संगीत लिहिण्याची पद्धत परकीय संगीतात चांगलीच रुजली. संगीतकारानं संगीत नुसतं निर्माण करून थांबायचं नाही, तर ते लिहून ठेवायचं. त्यामुळे ती संगीतरचना जशीच्या तशी पुन्हा सादर करता येण्याची शक्यता वाढली. पाश्चात्त्य संगीताच्या कोणत्याही ‘कॉन्सर्ट’मध्ये सगळ्या वादकांसमोर लिहिलेलं संगीत असतं. ते वाचत वाचत वाजवणं अपेक्षित असतं. त्यात जराही बदल चालत नाही.
संगीत हे सृजनाचंच गाणं आहे. गळ्यातून बाहेर येणारा नादमय स्वर, वाद्यातून किंवा तालवाद्यातून व्यक्त होणारा सौंदर्यमय नाद निर्माण करण्यासाठी मेंदूतील चलबिचल अधिक महत्त्वाची असते. संगीत आधी तिथं तयार होतं. असं अवचित, अचानक नाही तयार होत संगीत. ते आधी जाणवावं लागतं. त्याची चाहूल लागावी लागते. जाणवलेलं हळूहळू स्पष्ट होत जावं लागतं. त्याचे रंग, रूप, गंध, आकार या सगळ्याचं भान यायला लागलं, की संगीताच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते. ते व्यक्त करणं वाटतं तितकं सोपं नसतं. त्याची जी प्रतिमा आपल्या मेंदूत तयार झालेली असते, ती तशीच्या तशी गळ्यातून बाहेर काढता यायला हवी. जसं सुचलं, तसं गळ्यातून नाही आलं, तर मेंदूतलं संगीत आणि बाहेर येणारं गाणं यात फारच तफावत राहायची शक्यता. पण सहसा असं घडत नाही. निसर्गत:च घडत नाही. म्हणजे जाणीव व्हायला लागल्यावर पहिल्यांदा लक्ष जातं ते आवाजाकडे. कोणत्याही प्रकारचा आवाज ज्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचतो, ते कान जन्मल्यापासूनच टवकारलेले असतात. आईचा ओळखीचा आवाज किंवा परिसरातील कोणताही नाद पटकन लक्ष वेधून घेतो. तरीही संगीत ही फारच निराळी गोष्ट ठरते. कारण ती माणसाच्या मनाचा ठाव घेते.
संगीत निर्माण करणारा प्रत्येक माणूस वेगळा. त्याची विचार करण्याची पद्धत निराळी आणि तो व्यक्त करण्याची रीतही. स्वर तेच. त्यांची परस्परांशी असलेली नातीही तशीच. पण त्यातून संगीत साकारताना प्रत्येकाचं वेगळेपण सहजपणे लक्षात येणारं. त्याची संगीताकडे बघण्याची दृष्टी आणि त्याचा स्वत:चा विचार त्यात दिसायला लागतो, तेव्हा कुठे त्याच्या हाती काही लागायला लागतं. म्हणजे प्रत्येकाची सर्जनशीलता त्यात ओतप्रोत भरल्याशिवाय त्याच्या संगीतात ‘तो’ दिसतच नाही. भारतीय अभिजात संगीताचं वेगळेपणच म्हणायचं तर ते असं आहे. राग तोच. त्याचे आरोह-अवरोह तेच. त्याचं चलनही वेगळं नाही. बंदिशही यापूर्वी अनेकदा ऐकलेली. तरीही प्रत्येक कलावंतानं ती वेगळेपणानं सादर करण्याची मात्र अपेक्षा आहे. अगदी गुरूसारखं गायलं, तरी त्याला नक्कल म्हणतील. आज सादर केलेली बंदिश यापूर्वी जेव्हा केव्हा सादर केली असेल, तशीच पुन्हा सादर केली, तरी कलावंत कमअस्सल आणि उपज नसल्याच्या आरोपाचा धनी. सतत सुचलं पाहिजे. सुचलंच पाहिजे हाच आग्रह करणारं भारतीय अभिजात संगीत गेली काही हजार र्वष अनेक वाटावळणांनी आजच्या टप्प्यावर येऊन थांबलं आहे. त्यात नव्यानं येऊ पाहणाऱ्या कुणाही सर्जनशील कलावंताला मात्र या संगीतात अजून खूप काही निर्माण करण्याची शक्ती असल्याचं जाणवतं, तेव्हा खरी गंमत कळते. म्हणजे इतकी शतकं यमन गायला किंवा वाजवला जातो आहे, पण त्यातून नवं काही व्यक्त करण्याची क्षमता संपलेलीच नाही अजून. प्रत्येक कलावंत जेव्हा या यमनाला भिडतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की अरेच्चा.. अजून यात न कळलेलं, न सांगितलेलं खूपच शिल्लक आहे की!
