आत्मकेंद्री राहणे सोडून दुसऱ्यांचा विचार केला, तर वर्तमानात जगणे सोपे जाते. दिवाळीत कुटुंबीयांसह मजेत घालवलेल्या चार घटकासुद्धा हेच सांगत असतात..
आपल्या कालगणनेत सारे सण आणि उत्सव अगदी चपखल बसवले आहेत. वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक अशा साऱ्या बाबींचा त्यात विचार झालेला आहे. दीपोत्सवाचा सण दिवाळी हा शरद आणि शिशिर ऋतूंच्या मधोमध येतो. दिवस लहान होत रात्री मोठय़ा झालेल्या असतात. थंडी पडायला लागलेली असते. अग्नीच्या प्रकाश आणि ऊब देणाऱ्या शक्तींसाठी त्याची उपासना करावयाची असते. दिव्यांची आरास करणे, आकाशकंदील लावणे या साऱ्या अग्नीच्या उपासना आहेत.
अग्नीलासुद्धा त्या उपासना आवडत असाव्यात. दिव्यांची आणि पणत्यांची आरास टिकून राहते ती त्याचमुळे. आकाशकंदील हे तर अग्नीला लेवविलेले लेणेच आहे. निरनिराळे रंग आणि आकार यांमुळे प्रकाशाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. तमाची म्हणजे अंधाराची शक्ती वाढत असते. तिला आमच्याजवळ प्रकाशाची शक्ती आहे, तुला घाबरण्याचे कारण नाही असे बजावायचे असते.
हा दीपोत्सव सलग चार दिवस चालतो. त्याला जोडून सुट्टय़ा असतात. वर्षभराच्या कामाच्या-अभ्यासाच्या रगाडय़ात करमणुकीची हौस भागवायला वेळच झालेला नसतो. ती हौस सिनेमा, नाटक, दिवाळी अंक, सहली, नातेवाईक आणि मित्रपरिवाराबरोबर जेवण आणि गप्पांचे कार्यक्रम यांमुळे भागवता येते. शिशिर ऋतूत पचनशक्तीत सुधारणा झालेली असते, कारण थंडीत जास्त ताकदीची गरज असते. त्यामुळे गृहिणी रुचकर पदार्थ करून सर्वाचीच हौस भागवतात. आता तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बाजारात तयारच मिळतात. त्यामुळे खाण्याची चंगळच असते.
या सणाला आपली सारी नाती पक्की करायची असतात. साऱ्या स्त्रीवर्गाचे वस्त्रे आभूषणे देऊन पूजन करायचे असते, हेच खरे लक्ष्मीपूजन. पाडवा आणि भाऊबीज हे दिवस तर पती-पत्नी आणि भाऊ-बहीण या नात्यांसाठी अतिशय महत्त्वाचे. पण इतरांनासुद्धा भेटी देऊन खूश करायचे असते. भेटकार्डे आता एसएमएस आणि ई-मेल हेही संदेश पाठवण्यासाठी भरपूर वापरले जातात. या सर्वच गोष्टी आवर्जून करायला हव्यात. आपण कोणासाठी तरी फार महत्त्वाचे आहोत ही भावना निर्माण होते आणि नाती व मैत्री यांचे संबंध पक्के करण्यासाठी ती खूप उपयोगी ठरते.
निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला सहलीत सहभागी होणे फारच उत्तम. नेहमीच्या त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. आपल्याकडे पाश्चात्त्यांसारखी वीक-एन्डची संस्कृती अद्याप रुजलेली नसल्याने हा वातावरणातला बदल फार गरजेचा आहे. पण यासाठी पाहुणे म्हणून कोणाकडे जाऊन तिथे सुट्टी संपेपर्यंत ठिय्या देणे शक्यतो टाळायला हवे. कारण आपला आनंद हा इतरांच्या कपाळाला आठय़ा पाडणारा नसावा.
मुलांच्या सुट्टीमध्ये नुसते हुंदडणे असण्यापेक्षा थोडेतरी नवे शिकण्याचा भाग असावा. त्यांना ट्रेकिंगचा फार फायदा होऊ शकतो. लहान मुलांची खर्च झालेली शारीरिक शक्ती चटकन भरून येते आणि या प्रक्रियेत त्यांचे आरोग्यही सुधारत असते. त्यामुळे त्यांच्या सुट्टीच्या नियोजनांत स्पर्धात्मक खेळांचा अवश्य अंतर्भाव असावा. दिवाळी ही फक्त आपल्या छंदासाठीच न वापरता शक्यतो कुटुंबासाठी आणि मित्रपरिवारासाठीही काही वेळ काढावा. कारण आपल्या वेळांवर इतरांचाही अधिकार असतो. तो डावलला गेल्याने संबंध पक्के होण्याऐवजी त्यांत दुरावा निर्माण होतो. मग ती गोष्ट आपल्याच सुख-समाधानाच्या आणि आनंदाच्या आड यायला लागते. एकत्र वेळ घालवताना आपल्याप्रमाणेच इतरांच्याही आवडीनिवडी विचारात घ्याव्या लागतात याचे भान विसरता कामा नये.
