अमेरिकी आणि आफ्रिकी कथेची ही सद्य:स्थिती मराठीला आत्मपरीक्षण करायला लावणारी..
जगभरातून ‘कथा’ साहित्याची पीछेहाट होत असल्याच्या बोंबा आपण मराठीत उतरणीला लागलेल्या या साहित्य प्रकारावरून करतो. त्यात वाचन साचलेपणा हा आपल्याकडच्या वाचकांचा सर्वात मोठा दोष आहे. शिवाय पन्नास-साठ वर्षे ‘थोर’पदाची खुर्ची अडवून बसलेली महान मंडळी कथाप्रकाराला तुच्छ लेखून बापुडय़ा वाचकांचा बुद्धिभेद करण्यात यशस्वी वगैरेही झाली आहेत. आज कुठलीही चार-दोन नावाजलेली मराठी मासिके घेतली, तर वैचारिकतेच्या नावाखाली आंबलेल्या विचारांचा शब्दसडा पाडत आणि कथनसाहित्याला मागे टाकत मार्गक्रमण करताना दिसत आहेत. याउलट हिंदूीतील हंस, कथादेश, वर्तमान साहित्य, पहल, वागर्थ आदी भल्या मोठय़ा यादींतील नियत-अनियतकालिकांनी कथा साहित्याचा मान राखत त्याला पुरेशी जागा आणि वेळ दिलेला दिसतो. नव्या लेखनाला नाकारत आणि साठोत्तरीत-नव्वदीत लिहू लागलेल्याच लेखक कथाकारांना कुरवाळत सुरू असलेला मराठीतील मासिक आणि वार्षिक कथाव्यवहार अनेकांगानी दुष्टचक्रात सापडला आहे. अपवाद वगळता ‘बोरियत’ने भरलेल्या आणि त्याच- त्याच नावांनीही कंटाळा आलेल्या कथाकारांच्या फौजेने वाचकांना या साहित्यप्रकाराची भीती वाटावी अशीच ‘मोला’ची भर टाकली आहे. चार-दोन लुटूपुटू कथास्पर्धामधून मराठी कथेत कणभरही भर पडत नाही. एकीकडे मराठीत ही कथाअस्ताची स्थिती असताना अमेरिकेतील ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ या कथापुस्तक प्रकल्पाला वाजत-गाजत यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे विविध मासिकांतून निवडलेल्या २० कथांचे एक पुस्तक बाजारात दाखल होणार आहेच. त्याशिवाय गेल्या १०० वर्षांतील सवरेत्कृष्ट अमेरिकी कथांचे पुस्तकही ‘हॉटन मिफ्लिन बुक्स’ या प्रकाशन संस्थेच्या वतीने काढण्यात आले आहे. प्रसिद्ध कथालेखिका लॉरी मूर यांनी संपादित केलेल्या या ग्रंथात अमेरिकी कथालेखकांच्या तीन चार पिढय़ांतील कथासम्राटांनी घडविलेले ‘कथाहोत्र’ एकत्रित करण्यात आले आहे. विल्यम फॉकनर, एड्ना फर्बर यांच्यापासून आजचे जॉर्ज सॉण्डर्स, झुम्पा लाहिरीपर्यंत कथालेखनात मोलाचे योगदान देणारे तोलामोलाचे साहित्यिक आहेत.
पहिल्या महायुद्धाच्या काळापासून अमेरिकी मासिकांमध्ये वर्षभरात छापून आलेल्या कथांपैकी सर्वोत्तम वाचकांना देण्याचा हा प्रकल्प अव्याहत सुरू आहे, हे कथाविश्वातील आश्चर्य आहे. यात दशकातील अत्यंत महत्त्वाच्या लेखकाला एका वर्षीचे संपादकत्व दिले जाते. त्याने शेकडो-हजारो कथा वाचून निवडलेल्या २० कथांच्या पुस्तकांचा हा गुच्छ कथाप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. (इतका की तो सेकंडसेल बाजारात क्वचित मिळतो आणि प्रकाशनानंतर अल्पावधीत संपतो) यंदाच्या कथामालिकेचे संपादक कथाकार टी.सी. बॉयल असल्याचे जाहीर झाले असले, तरी अद्याप त्यांनी निवडलेल्या कथांची यादी दाखल न झाल्याने मानाच्या १००व्या कथामालिकेचे कुतूहल वाढले आहे.
अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कर, हार्पर्स, झोइट्रोप, अटलांटिक मंथली या वैचारिकतेसोबत पुरेशा प्रमाणात साहित्य प्रसवणाऱ्या आघाडीच्या नियतकालिकांसोबत विद्यापीठांची अग्रगण्य मासिके (लोवा रिव्ह्यू, व्हीक्यूआर) आहेत. यांसोबत व्हाइस, नेसेसरी फिक्शन, अमेरिकन रीडर, जॉयलॅण्ड, कॉलेजिस्ट, टिन हाऊस, अग्नी ऑनलाइन यांसारखी निव्वळ साहित्याला वाहिलेली शेकडो मासिके अखंडित निघत आहेत. ‘इमर्जिग रायटिंग’सारख्या शेकडो स्पर्धा, शिष्यवृत्त्या आणि लेखनअनुदान, लेखननिवास सारख्या प्रोत्साहनांनी आणि विद्यापीठ, महाविद्यालयांमधून सर्जनशील लेखनाचा विषय यांमुळे कथालेखनाला व्यासपीठ आणि प्रोत्साहन यांचे मुबलक अनुकूल वातावरण आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या कथांची संख्या शेकडोंच्या घरात असल्यामुळे त्यांचा पाठपुरावा करत विविध निकषांवर तावून सुलाखून ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ ही कथामालिका तयार होते. (निबंध, क्रीडा पत्रकारिता, गुन्हेविषयक लिखाण आणि इतरही अनेक गटांमध्ये विखुरलेल्या लेखनाचेही या प्रकारे संकलन होते.) या कथानिवडीमध्ये त्या त्या संपादकाची आवड-निवड शामील असली, तरी कथा वाचताना, वेळ फुकट गेल्याचे दु:ख कधी वाटत नाही इतके विषय वैविध्य कथांमध्ये असते.
या अमेरिकी कथाहोत्राच्या प्रेरणेने आपल्याकडे राम कोलारकर आणि छाया कोलारकर या दाम्पत्याने ‘सवरेत्कृष्ट मराठी कथा’ नावाचे २० खंड तयार केले होते. ‘ऐतिहासिक मराठी कथां’पासून वैविध्य असलेल्या या खंडांचे महत्त्व मराठी वाचकांना समजले नाही, तितकेच ऊठसूट भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्यासाठी लढण्याची पोकळ भाषा करणाऱ्या कुठल्याच शासनव्यवस्थेला कळाले नाही. (उत्तरकाळात पुरस्कार ही कामाला पावती होती, पण त्या दाम्पत्याचे काम अव्याहत सुरू राहवे यासाठी शासनाने काहीच केले नाही.) या दाम्पत्याच्या कार्यकाळाचा अस्त झाला तेव्हा मराठी कथा आक्रसली होती. आज सवरेत्कृष्ट मराठी कथा यासारखे वार्षिक पुस्तक करायचे झाले, तर निवड ही अवघड गोष्ट बनेल. त्यामुळे दूर असलेल्या ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’च्या शंभराव्या वर्षांतील पुस्तक प्रकल्पाकडे कौतुकाने पाहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.