एका कलावंतानं आपल्या प्रतिभेनं एखादी धून तयार करावी आणि नंतरच्या पिढय़ांनी ती जशीच्या तशी सादर करण्यातच आयुष्यं  घालवावीत, हे काही भारतीय संगीतात घडत नाही. ‘जसंच्या तसं’ ही कल्पना अक्षरश: बाद करून टाकल्यानं, प्रत्येकालाच आपल्या प्रतिभेला साद घालता येते. कमी-अधिक प्रमाणात स्वत:चं काही सांगण्याची शक्यता त्यातूनच निर्माण होते. मग मला जे सुचलं, ते मी लिहून ठेवलं आणि पुढच्यानं ते तस्संच गायलं तर काय बिघडेल? भारतीय अभिजात संगीतात नक्कीच बिघडेल. मुळात हे संगीत दीर्घकाळ चालणारं. त्यातील वळणं ठरलेली असली, तरी त्यांचा आवाका फार मोठा. ते पाठ तर करता येणार नाही आणि पाठ केलेलं चालणारही नाही. विस्ताराचं अवकाशही एवढं मोठं, की छाती दडपून जावी. त्यात मुख्य कलावंतालाच महत्त्व. त्यामुळे तो जे निर्माण करेल, तेच त्याचं आकाश. भारतीय संगीतपरंपरेनं हे सारं फार कसोशीनं पाळलं. व्यक्तिकेंद्रित कला सादरीकरणामुळेही असेल, परंतु या संगीतानं ते निर्माण करणाऱ्या प्रत्येकाला त्याचं म्हणणं संगीतातून मांडण्याची मुभा दिली. प्रत्येकाच्या सौंदर्यदृष्टीनं हे संगीत रसरसून गेलं आणि त्यानं सांगीतिक विश्वालाच गवसणी घातली.
संगीत लिहिण्याची पद्धत परकीय संगीतात चांगलीच रुजली. संगीतकारानं संगीत नुसतं निर्माण करून थांबायचं नाही, तर ते लिहून ठेवायचं. त्यामुळे ती संगीतरचना जशीच्या तशी पुन्हा सादर करता येण्याची शक्यता वाढली. पाश्चात्त्य संगीताच्या कोणत्याही ‘कॉन्सर्ट’मध्ये सगळ्या वादकांसमोर लिहिलेलं संगीत असतं. ते वाचत वाचत वाजवणं अपेक्षित असतं. त्यात जराही बदल चालत नाही. म्हणजे खपवून घेतला जात नाही. कारण त्यात ते वाजवणाऱ्या वादकाची प्रतिभा उतरण्याची आवश्यकता नसते. ज्या कलावंतानं ती धून तयार केली आहे, त्याच्या सर्जनशीलतेमधून जे काही तयार झालं आहे, त्यात फेरफार न करता जसंच्या तसं सादर करणं हीच त्या वादकाची खरी कसोटी. म्हणजे सर्जनाची प्रतिभा एकटय़ाची. त्यानं सगळ्या वाद्यांच्या मेळातून स्वरांचा जो अनुभव कल्पिला आहे, तोच त्याचा आविष्कार. चुकून एखाद्यानं ऐन वेळी काही वेगळं करून पाहायचा प्रयत्न केला, तर त्याची काही खैर नाही. संगीताच्या क्षेत्रातील ही अभिजन्यता (अ‍ॅरिस्टोक्रसी) एका पातळीवर थोरच. सगळं आखीव आणि रेखीव. त्यात सादर करणाऱ्या कलावंतापेक्षा ते तयार करणाऱ्याचं महत्त्व अधिक. हे असं झालं, याचं एक कारण त्या संगीतात स्वरांचा मेळ असतो. एकाच वेळी विविध नाद निर्माण करणाऱ्या वाद्यांमधून येणाऱ्या एकत्रित स्वरांमधून अवकाश निर्माण करण्याची ही एक अतिशय लोभस अशी कल्पना आहे. जो ते तयार करतो, त्याला त्या सगळ्या वाद्यांमधून एकाच वेळी उमटणाऱ्या स्वरांच्या एकत्रीकरणानं तयार