दिवाळीचा उत्सवच मुळी तृप्तीच्या म्हणजेच लक्ष्मीच्या आराधनेकरिता असतो. जे करावेसे वाटते, पण वेळेच्या अभावी शक्य होत नाही ते करून घ्यायचे, पण त्याच्यासाठी मनात तृप्तीची भावना जोपासायची. जे अतिशय आवडीचे असते त्याबद्दल नैसर्गिक ओढ अतृप्तीकडेच असते. आणखी हवे, पुन्हा केव्हा मिळेल असे वाटणे म्हणजे अतृप्तीची वाढ होऊ देणे असते. तृप्ती ही मनातली भावना आहे आणि आनंदाप्रमाणेच आपला अनुभवाला आलेला प्रतिसाद आहे, हे पक्के ध्यानात ठेवायला हवे. म्हणजे मग मनात वखवख निर्माण होत नाही. ‘चित्ती असू द्यावे समाधान’ ही तुकोबांची शिकवण याकरताच आहे.
सुट्टी, सण, उत्सव हे त्यांचा मनापासून आनंद घेण्याकरिता असतात. पण आपल्या मनाला भूतकाळातच रमण्याची किंवा भविष्यातल्या घटनांचा धसका घेण्याची सवय असते. मागे घडलेली एखादी घटना उदास करीत असते किंवा भविष्यकाळात उभे राहणारे एखादे आव्हान धडकी भरवत असते. हे भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे झोके बंद करून पूर्ण वर्तमानात राहण्याची कला साधायला हवी. म्हणजे मग उत्सवाचा खरा आनंद उपभोगता येतो. लहान मुलांचा सहवास हा उत्तम उपाय आहे. ती सतत वर्तमानातच असतात. भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून पडण्याचा त्यांचा स्वभावच नसतो. त्यांनाच वर्तमानात जगण्याच्या कलेत गुरू मानायला हवे.
आपल्या मनाचे हे भूत-भविष्याचे झोके वाढायला लागले म्हणजे सारा आनंदच नाहीसा होऊन जातो. झोके वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जास्त आत्मकेंद्रित व्हायला लागतो हेच आहे. निवृत्ती जवळ आलेली असताना माझ्या एका सहकाऱ्यावर खूपच मोठी जबाबदारी येऊन पडली. त्याचे अभिनंदन करायला गेलो तेव्हा तो खूपच चिंतेत पडलेला दिसला. केव्हा एकदा हे नोकरीचे दिवस संपतात आणि आपण निवृत्त होतो असे त्याला झाले होते. मी त्याला म्हटले- ‘या पदावर राहून तू कितीतरी लोकांचे भले करू शकशील. त्यांच्याबद्दल विचार कर. म्हणजे तुझे काम उत्तम होईल.’
सण आणि सुट्टय़ा तुम्ही आनंदात घालवायला लागलात की तुमच्या मनाची शक्ती वाढते आहे अशी पक्की खूणगाठ बांधा. दुबळ्या मनाच्या लोकांना कशातच आनंद वाटत नाही. तुम्हालाच नव्हे तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानाच आनंदाचा अधिकार आहे. तो सर्वानी मिळून बजावण्यासाठी दीपावलीचा उत्सव आहे हे ध्यानात असू द्या. म्हणजे मग ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्यामुळे इतरांनाही आनंदाची जाईल हे नक्की!
सर्वानाच आनंद मिळू दे!
आत्मकेंद्री राहणे सोडून दुसऱ्यांचा विचार केला, तर वर्तमानात जगणे सोपे जाते. दिवाळीत कुटुंबीयांसह मजेत घालवलेल्या चार घटकासुद्धा हेच सांगत असतात.. आपल्या कालगणनेत सारे सण आणि उत्सव अगदी चपखल बसवले आहेत. वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक अशा साऱ्या बाबींचा त्यात विचार झालेला आहे.
First published on: 14-11-2012 at 04:35 IST
मराठीतील सर्व आनंदयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a %e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6 %e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a5%82 %e0%a4%a6%e0%a5%87