सध्या ‘समर रीडिंग’ विशेषांक काढण्यामध्ये अमेरिकी मासिकांमध्ये स्पर्धा सुरू असून, न्यूयॉर्करने ‘जोनाथन फ्रॅन्झन’ यांच्या ३५ पानी (प्रिंटआऊटच्या) कथेपासून आघाडीच्या पाच अमेरिकी लेखकांना सोबत घेऊन कथाविशेषांक काढला आहे. व्हाइस मॅगझिनच्या फिक्शन इश्यूमध्येही नामांकित लेखकांचा भरणा आहे. अमेरिकन रीडर, व्हीक्यूआर यांच्याही उपलब्ध अंकांमध्ये खणखणीत कथांची मात्रा मोठी आहे. आपल्याकडे दिवाळी अंकांमध्ये येते, तितके भरमसाट आणि गुणवंत लेखकांच्या साहित्याने समर रीडिंग विशेषांक अमेरिकेत निघतात. ही साहित्यसंपदा ऑनलाइन स्वरूपात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातील अंमळ भागाचा जरी आस्वाद घेतला, तर आजच्या आपल्या मराठी कथन साहित्याची खोली कळून येईल.
आंतरराष्ट्रीय कथाक्षेत्रात गेल्या दशकभरात मान मिळविणारा ‘केन’ पुरस्कार या आठवडय़ात जाहीर झाला. आफ्रिकी राष्ट्रांमधील सवरेत्कृष्ट कथेला तो दिला जातो. झांबियामध्ये जन्मलेल्या अमेरिकी लेखिका नामवाली सरपेल यांनी हा पुरस्कार पटकावून पहिल्यांदाच झांबिया देशाकडे हा पुरस्कार नेला. त्याशिवाय त्यांनी एक नवा पायंडाही पाडला. पुरस्काराच्या १५ हजार डॉलर रकमेला त्यांनी इतर चार स्पर्धकांमध्ये वाटून टाकले. ‘कथास्पर्धेमधील सर्वच कथा तोडीस तोड असल्याने त्यात पैशांचा संबंध नको.’ असे म्हणत त्यांनी रकमेचे पाच भाग करून सर्वाना चाट पाडले. त्यांची विजेती ‘सॅक’ ही कथा पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून, त्यासोबत टिन हाऊसने मागे प्रसिद्ध केलेली ‘बॉटम्स अप’ नावाची कथा या आठवडय़ात वाचकांसाठी ऑनलाइन उपलब्ध केली आहे. २००९ सालीदेखील या लेखिकेची ‘मुझुंगू’ ही झांबियातील वय वर्षे ९ असलेल्या निवेदक मुलीची कथा केन पुरस्काराच्या अंतिम पाचात दाखल झाली होती. त्या कथेला त्यावर्षीचा पुरस्कार मिळाला नव्हता. मात्र ‘बेस्ट अमेरिकन शॉर्टस्टोरीज’च्या त्याच वर्षांच्या अंकात ती मुद्रित झाली आहे. कथासाहित्याच्या पीछेहाटीची ओरड मराठीत कितीही होवो, वाचकाला इतर भाषेत पर्याय कमी नाही. मराठीला मारून मुटकून अभिजात दर्जा मिळेलही कदाचित.. पण त्यानंतर आटत चाललेल्या साहित्यप्रवाहाविषयी, लोकांच्या जगण्यातून मराठीतील साहित्यवाचन मंदावण्याच्या स्थितीत बदल होईल काय? मराठीच्या दु:स्थितीवर गळा काढणारे तुम्ही, आम्ही, आपण सगळेच आणि साहित्य व्यवहाराशी संबंधित उरलेल्या नियतकालिकांचे संपादक यांनी स्वत:ला हा प्रश्न विचारण्याची हीच वेळ आहे. अन्यथा ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ची दोनशे वर्षे साजरी होताना मराठी भाषेत साहित्य निर्माण होण्याची शक्यताही धूसर वाटते.
loksatta@expressindia.com
‘कथा’होत्राची १०० वर्षे
अमेरिकी आणि आफ्रिकी कथेची ही सद्य:स्थिती मराठीला आत्मपरीक्षण करायला लावणारी..

First published on: 11-07-2015 at 12:23 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 years of the best american short stories