परोपकार किंवा सेवा हीसुद्धा ईश्वराचीच पूजा होते, सेवा होते. पण आपण जगाला मदत करायला जातो त्याचा हेतू काय असतो? तर जग सुखी व्हावे, जग सुधारावे, जगात दुख उरू नये. जग दुखमुक्त व्हावं म्हणून, ते सुधारावं म्हणून माणूस आपल्यापरीने काम करीत राहतो तसेच काहीजण मोठमोठी सामाजिक कामेही उभारतात. अनेक चळवळी उभारा पण त्यांना भगवंताचं अधिष्ठान मात्र पाहिजे, असं समर्थानीही बजावलं होतं. प्रत्यक्षात अहंकाराचंच अधिष्ठान आपल्या सेवेला, कामाला, सुधारणांना लाभतं. ईश्वराची कर्मफुलांनी पूजा म्हणून होणारी ही सेवा जर निरभिमानी नसेल तर त्यातून अहंकार वाढतो आणि वृत्तीचाच नाश होतो. वृत्तीचा नाश हा तर परमार्थाचाच घात आहे. मग ‘‘ज्याला कोणी नाही त्याचे करणे ही देवाची सेवाच नाही का?’’(बोधवचने, क्र. ४७०) या श्रीमहाराजांच्या वाक्याचा व्यापक आणि गूढ अर्थ काय असावा? तो उकलण्यासाठी श्रीनिसर्गदत्त महाराज यांच्या संवादाकडे वळू. जगातला अनाचार, दुराचार, अत्याचार याबाबत एक पाश्चात्त्य साधक तावातावाने बोलत होता. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणाले, ‘‘चेहरा बदलल्याशिवाय तुम्ही प्रतिबिंब बदलू शकत नाही. अगोदर हे पक्के जाणा की तुमचे जग तुमचे स्वतचेच प्रतिबिंब आहे. उगाच प्रतिबिंबाला दोष देऊ नका. स्वतकडे लक्ष पुरवा. मानसिक आणि भावनिक दृष्टीने स्वतला नीट सुधारा. मग भौतिक जग आपोआप सुधारेल. तुम्ही आर्थिक, सामाजिक, राजकीय सुधारणांबद्दल एवढे बोलत असता. सुधारणा राहू द्या. अगोदर सुधारणा करणाऱ्यांकडे लक्ष पुरवा. मूर्ख, अधाशी, निष्ठुर असणारा माणूस कशा प्रकारचे जग निर्माण करू शकेल?’ त्यावर साधक स्पष्टपणे सांगतो, ‘हृदयपरिवर्तनाची वाट पाहावी लागणार असेल तर आम्हाला अनिश्चित काळापर्यंत वाट पाहावी लागेल. आपला सल्ला परिपूर्णतेचा आहे आणि निराशाजनकही आहे. सारे लोक पूर्ण होतील तेव्हा जगही पूर्ण होईल, हे सर्वपरिचित सत्य किती निरुपयोगी आहे!’ त्यावर श्रीनिसर्गदत्त महाराज ताडकन् उत्तरतात, ‘‘पण मी ते उच्चारलेले नाही. मी एवढेच म्हटले की, स्वतला बदलल्याखेरीज तुम्ही जग बदलू शकत नाही. ‘प्रत्येकाला बदलल्याखेरीज’ असे मी म्हटलेले नाही. दुसऱ्यात बदल घडविण्याची जरुरी नाही, तसे करणे शक्यही नाही. पण तुम्ही स्वतला बदलू शकता. मग तुम्हाला असे आढळेल की दुसऱ्या कोणत्याच बदलाची जरुरी नाही.’’ तेव्हा खरे परिवर्तन आंतरिक आहे. ते होत नाही तोवर बाह्य़ परिवर्तनाची शक्तीही लाभणार नाही. श्रीनिसर्गदत्त महाराजांचंच वाक्य आहे, ‘दुसऱ्यांना मदत करण्यासाठी अगोदर स्वतला मदतीची गरज असता कामा नये.’ तेव्हा ‘ज्याचं कुणी नाही त्याचं करणे ही देवाचीच सेवा’ हे खरे पण ज्याचं कुणी नाही, असा खरा कोण आहे? या जगात कुणी कुणाचा नाही, आपलं कुणीही नसतं, येताना माणूस एकटाच आणि जातानाही एकटाच असतो, असं तत्त्वज्ञान आपल्याला तोंडपाठ आहे. त्यामुळे ज्याचं कुणी नाही, असे आपण स्वतच आहोत! आपल्यालाच मदतीची आणि सुधारणेची गरज आहे!
१००. ज्याचं कुणी नाही असा कोण?
परोपकार किंवा सेवा हीसुद्धा ईश्वराचीच पूजा होते, सेवा होते. पण आपण जगाला मदत करायला जातो त्याचा हेतू काय असतो? तर जग सुखी व्हावे, जग सुधारावे, जगात दुख उरू नये. जग दुखमुक्त व्हावं म्हणून, ते सुधारावं म्हणून माणूस आपल्यापरीने काम करीत राहतो तसेच काहीजण मोठमोठी सामाजिक कामेही उभारतात.
आणखी वाचा
First published on: 22-05-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 who is whos not anybody