होणाऱ्या ‘साऊंड’ची पुरेपूर कल्पना असावी लागते. ते त्याचं सर्जन असतं. संगीतासारख्या प्रयोगशरण कलेत सगळं आधीच ठरवण्याची ही पद्धत अन्य स्थितिगत कलांमधून तर आली नसेल? चित्रकाराचं चित्र काढणं बघण्यासारखं नसतं. ते चित्र पूर्णत्वाला पोहोचल्याशिवाय त्यातून त्या चित्रकाराचं पूर्ण दर्शनही होऊ शकत नाही. वास्तुकाराचं वास्तूबाबतही असंच. या कला निर्माण होताना फक्त त्या कलावंताच्या प्रतिभेच्या अधीन असतात. पूर्णत्वानंतर त्याचा आस्वाद घेताना रसिकाला त्यातून नाना अर्थ जाणवत राहतील, पण तोवर त्याला थांबणं भाग असतं. पाश्चात्त्य संगीतातील ही वेगळ्या प्रकारची अभिजातता भारतीय परंपरेत रुजू शकली नाही. त्यांची वाद्यं भारतीय संगीतात स्थिरावली, पण इथल्या संगीतपरंपरेची वस्त्रं लेवूनच. व्हायोलिन असो की हार्मोनियम. त्यातून आपलं संगीत व्यक्त करण्याएवढी अचाट प्रतिभा इथल्या कलावंतांमध्ये होती.
संगीताचं लेखन करतानाचं सृजन आणि व्यक्त करताना होणारं सृजन यातला फरक या दोन्ही परंपरांचं वेगळेपण सांगणारा आहे. कितीही रियाज केला, तरी त्याचं पाठांतर करता येत नाही. रियाजात कलात्मक जाणिवांच्या शक्यतांचा वेध घेता येतो. पण प्रत्यक्ष कला सादर करताना रियाजच पुन्हा सादर होणं अपेक्षितच नसतं. तिथं रसिकांच्या साक्षीनं दरवेळी काही नवसर्जन होण्याचीच अपेक्षा असते. गुरूनं जे सांगितलं, ते तसंच सांगून चालत नाही, कारण त्यात नकलेला प्राधान्य असतं. गुरूकडून मिळालेल्या ज्ञानात शिष्य किती मोलाची भर घालू शकतो, यावर त्याच्या कलेची उंची ठरते. सर्जनाचं सळसळतं चैतन्य ज्या कलावंताच्या भाळी अधिक, तो अधिक टवटवीत. वर्षांनुर्वष तेच आणि तसंच गाणं सादर करणारा अप्रतिभावान आणि कमनशिबीसुद्धा. ज्यानं मालकंस निर्माण केला, त्यानं त्यावर हक्क सांगायचा नाही आणि ज्यानं तो सादर केला, त्यानंही फुशारकी मारायची नाही असा हा मामला. त्यामुळे कधी गाणं रंगेल आणि कधी पडेल, याचा भरवसा नाही. सर्जनाच्या अशाश्वताशी सतत खेळत राहणं हेच त्याचं भागधेय. गेली अनेक शतकं अगणित कलावंतांनी या खेळात आपलं आयुष्य खर्ची घातलं. काही नवं हाती लागल्याचं जाणवू लागेपर्यंत ते निसटून गेल्याच्या जाणिवेनं व्याकूळ होत, पुन:पुन्हा सर्जनापाशी रुंजी घालत राहणं, हेच तर भारतीय अभिजात संगीताचं वेगळंपण. तिथं संगीत लिहिणारा एकटाच. सादर करणारे अनेक. इथं सादर होतानाच नवी वाट शोधण्याचा प्रयत्न करणारा एकटाच. पण असे एकटेही अनेक!

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Important update regarding Raigad Fort Project to build Shiv Srushti at Pachad gains momentum
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
Story img Loader