या जगात ज्याचं कुणी नाही, असे आपणच आहोत आणि आपल्यालाच मदतीची गरज आहे. जेव्हा ती गरज पूर्ण होईल तेव्हाच आपण जगाला खऱ्या अर्थाने मदत करू शकू. आता कोणत्या मदतीची आपल्याला गरज आहे आणि ती नेमकी कशी लाभेल, याचा विचार आपण तपशिलात करूच. पण तो सुरू करण्याआधीच्या उंबरठय़ावर थोडं विषयांतर करू. कालचा भाग वाचून काही जणांच्या मनात थोडा विकल्प आला असू शकतो. हे ‘चैतन्य चिंतन’ असताना त्यात श्रीनिसर्गदत्त महाराजांच्या विचारांची जोड कशाला, असं कुणाला वाटेल आणि श्रीमहाराजांनाही हेच सांगायचं असेल कशावरून, असंही काहींच्या मनात येईल. खरं तर सत्य एकच असतं आणि वेगवेगळ्या सत्पुरुषांनी ते सांगितलं तरी ते एकच असतं! श्रीनिसर्गदत्त महाराजांच्या सांगण्याचं सार असं की, ‘चेहरा बदलल्याखेरीज प्रतिबिंब बदलू शकत नाही. चेहऱ्यातच दोष आहे म्हणून तो प्रतिबिंबातही आहे. जग हे तुमचेच प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब म्हणजे जग सुधारायचे तर आधी स्वतला सुधारा मग भौतिक जग आपोआप सुधारेल.’ आता श्रीगोंदवलेकर महाराजांनीही हेच सांगितलं. पुराव्यासाठी १४ ऑक्टोबरचं प्रवचन पाहा. त्यात श्रीमहाराज निक्षून सांगतात की, ‘‘परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात, असे काही माणसांना वाटते. पण अमुक एका देहामार्फतच लोककल्याण व्हावे, अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामथ्र्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही, असेही म्हणता! तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.’’ याच प्रवचनात श्रीमहाराज पुढे म्हणतात, ‘‘आपण सात्त्विक कृत्ये करतो, पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्त्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तइष्टांना मदत केली आणि ते म्हणू लागले की, ‘यात याने काय केले? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली’, हे ऐकून मला वाईट वाटते! वास्तविक त्यांना परमात्मा आठवला आणि मी मात्र ‘मी दिले’ असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो! परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले, हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे कारण काय?’’ आता या वाक्यांवरूनही आपल्या मनात विचारकल्लोळ सुरू झाला असेल. तो निस्तरू.

Story img Loader