पृष्ठभागावरील बदल स्वीकारण्यापेक्षा जर्मन एक्स्प्रेशनिझमच्या अंगाने माहिती झालेला कांट, फ्रॉइड- त्याची सुप्त मनाची संकल्पना तसेच अशा अनेक तत्त्ववेत्त्यांच्या आधारे स्वत:च्या मानसिक प्रक्रियेत भारतीयतेचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. यातूनच पुढे भारतीय दर्शनं, त्यातील तत्त्वज्ञान, विश्वाकडे पाहायची दृष्टी, तंत्र- मंत्र- यंत्र असा प्रवास होत झेन बुद्धिझम, जे. कृष्णमूर्ती, तुकाराम, ओशो, रमणमहर्षी इथवर येऊन पोहोचला. ‘आतून’ उत्स्फूर्तपणे व्यक्त होणाऱ्या कलानिर्मिती प्रक्रियेची चर्चा होऊ लागली. यातून भारतीयतेचं प्रतिबिंब चित्रकलेत पडलं का, भारतीयतेशी नाळ जोडली गेली का, हे खरंच तपासायला पाहिजे. पण एक मात्र खरं : १९६०-७०च्या दशकात अनेक साहित्यिक आणि विचारवंतांनी चित्रकलेवर बरंच साहित्य मराठीत निर्माण करून ठेवलं. एक महत्त्वाचा मुद्दा येथे लक्षात घ्यायला हवा तो असा की, महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा आर्टस्कूलमध्ये शिकल्या त्यांनाच भारतीयतेच्या मुद्दय़ाने पछाडले (जिव्या सोमासारख्या चित्रकारांना भारतीयतेचा मुद्दा त्रास देत नाही). याचं कारण, आर्टस्कूलमध्ये चित्रकलेचं शिक्षण घेतलं की, माध्यमं, त्यांना हाताळण्याची तंत्रं, पद्धती, त्याचा सराव, चित्रप्रकार, विषय, त्याबद्दलचे काही शब्दसमूह, विचार करायची भाषा, अशा अनेक पातळय़ांवर पाश्चात्त्य कलेचा प्रभाव पडतो. हा प्रभाव अनेकांगी असल्यामुळे संसर्गासारखा असतो. त्या प्रभावापासून दूर जाऊन विचार करणं सहज शक्य होत नाही. त्यातही १९६०-७० पासून विचार करायला शिकवण्यापेक्षा व्यक्तिकेंद्रित अभिव्यक्तीवर आधारित कलानिर्मितीचं शिक्षण देण्यावर भर आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीयतेचं प्रतिबिंब निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष चित्ररूपात बदल करण्यापेक्षा चित्रकारांनी हा प्रश्न बौद्धिक पातळीवर सोडवण्यातच धन्यता मानली. अर्थातच, याला छेद देणारे अनेक चित्रकार आहेत. प्रभाकर बरवे, सुधीर पटवर्धन ही नावं लगेच समोर येतात. यांच्या चित्रांमधील वास्तवाकडे पाहणारी काहीशी मराठी मध्यमवर्गीय संवेदनशील दृष्टी खूप वेगळी आहे- आर्टस्कूलमधील युरोपीय वास्तववादापेक्षा (यथातथ्य चित्रणापेक्षा) थेट वास्तवाच्या अनुभवातून उमलणारी व त्या अनुभवांना चित्ररूप देऊ पाहणारी. थोडय़ा व्यापक दृष्टीनं पाहिलं तर गीव्ह पटेल, भूपेन खक्कर, तय्यब मेहता, जे. स्वामीनाथन, मनजीत बावा, असे कित्येक चित्रकार पुढे येतात. पण ते असो.
मूळ प्रश्न असा आहे की, भारतीयतेचं मूळ कसं व कुठे शोधायचं आणि हे करण्यासाठी संस्कारित चित्रकला-शिक्षणातील अनुभव किती व कसा वापरायचा. आणि त्याहून महत्त्वाचं- ते संस्कार सोडून विचार करण्याचं धारिष्टय़ कसं दाखवायचं.
अनेक परिचितांना आठवत असेल की यासंबंधात बरवे चर्चा करताना चित्रकाराच्या हेतुशुद्धतेबद्दल नेहमीच बोलायचे. कारण कदाचित शुद्ध हेतूनेच आपल्या दैनंदिन जीवनातील दृश्यानुभव, दृश्यसंबंधित अनेक सवयी, वृत्ती यांचा शोध घेता येईल. ज्यामध्ये भारतीयत्वाची मुळं असतील. उदाहरणार्थ, आपल्या धार्मिक सवयीतून दृश्याला समांतर राहून अनुभव घेणं- ‘दर्शन घेणं’ याची पद्धत/सवय यांचा संबंध काही प्रमाणात लघुचित्रांच्या द्विमितीला लागू होतो. आणि युरोपीय संस्कारांतून उमललेल्या आपल्याकडील अमूर्त चित्रकलेलाही. पण या समांतर राहून (आमोरासमोर) थेट भिडण्याच्या दृश्यसवयीबाबत कुणी अमूर्तचित्रकार बोलत नाहीत. फक्त तत्त्वज्ञानाचीच चर्चा होते.
अत्यंत वेगाने बदलणाऱ्या वास्तवात अशा प्रकारचा शोध घेणं, भारतीयतेला निरनिराळय़ा प्रकारे समजून घेऊन तिची पाळंमुळं खोदून त्यांचा आपल्या कामाशी संबंध पडताळणं- हे सर्व करणं खूप कठीण आणि दुर्मीळ आहे.
१९९० नंतर ‘गुंतवणुकीवर आधारित कलाबाजारा’मध्ये भारतीयता ही आकर्षक विक्रीयोग्य संकल्पना होणं शक्य नव्हतं. त्यामुळे भारतीयतेच्या मुद्दय़ाला बगल दिली गेली. पण हे मुळावरचं दुखणं आहे. दुर्लक्ष हे त्याचे औषध नव्हे. त्यामुळे भारतीयतेनंतरचं काय यापेक्षा, भारतीयतेचं काय याचीही चर्चा होत राहिली पाहिजे.
* लेखक हे कलासमीक्षक व चित्रकार असून गेले दशकभर कला-महाविद्यालयांशी संबंधित आहेत.
भारतीयतेनंतरचं काय?
आपली चित्रकला भारतीय असेल तरच लोकांना ती 'आपली' वाटेल, असं स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगितलं जात आहे. आज ते कुणी ऐकत नाही असं दिसतं, म्हणून मग 'भारतीयते'ऐवजी असा कोणता मुद्दा आहे की जो समाज आणि चित्रकार या दोघांना समान भूमीवर आणू शकतो? …
First published on: 16-12-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व कलाभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What after indianness