स्वार्थ म्हणजे काय? जिथे ‘स्व’ म्हणजे ‘मी’लाच अर्थ आहे तो स्वार्थ. ‘मी’ आणि ‘माझे’ यांची चौकट जपण्याची अखंड धडपड म्हणजे स्वार्थीपणा आहे. माझा प्रपंच या स्वार्थीपणानेच भरला आहे. ‘मी’ आणि ‘माझे’चं पोषण व्हावं, जपणूक व्हावी, त्यांना कधीही धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी क्षणोक्षणी माझी धडपड आहे. ‘मी’ आणि ‘माझे’च्या जपणुकीची इच्छा मला कितीही असली तरी बाह्य़ परिस्थिती आणि इतर माणसांची त्याला साथ लाभेलच, याची काही खात्री नाही. त्यामुळे त्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडण्याचीही शक्यता पदोपदी आहे. त्यामुळे माझी इच्छापूर्ती न साधण्याची भीती मनात वावरते. थोडक्यात जिथे स्वार्थ आहे तिथे भीती आहेच. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे निर्भयता आहेच. मी जसजसा निस्वार्थी होत जाईन तसतशी निर्भयताही मला लाभेल. आता अनंत जन्म स्वार्थपूर्तीचीच सवय माझ्यात रूजली असताना निस्वार्थी होणं माझ्या ताकदीवर मला साधणार नाही. जन्मापासून मरणभयापासून अनंत प्रकारचे भय मनात वावरत असताना माझ्या ताकदीवर निर्भय होणं मला साधणार नाही. कोणताही कमकुवत आधार मला निस्वार्थी आणि निर्भय करू शकणार नाही. त्यासाठी परम आधाराचीच गरज आहे. श्रीसद्गुरूंचा बोध आणि त्यानुरूप आचरणाचा प्रयत्न हाच तो परमाधार आहे. नुसता बोध हा परमाधार नाही. त्या बोधानुरूप आचरणाचा प्रयत्न हाच परमाधार आहे. पहा बरं, इथे बोधानुरूप आचरण असं म्हटलेलं नाही. कारण जसा त्यांचा बोध आहे अगदी त्यानुरूप अचूक आचरणही मला साधू शकत नाही. पण मी त्यासाठी प्रयत्न करू शकतो. अभ्यास करू शकतो. कधी चुकणे कधी बरोबर येणे हाच अभ्यास आहे, असे श्रीगोंदवलेकर महाराजांनीही सांगितलं आहे. तेव्हा त्या बोधाला धरून जगण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. तसा प्रामाणिक प्रयत्न मी केला तर हळुहळू निस्वार्थीपणा म्हणजे काय हे उमगू लागेल आणि स्वार्थरहित व्यवहारही साधेल. त्याचबरोबर बोधाचं सदोदित चिंतन मनात सुरू राहिलं की ज्यानं तो बोध केला आहे त्याचं अनुसंधान आपोआपच साधू लागेल. अखंड अनुसंधान आणि निस्वार्थीपणा म्हणजेच ‘मी’ आणि ‘माझे’च्या जागी ‘तू’ आणि ‘तुझे’ची स्थिती येईल. श्रीगुरूदेव म्हणाले, आज तुम्ही घरदार, माणसं यांना धरून माझे माझे करीत जगत आहात. एक क्षण असा येईल की सर्वकाही इथेच टाकून निघावेच लागेल. माझं एवढं काम बाकी आहे ते करू दे, मुलाचं लग्न बाकी आहे ते होऊ दे, दुसरं घर नोंदवलं आहेच तिथे काही दिवस राहू दे, अशी कोणतीही कारणं ‘मृत्यू’ ऐकूनही घेणार नाही. सारं काही सोडावंच लागेल. जर असं सोडावं लागत नसतं तर मग मी तुमचं ‘माझं माझं’ करणं वावगं मानलं नसतं. पण जे कोणत्याही क्षणी सोडावंच लागणार आहे ते आत्ताच मनानं का सोडत नाही? देहानं सोडू नका. सर्व कर्तव्यं करा. प्रेमानं राहा. आनंदात राहा. पण मनातून साऱ्याचा त्याग करा. जर मनानं त्याचा आज त्याग करू शकलात तर प्रत्यक्षात सोडावं लागेल तेव्हा मनाला दुख होणार नाही!
१०९. सोडवणूक
स्वार्थ म्हणजे काय? जिथे ‘स्व’ म्हणजे ‘मी’लाच अर्थ आहे तो स्वार्थ. ‘मी’ आणि ‘माझे’ यांची चौकट जपण्याची अखंड धडपड म्हणजे स्वार्थीपणा आहे. माझा प्रपंच या स्वार्थीपणानेच भरला आहे. ‘मी’ आणि ‘माझे’चं पोषण व्हावं, जपणूक व्हावी, त्यांना कधीही धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी क्षणोक्षणी माझी धडपड आहे.
First published on: 04-06-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 109 extrication